लावणीसम्राज्ञीच्या आठवणी

१३ मार्च हा ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा जन्मदिन. अतिशय संघर्षाचे आयुष्य जगत आपल्या कलेला सन्मान मिळवून देणाऱ्या सुलोचना यांचे दोन वर्षांपूर्वी १० डिसेंबर २०२२ ला निधन झाले. लावणी या कलाप्रकाराला पद्मश्रीचा सन्मान मिळवून देणाऱ्या सुलोचना यांचे स्मरण आजही लावणी हा शब्द उच्चारला की होतेच.
लावणीसम्राज्ञीच्या आठवणी
एक्स @supriya_sule
Published on

स्मरण

आरती चव्हाण

१३ मार्च हा ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा जन्मदिन. अतिशय संघर्षाचे आयुष्य जगत आपल्या कलेला सन्मान मिळवून देणाऱ्या सुलोचना यांचे दोन वर्षांपूर्वी १० डिसेंबर २०२२ ला निधन झाले. लावणी या कलाप्रकाराला पद्मश्रीचा सन्मान मिळवून देणाऱ्या सुलोचना यांचे स्मरण आजही लावणी हा शब्द उच्चारला की होतेच.

‘मला हो म्हणत्यात लवंगी मिरची...’, ‘सोळावं वरीस धोक्याचं...’, ‘पाडाला पिकलाय आंबा...’, ‘तुझ्या ऊसाला लागंल कोल्हा...’, ‘कळीदार कपुरी पान...’, ‘खेळतांना रंग बाई होळीचा...’, ‘कसं काय पाटील बरं हाय का...’, ‘गाव हे हाय टग्याचं...’, ‘नाचतो डोंबारी गं...’, ‘पदरावरती जरदारीचा मोर नाचरा हवा...’, ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना...’, ‘औंदा लगीन करायचं..’ अशा एकाहून एक सरस ठसकेबाज लावणी गीतांनी अवघ्या मऱ्हाठी मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ख्यातनाम लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा १३ मार्च हा जन्मदिन. कणीदार खड्या आवाजानं लावणीला ठसकेदार रांगडा बाज देऊन लावणीला नटवणारी कसबी सुगरण म्हणजे सुलोचना चव्हाण.

सुलोचना चव्हाण म्हणजेच आमच्या कुटुंबियांच्या माईं. त्यांच्या कणखर आवाजात एक वेगळाच गोडवा होता. माईंचा आवाज थेट ऐकणाऱ्या कानांचा वेध घेई. त्यांचा सहवासही तसाच होता. अत्यंत साधं राहणीमान असणाऱ्या माई जितक्या कडक शिस्तीच्या होत्या तितक्याच प्रेमळही होत्या. त्यामुळे त्यांचा सहवास हा आमच्यासाठी दुग्धशर्करा योगच असे. त्या गायिका म्हणून ग्रेट होत्याच, परंतु एक माणूस म्हणूनही त्या तितक्याच मोठ्या होत्या. त्यांना जे जे म्हणून भेटले, ते ते त्यांच्या कुटुबीयांपैकीच एक बनले, अगदी रक्ताचे नाते असल्यागत.

माईं म्हटले की आठवणींचा खजिनाच समोर उघडतो. त्यांच्या भेटीला संगीत दिग्दर्शक, लेखक, गीतकार, डॉक्टर, न्यायाधीश, नेते, पत्रकार यांच्यासारखी बडी बडी मंडळी नेहमी येत. त्यांच्यासोबत गाण्यांचा उत्सव साजरा करीत. त्याचबरोबर त्यांच्या हातच्या जेवणाचाही मनमुराद स्वाद घेत. गाण्यांबरोबरच त्यांच्या खाद्यसंस्कृतीचाही एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला होता, तो आगळाच. अनेकजण आम्हाला भेटतात, तेव्हा ते आधी त्यांच्या गाण्याबद्दल बोलतात आणि नंतर त्यांच्या हातच्या जेवणाच्या गोड आठवणींमध्ये रमतात, तेव्हा मन अगदी भरून येते.

आम्हा सर्व कुटुंबीयांच्या त्या खंबीर आधारस्तंभ होत्या. त्यांचा स्वभाव अत्यंत बोलका होता. त्यामुळे गप्पाष्टकांमध्ये त्यांचा वेळ कसा जायचा, हेच अनेकांना उमजेनासे व्हायचे. कोविड महामारीच्या काळातील एक आठवण मी कधीच विसरणार नाही. मी माईंना म्हणाले, “माई, खूप महिने झाले तुम्हाला भेटले नाही. मी राहायला बोरीवलीला, तुम्ही गिरगावात. मी तुम्हाला भेटायला येते.” तेव्हा माई म्हणाल्या, “आता तर लॉकडाऊन आहे, तू कशी येणार मला भेटायला?” त्यांचा प्रश्न योग्यच होता. पोलिसांना तुमचे नाव सांगून मी येईन, असे मी त्यांना म्हणाले तेव्हा माई म्हणाल्या, “बरं, तुला पोलीस सोडतील, पण मला ताब्यात घेतील, त्याचे काय?” यावर आम्ही दोघी खळखळून हसलो. अशा होत्या आमच्या माई. अडचण कोणतीही असो, प्रसंगाचे भान त्यांना कायम असे.

