महापौरांना अटक, जनता रस्त्यावर...

एखाद्या शहराच्या महापौरांना अटक झाली तर थेट देशाच्या राष्ट्रपतींची खुर्ची डळमळीत होऊ शकते का? सध्या हे सारे तुर्कीमध्ये घडते आहे. इस्तंबूलचे महापौर इकरम इमामोअलू यांना अटक झाल्याने संतप्त जनता रस्त्यावर उतरून देशभर निदर्शने करीत आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडे वेधले गेले आहे. तुर्कीतील घडामोडींचा हा वेध...
महापौरांना अटक, जनता रस्त्यावर...
एक्स @nomadaesthetic
Published on

देश-विदेश

भावेश ब्राह्मणकर

एखाद्या शहराच्या महापौरांना अटक झाली तर थेट देशाच्या राष्ट्रपतींची खुर्ची डळमळीत होऊ शकते का? सध्या हे सारे तुर्कीमध्ये घडते आहे. इस्तंबूलचे महापौर इकरम इमामोअलू यांना अटक झाल्याने संतप्त जनता रस्त्यावर उतरून देशभर निदर्शने करीत आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडे वेधले गेले आहे. तुर्कीतील घडामोडींचा हा वेध...

एखाद्या चित्रपट किंवा कादंबरीत शोभावे असे कथानक सध्या तुर्कीमध्ये घडते आहे. निमित्त आहे ते इस्तंबूलचे महापौर इकरम इमामोअलू यांना अटक झाल्याने देशभरात जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तुर्कीमध्ये एकूण ८१ प्रांत आहेत. त्यातील ५५ प्रांतांमध्ये निदर्शने सुरू आहेत. काही ठिकाणी जाळपोळ आणि हिंसाचार होत आहे. या सर्वांची दखल घेत राष्ट्रपती रेचेप तैयप्प एर्दोगन यांनी दंगेखोरांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी धरपकड सुरू केल्याने जनतेतील असंतोष आणखी वाढीस लागला आहे. शेकडो जणांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही पत्रकारांचाही त्यात समावेश आहे, तर सरकारविरोधी पोस्ट करणाऱ्या ७०० हून अधिक एक्स (ट्विटर) अकाऊंट बंद करण्याचे आदेश सरकारने काढले आहेत. रस्त्यांवर आणि चौकाचौकात जमलेल्या नागरिकांच्या झुंडी, निदर्शने, पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर आदींचे फोटो सध्या जगभर व्हायरल झाले आहेत. तुर्कीमध्ये हे सारे का आणि कसे घडते आहे, त्यातील राजकारण काय आहे, आदी सविस्तरपणे जाणून घेणे आवश्यक आहे.

७१ वर्षांचे असलेले रेचेप तैयप्प एर्दोगन यांची गेल्या दोन दशकांपासून तुर्कीमध्ये सत्ता आहे. पूर्वी ते प्रधानमंत्री होते. आता सलग तिसऱ्यांदा ते राष्ट्रपती आहेत. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०२३ मध्ये तेथे सार्वत्रिक निवडणूक झाली आणि एर्दोगन पुन्हा सत्ताधीश बनले. आता पुढील निवडणूक २०२८ मध्ये होणार आहे. मात्र, पुढील निवडणूक एर्दोगन यांना लढविता येणार नाही. कारण, तुर्कीच्या घटनेनुसार, चौथ्यांदा कुणी व्यक्ती राष्ट्रपती बनू शकत नाही. यावर तोडगा म्हणून थेट घटनेत बदल करण्याच्या हालचाली एर्दोगन यांनी चालविल्या आहेत. या साऱ्यात त्यांना महापौर इकरम इमामोअलू यांची भीती वाटू लागली आहे. यातूनच सध्याच्या घडामोडी घडत आहेत.

