
देश-विदेश
भावेश ब्राह्मणकर
बॉम्ब वर्षाव, मृत्यूचे तांडव, भयाची दहशत, क्रूरतेची छाया अशा अत्यंत भयावह स्थितीत असलेला पश्चिम आशिया आणखीनच अस्वस्थ झाला आहे. पश्चिम आशियाने यापूर्वी अरब-इस्रायल हा संघर्ष पाहिला आहे. यामुळे तिसरे महायुद्ध पेटते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता पुन्हा अशाच प्रकारचे वातावरण तयार होते की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. इस्रायलच्या गाझावरील हल्ल्यांनी माणुसकीला पार काळीमा फासला आहे. त्यात आता इस्रायलने इराणवर हल्ले चढविले आहेत. हे सारे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असेच आहे.
अन्नाची पाकिटे घेण्यासाठी जीवाच्या आकांताने धावणारे चिमुकले, वृद्ध, महिला अशा साऱ्यांवरच धाडकन बॉम्ब पडतो... कानठळ्या बसवणारा स्फोट होतो... क्षणार्धात सारेच उद्ध्वस्त होते... नियतीच्या दुष्टचक्रामुळे हे सारे घडते आहे का? असा विचार करणाऱ्यांना हे कुठे ठाऊक आहे की, बेंजामिन नेतान्याहूसारख्या क्रूरकर्म्याचा थयथयाट सुरू आहे! युद्धोतिहासात आजवर हिटलरच्या अनेक निष्ठूर कहाण्या सांगितल्या जातात; मात्र, इस्रायलचे नेतृत्व करणाऱ्या नेतान्याहू यांनी मानवाधिकारांसह अनेक आंतरराष्ट्रीय नियम आणि कायद्यांचे सर्रास उल्लंघन करीत शस्त्रास्त्रांच्या हल्ल्यांचा सिलसिला कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे, जगातील १९४ देशांच्या डोळ्यादेखत हे घडते आहे. या सर्व देशातील प्रमुख, नेते, जनता हे सारेच ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ ठेवून गपगुमान पाहत आहेत. हे सारे कमी म्हणून की काय आता नेतान्याहू यांनी थेट इराणवर हल्ला चढविला आहे. त्यामुळे जगभरात एकच हलकल्लोळ उडाला आहे.
इस्रायल किंवा नेतान्याहू यांच्या मनमानीपणाला मुख्य पाठिंबा आहे तो अमेरिकेचा. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सत्तारूढ होण्यापूर्वी डांगोरा पिटत होते की, ते शांततेचे पाईक आहेत. रशिया-युक्रेन, इस्रायल-गाझा ही युद्धे क्षणार्धात थांबविण्याची वल्गनाही त्यांनी केली. प्रत्यक्षात त्यात त्यांना कुठलेही यश आलेले नाही. याउलट इस्रायल-इराण युद्ध सुरू झाल्याने सारेच फासे उलटे पडत आहेत. किंबहुना ट्रम्प यांची तशी इच्छा आहे, असेच म्हणणे योग्य ठरेल. पश्चिम आशियाने यापूर्वी अरब-इस्रायल हा संघर्ष पाहिला आहे. यामुळे तिसरे महायुद्ध पेटते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने ती निवळली. आता पुन्हा अशाच प्रकारचे वातावरण तयार होते की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.
जगभरातील ज्यू धर्मीयांनी आपला स्वतंत्र देश अस्तित्वात यावा यासाठी आग्रह धरला. त्यातूनच इस्रायलची रक्तरंजित निर्मिती झाली. दुसरे महायुद्ध आणि त्याच्या पश्चात हे सारे घडले. मात्र, मूळ रहिवाशांना हुसकावून लावत त्या जागी स्वतःला प्रस्थापित करणे आणि त्यानंतर तेथे हुकूमत गाजवण्याचे प्रकार घडले. यातूनच पश्चिम आशियाच्या शांततेला दृष्ट लागली. परिणामी, इस्रायलचा पॅलेस्टाईन, गाझा, इजिप्त, जॉर्डन, सीरिया, इराक, लेबनाॅन, इराण अशा विविध देशांशी सातत्याने संघर्ष होत राहिला. या संघर्षास वांशिकतेचाही लवलेश आहे. अरब राष्ट्रे आणि मुस्लिम धर्मीय विरुद्ध ज्यू अशा संघर्षाची किनार त्यास आहे. वांशिक युद्ध हे अतिशय भयानक असते. आजवरचा इतिहास तेच सांगत आला आहे. त्यामुळे आता पुन्हा तसा संघर्ष उभा राहणे जगाच्या हिताचे नाही, याची जाणीव इस्रायल आणि अमेरिकेसह सर्वच देशांनी ठेवणे गरजेचे आहे. मात्र, इस्रायल आणि अमेरिका यांनी डोळ्यावर पट्टी बांधल्याने त्यांच्याकडून तशी अपेक्षा ठेवणे गैर आहे.
