मुंबईने नाना शंकरशेठ यांना कधीच विसरू नये

मुंबई नगरीचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांच्या स्मारकाला निधी मंजूर होणे हा मुंबईच्या मराठी अस्मितेचा विजय आहे. हा निर्णय केवळ भौतिक इमारतीचा नाही, तर एका कृतघ्न विस्मृतीवर मात करण्याचा आहे. आता हे स्मारक उभे करून नानांना मुंबईने खऱ्या अर्थाने ‘घरी’ आणले पाहिजे.
मुंबईने नाना शंकरशेठ यांना कधीच विसरू नये
Published on

मत आमचेही

ॲड. हर्षल प्रधान

मुंबई नगरीचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांच्या स्मारकाला निधी मंजूर होणे हा मुंबईच्या मराठी अस्मितेचा विजय आहे. हा निर्णय केवळ भौतिक इमारतीचा नाही, तर एका कृतघ्न विस्मृतीवर मात करण्याचा आहे. आता हे स्मारक उभे करून नानांना मुंबईने खऱ्या अर्थाने ‘घरी’ आणले पाहिजे.

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीने १९ जून २०२४ रोजी घेतलेला ठराव क्रमांक ४८ हा केवळ एक प्रशासकीय निर्णय नव्हता, तर मुंबईच्या सामूहिक स्मृतीला दिलेली एक दीर्घ प्रतीक्षा संपवणारा क्षण होता. नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेठ यांच्या स्मारकासाठी निधी मंजूर करताना महानगरपालिकेने आपल्या इतिहासातील एका महान शिल्पकाराला न्याय दिला. मुंबई ज्या मराठी माणसाने घडवली, त्या माणसाला मुंबईने विसरू नये, ही भावना आता प्रशासकीय वास्तवात उतरत आहे.

१९व्या शतकातील मुंबईच्या रूपांतरात नाना शंकरशेठ यांचे योगदान अतुलनीय आहे. १८०३ मध्ये जन्मलेले जगन्नाथ शंकरशेठ हे केवळ धनाढ्य व्यापारी नव्हते, तर दूरदृष्टी असलेले शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक सुधारक, राजकीय नेते आणि शहर नियोजक होते. पेशवाई संपल्यानंतर इंग्रजांच्या उदयकाळात त्यांनी मराठी माणसाच्या आत्मसन्मानाची ज्योत प्रज्वलित ठेवली. त्यांच्या प्रयत्नांमुळे मुंबईत आधुनिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना, एल्फिन्स्टन कॉलेजचे विश्वस्तपद, मुलींच्या शिक्षणासाठी स्वतःच्या घरी शाळा सुरू करणे, ‘बॉम्बे असोसिएशन’सारख्या राजकीय संघटनेची पायाभरणी हे सर्व नानांच्या दूरदृष्टीचे पुरावे आहेत.

राणीची बाग, सोनापूर स्मशानभूमी (ज्याला त्या काळात ‘नानापूर’ म्हटले जायचे) विहार तलावाची योजना, गॅस कंपनी, पहिली रेल्वे, मुंबईच्या प्रत्येक महत्त्वाच्या विकासकामात नानांचा हात होता. १८५३ साली बोरीबंदर ते ठाणेदरम्यान धावणारी पहिली आगगाडी नानांच्या उपस्थितीतच सुरू झाली. मुंबई महानगरपालिकेच्या पूर्वरूप असलेल्या म्युनिसिपल कमिशनमध्ये त्यांची नेमणूक झाली होती. ते जस्टिस ऑफ द पीस (जे.पी.) होते आणि अनेक संस्थांचे संस्थापक किंवा विश्वस्त होते. ‘आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री’ असे बाळशास्त्री जांभेकरांनी ज्या व्यक्तीला म्हटले, त्या व्यक्तीला स्मारक नसणे ही मुंबईसाठी लाजिरवाणी बाब होती.

मुंबई महानगरपालिकेने ‘एफ/उत्तर’ विभागातील भूखंड क्र. ३/३४७ (भाग) येथे शैक्षणिक इमारत व स्मारक बांधकामासाठी ९८,०८,८८,००४/- रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निर्णय स्थापत्य समिती (शहर), महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते आणि सर्वपक्षीय नगरसेवकांच्या सहकार्याने घेण्यात आला. ॲड. मनमोहन चोणकर यांच्या नेतृत्वाखालील नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेठ प्रतिष्ठानचे प्रयत्न यशस्वी झाले. हे केवळ एका प्रतिष्ठानचे यश नाही, तर मुंबईच्या मराठी अस्मितेचे पुनरुज्जीवन आहे.

इतिहास आणि वर्तमान यांचा संवाद

नाना शंकरशेठ यांचे जीवन हे १९व्या शतकातील भारताच्या पुनर्जागरणाचे प्रतीक आहे. इंग्रजी, संस्कृत, मराठी, गुजराती भाषांवर प्रभुत्व, ठरलेल्या सूर्यनमस्कारानंतरच अल्पोपहार घेण्याची शिस्त, वनस्पतीशास्त्राची आवड, स्त्रीशिक्षणासाठी केलेला आग्रह हे सर्व गुण त्यांना केवळ व्यापारी नव्हे तर एक ‘आधुनिक ऋषी’ बनवतात.

