ही अस्थिरता अराजकतेकडे नेऊ शकते?

महाराष्ट्रात या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागल्यामुळे सर्व कामे ठप्प झाली आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीला खीळ बसली असून महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या घटकांकडून सुरु आहेत.
ही अस्थिरता अराजकतेकडे नेऊ शकते?
ही अस्थिरता अराजकतेकडे नेऊ शकते?'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

सह्याद्रीचे वारे

अरविंद भानुशाली

महाराष्ट्रात या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागल्यामुळे सर्व कामे ठप्प झाली आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीला खीळ बसली असून महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या घटकांकडून सुरु आहेत.

राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून पहिल्या राउंडमध्ये महायुती वरचढ ठरली आहे. तर महाविकास आघाडीचा पाला-पाचोळा झाल्याचे चित्र समोर आले आहे. महाविकास आघाडीने दिलेले उमेदवार पळून गेल्याने सहा ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडणूक न लढवता विजयी झाले आहेत. महाराष्ट्रात या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागल्यामुळे सर्व कामे ठप्प झाली आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीला खीळ बसली असून महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या घटकांकडून सुरु आहेत. पुणे व नाशिक हे दोन जिल्हे विविध विषयाने सध्या महाराष्ट्राच्या गुन्हेगारीमध्ये गाजत आहेत.

महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु असून तीच परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये दिसत आहे. मित्र पक्ष परस्परांवर चिखलफेक करत आहेत. बंडखोरी शमविण्यात महायुतीला ५० टक्के यश आले आहे. त्यामुळे महायुतीबाबतही निराशा झाली आहे. या निवडणुकीमुळे महत्वाचे विषय बाजूला पडले आहेत. अशोक खरात या भोंदू बाबाने तंत्र-मंत्राच्या आधारावर कोट्यवधींची संपत्ती राजकारण्यांच्या आशीर्वादाने जमा केली आहे. तर इकडे नीट पेपर फुटीमुळे शिक्षण क्षेत्रात गोंधळ झाला आहे. तर तिकडे राहुल गांधी मोदीसरकार हे वर्षभरात पडणार अशी भविष्यवाणी व्यक्त करीत आहेत.

महायुतीमधील घटक पक्षात आता स्थिरता राहिली नसून आरोप प्रत्यारोप आता सुरु आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी भाजप विरोधात आघाडी उघडली आहे. तर इकडे संजय राऊत यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येणाची चर्चा सुरु केली आहे. ज्यांना पश्चाताप होत असेल त्यांना मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत. गेल्या काही महिन्यात उद्धव ठाकरे यांनी गद्दारांना आमच्याकडे थारा नाही असे वक्तव्य केले आहे. विरोधकांमध्ये फूट पाडण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. राष्ट्रवादीचे विलीनीकरण बाजूला पडले असतांना दोन्ही शिवसेना एकत्र येणाचे राजकारण सुरु आहे. राज्यात एकूण सर्वत्र गोंधळ सुरु आहे. राज्यात पुन्हा कायदा सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पुणे पिंपरी चिंचवड आदी भागात विषारी दारूने माणसे मरत आहेत. २१ पोलिसांना व वरिष्ठांना निलंबित केले असले तरी मुख्य प्रश्न सुटत नाहीत. नीट पेपर फुटीमुळे तर केंद्र व राज्य सरकारची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. याच बरोबर नाशिकचे टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरण गाजत आहे. याप्रकरणीचा तपास सीआयडी सीबीआय क्राईम ब्रांच करीत असले तरी अजून ते कोणत्याही निष्कर्षांपर्यन्त आले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्याचा कारभार आहे. सध्या कायदा सुव्यवस्था या बाबतच चर्चा सुरु आहे. पोलिसांचा धाक राजकारणाच्या हस्तक्षेपामुळे राहिला नाही ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. परिस्थिती अशीच राहिल्यास अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. एका बाजूला निवडणुकीचे राजकारण तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात प्रक्षोभ निर्माण करण्याचे वातावरण हे चिंताजनक आहे. जरांगे - पाटील यांच्यापुढे राज्य सरकारने लोटांगणंच घातले असल्याचे दृश्य गेले काही दिवस दिसून येत आहे. मंत्री व नेते आपली आसने सोडून जरांगे पाटील यांच्यामागे धावत असल्याचे दृश्य गेले आठवड्याभरात दिसून येते. त्यामुळे मोठा घटक असलेला ओबीसी समाज हाही संतप्त होऊन रस्त्यावर उतरण्याची भाषा करीत आहे. राज्य सरकारच्या विरोधात विरोधकांनी दंड थोपटले आहेत.

देशात शिक्षण क्षेत्रात आज जो सावळा गोंधळ चालू आहे. त्यामुळे विद्यार्थी, तरुण मंडळी संतापली आहे. आधार म्हणून त्यांनी कॉक्रोच पार्टीचा हात धरला तर त्यात नवल नाही. कॉक्रोच जनता पार्टीचे मोहोळ येत आहे. तरुणांमध्ये अस्थिरता असल्याने यापैकी काही तरुण कॉक्रोच पार्टीकडे वळले आहेत. पेपर फुटीचे हे आंदोलन आज कॉक्रोच पार्टीने हाती घेतले आहे तर दुसऱ्या बाजूला शरद पवार राष्ट्रवादीचा काही संबंध नसतांना रोहित पवार हे अस्थिरता निर्माण करत असल्याचे चित्र समोर येत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कॉक्रोच पार्टीला समर्थन देण्याचे जाहीर केले. १४० कोटी भारतीय जनतेच्या पुढे २५ ते ३० लाख तरुणांचा सोशल मीडिया पॉवरफुल ठरल्याच्या आरोळ्या मारल्या जात आहेत. यापूर्वी या देशाने जनता राजवटीचा अनुभव घेतला आहे. काँग्रेसच्या विरोधात १९६६ मध्ये सर्व विरोधक एकत्र आले होते. त्यामध्ये बिहारमध्ये कर्पुरी ठाकूर, मध्यप्रदेशमध्ये वीरेंद्रकुमार सकलेचा, उत्तरप्रदेशमध्ये जे बी कृपलानी यांच्या पत्नी मुख्यमंत्री झाल्या होत्या. १९७५ची आणीबाणी आजही डोळ्यसमोरून जात नाही. इंदिरा गांधींचे सरकार पाडून जनता पार्टीच्या हाती सत्ता आली होती. परंतु आपापसातील मतभेदामुळे ही जनता पार्टी लयाला गेली.

