म्हैसाळच्या घटनेचा महाराष्ट्राला धक्का

वनमोरे कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या नसून हत्या झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
म्हैसाळच्या घटनेचा महाराष्ट्राला धक्का

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ (ता. मिरज) येथील एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याच्या बातमीने केवळ सांगली जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. दिल्लीत काही वर्षांपूर्वी घडलेल्या सामूहिक आत्महत्येच्या घटनेची त्यानिमित्ताने आठवण झाली होती. परंतु पोलिसांनी केलेल्या तपासातून ज्या गोष्टी निष्पन्न झाल्या आहेत, त्यामुळे या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. वनमोरे कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या नसून हत्या झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्याहून गंभीर म्हणजे यामागे गुप्तधन, मांत्रिकादी अंधश्रद्धांचा संबंध असल्यामुळे तर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. सांगली पोलिसांनी घटनेचा अत्यंत संवेदनशीलतेने तपास करून मांत्रिक अब्बास मोहम्मद अली बागवान आणि धीरज चंद्रकांत सुरवशे ( दोघेही रा.सोलापूर) यांना अटक केली आहे.

डॉ. माणिक बल्लापा वनमोरे आणि पोपट यलाप्पा वनमोरे यांच्या गुप्त धनाच्या संदर्भाने संबंधित मांत्रिकासोबत भेटी होत होत्या. त्यासाठी त्यांनी त्याला वेळोवेळी मोठी रक्कम दिली होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबे कर्जबाजारी झाली होती. संबंधित मांत्रिकाकडे त्यांनी पैशाचा तगादा लावल्यानंतर त्याने संपूर्ण कुटुंबाचा काटा काढायचे ठरवले आणि त्यातून विषप्रयोग करून दोन कुटुंबातील नऊ निष्पापांचे बळी घेतले. क्रौर्याचा कळस गाठणारी ही घटना म्हणावी लागेल. गुप्तधनाचा शोध घेण्याच्या हव्यासापोटी मांत्रिकाच्या नादी लागून दोन कुटुंबांनी अंत ओढवून घेतला. आपल्या कुटुंबातील लहान मुले, स्त्रिया यांनाही प्राण गमावावे लागले. समाज म्हणून आपण कुठे आहोत आणि कुठे चाललो आहोत, याचा विचार करायला लावणारी आणि पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी ही घटना आहे.

सोशल मीडियाच्या प्रभावाचा काळ आहे. हातातील मोबाइलच्या माध्यमातून प्रत्येकावर माहितीचा धबधबा कोसळतो आहे. व्हाट्सअपच्या माध्यमातून जी माहिती पसरवली जाते त्यामुळे ज्ञानाचा नव्हे, तर अज्ञानाचा प्रसार वाढत चालला आहे. या ज्ञानाच्या आधारे युक्तिवाद करणा-यांना व्हाट्सअप युनिव्हर्सिटीचे पदवीधर म्हणून नव्याने ओळख मिळाली आहे. इथे येणा-या माहितीची खातरजमा करण्याच्या फंदात कुणी पडत नाही. आपल्याकडे आलेली माहिती ते आपलेच ज्ञान असल्याच्या थाटात परिचितांकडे धाडली जाते. सतत अशा रितीने माहितीची देवाणघेवाण होते. आणि या आभासी देवाणघेवाणीलाच संवाद म्हणण्याची चूक केली जाते. जग एक खेडे बनले आहे आणि आपण जगाशी जोडले गेलो आहोत, हे नुसते भाषणांमधले आणि लेखांमध्ये वापरावयाचे वाक्य बनले आहे. प्रत्यक्षात माणूस माणसापासून लांब जाऊ लागला आहे. त्याचा संवाद खुंटू लागला आहे. या परिस्थितीत समाज, समाजातील विविध माणसे किती एकाकी बनली आहेत, परस्परांपासून तुटत चालली आहेत; त्यांचा संवाद खंडित झाला आहे हेसुद्धा या घटनेवरून दिसून येते.

