आपले महानगर
तेजस वाघमारे
दिवाळीतील फटाक्यांच्या धुराने आणि आवाजाने मुंबईत प्रदूषणाचा शिखर बिंदू गाठला आहे. न्यायालयाचे निर्बंध असूनही फटाके वाजवणे सुरूच आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी सामूहिक जबाबदारी स्वीकारून सण आनंदात, पण पर्यावरणपूरक रीतीने साजरा करणे अत्यावश्यक आहे.
दिवाळी म्हटले की, फटाके आलेच. या फटाक्यांमुळे मुंबईतील अनेक भागातील हवा आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक बनते. दरवर्षी यावर चर्चा होते. पण यातून कोणी बोध घेताना दिसत नाही. यामुळेच की काय आयक्यू एअर रैंकिंगमध्ये देशातील तीन शहरे समाविष्ट झाली आहेत. जगामध्ये सर्वाधिक प्रदूषित शहर दिल्ली ठरले आहे. तिसऱ्या क्रमांकावर मुंबई आणि सहाव्या क्रमांकावर कोलकाता आहे. देशातील प्रमुख राजधानीच प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या असल्याने या शहरांमधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
काही संघटना गेल्या २० ते २२ वर्षांपासून दिवाळी दरम्यान मुंबईत होणाऱ्या प्रदूषणाची नोंद घेत आहेत. तेव्हा फटाक्यांचा आवाज १४० डेसिबलपर्यंत नोंदविला जात होता. सातत्याने पाठपुरावा करून मोठ्या आवाजाचे फटाके कसे कमी होतील? याकडे लक्ष देऊन मुंबई पोलीस, मुंबई महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या मदतीने मोठ्या फटकांच्या आवाजावर बंधने घालण्यावर काही प्रमाणात यश आले आहे. १४० डेसिबलचा आवाज १२० किंवा १०० वर येऊन ठेपला आहे. प्रत्येक वर्षी फटाक्यांच्या आवाजाचे डेसिबल मोजल्यानंतर समोर आलेल्या परिणामामुळे हा छोटासा का होईना निकाल समोर आला आहे; मात्र एवढ्या सगळ्यानंतरही फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. यातून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
मुंबई महापालिका, मुंबई पोलीस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दिवाळीतल्या आवाजाच्या आणि वायू प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी काम करते. केंद्र सरकारने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे राज्यातील प्रत्येक प्राधिकरण दिवाळीदरम्यान प्रदूषण होणार नाही, यासाठी काम करते. आपल्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने फटाक्यांच्या आवाजावर बंधने घातली जातात. कोणत्या फटाक्यांचा आवाज किती असावा? किंवा मोठे आवाज करणारे फटाके बंद करावेत. संबंधित फटाक्यांची विक्री होऊ नये यासाठी फटाक्यांच्या आवाजाच्या चाचणीनंतर ज्या फटाक्यांमध्ये दोष आढळतील, त्या फटाक्यांच्या विक्रीवर बंधने घालण्यासाठी मुंबई महापालिकेकडून काम केले जाते. ज्या क्षेत्रामध्ये आवाजाचे उल्लंघन होते, तेथे कारवाई करण्याचे अधिकार मुंबई पोलिसांना आहेत.
