मोदी-शहा विसरले,गरिबी, बेरोजगारी आणि महागाई

राजकारणात इतिहासाचा पाया पक्का असावा लागतो. अन्यथा आपलेच भाषण, आपलेच वक्तव्य आपल्या अंगाशी येते.
मोदी-शहा विसरले,गरिबी, बेरोजगारी आणि महागाई

- ॲड. हर्षल प्रधान

मत आमचेही

राजकारणात इतिहासाचा पाया पक्का असावा लागतो. अन्यथा आपलेच भाषण, आपलेच वक्तव्य आपल्या अंगाशी येते. यंदाच्या लोकसभेच्या संपूर्ण रणसंग्रामाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भरकटलेले मुद्दे. मोदी-शहा यांना सातत्याने आपल्याच भाषणांचा वा वक्तव्यांचा पडणारा विसर हे आणखी एक वैशिष्ट्य. भाजपाचा खरा शत्रू काँग्रेस नाही, तर गरिबी, बेरोजगारी आणि महागाई आहे. काँग्रेसने ६० वर्षांत सगळे राजकारण हे ‘गरिबी हटाव’ या एकाच मुद्यावर केले. पण त्यांना त्यात यश आले नाही. भाजपा त्यामानाने अगदीच नवखा आहे. वाजपेयी-अडवाणी, महाजन-मुंडे यांना किमान आपल्या वक्तव्यांचा विसर कधी पडत नसे. मात्र मोदी-शहा , फडणवीस-बावनकुळे या राजकारण्यांना आपलीच आधीची वक्तव्यं आठवत नाहीत. त्यामुळे ही निवडणूक भरकटली आहे आणि महागाईसारख्या मूळ मुद्द्यांपासून बाजूला सरकली आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला हतबल करण्याचा निर्धार करणाऱ्या भाजपा आणि संघांचे मुख्य लक्ष्य हे काँग्रेसला देशातून हद्दपार करण्याचे आहे. त्यामुळे जर काँग्रेसला संपवण्याचे ध्येय पूर्ण करायचे असेल तर काँग्रेसला मदत करणारे जे जे पक्ष असतील त्यांना आधी मुळासकट उखडणे आवश्यक आहे आणि म्हणूनच भाजपाच्या सत्ताधीशांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी या बलाढ्य पक्षांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा परिणाम उलटा झाला आणि भाजपा महाराष्ट्रातील सामान्य माणसांच्या नजरेतून उतरली. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी ‘तुम्ही देश पहा, आम्ही महाराष्ट्र पाहतो’ म्हणत हिंदुत्त्वाच्या मुद्यावर महाराष्ट्रात भाजपाला शिवसेनेसोबत बरोबरीचे स्थान दिले, त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेला आता ‘नकली सेना’ म्हणण्यापर्यंत भाजपाने आपली भूमिका बदलली आहे. मोदींनी तर कहरच केला. ते उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांची ‘नकली संतान’ म्हणाले. अरेरे , काय हे मोदी? या एका वाक्याने मोदींनी संपूर्ण महाराष्ट्र गमावला.

महाराष्ट्र ही भावनिक भूमी

महाराष्ट्रातील जनतेला हे पटले नाही आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्यामागे महाराष्ट्रातील जनता उभी राहिली आहे. महाराष्ट्र ही भावनिक भूमी आहे. एखाद्या माणसाला इथे त्याच्या कर्तृत्त्वाने स्वीकारले जाते. ज्या उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात महाराष्ट्रातील जनतेला अतिशय प्रेमाने आणि संयमाने हाताळले त्या उद्धव ठाकरे यांना केवळ सत्ता मोहापायी भाजपाने मुख्यमंत्रीपदावरून पायउतार केले. आता उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांची ‘नकली संतान’ म्हणत आपली अक्कल पाजळली आहे.

