
शिक्षणनामा
रमेश बिजेकर
अर्वाचीन काळात ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेनंतर व पेशवाईच्या अखेरनंतर भारतात मोठी स्थित्यंतरे घडली. शिक्षण, समाजरचना, आर्थिक-राजकीय व्यवहारांमध्ये बदल झाला. ब्राह्मणी पेशवाईने जातीय अत्याचार, शोषण आणि स्त्री-शूद्र-अतिशूद्रांवरील अमानवी वागणूक वाढवली. फुले-आंबेडकरांनी शिक्षण सार्वत्रिकीकरणाचा आग्रह धरला. शिक्षण ‘कोणासाठी’ आणि ‘कशासाठी’ यावर वाद सुरू झाला. जाती-लिंगाधारित भेद, शोषण व शिक्षणव्यवस्थेतील उतरंड समजून घेणे ही आजची खरी गरज ठरते.
अर्वाचीन काळात भारतात अनेक स्थित्यंतरे घडली. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना होणे व पेशवाईची राजकीय सत्ता संपुष्टात येणे हे प्रमुख दोन बदल अर्वाचीन काळात झाले. ईस्ट इंडिया कंपनीने आपले पाय रोवल्यानंतर क्रमाक्रमाने इंग्रजांनी भारतातील राजकीय सत्ता हस्तगत केली. या बदलाचे दूरगामी परिणाम राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रांवर झाले. उत्पादन साधन व उत्पादन संबंधांमध्ये नवे बदल घडले. शिक्षण क्षेत्रात मूलभूत बदल झाले. वर्णजाती व्यवस्थेतील शिक्षणबंदी औपचारिक स्वरूपात उठवली गेली; मात्र शिक्षणबंदीच्या भूमिकेचा प्रभाव राजकीय, सामाजिक क्षेत्रांवर कायम राहिला. अर्वाचीन काळातील शिक्षणाचे आव्हान बहुपदरी झाले. वर्णजाती व्यवस्थेतील उतरंडीची सामाजिक रचना व उत्पादन संबंधांमध्ये काही बदल झाले, तरी नव्या स्वरूपात सामाजिक उतरंड कायम राहिली. उतरंडीची व स्तरीकरणाची शिक्षणव्यवस्था उभी राहिली. हे नवे आव्हान शिक्षण व्यवस्थेपुढे उभे राहिले. उत्पादन व्यवस्था व राजकीय सत्तेशी शिक्षणाचा संबंध जोडण्याच्या विचाराची सार्वजनिक चर्चा घडू लागली. मोजक्यांचे शिक्षण की शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण या दोन परस्परविरोधी दृष्टिकोनांमध्ये ही चर्चा घडली. ही चर्चा ‘शिक्षण कोणासाठी’ एवढ्यापुरती मर्यादित न राहता ‘शिक्षण कशासाठी’ इथपर्यंत विस्तारली. सत्ताधारी विचारसरणीने मोजक्यांचा शिक्षणविचार व ब्राह्मणी भांडवली शिक्षण आशय पुरस्कृत केला, तर जोतीराव फुलेंनी शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा आणि आधुनिक ज्ञान व अब्राह्मणी शिक्षण आशयाचा पुरस्कार केला. अर्वाचीन काळातील शिक्षणबदल, त्यातील विविध पदर व संघर्ष समजून घेणे आवश्यक आहे. हा संघर्ष समजून घेण्यासाठी त्या काळातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक स्थित्यंतरे, सिद्धांत व विवरण समजून घेणे आवश्यक आहे.
ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ३१ डिसेंबर १६०० रोजी झाली, तर पेशवाईची स्थापना १७१३ मध्ये झाली. ईस्ट इंडिया कंपनी व पेशवाई समांतरपणे एकाचवेळी कार्यरत होत्या. १७१३ ते १८१८ पर्यंत साधारणतः शंभर वर्षे पेशवाईची कारकीर्द राहिली. शिवाजी व संभाजीच्या मृत्यूनंतर पेशवाई पूर्णतः ब्राह्मणी झाली. गेल ऑमव्हेट ब्राह्मणेतरांच्या समजुतीचा संदर्भ देत पेशवाईबद्दल पुढीलप्रमाणे मत व्यक्त करतात - ‘...शिवाजीराजांच्या व पेशवांच्या सत्तांच्या स्वरूपात आमूलाग्र फरक होता. त्यांच्या मते पेशव्यांनी शिवाजीराजांची परंपरा बळकावून तिचा विध्वंस केला...’ शिवाजी व संभाजीच्या जातीविरोधी भूमिकेला तिलांजली देऊन कर्मठ जातीसमर्थनाची भूमिका पेशवाईत घेतली गेली. जातीव्यवस्थेच्या परमोच्च विकासाचा हा काळ होता. पेशवाईच्या उत्तरार्धात ब्राह्मण्य उर्मठ, उन्मत्त व अमानवी बनले होते. शोषणाने टोक गाठले होते. या काळातील सामाजिक व आर्थिक शोषणाची विदारकता जोतीराव फुलेंनी पुढीलप्रमाणे मांडली - ‘....गरीब बिचारे शूद्र लोकांना रात्रंदिवस भर उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात एकसारखे शेतात कष्ट करावे लागत असत. त्यांना अंगास जाडेभरडे वस्त्र किंवा पोटास जाडेभरडे अन्न देखील मिळण्याची मारामार असे. आता त्यांच्याविषयी, म्हणजे स्त्रियांच्या पोशाखाविषयी विचाराल तर ते आम्हास मोठे दु:ख वाटते... बिचाऱ्या जाडा घोंगडा सुमारे दोन किंवा अडीच रुपये किमतीचा मिळाला, तर त्यास एकदोन वर्षांपर्यंत घालावा लागे...’
मात्र त्याचवेळी जनतेकडून वसूल केलेला पैसा ब्राह्मण हितासाठी पेशवाईत पुढीलप्रमाणे खर्च केला जात होता. याकडे फुलेंनी आपले लक्ष वेधले आहे - ‘पेशवाईच्या राज्यात त्यांनी आपल्या जातीचे ब्राह्मण भट लोकांकरिता जागोजागी देवांची संस्थाने स्थापन करून तेथे त्याकरिता अन्नछत्रे घातली. प्रजेकडून पैसा वसूल झाला की, लागलीच ब्राह्मण भोजनाप्रीत्यर्थ अमुक संस्थानाकडे दोन लक्ष रुपये, अमुक संस्थानाकडे पन्नास हजार, येणेप्रमाणे ठराव करून पैसा वाटून घ्यावा... दररोज जेवण व वर ओगराळे भरून दक्षिणा...’
यावरून स्पष्ट होते की, परस्परविरोधी हितसंबंधाच्या भूमिकेतून अन्न, वस्त्रसारख्या मूलभूत गरजा कनिष्ठ जातींना भागवणे अवघड झाले होते. इतकेच नव्हे, तर स्त्री-शूद्र-अतिशूद्रांचा अमानवी छळ होत होता. विठोजीराव होळकरांना झालेल्या शिक्षेचा हवाला देत फुलेंनी स्त्री-शूद्र-अतिशूद्रांना क्षुल्लक कारणावरून किंवा शेतसारा देण्यास विलंब झाल्यास वा चुकल्यास अमानवी व क्रूर शिक्षा कशी दिल्या जात होत्या याचे उदाहरण पुढीलप्रमाणे दिले आहे. ‘तसेच मनुष्याचे अंग चाबकाने अथवा झाडाच्या फोकाने फोडून सर्वांगातून रक्त वाहावे तोपर्यंत मारून, त्यावर मिठाचे अथवा चिंचेचे पाणी शिंपडावे आणि त्यापासून त्यास अत्यंत व्यथा प्राप्त होऊन तो कसा तळमळत आहे हे पहावे...’