फटाक्यांच्या आवाजाचा सिलसिला गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. मनुष्यप्राणी हा ८० डेसिबलपर्यंत आवाज सहन करू शकतो. आवाजाची मर्यादा १२५ डेसिबल किंवा १२० डेसिबल होते, तेव्हा मनुष्य प्राण्यांच्या कानाला इजा होतात. आवाजाचा त्रास केवळ माणसाला होत नाही तर तो पशु-पक्षी या सगळ्यांना होतो. एकंदर निसर्गाला होतो. हिवाळ्या दरम्यान मुंबईतल्या प्रदूषणामध्ये वाढ होते. त्यावेळी मुंबई महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने हवेतील प्रदूषकांचे प्रमाण मोजले जाते. दिवाळी असो, गणपती असो किंवा ईद असो प्रत्येक वेळी होणारे वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण विविध यंत्रणांकडून मोजले जाते. या सगळ्याचा परिपाक म्हणून वीसएक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना आता यश येत आहे. परंतु प्रत्येक वर्षी एकाच संघटनेने पुढाकार घेऊन काम केले पाहिजे, असे नाही. काही आघाड्यांवर सरकारी यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य लोकांनी देखील प्रदूषणासंदर्भात आवाज उठवण्याची गरज आहे. कारण सगळेच जर सगळ्यांच्याच सुखसोयीप्रमाणे वागू लागले तर मग त्याचा त्रास प्रत्येकालाच होणार आहे. याचा सारासार विचार करून प्रत्येक सण हा सणासारखा साजरा व्हावा. कुठेही नियमांचे उल्लंघन होऊ नये आणि कोणाला त्रास होऊ नये हा हेतू प्रत्येकाने ठेवला तर अशा नोंदी ठेवण्याची गरजच भासणार नाही. पण औपचारिकता म्हणून प्रदूषणाची नोंद ठेवणे भाग आहे. कारण सरतेशेवटी या सगळ्या प्रक्रियेतून नागरिकांच्या हितासाठी काही निर्णय घेता येतात. त्यामुळे ही सर्व कामे कागदपत्री होतच राहतील. परंतु या पलीकडे जाऊन प्रदूषण रोखण्यासाठी सर्व आघाड्यांवर आज घडीला काम करण्याची वेळ आली आहे.
उच्च न्यायालयाने फटाके वाजविण्याच्या वेळेवर निर्बंध घातल्याने यंदा दिवाळीत वायू प्रदूषण कमी होण्याचा अंदाज होता. मात्र हा अंदाज मुंबईकरांनी खोटा ठरवला. मध्यरात्रीही फटाक्यांचे आवाज अधूनमधून येतच असतात. दिवाळी सुरू होताच मुंबईतील वायू प्रदूषणाची पातळी वाढली आहे. भायखळा, माझगाव, नेव्ही नगर, कुलाबा, वरळी भागात वाईट हवेची नोंद झाली, तर वांद्रे कुर्ला संकुलातील हवा अतिवाईट श्रेणीत गेली आहे. देवनार, माझगाव, विलेपार्ले, मालाड, खेरवाडी, चकाला आणि बोरिवली या भागातील हवा वाईट श्रेणीत आहे. त्याखालोखाल चेंबुर, घाटकोपर, कांदिवली, भांडुप, कुर्ला, शिवडी आणि शिवाजी नगर येथील हवा मध्यम श्रेणीत होती. यामुळे आधीच विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
फटाक्यांचा माणसांना त्रास होत आहेच. पण याचा त्रास प्राणी, पक्ष्यांनाही होतो. कुत्रे व मांजरांची ऐकण्याची क्षमता माणसांपेक्षा चार ते सात पटीने जास्त असते. माणसांना जो आवाज मोठा वाटतो, तो प्राण्यांसाठी असह्य ठरतो. फटाके वाजत असल्याने रस्त्यावरील प्राणी घाबरून पळतात. यातून प्राणी अपघातात सापडतात किंवा कायमचे बहिरे होतात. याचाही विचार फटाके वाजवताना करायला हवा. कमी आवाजाचे आणि कमी प्रदूषण करणारे फटाके वाजविल्यास दिवाळी आनंदसोबतच मोफत मिळत असलेल्या हवेचीही काळजी नागरिकांनी घेणे गरजेचे आहे. कारखाने, उद्योग, विकास प्रकल्पांसाठी होणारे प्रदूषण रोखता येऊ शकत नाही. मात्र मानव निर्मित प्रदूषण रोखता येण्यासारखे आहे. त्यामुळे मानवजातीच्या कल्याणासाठी सर्वांनी विचार आणि कृती करणे गरजेचे आहे.
tejaswaghmare25@gmail.com