मुंबईत धुळीचे साम्राज्य

वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन विकासक, कंत्राटदारांकडून होत नाही. त्यामुळे मुंबईत धुळीचे साम्राज्य निर्माण होऊ लागले आहे. मुंबईत ठिकठिकाणी नियम धाब्यावर बसवून बांधकामे सुरू आहेत.
Air Pollution
Air Pollution
Published on

आपले महानगर

तेजस वाघमारे

वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन विकासक, कंत्राटदारांकडून होत नाही. त्यामुळे मुंबईत धुळीचे साम्राज्य निर्माण होऊ लागले आहे. मुंबईत ठिकठिकाणी नियम धाब्यावर बसवून बांधकामे सुरू आहेत.

देशभरातील विविध शहरांमध्ये प्रदूषण वाढू लागले आहे. दिवाळीच्या कालावधीत तर मुंबई, दिल्ली, कोलकाता ही सर्वाधिक प्रदूषित शहरे बनतात. ऑक्टोबरपासून प्रदूषणाला सुरुवात होते. हवेची दिशा बदलली किंवा हवा स्थिर राहिली की प्रदूषणाचे प्रमाण वाढते. तसे दरवर्षी हिवाळ्यात सर्वत्र प्रदूषण वाढते. हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. गेल्या दोन-तीन वर्षांचा विचार करता २०२५ च्या जानेवारीपासून मुंबईत प्रदूषणाचे प्रमाण वाढीस लागले आहे. याला कारणेही तशीच आहेत. मुंबईत सुरू असलेली इमारतीची, रस्ते, पूल, मेट्रोची कामे सुरू आहेत. यामुळे मुंबईत धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

मुंबई महापालिका हद्दीतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार बांधकामाभोवती लोखंडी किंवा कापडांचे आच्छादन उभारणे, बांधकामाच्या ठिकाणी पाणी फवारणी करणे बंधनकारक आहे. यानंतरही अनेक बांधकामांच्या ठिकाणी महापालिकेच्या परिपत्रकाकडे दुर्लक्ष करण्यात येते. महापालिकेच्या परिपत्रकाची अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी करण्यासाठी महापालिकेने विभाग स्तरावर पथके तयार केली आहेत. यानंतरही काही भागांमध्ये धुळीचे साम्राज्य पसरले आहे. विक्रोळी कन्नमवार नगर, वांद्रे पूर्व भागात धुळीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

मुंबईत इमारतीची अनेक कामे सुरू आहेत. या बांधकामाच्या ठिकाणी महापालिकेने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होत असल्याने महापालिकेने जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत तब्बल ३ हजार ४९७ बांधकामांना काम थांबविण्याची नोटीस दिली होती.

विकासक, कंत्राटदारांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आश्वासन दिल्याने पुन्हा काही बांधकामे सुरू झाली, तर सुमारे दोन हजार बांधकामे अद्यापही थांबलेली आहेत. यानंतरही मुंबईतील वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढीस लागले आहे, हे नाकारता येणार नाही.

मुंबई शहर आणि उपनगरात मेट्रो, रस्ते, पूल, इमारती अशी विविध बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांच्या ठिकाणाहून वाहून नेण्यात येणारा राडारोडा हवेत उडतो.

वाहनांमधून वाहून नेण्यात येणाऱ्या मातीवर आच्छादन टाकणे बंधनकारक आहे. मात्र अनेक कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे मुंबईतील अनेक रस्ते मातीने माखले आहेत. त्याचप्रमाणे मातीवर आच्छादन न टाकताच वाहने वेगाने धावत असल्याने वाहनांद्वारे धूळ हवेत पसरते. यामुळे हवेत धुळीचे प्रमाण वाढत आहे. यातच मुंबईतील वाहनांची वाढती संख्या प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहे.

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यातच मुंबईत वाढलेल्या वायू प्रदूषणावर उपाय म्हणून मुंबईतील रस्ते पाण्याने धुवून काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. महापालिका दिवसाला २६० कि.मी.चे रस्ते पाणी फवारणी करून धूत होती. अशीच वेळ मुंबईवर यंदाही येऊ नये, यासाठी महापालिका प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा यंदाही धुळीच्या नावावर पुन्हा कंत्राटदारांचे भले करण्याचे उद्योग सुरू होऊ शकतात.

मुंबईसह देशभरातील प्रदूषण पातळीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित हवेच्या पहिल्या टप्पात नागरिकांना श्वसनाचा सौम्य त्रास, घशात खवखव, खोकला, थकवा, डोकेदुखी असे त्रास होऊ शकतात. लहान मुले, वृद्ध, दमा रुग्ण यांना जास्त त्रास होऊ शकतो, तर दूषित हवेच्या दुसऱ्या टप्प्यात श्वसनाची समस्या तीव्र होते. दमा, डोळ्यांतील जळजळ, छातीत धडधड होणे वाढते. प्रदूषणाच्या तिसऱ्या टप्पात सर्वांसाठी श्वसन आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. श्वास घेण्यास त्रास, खोकला, डोळ्यांत जळजळ तसेच धुळीच्या दीर्घकाळ संपर्कामुळे दीर्घकालीन श्वसन रोग किंवा हृदयविकार उद्भवू शकतात. तर चौथ्या टप्प्यात निरोगी व्यक्तींनाही त्रास होतो. दमा, स्ट्रोक, आणि हृदयविकारांची प्रकरणे वाढत असल्याचे पर्यावरण अभ्यासक सांगतात.

मुंबईत महापालिका, एमएमआरडीए, एसआरए आणि म्हाडा या प्रमुख प्राधिकारणामार्फत विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. हे प्रकल्प मुंबईकरांच्या हितासाठी हाती घेण्यात आले आहेत. मात्र हे प्रकल्प राबविणाऱ्या कंत्राटदारांनी प्रदूषण होऊ नये याची खबरदारी घेणे तितकेच गरजेचे आहे. संबंधित संस्थांनीच आपल्या नियुक्त कंत्राटदारांवर करडी नजर ठेवल्यास प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या कंत्राटदारांना चाप बसेल.

धूळ नियंत्रणाची जबाबदारी आपली नाही, असे सांगत त्याकडे डोळेझाक करण्याची भूमिका प्राधिकरणांनी बदलली पाहिजे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई महापालिका त्यांचे कर्तव्य बजावत आहे. मात्र अन्य प्राधिकरणांनीदेखील याबाबत गंभीर होणे ही काळाची गरज बनली आहे. कंत्राटदार, प्राधिकरणांनी नियमांची अंमलबजावणी योग्य रीतीने केल्यास मुंबईकरांना स्वच्छ हवा मिळेल. अन्यथा प्रदूषित हवा नागरिकांचे जीव घेईल.

tejaswaghmare25@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in