भाजपा नेत्यांचे उद्धव ठाकरे हेच लक्ष्य

उद्धव ठाकरे यांना अमित शहा जाहीर सभांमध्ये एकामागोमाग एक प्रश्न विचारत आहेत. उद्धव ठाकरे यांना काँग्रेसचा जाहीरनामा मान्य आहे का? उद्धव ठाकरे स्वातंत्रवीर सावरकर यांचे नाव का घेत नाहीत? काँग्रेस म्हणते आम्ही ३७० कलम पुन्हा आणू, हे उद्धव ठाकरेंना मान्य आहे का ? काँग्रेस म्हणते आम्ही ‘सीएए’ला विरोध करू, हे उद्धव यांना मान्य आहे का? इत्यादी. भाजपाच्या या आक्रमक प्रचाराला उद्धव ठाकरे यांनीही सुरुंग लावला. ते म्हणाले, ‘गाईवर नको, महागाईवर बोला’, ‘एक अकेला सबपे भारी, साथमें सारे भ्रष्टाचारी’, ‘अबकी बार भाजपा तडीपार’, ‘दोन सुरतवाल्यांना उलटे लटकवणार’ अशा आक्रमक शब्दांमध्ये ते भाजपाचा समाचार घेत आहेत. थेट उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांना लक्ष्य करण्यामध्ये भाजपाची अगतिकताच दिसून येते. पण त्याचसोबत त्यांच्या अडचणीही वाढल्या. कारण त्यांच्या बोलण्यातून त्यांना काँग्रेसआणि शिवसेना यांच्या संबंधांचा साधा इतिहासही माहीत नसल्याचे उघड झाले.

बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे कायम लोकांसोबत

बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसचे अनेक नेते यांचे चांगले संबंध होते. १९६० मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मार्मिक’ या व्यंगचित्र साप्ताहिकाची स्थापना केली. या साप्ताहिकाच्या पहिल्याच अंकाचं उद्घाटन काँग्रेसचे नेते यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झालं होतं. बाळासाहेब ठाकरे यांचे काँग्रेसच्या वसंतराव नाईक यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते. शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर मुंबईतलं कम्युनिस्टांचं वर्चस्व हटवण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला मदत करते, असे म्हणत शिवसेनेला 'वसंतसेना' म्हटले जायचे. शिवसेनेने १९६७ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार स. गो. बर्वे यांना पाठिंबा दिला होता. माजी संरक्षणमंत्री व्ही. के. मेनन यांना काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर मेनन यांनी ही निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत मेनन यांना कम्युनिस्टांचा आणि बर्वेंना शिवसेनेचा पाठिंबा मिळाला.

आणीबाणी काळात इंदिरा गांधींना दिला पाठिंबा

मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात शिवसेना आल्यानंतरही शिवसेना आणि काँग्रेस यांचे संबंध चांगले राहिले. १९७३ मध्ये तेव्हाच्या मध्य-मुंबई मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत कम्युनिस्ट नेत्या रोझा देशपांडे यांच्याविरोधात काँग्रेसचे रामराव आदिक निवडणूक लढवत होते. शिवसेनेने या निवडणुकीत आपला उमेदवार दिला नाही आणि आदिक यांना पाठिंबा दिला. रामराव आदिक, सुशीलकुमार शिंदे, शरद पवार अशा तत्कालीन काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांशी बाळासाहेब ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. शिवसेनेने इंदिरा गांधी यांच्या देशावर लादलेल्या आणीबाणीला ‘शिस्तपर्व’ म्हटले होते. इतकेच नव्हे तर १९८० च्या निवडणुकीत शिवसेनेने एकही उमेदवार न लढवता काँग्रेसचा विजय सोप्पा केला होता. त्याच बदल्यात प्रमोद नवलकर आणि वामनराव महाडीक हे विधानपरिषदेवर निवडून गेले होते. बॅरिस्टर अंतुले यांच्यासाठी बाळासाहेबांनी जाहीरपणे प्रचार केला होता. अगदी अलीकडे जेव्हा उद्धव ठाकरे शिवसेना कार्याध्यक्ष होते तेव्हा त्यांनीही बाळासाहेबांच्या भूमिकांचे पुनरावलोकन करून निर्णय घेतले.