जातीव्यवस्थेने माणसाची ओळख निश्चित केली, अधिकार व कर्तव्यांची विभागणी केली व अनिर्बंध आणि अमर्याद भौतिक शोषणाची व्यवस्था उभी केली. पेशवाईतील तिचे भीषण रूप डॉ. आंबेडकरांनी पुढीलप्रमाणे व्यक्त केले आहे- ‘पेशव्यांच्या काळात, अस्पृश्यांची सावली हिंदूच्या अंगावर पडून त्याला विटाळ होऊ नये म्हणून, हिंदू रस्त्याने येत असताना अस्पृश्याला सार्वजनिक रस्ता वापरण्याची परवानगी नव्हती... अस्पृश्याच्या ओळखीसाठी खूण म्हणून त्याच्या मनगटावर किंवा गळ्याभोवती काळा दोरा बांधावा लागत असे...’ अस्पृश्यांच्या थुंकीमुळे वा पायाच्या स्पर्शामुळे अपवित्र झालेली जमीन पवित्र करण्यासाठी त्यांच्या कमरेला झाडू व गळ्यात मडके बांधले जात होते. गाईचे गोमूत्र पवित्र मानून माणसाचा स्पर्श अपवित्र मानणाऱ्या हिंदू धर्माचे पेशवे समर्थक होते. रस्त्यासारखी सार्वजनिक संपत्तीचा अधिकार अस्पृश्यांना इतरांसारखा अनिर्बंध नव्हता, बंधनयुक्त होता. इतकेच नव्हे, तर अस्पृश्यांनी व शूद्रांनी (ओबीसी) खासगी संपत्ती किती व कोणती ठेवावी याचे नियम जातीव्यवस्थेने ठरवले होते. जे सगळ्यांसाठी समान नव्हते. ब्राह्मणासारखा स्तर वा जीवनमान शूद्र जातींनी जगण्याचा प्रयत्न करणे ब्राह्मणांना सहन होत नसे. याचे उदाहरण डॉ. आंबेडकरांनी पुढीलप्रमाणे दिले आहे - ‘...सोनार स्वतःला देवज्ञ ब्राह्मण म्हणवू लागले, ब्राह्मणाप्रमाणेच निऱ्या घालून कासोटा खोचलेले धोतर नेसू लागले तसेच अभिवादनासाठी ‘नमस्कार’ हा शब्द वापरू लागले. हे दोन्ही खास ब्राह्मणांची वैशिष्ट्ये होती. ब्राह्मणांना सोनारांनी केलेले त्यांचे अनुकरण आणि ब्राह्मण म्हणून गणले जाण्याचा प्रयत्न आवडला नाही. ब्राह्मणांनी पेशव्याच्या अधिकाऱ्यांच्या सहाय्याने सोनारांचा प्रयत्न यशस्वीपणे चिरडून टाकला...’
पेशवाईची विस्ताराने चर्चा त्यातील छळ व क्रूरता लक्षात घेण्यापुरती मर्यादित नाही, तर त्या व्यवस्थेतील हितसंबंधाची चौकट, भौतिक व सामाजिक शोषण समजून घेण्यासाठी केली आहे. या चौकटीचा संबंध पुढे ईस्ट इंडिया कंपनी, इंग्रजांचे साम्राज्यवादी राजकीय धोरण व त्यातून प्रसवणाऱ्या शिक्षणधोरणांशी आहे. पुरुषसत्ताक वर्णजाती संघर्ष हा भारताचा मूलभूत संघर्ष होता हे पेशवाईच्या भूमिकेने पुन्हा एकदा अधोरेखित केले. या मूलभूत संघर्षात वसाहतिक काळात कोणते बदल झाले? ईस्ट इंडिया कंपनीची भूमिका काय होती? १८१८ मध्ये पेशव्यांची राजकीय सत्ता संपुष्टात आली, परंतु जाती अधिष्ठानाचे काय झाले? हे समजून घेऊन आपल्याला पुढे जावे लागणार आहे.
(क्रमशः)
जनतेचा शिक्षण जाहीरनामा, शिक्षण बचाव समन्वय समिती, महाराष्ट्र
Ramesh.bijekar@gmail.com