-डॉ. सुनील भगत
भ्रम विभ्रम
छद्म विज्ञान, स्यूडो सायन्स हे आपण विज्ञान असल्याचा दावा करते. परंतु वैज्ञानिक समुदाय त्याला विज्ञान म्हणून स्वीकारत नाही. छद्म विज्ञानामध्ये अप्रचलित विज्ञान किंवा वैद्यकीय सिद्धांतांचा समावेश नसलेले विज्ञान येते. वैज्ञानिक समुदायाद्वारे ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र आणि फेंग शुई हे छद्म विज्ञान मानले जातात. तसेच सध्या मिड ब्रेन ॲॅक्टिव्हेशन असा दावा करणाऱ्या छद्म वैज्ञानिक प्रशिक्षण पद्धतीची पालकांमध्ये खूप चर्चा आहे. याद्वारे मुलांचा बुद्ध्यांक वाढतो, हा पूर्णत: अशास्त्रीय दावा आहे.
मध्य मेंदू सक्रियीकरण म्हणजेच मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन या तंत्रज्ञानाद्वारे बुद्ध्यांक वाढविण्याचा, अंध दृष्टी विकसित करण्याचा तसेच स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारण्याचा अशास्त्रीय दावा केला जातो. म्हणूनच मध्य मेंदू सक्रियीकरण (mid brain activation) म्हणजे काय? हे समजून घेणे आवश्यक आहे. त्यातील अशास्त्रीय दावाही समजून घ्यायला हवा.
मेंदू आणि मानसिक वाढ
मेंदू हा मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. तो क्रिया व प्रतिक्रिया नियंत्रित आणि समन्वयित करतो. विचार करणे आणि अनुभवणे शक्य करतो. ज्या गोष्टींमुळे आपण ‘मानव’ बनलो आहोत अशा आठवणी आणि भावना या सगळ्या गोष्टी मेंदुद्वारे घडतात. म्हणूनच त्याला ‘मास्टर’ म्हणतात. मानवी मेंदूचे वजन सुमारे १.३ ते १.५ किलो असते. प्रत्येकजण आपल्या मेंदूच्या क्षमतेचा १००% वापर करतो. मेंदूचा असा कोणताही भाग नसतो जो वापरात नसतो. मेंदूचे काही भाग अधिक कार्य करतात, परंतु ते सर्व महत्त्वाच्या भूमिका बजावतात. मध्य मेंदू (Mid brain) हा भाग मानवी शरीरातील संप्रेरकं म्हणजेच हार्मोनल स्राव उत्तेजित करून मेंदूला जागृत करतो. संप्रेरके (Harmons) अशी रसायने आहेत जी तुमच्या रक्ताद्वारे तुमचे अवयव, त्वचा, स्नायू आणि इतर ऊतींना संदेश देऊन तुमच्या शरीरातील विविध कार्यांचा समन्वय साधतात. हे संदेश तुमच्या शरीराला काय करायचे आणि कधी करायचे ते सांगतात. जीवनासाठी आणि आरोग्यासाठी ही संप्रेरके आवश्यक आहेत.
पिट्यूटरी ग्रंथी (pituitary gland) या संप्रेरक स्रावांचे नियमन करते. यासाठी प्रजातींच्या उत्क्रांतीशी संबंधित पाइनल ग्रंथी सक्रिय करणे महत्त्वाचे असते. पाइनल ग्रंथी (pineal gland) ही मेंदूतील एक लहान अंतःस्रावी ग्रंथी आहे जी मेलाटोनिनचा स्राव स्त्रवते. हे एक असे संप्रेरक आहे जे झोप आणि सर्काडियन लय नियंत्रित करते आणि उजव्या मेंदूची बुद्धिमत्ता वाढवण्याची क्षमता नियंत्रित करते. मध्य मेंदू सक्रियीकरण (Mid brain activation) यालाच अलिकडे माईंड ग्रूमिंग म्हणतात. मध्य मेंदूच्या सक्रियतेचे फायदे म्हणून सुपर बुद्धिमत्ता (IQ), दडलेल्या मानवी शक्यता, उत्कृष्ट अंतर्ज्ञान बाहेर आणणे या बाबी सांगितल्या जातात. मेंदू पूर्णपणे सक्रिय करण्यासाठी रेखाचित्रं, चित्रकला, इतर हस्तकला, कोडे, क्रॉसवर्ड पझल्स, सुडोकू गेम, जिगसॉ पझल्स आणि तर्कशास्त्र, गणित, शब्द आणि दृश्य-स्थानिक कौशल्यांवर अवलंबून असलेले इतर खेळ वापरुन मेंदूची शक्ती वाढवण्याचे हे उत्तम मार्ग आहेत, असे सांगितले जाते. या प्रकारच्या खेळांना एकाधिक संज्ञानात्मक क्षमतांची आवश्यकता असते, जे तुमच्या मेंदूला आव्हान देतात आणि प्रक्रिया गती व स्मरणशक्ती सुधारतात, असा दावा केला जातो.