आजही मला तो दिवस आठवतो. पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहात माईंचा शो होता. कार्यक्रमाला तुडुंब गर्दी लोटली होती. माई आणि मी नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराशी आलो. पण तिथल्या सुरक्षारक्षकांनी माईंना ओळखले नाही आणि आम्हाला प्रवेशच नाकारला. मग काय, आम्ही बाहेरचा रस्ता धरला. तेथील एका वडापावच्या गाडीवर गेलो. तिथे वडापाव खाण्याचा मनसोक्त आनंद लुटला. कार्यक्रमाची वेळ झाली होती. माई कुठे दिसेनात म्हणून चिंतेत असलेले आयोजक शोधत बाहेर आले. जेव्हा त्यांना कळले की सुरक्षारक्षकाने माईंना ओळखलेच नाही, तेव्हा आयोजक ओशाळवाणे झाले. माईंची माफी मागून त्यांना त्यांनी मोठ्या सन्मानाने कार्यक्रम स्थळी नेले. आपण कोणीतरी मोठे कलावंत असल्याचा ॲटीट्यूड वा लवलेशही माईंच्या ध्यानीमनी नव्हता, हे इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते.

माईंचे माहेरचे नाव सुलोचना कदम. त्यांचा जन्म १३ मार्च १९३३ रोजीचा. इयत्ता चौथीपर्यंतची धुळाक्षरे गिरविणाऱ्या सुलोचना यांनी वयाच्या ७ व्या वर्षी एका नाटकात ‘श्रीकृष्णा’ची आणि उर्दू नाटकात ‘मजनू’ची भूमिका साकारली होती. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी व्यावसायिक गायनाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी ७० हिंदी चित्रपटांमध्ये २५० गाणी गायली आहेत. एवढेच नव्हे, तर मराठी चित्रपट, अल्बम, एचएमव्ही या सगळ्यांसाठी जवळपास पाच हजाराहून अधिक गाण्यांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. १९५५मध्ये त्यांनी श्यामराव चव्हाण दिग्दर्शित ‘कलगी तुरा’ या मराठी चित्रपटात पहिली ‘लावणी’ गायली. ‘मला हो म्हणत्यात लवंगी मिरची’ या लावणीमुळे त्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये ‘लावणी’ गीतं नुसती गायली नाहीत, तर चांगली गाजवली सुद्धा. ‘खेळताना रंग बाई होळीचा होळीचा, फाटला ग कोना माझ्या चोळीचा’ या गाण्याने होळीच्या गीताला मऱ्हाठी बाज दिला. ‘पदरावर जरतारीचा मोर नाचरा हवा’ या लावणीने तर आई आणि लेकीच्या नात्यामध्ये शालूचं बंधन बांधलं. ‘सोळावं वरीस धोक्याचं..’ या लावणीने तरुणाईला भुरळ घातली. ‘पाडाला पिकलाय आंबा’नेही गोडवा आणला. ‘मला हो म्हणत्यात लवंगी मिरची..’ने कोल्हापुरी ठेच्याचीच आठवण दृढ केली. ‘तुझ्या ऊसाला लागंल कोल्हा’नेही लावणीचे फड गाजविले. ‘कळीदार कपुरी पान’ने तर बहार आणली. त्यांनी शृंगारिक लावणी माजघरापर्यंत नेली.

सुलोचना चव्हाण यांनी महाराष्ट्रातील विदर्भ, खानदेश आणि मराठवाडा भागातील विविध शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये, अनाथालये आणि रुग्णालयांच्या उभारणीसाठीच नव्हे, तर पानशेत धरण फुटल्यानंतर रस्त्यावर आलेल्या पूरग्रस्तांसाठीही स्टेज परफॉर्मन्स’ करून आपले उत्पन्न त्या त्या कामांना दिले आणि सामाजिक बांधिलकी जपली. त्यांचे समाजभान कायम जागृत होते. त्यांनी १९६९ मध्ये नागालँडमध्ये भारतीय जवानांसाठी कार्यक्रम सादर केला होता.

संगीत कलेच्या क्षेत्रात दिलेल्या अपूर्व योगदानाबद्दल ‘लावणी सम्राज्ञी’, ‘पद्मश्री’ या महत्त्वांच्या किताबासह अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले. माई गेल्या, पण त्यांच्या हृद्य आठवणी आमच्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. ठसठशीत कुंकू लावलेली, अंगभर पदर लपेटलेली माईंची छबी आजही डोळ्यासमोर कायम आहे. मला, माईंसारखी आजी मिळाली, याउपर आणखी काय हवं?

(लेखिका सुलोचना चव्हाण यांची नात आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in