

दृष्टिक्षेप
उत्तम जोगदंड
बुद्धीच्या देवाचा उत्सव साजरा करताना बुद्धीचा, साध्या कॉमन सेन्सचा वापर का केला जात नाही? परंपरेचा अभिमान उठसूठ सांगणारे बांधव उत्सवांची धार्मिक, पवित्र परंपरा का पाळत नाहीत?
मानव हा उत्सवप्रिय प्राणी आहे असे म्हणतात. उत्सवांच्या मागे काही ना काही कारण असते. उदा. ऋतू बदलाची सुरुवात, पिकांच्या हंगामाचे दिवस, ऐतिहासिक घटना वगैरे. नेहमीच्या कष्टमय आणि रटाळ जीवनात असे उत्सव, सण रंगत आणतात, आनंद देतात आणि ते साजरे केल्यावर माणूस नव्या उत्साहाने पुढील जीवन जगायला सिद्ध होतो. भारतीयांची उत्सवप्रियता तर अफाटच आहे. आपल्याकडील बहुसंख्य उत्सवांना, सणांना काही ना काही पौराणिक, ऐतिहासिक आणि धार्मिक पार्श्वभूमी असल्याने ते भक्तिभावाने साजरे केले जातात. काही सण हे प्रादेशिक असतात. काही सण कुटुंबात साजरे केले जातात तर काही सार्वजनिक स्वरूपात साजरे केले जातात. परंतु, आपल्या जीवनात रंगत आणणाऱ्या, आनंद देणाऱ्या सण, उत्सवांचे, विशेषतः सार्वजनिक उत्सवांचे, स्वरूप गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बदलले असून ते जनतेला आनंद देण्याऐवजी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष यातना देणारे ठरत आहेत. त्यावर एक दृष्टिक्षेप टाकणे आणि चर्चा करणे आवश्यक ठरते.
सार्वजनिक सण-उत्सवांचे बदलते स्वरूप
ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यलढ्यात लोकांमध्ये जागृती, एकजूट निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर खरे तर या उत्सवाची तशी आवश्यकता उरली नव्हती. परंतु या उत्सवानिमित्त लोकांनी एकत्रित येणे, प्रबोधनात्मक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आस्वाद घेणे होत असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव लोकांनी चालूच ठेवले. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीही सार्वजनिक स्वरूपात साजरी होत होती आणि होत आहे. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य महापुरुषांच्या जयंतीही धुमधडाक्यात साजऱ्या होऊ लागल्या आहेत.
गेल्या काही दशकांपासून या सण-उत्सव-जयंती यांचे स्वरूप पूर्णतः बदलले आहे. त्यातील सोज्वळता, धार्मिकता, आदर हे सारे मागे पडू लागले आहे. आता डॉल्बी-डीजे, लेजर, नाशिक ढोल-ताशे, गॅस सिलिंडरपासून बनवलेल्या मोठ्या घंटा यांचा वापर होतो.
गुजरातमधून आलेला गरबा. उत्तरेकडील छटपूजाही आता महाराष्ट्रात जोर धरू लागली आहे. कावड यात्रा सुरू व्हावी अशी काही धर्माभिमानी लोकांची मागणी आहे. ईद-ए-मिलाद या हजरत महम्मद पैगंबर यांच्या जयंती उत्सवानिमित्त मुस्लिम बांधव बऱ्याच ठिकाणी मिरवणूक काढतात.
उत्सवांना राजकारण्यांचे-उद्योजकांचे प्रायोजकत्व
सार्वजनिक गणेशोत्सव, गरबा, जयंती यांना बरेचदा कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्याचे किंवा छोट्या-मोठ्या उद्योजकांचे प्रायोजकत्व लाभलेले असते. कधी कधी अंडरवर्ल्ड ‘डॉन’सुद्धा या उत्सवांचे प्रायोजक, आश्रयदाते असतात. त्यामुळे उत्सवांना पैशाची कमतरता भासत नाही. परिणामी उत्सव अधिक खर्चिक झाले आहेत. प्रायोजकत्व आले की प्रायोजकांचे मोठमोठे बॅनर्स आलेच. शिवाय सजावटीवर आणि दिखाव्यांवर अफाट पैसा खर्च केला जाऊ लागला आहे. मूर्तींची उंची वाढू लागली आहे. त्यात सणांचे पावित्र्य हरवले आहे. उत्सवांचे व्यापारीकरण झालेले आहे.
नागरिकांना उत्सवांच्या आनंदाऐवजी त्रास
बरेच सार्वजनिक उत्सव रस्त्यावर साजरे केले जातात. त्यांच्या पूर्वतयारीसाठी आधी आठवडाभर आणि उत्सवानंतर आठवडाभर रस्ते पूर्णतः किंवा अंशतः बंद असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. मिरवणुकांमुळे वाहतूक ठप्प असते. या उत्सवांमधील सर्वात धोकादायक प्रकार म्हणजे डॉल्बी डीजे आणि गॅस सिलिंडरपासून बनवलेल्या मोठ्या घंटा. यातून निघणारा आवाज एवढा मोठा असतो की डीजेची गाडी जवळून गेल्यास इमारतीतील भिंती, खिडक्यांची तावदाने हादरतात, माणूस स्वतः हादरतो. डीजेमुळे मृत्यू आल्याच्या बातम्याही आल्या आहेत. वृद्ध, बालके, गरोदर स्त्रिया, रुग्ण यांचे तर खूपच हाल होतात.
