पुन्हा मराठी सरन्यायाधीश!

पिता आणि पुत्र या दोघांनाही सरन्यायाधीशपदाचा बहुमान प्राप्त होणारे हे दुर्मीळ उदाहरण ठरेल
पुन्हा मराठी सरन्यायाधीश!

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळित हे येत्या ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असून न्या. लळित यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायाधीश न्या. धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. सरन्यायाधीशांची शिफारस लक्षात घेता देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून न्या. धनंजय चंद्रचूड हे त्या पदाची शपथ घेतील हे जवळजवळ निश्चित झाले आहे. ९ नोव्हेंबर रोजी ते पदाची सूत्रे स्वीकारतील. सरन्यायाधीश उदय लळित यांच्यानंतर या पदाचा बहुमान पुन्हा एकदा मराठी व्यक्तीस मिळाला आहे. आतापर्यंत चार मराठी व्यक्तींनी सरन्यायाधीशपद भूषविले होते. न्या. धनंजय चंद्रचूड हे सरन्यायाधीशपदी स्थानापन्न होणारी पाचवी मराठी व्यक्ती असणार आहेत. न्या. धनंजय चंद्रचूड यांचे वडील न्या. यशवंत चंद्रचूड हेही सरन्यायाधीश होते. पिता आणि पुत्र या दोघांनाही सरन्यायाधीशपदाचा बहुमान प्राप्त होणारे हे दुर्मीळ उदाहरण ठरेल. याआधी न्या. प्रल्हाद भालचंद्र गजेंद्रगडकर (१ फेब्रुवारी १९६४ ते १५ मार्च १९६६), न्या. यशवंत चंद्रचूड (२२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५), न्या. शरद बोबडे (१८ नोव्हेंबर २०१९ ते २३ एप्रिल २०२१) आणि विद्यमान सरन्यायाधीश उदय उमेश लळित (२७ ऑगस्ट २०२२ ते ८ नोव्हेंबर २०२२) या चार मराठीजनांनी हे पद भूषविले आहे. न्या. यशवंत विष्णू चंद्रचूड हे सरन्यायाधीशपदावर सात वर्षे आणि १३९ दिवस होते. हा एक विक्रमच होता. मराठी व्यक्तींप्रमाणे मराठी नसलेल्या महाराष्ट्रातील सहा न्यायाधीशांनीही सरन्यायाधीशपद भूषविले आहे. न्या. धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयात नियुक्त होण्यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. तसेच ते मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्तीही होते. दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर कायद्यासंदर्भातील पुढील शिक्षण त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून घेतले. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त होण्याआधी ते पश्चिम भारतासाठी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून काम पाहत होते. वकील आणि न्यायाधीश म्हणून न्या. धनंजय चंद्रचूड यांचा अनुभव दांडगा आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती या नात्याने न्या. धनंजय चंद्रचूड यांनी सर्वात जास्त वेळा घटनेशी संबंधित मुद्द्यांच्या सुनावणीसाठी नेमण्यात आलेल्या घटनापीठावर काम केले आहे. भारतीय घटना, मानव अधिकार, जनहितार्थ दाखल केलेल्या याचिका, गुन्हेगारी कायदा, वाणिज्य कायदा अशा विविध विषयांवर आपले निकाल दिले आहेत. सरन्यायाधीश उदय लळित यांनी सरन्यायाधीशपदासाठी न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केंद्राला केली. नेहमीच्या प्रथा, संकेत बाजूला ठेवून सरन्यायाधीश लळित यांनी या शिफारसपत्राची प्रत स्वतः न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांच्या हाती सुपूर्द केली. सरन्यायाधीशपदासाठी न्या. धनंजय चंद्रचूड यांची शिफारस केल्यानंतर आगामी काही दिवसांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भावी सरन्यायाधीश म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करतील. न्या. धनंजय चंद्रचूड यांचे वडील न्या. यशवंत चंद्रचूड हे सरन्यायाधीशपदी असताना त्यांच्या सरकारी निवासस्थानाच्या आवारात क्रिकेट खेळणारा त्यांचाच मुलगा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून भारताचा सरन्यायाधीश होणार आहे, ही मराठी माणसांसह सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची बाब मानावी लागेल. त्यावेळी सरन्यायाधीशांच्या मुलाला महाविद्यालयात जाण्यासाठी सरकारी वाहन उपलब्ध केले जात नसे. दिल्ली परिवहन सेवेच्या बसने न्या. धनंजय चंद्रचूड हे महाविद्यालयात जात असत. नागरी स्वातंत्र्याचे कट्टर संरक्षक म्हणून न्या. धनंजय चंद्रचूड ओळखले जातात. रामजन्मभूमी वादासंदर्भात २०१९ साली सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय पीठाने राम मंदिराच्या बाजूने एकमताने जो निकाल दिला, त्या पीठावर न्या. धनंजय चंद्रचूड होते. अलीकडील काळातील तो एक ऐतिहासिक निकाल होता. न्या. धनंजय चंद्रचूड यांचा अंतर्भाव असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ सदस्यीय पीठाने खासगी जीवन (प्रायव्हसी) हा मूलभूत हक्क असल्याचा निर्णय दिला होता. पाच सदस्यीय पीठाचे सदस्य या नात्याने न्या. चंद्रचूड यांनी आधार कार्ड २०१६, संदर्भातील कायद्याच्या वैधतेबाबतच्या निकालात आपले विरोधी मत नोंदविले होते. सदर कायदा हा वित्त विधेयक म्हणून घटनाबाह्यरीत्या संमत करण्यात आला, असे न्या. धनंजय चंद्रचूड यांनी नमूद केले होते. या शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयात त्यांचे योगदान राहिले आहे. न्या. धनंजय चंद्रचूड यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती होणे निश्चित असल्याने पुन्हा एकदा एका मराठी व्यक्तीला हा सर्वोच्च बहुमान प्राप्त होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in