भाजपाचे गोड बोलून घात करणे ओळखले

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आपली गरज म्हणून मातोश्रीवर आलेल्या भाजपाच्या नेत्यांचे डाव उद्धव ठाकरे यांनी वेळीच ओळखले. त्याच वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत एकीकडे युतीची बोलणी सुरु ठेवायची आणि दुसरीकडे अपक्ष उमेदवाराला शिवससेनेच्या विरोधात रसद पुरवायची, असे भाजपाने महाराष्ट्रातील जवळपास चाळीस ते बेचाळीस मतदारसंघात केले. तेव्हाच भाजपाची वाकडी चाल उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आली. काँग्रेसमुक्त भारत करताना भाजपा शिवसेनेलाही महाराष्ट्र गोमंतकवादी पक्षाप्रमाणे बाजूला सारण्याचे डावपेच आखतेय, हे उद्धव यांनी ओळखले. भाजपा जेव्हा १२५ च्या वर आमदार निवडून आणू, असे दावे करू लागली तेव्हाच उद्धव ठाकरे यांनी ओळखले की, भाजपा अपक्ष आमदारांची मोट बांधून स्वतःच्या पक्षाची सत्ता आणायला तयार आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपचा हा डाव फसला कारण त्यांना १०५ आमदारच निवडून आणता आले आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या ५६ आमदारांसह त्यांना खिंडीत गाठले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाराष्ट्रात सत्ता मिळवली. भाजपने मग अगदीच शेवटचे अस्त्र काढले आणि थेट इडी - सीबीआय यांचा गैरवापर करून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना सुरुंग लावले. पक्षचिन्ह आणि आमदार-खासदार सगळेच पळवले. एकीकडे भ्रष्टाचारी म्हणून ज्यांना बदनाम केले, तुरुंगात टाकण्याची भाषा केली त्यांनाच सोबत घेऊन मंत्री बनवले. राज्यातील जनता भाजपाचा हा कांगावखोर राजकीय चेहरा पाहून हबकली आणि त्यांनी उद्धव ठाकरे या सच्च्या माणसाला साथ देण्याचे ठरवले.

राजकारणाचा इतिहास हे लक्षात ठेवेल

राजकारणाचा इतिहास हेच लक्षात ठेवेल की, भाजपाच्या केंद्रातील नेत्यांनी महाराष्ट्रात अतिशय हीन दर्जाचे राजकारण केले. म्हणूनच ‘भाजपामुक्त देश’ करण्यासाठी उद्धव ठाकरे पुढे सरसावले आणि देशभर त्यांना सहानुभूती आणि पाठिंबा मिळाला. इतिहास हेच लक्षात ठेवेल की, ज्या उद्धव ठाकरे यांनी कोरोनासारख्या महासाथीत लोकांचे प्राण वाचवले त्या माणसाला भाजपाने राजकीय घात करून सत्ताबाह्य केले. भाजपचा हा काळा चेहरा आता देशातील जनतेला कळून चुकला आहे.

महंगाई जो रोक ना सकी, वह सरकार निक्कमी है

दहा वर्षांपूर्वी काँग्रेसच्या कालावधीत ‘महंगाई जो रोक ना सकी, वह सरकार निक्कमी है’ ‘जो सरकार निक्कमी है, वह सरकार बदलनी है’ अशा घोषणा आम्ही करत होतो आणि काँग्रेसने कसे महागाईमुळे कंबरडे मोडले आहे अशी भाषणे करत होतो. रस्त्यावर उतरून स्मृती इराणी गॅस भाववाढीवर आंदोलन करत होत्या. अगदी शिवसेनेनेदेखील उद्धव ठाकरे यांच्या हातात गॅस सिलेंडरची प्रतिकृती देऊन आंदोलन केले होते. पण तेव्हाची ती कंबर तोडणारी महागाई आणि आजची महागाई यांची तुलना केल्यावर हीच का ती महागाई, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

या लोकांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू आहेत. आता सांगा, महागाई वाढली की कमी झाली? अच्छे दिन आले का? या लोकसभा निवडणुकीत हा एकच मुद्दा महत्वाचा आहे. पण आतापर्यंत ‘महागाई’वर भाजपाचा एकही नेता बोललेला नाही. भाजपाने आपलाच नारा खरा करून दाखवला आहे, ‘महंगाई जो रोक ना सकी वह सरकार निक्कमी है’आणि म्हणून ‘जो सरकार निक्कमी है, वह सरकार बदलनी है.’

(लेखक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ता आणि जनसंपर्क प्रमुख आहेत.)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in