प्रदूषण आणि अन्य बाबी
गणेशमूर्ती बनवताना रासायनिक रंग वापरले जातात. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तर रासायनिक प्रक्रियेनेच बनतात. या मूर्तींचे विसर्जन आपल्या वापराच्या जलस्रोतात केल्यास ते पाणी प्रदूषित होते. असे प्रदूषित पाणी प्यायल्याने कॅन्सरसारखे दुर्धर आजार होऊ शकतात. पाण्यातील जीवसृष्टीवरही त्याचा वाईट परिणाम होतो. प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींवर बंदी येऊ नये म्हणून प्रकरण न्यायालयात नेले आहे. मिरवणुकीत जो गुलाल मुक्तपणे उधळला जातो त्यात असलेले शिसे आरोग्यास धोकादायक असते. मिरवणूकप्रसंगी आणि उत्सवस्थळी फोडले जाणारे फटाके अत्यंत विषारी वायू उत्सर्जित करतात. या सर्व प्रकारच्या प्रदूषणाचा त्रास सर्वांनाच होतो.
काही मंडळे आपला गणपती नवसाला पावतो म्हणून दावा करतात. त्यामुळे अशा ठिकाणी भक्तांची एकच झुंबड उडते. हे एक प्रकारे अंधश्रद्धेला दिले जाणारे प्रोत्साहनच आहे. या उत्सवांना धार्मिक उन्मदाचे स्वरूप आल्याने मिरवणुकीच्या मार्गालगत असलेल्या अन्य धर्मीय प्रार्थनास्थळांसमोर मिरवणूक येते तेव्हा प्रचंड तणाव निर्माण झालेला असतो. त्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ मोठा आवाज करून नाचणे हे हल्ली भूषणावह मानले जाते. ती वेळ पोलीस दलांसाठी परीक्षेची असते.
काही दिवसांपूर्वी एक भव्य मूर्ती उत्सव-स्थळी घेऊन जात असताना ती कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला आणि पाच लोक जखमी झाले. त्यामुळे अशा भव्य मूर्ती निर्माण करण्याची खरोखरच आवश्यकता आहे का, यावर देखील चर्चा झाली पाहिजे.
माणसांसाठी सण की सणांसाठी माणूस?
बदलत्या काळानुसार सण-उत्सव सुद्धा बदलले पाहिजेत हे कोणीही मान्य करेल. परंतु ज्या पद्धतीने हल्ली सण-उत्सव साजरे केले जातात त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास, पर्यावरणास धोका निर्माण होत आहे. हे पाहून प्रश्न पडतो की हे सण, उत्सव माणसांसाठी आहेत की सणांसाठी माणूस आहे? विज्ञानाने लावलेल्या विविध शोधांचा, उदा. डॉल्बी डीजे, लेजर लाइट, प्रकाश योजना यांचा विधायक उपयोग करण्याऐवजी विघातक पद्धतीने का केला जातो आहे? बुद्धीच्या देवाचा उत्सव साजरा करताना बुद्धीचा, साध्या कॉमन सेन्सचा वापर का केला जात नाही? परंपरेचा अभिमान उठसूठ सांगणारे बांधव उत्सवांची धार्मिक, पवित्र परंपरा का पाळत नाहीत? या बदललेल्या उत्सवांना सकारात्मक, सुखद, स्वरूप देण्यासाठी नागरिक पुढाकार का घेत नाहीत?
पुणे येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि महापालिका पदाधिकारी यांच्या बैठकीत एका सूज्ञ नागरिकाने, डीजेमुक्त गणेशोत्सव साजरे करावेत अशी सूचना केली असता मंडळांचे पदाधिकारी अत्यंत आक्रमक झाले, चिडले आणि बैठकीत प्रचंड गोंधळ माजला. शेवटी त्या नागरिकास सुरक्षारक्षकांच्या गराड्यात बाहेर काढण्यात आले. नागरिकांना आपल्या उत्सवामुळे त्रास होतोय, त्यांना डीजेचा आवाज नकोय याबाबत थोडी तरी संवेदनशीलता दाखवायला हे मंडळांचे पदाधिकारी तयार नाहीत! महापालिका पदाधिकारी देखील मंडळांचीच री ओढत मंडळांना मुक्त परवाना देत आहेत. आता उत्सव स्थळाजवळील लोक, एके काळी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला हा उत्सव, कधी एकदाचा संपतोय याची सालाबादप्रमाणे असहाय्यपणे वाट पाहत राहतील, गणराया, पुढच्या वर्षी येताना तरी या मंडळांना सद्बुद्धी दे, अशी प्रार्थना करत.