मध्ययुगीन भक्तिमार्ग- समता आणि सामाजिक वास्तव

मध्ययुगीन संतांनी आध्यात्मिक समतेचा संदेश दिला, पण ते सामाजिक जातिव्यवस्थेची चौकट पूर्णपणे मोडू शकले नाहीत. त्यांनी कर्मकांड आणि उच्चनीचतेला विरोध केला. त्यांच्या कार्याला मर्यादा होत्या, तरीही त्यांनी माणुसकी, प्रेम आणि भक्तीचा दिवा सामान्य माणसाच्या मनात पेटवला.
मध्ययुगीन भक्तिमार्ग- समता आणि सामाजिक वास्तव
Published on

भ्रम -विभ्रम

जगदीश काबरे

मध्ययुगीन संतांनी आध्यात्मिक समतेचा संदेश दिला, पण ते सामाजिक जातिव्यवस्थेची चौकट पूर्णपणे मोडू शकले नाहीत. त्यांनी कर्मकांड आणि उच्चनीचतेला विरोध केला. त्यांच्या कार्याला मर्यादा होत्या, तरीही त्यांनी माणुसकी, प्रेम आणि भक्तीचा दिवा सामान्य माणसाच्या मनात पेटवला.

मध्ययुगीन संत परंपरेतील अनेक थोर संतांनी 'देवाच्या दरबारात सर्व माणसे समान आहेत,' अशी शिकवण दिली. संत नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखामेळा, एकनाथ, कबीर, रविदास, बहिणाबाई, सोयराबाई यांसारख्या संतांनी भक्तीमार्गात सर्वसामान्य माणसाला स्थान दिले. त्यांनी जातपात, उच्चनीचता, ब्राह्मणांचे अधिकार आणि कर्मकांडे यांवर सडेतोड टीका केली. संत तुकाराम महाराज तर म्हणतात, "आम्हा घरी धन शब्दांचेच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू," यातून त्यांची सामाजिक स्थिती आणि त्यातून त्यांनी दिलेला भक्तीचा मार्ग दिसतो.

या संदर्भात, 'अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये संत साहित्याचे योगदान' या पुस्तकात डॉ. तारा भवाळकर लिहितात: "भौतिक पातळीवरील दारिद्र्य, उपासमार, अवहेलना अशा दैनंदिन तापातून सुटकेचे भौतिक मार्ग सापडत नाहीत. जातिबद्ध आचार-विचार आणि व्यवसाय यांचे धर्माच्या नावावर लादलेले दंडक आणि त्याच्या पालनाची शारीरिक-मानसिक दहशत असलेल्या कर्मविपाकवादाने समाजाला कुंठितावस्था प्राप्त झाली होती. श्रमाला पर्याय तर नव्हताच, म्हणून देवतोपासनेचा सर्वजनसुलभ आणि सर्व अपप्रवृत्तींचा निरास करू पाहणारा सुप्रतिष्ठित आचार गरजेचा होता. उच्चवर्गीयांचा कर्मठ बंदिस्तपणा आणि उर्वरित समाजाची अगतिकता लक्षात घेऊन संतांनी सर्वसामान्यांसाठी सोपे साधन भक्तीच्या प्रांतात रूढ केले. ते म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण! नामजप! अशा प्रकारे उपासनेच्या नावाखाली बहुजन समाजात होत असलेल्या अधःपतनाला बांध घातला. मध्ययुगीन भक्तिसंप्रदायांनी मानसिकदृष्ट्या कुंठित झालेल्या, उच्चवर्गीयांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या दहशतवादाने पिचलेल्या समाजाला आत्मप्रतिष्ठेची आणि आत्मसन्मानाची संजीवनी देण्याचा प्रयत्न केला."