इंदिरा गांधी मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आणि शरद पवारांचे पंतप्रधान पदाचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. शरद पवारांनी तर सोनिया गांधी ह्या परदेशी आहेत म्हणून दुसरं बंड केले होते, परंतु पुढे हे बंडही टिकले नाही. आता पवारांना बुद्धी सुचली आहे की, त्यावेळी आपण सोनिया गांधींवर जे बोललो ते बोलून चूक केली. शरद पवारांचे हातपाय चालत नसतांना ते राज्यसभेची शपथ घेण्यासाठी व्हीलचेयरवरून गेले हे राज्यातील जनतेने पाहिले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंब कधीच मागे पडले नाही. एका बाजूला मराठा समाजाला पाठिंबा देऊन आर्थिक मदत करायची तर दुसऱ्या बाजूला ओबीसी घटकांना मदत करून त्यांनाही धरून ठेवण्याची कसरत त्यांनी केली. त्यातूनच शरद पवार विरुद्ध अजित पवार असा वाद झाला. पवारांचे कुरघोडीचे राजकारण आता समोर येत आहे. त्याची परिणती विधान परिषदेत दिसून आली. त्यांनी दिलेल्या उमेदवारांना रणांगणातून पळ काढावा लागला.

भारत देशावर सध्या युद्धाचे ढग दिसत असून त्यामुळे डिझेल, पेट्रोल, गॅस व त्यावर अवलंबून असणारे उद्योग डबघाईस आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही उपाययोजना सुचविल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यापेक्षा त्याच्यावरही वार केले जात आहेत. महाराष्ट्रात तर काल पक्षांतर करून आलेल्यांना उमेदवारी दिली जाते. हा निकषच चुकीचा आहे. अहिल्यानगरचे प्राजक्त तनपुरे काल शरद पवार गटातून महायुतीकडे आले त्यांना ४८ तासात विधान परिषदेची उमेदवारी दिली. तर इकडे राष्ट्रवादीमध्ये काकडे बंधू भाजपला सोडून अजित पवार गटात गेले. त्या काकडेंना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. मित्र पक्षच एकमेकांचे पाय ओढत असल्याचे दिसत आहे. संभाजी नगरमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. शिवसेनेचे मंत्री भाजपा नेत्यांवर आरोप करत आहेत. नुसतेच आरोप नाहीत तर बंडाची भाषा केली जात आहे. असे किती दिवस चालणार? विरोधक महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकत असले तरी प्रत्यक्षात महायुतीमध्ये काही आलबेल नाही. विधान परिषद निवडणुकीत त्याची प्रचिती समोर येत आहे. तिकडे डोंबिवलीमध्ये भाजपाच्या माजी नगरसेवकांना शिवसेनेत घेतले जात आहे. महायुती म्हणून याला काही अर्थ राहिला आहे असे दिसत नाही. एकूणच राज्यात सर्वत्र कुणाचा पायपोस कुणाच्यात राहिलेला नाही असे दिसून येते. सध्या महाराष्ट्रात रोज नवीन विषय समोर येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला काटकसरीचे सल्ले द्यावे त्यावरही राजकारण केले जात आहे. यापूर्वी काँग्रेसचे सरकार असतांना याहीपेक्षा कडक निर्बंध घातले जात होते. उदाहरण द्यायचे म्हटल्यास स्व. लाल बहादूर शास्त्री यांनी जनतेने एक दिवस बुधवारी उपवास करावा असे म्हटले होते तर भारत चीन युद्धानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाची आर्थिक परिस्थिती बिघडल्याने हजारो क्विंटल सोन जमा केल होते. त्याचबरोबर १९७१ च्या बांगलादेश भारत युद्धात इंदिरा गांधी यांनी आवाहन केले होते त्याला जनतेने प्रतिसाद दिला होता.

सध्या देश प्रथम ही भावना पुसण्याचे राजकारण चालू आहे. यातूनच अराजकाची स्थिती निर्माण होण्याची धास्ती आहे. विविध पक्षाचे प्रवक्ते हे स्वतःच्या पक्षबद्द्ल काही बोलत नाहीत, मात्र देशात व जगात काय चालले आहे यावर शेरेबाजी करत आहेत. पूर्वी असे होत नव्हते. महाराष्ट्रात काँग्रेसच्या काळात विरोधक नगण्य होते, परंतु त्यांनी कधी राष्ट्रविरोधी भूमिका घेतली नाही. सध्या सोशल मीडियाला हाती धरून महाराष्ट्र पेटवण्याची भूमिका चालू आहे. हे थांबले नाही तर महाराष्ट्रात अस्थिरता माजेल.

logo
marathi.freepressjournal.in