मत आमचेही
श्रीनिवास बिक्कड
भर पावसात हजारो मराठा बांधव दृढ निश्चयाने जिद्दीने लढत आहेत. अभूतपूर्व जन आंदोलनाने सत्तेत बसलेल्या चतुर लोकांची कुटील कारस्थाने व डावपेच एका क्षणात उद्ध्वस्त झाले. त्यांचा राक्षसी बहुमताचा अहंकार एका प्रामाणिक माणसासमोर टिकू शकत नाही हे स्पष्ट झाले.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी “चलो मुंबई”चा नारा दिला आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत आले. चार महिन्यांपासून या आंदोलनाची तयारी सुरू होती. याबाबत सरकारला वारंवार सूचना, इशारे दिले होते; पण सरकारने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. आंदोलनाची वेळ आल्यावर गणेशोत्सवाचे कारण पुढे केले. हिंदुत्वाचे कार्ड खेळून पाहिले. आपल्या हस्तकांमार्फत न्यायालयात याचिका दाखल करून आंदोलन रोखण्याचा प्रयत्न झाला. पण सरकारी डावपेचांना कात्रजचा घाट दाखवत ट्रॅक्टर, ट्रक, टेम्पो, चारचाकी वाहनांत कपडे, धान्य, जेवणाचे साहित्य घेऊन लाखो मराठा आंदोलक २९ ऑगस्ट रोजी मुंबईत धडकले. राजधानीत धडकलेल्या या मराठा वादळाची तीव्रता पाहून हादरलेल्या सरकारने केवळ एका दिवसासाठी आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी दिली. पण या एका दिवसात राक्षसी बहुमताच्या सरकारला हलवून सोडणारा जनआक्रोश संपूर्ण देशाने पाहिला. महायुती सरकारने केलेल्या फसवणुकीविरोधात पहिल्या लढ्याचे रणशिंग या विशाल जनआंदोलनाच्या माध्यमातून फुंकले गेले आहे.
अनैतिकतेच्या पायावरील सत्ता
केंद्रातील सत्तेचा, राजभवनाचा गैरवापर करून, पक्ष फोडून, लोकशाही आणि संविधानाला धाब्यावर बसवून महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले. त्यानंतर अनैतिक मार्गाने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांचे सर्व रेकॉर्ड मोडले. त्यामुळे जनतेत संताप उसळला आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीचा राज्यात मोठा पराभव झाला. लोकसभा निकालानंतर विधानसभा निवडणुकीत सत्ता हातातून जाणार हे स्पष्ट दिसू लागल्याने महायुती सरकारने सत्तेच्या लालसेपोटी वारेमाप खोटी आश्वासने दिली. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, लाडकी बहिण योजनेतून महिलांच्या खात्यात दरमहा २,१०० रुपये, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थक्षेत्र योजना, डझनावारी महामंडळाची स्थापना अशा घोषणा करून जनतेची दिशाभूल केली. याचबरोबर लोकांच्या खऱ्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी लव्ह जिहादसारखे कृत्रिम मुद्दे उभे केले गेले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा-ओबीसी संघर्ष निर्माण करण्यात आला. निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला. मतदार याद्यांमध्ये घोळ करून बोगस मतदार वाढवण्यात आले आणि शेवटी या फसवणुकीतून निवडणूक जिंकली.
बहुमत आणि विसरलेली आश्वासने
सरकारकडे राक्षसी बहुमत असल्याने सरकारमध्ये बसलेल्या लोकांचे वागणे सरकारचे काम बेफामपणे सुरू झाले. आमच्याकडे प्रचंड बहुमत आहे, आम्हाला जे वाटेल ते आम्ही करू अशा अंहकारी वृत्तीने काम सुरू झाले. बहुमताचा कैफ चढल्याने आश्वासनांचा विसर पडला. आम्ही शेतक-यांची कर्जमाफी करू, असे म्हटलोच नाही, लाडक्या बहिणींना २,१०० रुपये लगेच देऊ, असे म्हणालोच नाही, अशी उद्दाम वक्तव्ये सरकारमधील मंत्री करू लागले. कर्जमाफीच्या आश्वासनांची आठवण करून देणा-या शेतक-यांना भिकारी म्हणण्यापर्यंत या सरकारची मजल गेली. सत्तेवर येताच ज्येष्ठ नागरिक तीर्थक्षेत्र योजना बंद केली. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत दिलेली आश्वासने हवेत विरली. मात्र निवडणुकीपूर्वी जनतेच्या प्रचंड विरोधामुळे बासनात गुंडाळून ठेवलेला शेतक-यांना देशोधडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन त्याची अधिसूचना काढली. पोलिसी बळाचा वापर करून या महामार्गासाठी भूसंपादनही सुरू केले. जनतेची गळचेपी करणारा जनसुरक्षा कायदा बहुमतच्या बळावर विधिमंडळात पारित करून घेतला.