महापौर इमामोअलू हे ५४ वर्षांचे आहेत. ते रिअल इस्टेट क्षेत्रात पूर्वी कार्यरत होते. त्यांनी इस्तंबूल विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले आहे. त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि २०१४ मध्ये ते बेलिकडुजु येथील महापौर बनले. त्यानंतरही ते फारसे चर्चेत नव्हते. मात्र, २०१९ हे वर्ष त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरले. तुर्कीची राजधानी असलेल्या इस्तंबूल या शहराच्या महापौरपदाची निवडणूक त्यांनी लढविली. विशेष म्हणजे, राष्ट्रपदी एर्दोगन यांचा पक्ष असलेल्या न्याय आणि विकास पक्षाच्या उमेदवाराचा इमामोअलू यांनी तब्बल ८ लाख मतांनी दारुण पराभव केला. १९९४ ते १९९८ या काळात एर्दोगन हे इस्तंबूलचे महापौर होते. त्यामुळे इमामोअलू यांनी एर्दोगन यांच्या समर्थकाचा केलेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. मात्र, महापौर होताच इमामोअलू यांनी इस्तंबूल शहराच्या विकासासाठी भरीव काम करण्यास प्रारंभ केला. जनतेचे प्रश्न जाणून घेणे आणि ते सोडवणे यावर भर दिला. सहाजिकच त्यांचा कारभार नागरिकांना आवडला. तसेच, इमामोअलू यांची जगभर ख्याती होऊ लागली. त्यानंतर २०२४ म्हणजेच गेल्या वर्षी इस्तंबूलमध्ये निवडणूक झाली. यातही इमामोअलू यांनी दणदणीत विजय मिळविला. एर्दोगन यांच्या उमेदवाराचा सलग पराभव झाला. शिवाय इमामोअलू यांच्या मताधिक्यात लक्षणीय वाढ झाली. इमामोअलू यांचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर चमकले. परिणामी एर्दोगन हे अस्वस्थ झाले. महापौर इमामोअलू यांनी विविध कामांमध्ये गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून खटलाही सुरू करण्यात आला. याचदरम्यान एर्दोगन यांनी इस्तंबूलमध्ये पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश दिले. इमामोअलू अटकेत असताना निवडणुकीचे निकाल घोषित झाले आणि इमामोअलू यांनी प्रचंड मताधिक्य मिळविले. जनतेने एर्दोगन यांच्या मनमानी कारभाराविरोधात हा कौल दिल्याचे देशभर बोलले जात आहे.

रिपब्लिकन पिपल्स पार्टी या विरोधी पक्षाने इमामोअलू यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. इमामोअलू यांची वाढती प्रसिद्धी आणि लोकप्रियता एर्दोगन यांना अडचणीची ठरत आहे. त्यातच गैरव्यवहार प्रकरणात इमामोअलू यांना अटक करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यांना अटक होताच जनतेने रस्त्यावर उतरून विरोध सुरू केला आहे. परिणामी, एर्दोगन यांच्या विरोधाची लाट तयार होत आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक २०२८ मध्ये होणार असली तरी सध्याचे चित्र पाहता तेथे मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केवळ नावालाच लोकशाही असून प्रत्यक्षात एर्दोगन यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षासह जनता करत आहे. आपलीच हुकूमत रहावी म्हणून देशाच्या घटनेत बदल करू पाहणाऱ्या एर्दोगन यांना आता जनतेने विरोधाचे झेंडे दाखवणे सुरू केले आहे. माध्यमेही सरकारधार्जिणी असल्याने जनतेचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप केला जात आहे. एर्दोगन यांच्या अहंकारी आणि मनमानी कारभाराचा फुगा फुटत असून इमोमाअलू यांच्यासारखे नेतृत्व देशासमोर येत आहे. अर्थात हाती असलेल्या सत्तेचा एर्दोगन किती गैरवापर करतात, जनतेचे आंदोलन चिरडण्यासाठी काय काय करतात, आगामी काळात काय काय घडामोडी घडतात यावर सारे काही अवलंबून आहे. सीरिया पाठोपाठ पश्चिम आशियातील आणखी एक देश अस्थिरतेच्या गर्तेत असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.

तुर्कीत राष्ट्रपती पदाचा उमेदवार हा उच्च शिक्षण घेतलेला असावा ही अट आहे. त्यामुळे इमामोअलू यांचा काटा काढण्यासाठी त्यांची शैक्षणिक पदवीही रद्द करण्यात आली आहे. याविरोधात आता अपील करण्यात आले आहे. त्याचा निकाल काय

लागतो आणि एर्दोगन हे आणखी काय काय डावपेच खेळतात यावर तुर्कीचे भवितव्य अवलंबून आहे. सीरियातील सत्ताधारी विद्रोही गट आणि तुर्कीचे एर्दोगन सरकार यांचेही लागेबांधे आहेत. त्यामुळे तुर्कीतील घडामोडींकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि पर्यावरणाचे अभ्यासक.

logo
marathi.freepressjournal.in