मुंबई आज जागतिक शहर म्हणून ओळखली जाते, पण तिची पायाभरणी करणाऱ्या मराठी माणसांना इतिहासात दुर्लक्ष केले गेले. नाना शंकरशेठ, डॉ. भाऊ दाजी, दादाभाई नौरोजी यांच्या योगदानाला पुरेसा न्याय मिळाला नाही. हे स्मारक केवळ पुतळा किंवा इमारत नसावे. ते एक सजीव शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र व्हावे. नानांच्या नावे संस्कृत शिष्यवृत्ती आधीपासून सुरू आहे. तिला विस्तार देऊन आधुनिक काळातील कौशल्य विकास, उद्यमशीलता, इतिहास संशोधन आणि मराठी भाषा संवर्धन यासाठी वापरता येईल. राणीच्या बागेत असलेल्या त्यांच्या विद्यमान पुतळ्याशी जोडून एक संपूर्ण स्मारक संकुल विकसित केल्यास मुंबईकरांना आपल्या इतिहासाशी थेट जोडता येईल.

राजकीय एकतेचे उदाहरण

शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲड. मनमोहन चोणकर यांच्या सततच्या प्रयत्नांना यश मिळाले हेही उल्लेखनीय. माजी नगरसेवक आणि प्रतिष्ठानाचे सरचिटणीस म्हणून त्यांनी केलेल्या भेटीगाठी आणि सादरीकरणाने निर्णय गतीने झाला. स्मारक मंजूर झाले तरी काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे ही अपेक्षा आहे. निधीची तरतूद झाली आहे, आता अंमलबजावणीचे टप्पे पारदर्शकपणे पूर्ण करणे गरजेचे आहे. स्मारकात नानांच्या जीवनावरील दस्तावेज, छायाचित्रे, माहिती केंद्र, ग्रंथालय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जागा असावी. शाळा-महाविद्यालयांशी जोडून विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून देणारे कार्यक्रम चालवावेत. मुंबई महानगरपालिकेने इतर विस्मृत इतिहासपुरुषांसाठीही असेच पुढाकार घ्यावेत. डॉ. भाऊ दाजी, गो. कृ. गोखले, महात्मा फुले, शाहू महाराज, आंबेडकर, प्रबोधनकार, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपणे हे शहराचे कर्तव्य आहे. नाना शंकरशेठ यांचे शब्द किंवा विचार आजही प्रासंगिक आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण, एकता आणि दूरदृष्टीने शहर घडवता येते. आज मुंबई ज्या आव्हानांचा सामना करत आहे प्रदूषण, वाहतूक, गृहनिर्माण, सामाजिक ताण त्यावर नानांच्या दूरदृष्टीने विचार करता येईल. नाना शंकरशेठ यांनी मुंबई ते ठाणेदरम्यानच्या भारतातील पहिल्या रेल्वे प्रकल्पात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांनी जमीन दान केल्याचे अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत, ज्यात शहर विकास, शिक्षण संस्था आणि सार्वजनिक प्रकल्प यांचा समावेश आहे. नाना शंकरशेठ हे ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या पहिल्या बोर्डावर दोन भारतीय संचालकांपैकी एक होते (दुसरे सर जमशेदजी जीजीभॉय). त्यांनी १८४५ मध्ये इंडियन रेल्वे असोसिएशन स्थापन करण्यात सक्रिय भाग घेतला. १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल) ते ठाणे (३४ किमी) दरम्यान धावणाऱ्या पहिल्या रेल्वेगाडीत नाना स्वतः उपस्थित होते. नाना शंकरशेठ यांनी मुंबईच्या विकासासाठी शेकडो एकर जमीन दान केली होती. मुंबई नगरीचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांच्या स्मारकाला निधी मंजूर होणे हा मुंबईच्या मराठी अस्मितेचा विजय आहे. हा निर्णय केवळ भौतिक इमारतीचा नाही, तर एका कृतघ्न विस्मृतीवर मात करण्याचा आहे. आता हे स्मारक लवकरात लवकर उभे करून नानांना मुंबईने खऱ्या अर्थाने ‘घरी’ आणले पाहिजे. ज्या भूमीवर नाना चालले, त्याच भूमीवर त्यांचे स्मारक उभे राहिले की मुंबई खऱ्या अर्थाने आपल्या पूर्वसुरींच्या ऋणातून मुक्त होईल. जगन्नाथ (नाना) शंकरशेठ यांना मुंबईने कधीच विसरता कामा नये ही भावना आता वास्तवात उतरत आहे. मुंबई महानगरपालिकेने घेतलेला हा निर्णय पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. लवकरच त्यांच्या नावाने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नामकरण व्हावे अशी अपेक्षा आहे. त्यांचे नाव खरेतर व्हीटी आताचे सीएसएमटी या मुख्य स्थानकाला द्यायला हवे होते, कारण त्यांनी जमीन दिली म्हणून व्हीटी ते ठाणे रेल्वे धावली, पण तिथे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आल्याने नानांचं नाव मागे पडलं. परंतु मुंबई ते ठाणेपर्यंत कोणत्याही मोठ्या टर्मिनलला नाना शंकरशेठ यांचे नाव देऊन त्यांचे योगदान भावी असंख्य पिढ्यांना स्मरणात राहील यासाठी त्वरित हालचाल करायला हवी. मुंबई सेंट्रल, दादर, ठाणे यापैकी कोणत्याही स्थानकाला नाना शंकरशेठ यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान केला जावा आणि यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने त्वरित पावलं उचलावीत एवढीच अपेक्षा.

प्रवक्ता आणि जनसंपर्कप्रमुख

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

logo
marathi.freepressjournal.in