तरीही, या संतांच्या काळात सामाजिक परिस्थिती अत्यंत कठोर आणि अस्पृश्यतेने ग्रासलेली होती. भलेही संतांनी 'देव' सगळ्यांचा आहे, 'भक्ती' सगळ्यांना करता येते असे सांगितले; पण समाजाच्या दैनंदिन व्यवहारात तेही याच भेदाभेदाच्या व्यवस्थेचे भाग होते. संत चोखामेळा हे स्वतः महार जातीचे होते. त्यांनी देवावर अखंड निष्ठा ठेवून पंढरपूरच्या विठोबाची भक्ती केली, पण त्यांनाही मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला. चोखोबांना मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घ्यावे लागे. या पार्श्वभूमीवर, चोखोबांच्या घरी दहीभात जेवण्यासाठी साक्षात पांडुरंग आल्याची दिवास्वप्नात्मक अनुभूतीच सत्यकथेच्या भावभूमीवर रूढ झाली. पण या आणि अशा कथांमध्येही पांडुरंग मंदिराबाहेर येतो, भक्ताला तो मंदिरात घेऊन जाऊ शकत नाही. कर्मठ आणि अहंकारदर्पाने क्रूर झालेल्या उच्चवर्गीयांचे नियम मोडण्याचे धाडस कल्पनेत (कथेत) सुद्धा कोणी करू शकले नाही, हेही सामाजिक निष्ठुर वास्तव लक्षात घ्यायला हवे.

"पंढरीचे ब्राह्मणे चोख्यासी छळिले।

तयालागी केले नवल देवे

सकळ समुदाय चोख्याचे घरी।

ऋद्धि-सिद्ध दारी तिष्ठताती ।।

रंगमाळा सडे गुढिया तोरणे।

आनंदे कीर्तन वैष्णवांचे ।।

असंख्य ब्राह्मण बैसल्या पंगती।

विमानी पाहती सुखद ।।

तो सुखसोहळा दिवाळी दसरा।

वोवाळी सोयरा चोखीयासी।।"

या रचनेतच विसंगती आहे. पहिल्या पंक्तीत चोखोबांना छळणारे ब्राह्मण नंतर त्यांच्या घरात पंक्तीत जेवण कसे करतात? पुन्हा, चोखोबांना (दिवा)स्वप्नातही आपल्या घरी ब्राह्मणांच्या पंक्ती बसण्यात धन्यता का वाटावी? ते ब्राह्मणांचा धिक्कारू शकत नाहीत. परंपरागत वर्णवर्चस्व इतके रुतून बसले आहे. याचा अर्थ, संत भक्तीच्या पातळीवर समतेचा आदर्श मांडू शकले, पण समाजातील जातिव्यवस्थेचा प्रत्यक्ष प्रभाव त्यांच्या आयुष्यावरही होता. त्यांनी जरी बौद्धिक किंवा आध्यात्मिक पातळीवर समतेचा उपदेश केला, तरी व्यवहारात तो आदर्श समाजात रुजवता आला नाही. हे त्यांच्या कार्याचे आणि प्रभावाचे एक मोठे मर्यादित अंग होते. काही वेळा तर त्यांनी स्वतःच ‘आपण कोणत्या जातीचे आहोत’ याचा अभिमानाने उल्लेख केला आहे. उदाहरणार्थ, रामदास स्वामी सांगतात,

"ब्राह्मण वेद मुर्तीमंत, ब्राह्मण साक्षात भगवंत

मनोकामना होती पूर्ण, विप्रवाक्ये करोनी

गुरु सकलासी ब्राह्मण, जरी तो झाला क्रीयाहीन

तरी तयासीची शरण, अनन्य भावे असावे..."

संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात,

"जे वर्णामाजी छत्र चामर, स्वर्ग जयांचे अग्रहार

मंत्र विद्येसी माहेर ब्राह्मण जे।

जे पृथ्वीतळीचे देव, जे तपोवतार सावयव

सकल तीर्थांचे दैव म्हणून तेथे प्रगटले

सांगे शुद्राघरी आघवी, पक्वान्ने आहात बरवी

ती द्विजे केवी सेवावी, दुर्बळू जरी जाहला||"

यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, जातीच्या श्रेष्ठ-कनिष्ठतेची संकल्पना त्यांच्याही अंतःकरणात खोलवर रुजलेली होती. म्हणूनच अगदी ज्ञानदेवांपासून कोणत्याही संताने लोकांना लौकिक कर्तव्ये सोडण्यास सांगितले नाही. उलट, 'विहित कर्मे करीतच रहावे' असे संतांनी आवर्जून सांगितले; मात्र विहित कर्मे म्हणजे परंपरेच्या वर्णाश्रमधर्माने सांगितलेली कर्मे हीच संतभूमिका होती. यावरून असे लक्षात येते की, भक्तिमार्गाने एक नवा दृष्टिकोन दिला, तो होता आध्यात्मिक समतेचा. पण तो समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पातळीवर परिवर्तन घडवू शकला नाही. संतांची शिकवण हे समाजसुधारणेच्या दिशेने पहिले पाऊल होते, पण ती समाजव्यवस्थेच्या गाभ्याला हादरवू शकली नाही. कारण त्यांनी वर्णव्यवस्था, श्रमविभागणी, ब्राह्मणसत्ता या मूळ व्यवस्थेला पूर्णपणे नाकारले नव्हते. हेच त्यांच्या कार्याचे मर्यादित स्वरूप आहे. तरीही या संतांचा प्रभाव नाकारता येणार नाही. कारण त्यांनी सामान्य माणसाच्या हृदयात भक्तीचा दिवा पेटवला. त्यांनी ‘कर्मकांडावाचूनही परमेश्वरप्राप्ती शक्य आहे’ हे दाखवून दिले. त्यांनी माणसाला स्वतःच्या विवेकाने आणि प्रेमभावनेने जीवन जगण्याची प्रेरणा दिली. या दृष्टीने त्यांच्या कार्याला समाजप्रबोधनाचे स्वरूप आहे. त्यांनी कर्मठता, आडमार्ग, मूढश्रद्धा, ब्राह्मणांचे अधिकार, देवळातील मक्तेदारी यांवर थेट आणि स्पष्टवक्तेपणाने प्रहार केला.

याच कारणास्तव डॉ. तारा भवाळकर यांच्यासारखे संत साहित्याचे अभ्यासक म्हणतात की, "अद्वैत तत्त्वज्ञान केवळ शब्दात न राहता लौकिक जीवनातही यावे, असा समस्त संतांचा प्रयत्न होता. पण वर्णाश्रमधर्माची चौकट मनोमन व्यर्थ वाटत असली, तरी त्यांनी ती पूर्ण झुगारून दिली नसल्याने मानवताधर्म सांगताना संतांची बरीच ओढाताण झालेली दिसते. एक आंतरिक द्वंद्वाची भूमिका संतांना घ्यावी लागल्याने त्यांची ससेहोलपट झाली. वारकरी संतांची ती मर्यादा ठरली. भक्तीच्या आणि उपासनेच्या प्रांतात जातिधर्म-भेदातील समानतेची भूमिका आग्रहाने मांडणाऱ्या संतांना प्रत्यक्ष व्यवहारात जातिव्यवस्थेच्या उतरंडीला किंचितही धक्का लावता आलेला नाही. कारण कर्मविपाकवाद, आत्म्याचे अस्तित्व आणि पुनर्जन्म या विषमतामूलक संकल्पना संत झुगारून देऊ शकले नाहीत, ही वारकरी संतांची मर्यादा मान्य करायलाच हवी."

यामुळेच पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ही संतपरंपरा म्हणजे ‘कवितेतील समता’ वाटली. आंबेडकरांनी ‘तुम्ही देवाचे दार खुले केले, पण मंदिराचे दार उघडले नाहीत,’ अशी एक तीव्र टीका केली. हे वाक्य संतपरंपरेच्या मर्यादांचे सार आहे. अर्थात, संत हे तत्कालीन काळातील एक विवेकशील आत्मा होते, ज्यांनी आपल्या काळाच्या चौकटीत राहूनही अत्यंत महत्त्वाचा आवाज दिला. त्यांनी समाजात भक्ती, करुणा, प्रेम, सहिष्णुता आणि माणुसकीचे बीज पेरले. त्या बीजापासून एका समतावादी, न्याय्य समाजाचा वृक्ष बनावा यासाठी पुढच्या पिढीने सजग राहणे आवश्यक होते. पण पुढच्या पिढीने संतांना दैवी शक्ती प्राप्त झाली होती असे दाखवण्याच्या नादात त्यांच्या कार्याला चमत्कार चिकटवले. संतांची शिकवण म्हणजे फक्त गीत-भजन नव्हे, तर ती एक वैचारिक परंपरा आहे, ज्यातून आपण अधिक पुढे जात सामाजिक समतेचा विचार प्रत्यक्षात आणू शकतो. पण आपण त्यांची ही 'भेदाभेद अमंगल' शिकवण लक्षात न घेता बनलो फक्त टाळकुटे! खरेतर, आजही हे संत आपल्याला केवळ उपासनेच्या जागीच नव्हे, तर त्यांच्या मर्यादांसकट समाजपरिवर्तनाचे प्रेरणास्थान वाटले पाहिजेत. पण लक्षात कोण घेतो?

jetjagdish@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in