सहज या एकूण घटनाक्रमाकडे पाहू लागलो तर काय दिसते? गावातील दोन कुटुंबे मांत्रिकाच्या नादी लागून कर्जबाजारी झाली आहेत आणि त्यातून त्यांची घालमेल सुरू आहे. सावकारांनी तगादा लावला आहे आणि ज्याने लुबाडले आहे तो दाद देत नाही. हे सगळे घडत असताना आजूबाजूच्या लोकांना त्याची काहीच माहिती असू नये किंवा काहीतरी संशयास्पद सुरू आहे याचाही कुणाला अंदाज येऊ नये, ही काळजी वाढवणारी बाब म्हणावी लागेल. माणसांनी परस्परांशी संवाद ठेवला, तर त्या संवादातून विचारांची देवाण-घेवाण करता येते. कितीही मोठ्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकतो. मात्र संवादच घडला नाही, तर मात्र कुढत कुढथ जगावे लागते. अडचणीतून बाहेर पडण्याचा रस्ता सापडत नाही. अशावेळी अनेकदा माणसे टोकाची पावले उचलतात. म्हैसाळमधील घटनेमध्ये प्रारंभी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचा संशय होता. जे चित्र समोर आले होते, त्यातून तीच शक्यता अधिक ठळकपणे समोर आली होती. परंतु नंतरच्या तपासातून जी वस्तुस्थिती समोर आली त्यानुसार या आत्महत्या नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले. काहीही असले तरी नऊ लोकांचे दुर्दैवी बळी गेले आहेत, ही घटनाच काळजाला पीळ पाडणारी आहे.

या कुटुंबांचा आपल्या शेजारीपाजारी, नातेवाईक यांच्याशी संवाद-संपर्क असतात तर कदाचित त्यांना यातून बाहेर पडण्याचा मार्ग कुणीतरी दाखवला असता किंवा एक कुटुंब अनेक लोकांकडून कर्जाऊ रकमा घेऊन त्याचा विनियोग कशासाठी करते आहे हे हे तरी आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आले असते, तरी ही घटना रोखणे शक्य झाले असते. दुर्दैवाने या कुटुंबाने कुणाजवळ आपले मन मोकळे केले नसावे किंवा आजूबाजूच्या समाजानेही या कुटुंबाची विचारपूस केली नसावी. त्यातूनच मांत्रिकाचा प्रभाव वाढत गेला, त्याने कुटुंबाला लाखो रुपयांना लुबाडले.

एका सुशिक्षित कुटुंबात आजच्या अशी घटना घडू शकते यावर सहजासहजी विश्वास बसू शकत नाही. घटना घडली आहे ते गाव कुठे आदिवासी पाड्यावर, दुर्गम भागात नाही. किंवा ज्या कुटुंबाचे बळी गेले आहेत, ती कुटुंबे अडाणी म्हणता येतील अशीही नव्हती. दोघेही भाऊ सुशिक्षित आणि नोक-या करणारे होते. अशा सुशिक्षित कुटुंबात घटना घडल्यामुळे तिचे गांभीर्य अधिक वाढले आहे. संत नामदेव, ज्ञानेश्वर, तुकारामांपासून संत परंपरेतील अनेक संतांनीही अंधश्रद्धांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवला. महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासारख्या समाजसुधारकांनी आधुनिक काळात त्याला वैचारिक दिशा दिली. अगदी अलीकडच्या काळातही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी रूढी परंपरांच्या विरुद्ध संघर्ष केला. या संघर्षात दाभोलकर यांना प्राणांचीही किंमत द्यावी लागली. महाराष्ट्र सरकारने जादूटोणा प्रतिबंधक कायदा करून इथल्या अनिष्ट प्रथांच्या विरोधातील चळवळीला ताकद दिली. राज्यभरात शेकडो कार्यकर्ते, विचारवंत, अनेक संघटना अंधश्रद्धांच्या विरोधात जनजागरण करीत आहेत. तरीसुद्धा म्हैसाळसारखी घटना घडते याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही. सुशिक्षित कुटुंबामध्ये गुप्तधनासारख्या गोष्टीवर विश्वास ठेवला जातो आणि त्यासाठी एखाद्या मांत्रिकाच्या नादी लागतात, ही गोष्टसुद्धा चक्रावून टाकणारी आहे. अंधश्रद्धेचा आणि शिक्षणाचाही तसा फारसा सबंध नसल्याचे यातून स्पष्ट होते. माणसे अगतिक बनली की सारासार विवेक गमावतात हेही यातून दिसून येते.

तांत्रिक, मांत्रिक, भोंदू लोक आपल्या स्वार्थासाठी अनेक काल्पनिक कहाण्या उभ्या करतात आणि भोळ्या भाबड्या लोकांच्या गळी उतरवतात. त्यात जे लोक फसतात त्यांची आर्थिक लुबाडणूक तर होतेच परंतु अनेकदा त्यांच्या प्राणावरही बेतू शकते. म्हैसाळमध्ये तेच घडले आहे. आजच्या काळात या घटनेबद्दल केवळ हळहळ करत न बसता भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रबोधनाची चळवळ अधिक गतिमान करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञाननिष्ठा रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याचाच भविष्यातील अशा घटना रोखण्यासाठी उपयोग होऊ शकतो. बाकी गोष्टींना तसा फारसा अर्थ नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in