इस्रायलकडून गाझा पट्टीमध्ये हजारो बळी घेतले जात आहेत. युद्ध आणि संघर्षाची एवढी भीषण दहशत तिथे आहे की, जे आता केवळ जगत आहेत, त्यांचे सुद्धा नजीकच्या काळात प्राण जाणार आहेत. अन्न, औषधे, उपचार यासह गरजेच्या वस्तूंचा नितांत तुटवडा तेथे आहे. इस्रायलकडून नागरी वस्त्यांवर दररोज दिवसा किंवा रात्री केव्हाही हल्ले केले जात आहेत. गाझा आणि पॅलेस्टाईन परिसरात असा एकही भाग नाही की जेथे हल्ल्याची शक्यता उरलेली नाही. संयुक्त राष्ट्रासह विविध संस्थांनी अहवालांमधून तेथील अनन्वित अत्याचार आणि क्रूरतेची मांडणी जगासमोर केली आहे. हे आकडे किंवा त्याचे वृत्त जगभर प्रसिद्ध केले जात आहे. प्रत्यक्षात इस्रायलने अमानुष हल्ल्यांचा हा ससेमिरा थांबवावा, यासाठी जगभरातून दबाव निर्माण होणे आवश्यक आहे; मात्र, महासत्ता असलेल्या अमेरिकेचा इस्रायलला असलेला भक्कम पाठिंबाच अनेकांना मूग गिळून गप्प बसवण्यास कारणीभूत ठरतो आहे. अमेरिकेला शिंगावर घेण्याची क्षमता असलेला रशियाच सध्या युक्रेनसोबतच्या युद्धात जायबंदी आहे. त्यामुळेच अमेरिका आणि इस्रायल यांचे फावते आहे. मात्र यात निष्पाप जनतेचा शेकडोच्या संख्येने बळी जात आहे.
इराण हा देश अण्वस्त्रे तयार करीत असल्याची वदंता थेट ८०च्या दशकापासून सुरू आहे. वारंवार तो आरोप नाकारत तसे काही नसल्याचे अहवाल प्रसृत झाले आहेत. असे असतानाही इराणचा हा अणुकार्यक्रम इस्रायलसाठी धोकादायक असल्याचे सांगत इराणवर हल्ले सुरू करण्यात आले आहेत. वास्तवतः इराण आणि इस्रायल यांची सीमा काही एकमेकांना लागून नाही. तरीही इस्रायलला इराणपासून असा धोका का वाटावा? आणि त्यांनाच तो का असावा? इराणच्या मानवी वस्तींसह महत्त्वाच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्र डागून इस्त्रायलने रणशिंग फुंकले आहे. इराणनेही त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकेने मिठाची गुळणी तोंडात धरल्याने इस्रायलचे फावते आहे. अधिकाधिक आक्रमक आणि विध्वंसकारी हल्ला करून इराणचा अणुकार्यक्रम हाणून पाडण्याचा इस्रायलचा डाव असला, तरी तो यशस्वी होण्याची सुतराम शक्यता नाही. मुळात नेतान्याहू यांचीच खुर्ची अस्थिर आहे. देशांतर्गत जनता आणि राजकीय नेत्यांच्या मनातूनही ते उतरले आहेत. हीच संधी साधून युद्धाचा अवतार घेणे नेतान्याहू यांना सोयीचे वाटले आहे. यातून मानव जातीचे मात्र मोठे नुकसान होत आहे. मानवाधिकारांचे सर्रास उल्लंघन घडते आहे.
इस्रायल-इराण युद्धाचा परिणाम जगाच्या पाठीवर विविध प्रकारे होत आहे. इराण हा तेल उत्पादक व पुरवठादार देशांचा सदस्य आहे. भारत आणि इराण हे मित्र आहेत. इराणकडून भारताला रास्त दरात, भारतीय रुपयात आणि उधारीने तेल मिळते. अमेरिकेने इराणवर असंख्य निर्बंध लादले असले, तरी तेलाचा हुकमी एक्का त्यांच्याकडे आहे. अनेक देशांना इराणकडून तेलाचा पुरवठा होतो. शिवाय इराणलगतच्या समुद्र आणि खाडीतून जगाचा तेल व्यापार, मालवाहतूक होते. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे ही वाहतूकही अडचणीत आली आहे. पहिल्या झटक्यात कच्च्या तेलाचे दर भडकले आहेत. आगामी काळात ते आणखी वाढू शकतात. यातून देशोदेशी महागाईचा भडका उडण्याची चिन्हे आहेत. भारतही या संकटातून वाचू शकणार नाही. म्हणजेच, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा थेट आणि अप्रत्यक्ष फटका अनेक देशांना बसणार आहे. असे असतानाही हे युद्ध थांबावे यासाठी ठोस प्रयत्न होताना दिसत नाही. मुजोरी करणाऱ्या इस्रायल किंवा त्यास पाठिंबा देणाऱ्या अमेरिकेवर काहीही दबाव निर्माण होत नाही. यामुळेच इस्रायलची मनमानी वाढत आहे.
इस्रायलला वेसण घालण्यात जगातील १९४ देशांना अपयश येणे हे अनेक समस्यांना जन्म देणारे आहे. तसेच, ‘आपले कुणी वाकडे करू शकत नाही’ या खुमखुमीलाही बळ देणारे आहे. यातूनच चीन हा तैवानचा घास घेण्यासाठी सरसावू शकतो. सार्वभौमत्व धोक्यात येणे हे कुठल्याही देशासाठी आव्हानात्मकच. तसेच, त्याचे रक्षण करण्यात अन्य देशांकडून जाणीवपूर्वक अडथळे आणणे हे सुद्धा घातक आहे. त्यामुळे सारासार विचार करता कुठल्याही सार्वभौम देशावर अचानक आणि हिंसक हल्ला करणे हे अत्यंत चुकीचे आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर याबाबत केवळ चिंता व्यक्त होते. अशा कृत्यांना वेसण घालण्यासाठीच संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली असली, तरी ही संस्था दुबळी असल्याचे प्रतीत होत आहे. दुसऱ्या देशावर आक्रमण करणे म्हणजे स्वतःचा देश सुरक्षित ठेवणे हा प्रघात रुजणे म्हणजे मानवी अस्तित्व अधिकाधिक धोक्यात जात असल्याचे संकेत आहेत. इस्रायलने आपल्या कृतीतून त्याची ठळक जाणीव संपूर्ण जगाला करून दिली आहे.
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध आणि पर्यावरणाचे अभ्यासक. मुक्त पत्रकार