औषधे, उत्पादन,उद्योग व्यवसाय की धंदा ?

आमच्यासाठी ग्राहक हा राजा आणि जे करतोय ते त्याच्या भल्यासाठी’ असे आकर्षकपणे सांगत असते.
औषधे, उत्पादन,उद्योग व्यवसाय की धंदा ?

उद्योग, व्यवसाय, धंदा या शब्दांना आपले स्वत:चे असे एक संचित आहे. उद्योजक, व्यावसायिक आणि धंदेवाईक या शब्दातून वाचणाऱ्याला भिन्न भिन्न अर्थ लक्षात येतात. पैसा मिळवणे, संपत्ती निर्माण करणे, रोजगार उपलब्ध करणे, यासाठी जे काम केले जाते, त्या कामाचा आवाका आणि त्या मागचा दृष्टिकोन या विविध शब्दांमधून सूचित होतो; मात्र ज्यावेळी विविध व्यवसाय आणि उद्योग परस्पर हिताचे रक्षण करण्यासाठी एकत्र येतात आणि विशिष्ट प्रकारे ग्राहकांना गृहीत धरतात, त्यावेळी व्यवसायाचे रूपांतर सहजपणे धंद्यात होते. या पडद्यामागच्या हालचाली सामान्य ग्राहकाच्या लक्षात येणे तसे कठीणच. शिवाय पडद्यासमोरचे चित्र सातत्याने ‘आमच्यासाठी ग्राहक हा राजा आणि जे करतोय ते त्याच्या भल्यासाठी’ असे आकर्षकपणे सांगत असते.

आज हे अधिक प्रकर्षाने स्पष्ट करण्याचे कारण म्हणजे शास्त्रीय अभ्यास करणाऱ्या आणि ते प्रसिद्ध करणाऱ्या ‘Lancet’ या जगप्रसिद्ध प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला एका अभ्यासाचा वृत्तान्त. आपल्या देशातील ९००० खासगी औषध विक्रेत्यांकडील (stockist) माहिती (data- विदा) मिळवण्यात आली. ही औषधे अखेरीस खासगी क्षेत्रात पोहोचली की इस्पितळात, या सारखा तपशील उपलब्ध होऊ शकत नाही; मात्र एक नक्की की, ज्या FDC (Fixed Dose Composition) औषधांची विदा तपासली गेली त्यावरून जे निष्कर्ष निघालेत, ते स्व-मनाने औषधे खरेदी करणाऱ्या, इतरांना सुचविणाऱ्या अनेक ग्राहकांसाठी धोक्याची घंटा वाजविणारे आहेत. यासाठी FDC औषधे म्हणजे काय हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊ, जेणेकरून औषधे खरेदी करताना त्यातील घटक वाचणारे ग्राहक जागरूक राहून खरेदी करू शकतील. आधी पाहू की, ही ओटीसी (Over The Counter), म्हणजे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय सहजपणे मिळणारी FDC औषधे कोणत्या तक्रारीसाठी खरेदी केली जातात/वापरावी, असे त्यावर म्हटलेले असते.

सर्वसामान्यपणे डोकेदुखी, अर्धशिशी, सांधेदुखी, अंगदुखी, मळमळ किंवा उलटीची भावना यासारख्या लक्षणांसाठी ही औषधे वापरली जातात. त्यामध्ये केवळ एकाच मूळ औषधी द्रव्याचा उपयोग केलेला नसून दोन किंवा तीन औषधे एकत्रित घातलेली असतात. त्यांचे प्रमाण असे असते की, त्यासाठी डॉक्टरांची चिठ्ठी लागणार नाही. त्यामुळे ती कुणालाही विकत घेता येतात. अशा औषधांमध्ये प्रतिजैविके-अँटिबायोटिक्स असतात. त्यांची शास्त्रीय नावे आणि उपयोग याबद्दल सामान्य ग्राहक अर्थात अनभिज्ञ असतो. अमुक औषध घेऊन मला बरे वाटले, असा अनुभव आला की, तो ते ओटीसी औषध मोठ्या विश्वासाने घेत राहतो; मात्र अशी औषधे वारंवार घेतल्याने समस्या उद्भवू लागल्या आहेत आणि त्याची दखल औषध नियामक यंत्रणेने आता घेतली आहे. काय आहेत आणि का निर्माण झाल्यात या समस्या?