मध्य मेंदू सक्रियीकरण प्रशिक्षणाचा फसवा दावा
मध्य मेंदू सक्रियीकरण प्रशिक्षण (M.B.A.) केंद्रानुसार असे सांगितले जाते की, तुमचा उजवा मेंदू सध्या व्यवस्थित काम करत नाही आहे. त्याला दुरुस्त, सक्रिय करण्यासाठी मध्य मेंदू सक्रियीकरण हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणे आवश्यक आहे. हे तंत्रज्ञान मानसिक क्षमता विकसित करते, मध्य मेंदू सक्रिय करते. काहींच्या मते ही पद्धत ५ ते १५ वयोगटातील मुलांसाठी जास्त उपयोगी आहे. परंतु प्रौढांना देखील त्यांचा मिड ब्रेन सक्रिय करता येऊ शकतो.
मध्य मेंदू सक्रियीकरण: छद्म विज्ञान
मध्य मेंदू सक्रियीकरण ही एक छद्म वैज्ञानिक प्रशिक्षण पद्धत आहे. यात अंध दृष्टी विकसित करण्याचा आणि स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारण्याचा दावा केला जातो. यात प्रशिक्षणार्थींना डोळ्यांवर पट्टी बांधून पाहण्याचे प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून ते पाहू शकत नसतानाही वस्तू वाचत असल्याचा भ्रम निर्माण करतात. हा मध्य मेंदू सक्रियीकरण घोटाळा ( Mid brain activation Scam) आहे. यात मुलांना डोळे बंद करून पाहण्यासाठी सक्षम होण्याकरिता ध्यानधारणेच्या स्थितीत, अलौकिक बुद्धिमत्तेच्या स्थितीत कसे प्रवेश करावे हे शिकवले जाते. ‘मध्य मेंदू सक्रियीकरण’ हा मुलांना प्रत्यक्ष डोळ्यांनी न पाहता दृश्य गुणधर्म जाणण्यासाठी प्रशिक्षित करण्याचा एक प्रशिक्षण कार्यक्रम आहे. अर्थातच विज्ञान शिक्षक आणि बुद्धिवादी या सगळ्याला छद्म-विज्ञान म्हणून संबोधतात. मात्र याचा उपयोग भोळसट पालकांना फसवण्यासाठी केला जातो. मेंदूच्या काही भागांना उत्तेजित करून मुलांची स्मरणशक्ती, एकाग्रता आणि अंतर्ज्ञान सुधारेल असा दावा करून हा कार्यक्रम चालवणाऱ्या संस्था पालकांना भुरळ घालतात. ते एका आठवठ्याच्या प्रशिक्षणासाठी अंदाजे दहा हजार ते पंचवीस हजार रुपये फी घेऊन पालकांची लुबाडणूक करतात. फ्रँचायझी संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या या अशा प्रशिक्षण कार्यक्रमांवर बुद्धिवादी मंडळी विशेषत: ‘फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनलिस्ट असोसिएशन’ (FIRA) चे अध्यक्ष नरेंद्र नायक यांनी टीका केली आहे.
कौन बनेगा करोडपती
३० नोव्हेंबर २०२१ मध्ये, ‘कौन बनेगा करोडपती’ च्या १३ व्या एपिसोडमध्ये एका तरुण मुलीने डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या अवस्थेत केवळ पुस्तकाचा वास घेऊन आपल्याला वाचता येत असल्याचा दावा केला होता. या एपिसोडमध्ये ती मुलगी या शोचे सूत्रसंचालन करणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधताना दाखवली. ‘फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनलिस्ट असोसिएशन’चे अध्यक्ष नरेंद्र नायक यांनी याविरोधात तक्रार केल्यानंतर चॅनेलने ज्या मुलीने डोळ्यांवर पट्टी बांधून पुस्तकाचा वास घेऊन वाचता येत असल्याचा दावा केला होता तो भाग मग काढून टाकला होता. नरेंद्र नायक यांनी या एपिसोडच्या ‘मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन’ सारख्या अवैज्ञानिक पद्धतींच्या जाहिरातींवरही आक्षेप घेतला होता. कारण या अशा जाहिरातींचा उपयोग पालकांचे शोषण करण्यासाठी केला जातो. बऱ्याच शास्त्रज्ञांनी मिडब्रेन सक्रियतेला ‘घोटाळा’ ‘मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन स्कॅम’ (Mid Brain Activation scam) असेही म्हटले आहे. ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ’ने देखील ह्या एपिसोडमधील ‘मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन’चा जाहीर निषेध नोंदवला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका
मध्य मेंदू जागृत करून बुद्ध्यांक वाढवण्याचा दावा करणारे ‘मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन’ हे आधुनिक विज्ञानाच्या आधारे पसरवले जाणारे थोतांड आहे. अशा फसवणुकीला पालक आणि विद्यार्थ्यांनी बळी पडू नये, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते त्यांच्या कार्यक्रमात पुस्तकाचा वास घेऊन डोळ्यांवर पट्टी बांधून मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन घोटाळ्याचा (Mid Brain Activation scam) ‘भांडाफोड’ करतात.
( लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नागपूरचे प्रधान सचिव आहेत.)