शेतकरी आणि जनतेचा आक्रोश
गेल्या दोन महिन्यांपासून राज्याच्या विविध भागात अतिवृष्ठीने प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. राज्यभरातील २२ जिल्ह्यांत २५ लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. घर आणि गोठ्यांची पडझड झाली असून ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून पशुधनांची मोठी हानी झाली आहे. पण सरकारकडून अद्याप कोणालाही मदत मिळाली नाही. पंचनाम्याचे आदेश दिल्याचे सरकार सांगत आहे. पण प्रत्यक्षात पंचनामे सुरू नाहीत. नदी - नाले - ओढ्यांना पूर आले आहेत. शेतामध्ये पाणी आहे ते ओसरेपर्यंत शेतातलं पिकच अस्तित्वात राहणार नाही, मग सरकार कशाचे पंचनामे करणार आहे? नांदेड जिल्ह्यात पुरात घरातील सामान धनधान्य आणि पशुधन वाहून घेल्याने आक्रोश करणा-या शेतक-याचा समाजमाध्यमावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यावर दगडालाही घाम फुटला असता, पण सत्तेवर बसलेल्या असंवेदनशील लोकांवर अशा गोष्टींचा काही परिणाम होत नाही. राज्यात रोज सहा शेतकरी आत्महत्या करत आहेत पण सरकारला याचे काही सोयरसुतक नाही.
मराठा समाजाची फसवणूक
२०२४ च्या जानेवारी महिन्यात मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलन केले होते. मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हजारो बांधव मुंबईच्या वेशीवर नवी मुंबईत आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या म्हणून गुलाल उधळला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असे सांगून जरांगे पाटलांचे उपोषण सोडवले. पण आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याऐवजी आपल्या हस्तकांमार्फत मराठा ओबीसी वाद निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेतली. असे वाद निर्माण करून महागाई, बेरोजगारी कायदा सुव्यवस्था महिला सुरक्षा भ्रष्टाचार आणि गैरकारभार या ज्वलंत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवून आपण सत्ता भोगू, असा विश्वास निर्माण झाल्याने सत्ताधारी जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी लोकांना एकमेकांशी झुंजवत ठेवून सत्तेची मलई खात बसले. याच अतिआत्मविश्वासातून त्यांना मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला. त्यामुळे मराठा समाजावर पुन्हा मुंबईत येऊन आंदोलन करण्याची वेळ आली आणि एक अभूतपूर्व असे जनआंदोलन सुरू झाले आहे.
बहुमताचा अहंकार गळाला
लाखो मराठा आंदोलक मुंबईत धडकले आणि सरकारची झोप उडाली. मनोज जरांगे पाटलांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे सत्ताधारी नेत्यांचे बगलबच्चे बिळात जाऊन लपले. जिभ हासडण्याची भाषा करणा-यांची बोबडी वळली. खाऊगल्ल्या, दुकाने बंद करून आंदोलकांची कोंडी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेला. पण मुंबईसह राज्यभरातील लोकांनी आंदोलकांसाठी चहा पाणी आणि जेवणाची व्यवस्था केली. मुस्लिम बांधवांनी ठिकठिकाणी आपल्या परीने शक्य ती मदत केली. मुंबईकरांनाही कुठलीही तक्रार न करता राज्याच्या काना कोप-यातून आलेल्या आंदोलकांच्या मागणीला पाठिंबा दिला. पडत्या पावसात हजारो बांधव दृढ निश्चयाने जिद्दीने लढत आहेत. या अभूतपूर्व जन आंदोलनाने सत्तेत बसलेल्या चतुर लोकांची कुटील कारस्थाने व डावपेच एका क्षणात उद्ध्वस्त झाले. त्यांचा राक्षसी बहुमताचा अहंकार एका प्रामाणिक माणसासमोर टिकू शकत नाही हे स्पष्ट झाले.
मनोज जरांगे पाटलांचा प्रामाणिकपणा आणि समाजासाठीची तळमळ यामुळे लाखोंचा जनसमुदाय त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. हा पाठिंबा फक्त आंदोलनापुरता मर्यादित नाही; तो सत्ताधाऱ्यांच्या गर्वाला, ढोंगी आश्वासनांना आणि निष्काळजीपणाला दिलेलं थेट आव्हान आहे.
जरांगे पाटलांचं आंदोलन हे सरकारसाठी आरशासारखं आहे. त्यामध्ये सरकारला स्वत:च्या अपयशाची, ढोंगीपणाची आणि असंवेदनशीलतेची खरी प्रतिमा दिसून येते. प्रामाणिकतेवर उभ्या असलेल्या जनशक्तीपेक्षा कुठलंही बहुमत मोठं नसतं. सरकारने यातून धडा घेऊन प्रामाणिकपणे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर जनशक्ती मोठमोठ्या सत्ता उखडून फेकू शकते याची प्रचिती पुन्हा येईल.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माध्यम समन्वयक