एकच घटक – उदा. पॅरासिटेमॉल असणारे औषध आणि त्यासोबत इतर एक अगर दोन इतर औषधे (घटक म्हणून असणे), यातून काही आरोग्यविषयक समस्या निर्माण झाली, तर तिचे कारण निश्चित करणे कठीण होते.

 एकल द्रव्याच्या औषधात न दिसणारे गुणधर्म अशा FDC औषधात असू शकतात.

 अशा FDC औषधामुळे रुग्णास खास फायदा होतो, असे म्हणता येत नाही.

 अजाणतेपणाने अशी औषधे घेत राहिल्याने भारतात प्रतिजैविके लागू पडेनाशी होण्याचे प्रमाण वाढते आहे, असे अनेक अभ्यासाचे निष्कर्ष आहेत. अशा रुग्णांसाठी टायफॉईड उपचार अत्यंत महागडे ठरतात.

आता आपल्याला असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे की, औषधे उत्पादन करण्यापूर्वी विविध चाचण्या आणि परवानग्या घ्याव्या लागतात. परवाने लागतात. तरीसुद्धा अशी घातक ठरू शकणारी औषधे बाजारात कशी येतात? त्याविषयी लॅन्सेट च्या अभ्यासात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्यांचे निरीक्षण असे की, केंद्र आणि राज्य अशा दोन्ही पातळ्यांवर औषधे नियामकांना असणारे काही अधिकार अंशत: दोन्हीकडे (Overlapping) आहेत. त्यामुळे देशपातळीवरील प्रतिजैविकांची उपलब्धता, विक्री आणि रुग्णाकडून होणारा प्रत्यक्ष उपयोग, यावर चोख नियंत्रण ठेवणे कठीण होते आहे. योग्य प्रकारे आकडेवारीसुद्धा उपलब्ध होऊ शकत नाही.

अशा प्रकारे ग्राहकांची आणि रुग्णांची चिंता वाढविणारी औषधे बाजारात आहेत आणि त्याबद्दल दिशादर्शक अभ्यास करून निरीक्षणे नोंदवली गेलीत. हा अभ्यास Boston University School of Public Health या संस्थेद्वारे करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर असेल; पण केंद्रीय नियामकानी नुकतीच (२७ ऑगस्ट) १९ FDC औषधे अधिक अभ्यासासाठी म्हणून निवडली आहेत. या औषधांच्या उपयुक्ततेबाबत आणि मुख्य म्हणजे अशा प्रकारचे combination (Cocktail drugs - असा ही उल्लेख एका वृत्तात आढळून आला आहे) करण्याच्या आवश्यकतेबाबत सखोल अभ्यास करायला सांगितले आहे. ही औषधे बाजारात आणण्यापूर्वी योग्य तो डेटा गोळा करण्यात आलेला नाही. म्हणून ही औषधे नियमित करण्यासाठी phase IV पातळीवरील परीक्षणे करण्याससुद्धा उत्पादकांना सांगण्यात आले आहे. राज्य पातळीवरील या परवानाधारकांनी सहा महिन्यांत ‘ना हरकत प्रमाणपत्रासाठी’चे अर्ज नियामकांकडे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आपल्या देशातील औषध-उत्पादन, वितरण उद्योग आकाराने अवाढव्य आहे. २०१९मध्ये तो १,४३,९३९ कोटी होता. ह्या वाढीला उपचारांचे बदलते कॉर्पोरेट स्वरूप आणि आरोग्य-विम्याची आक्रमक विक्री, हे घटक बऱ्याच प्रमाणात जबाबदार आहेत, असे ही म्हटले जाते; मात्र शासकीय पातळीवरील ढिसाळपणा आणि आरोग्य-सेवा व औषध उत्पादक यांची केवळ नफ्यावर असणारी नजर यामध्ये ‘ग्राहकाचे आरोग्य’ हीसुद्धा एक विक्रीयोग्य वस्तू (Commodity) ठरते, त्यावेळी व्यवसायाचा धंदा झाला, असेच म्हटले पाहिजे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in