
- आपले महानगर
- तेजस वाघमारे
मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत २०१७ पासून सुरू झालेल्या वातानुकूलित लोकलना सुरुवातीला तिकीटदरांमुळे अल्प प्रतिसाद मिळाला. तिकीटदर कमी केल्यावर प्रवासी वाढले; मात्र सामान्य लोकल कमी करून एसी लोकल वाढवल्यामुळे मध्यमवर्गीय व गरीब प्रवाशांना अधिक गर्दीत प्रवास करावा लागतो. गर्दीच्या वेळी सामान्य लोकल चालण्याऐवजी वातानुकूलित लोकल चालविण्यात येत असल्याने गर्दीमध्ये अधिकच वाढ होऊन प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे.
भारतातील सर्वात पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे स्थानकादरम्यान १६ एप्रिल १८५३ धावली. यानंतर हळूहळू उपनगरीय लोकल सेवेमध्ये विविध तांत्रिक बदल झाले. आज पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मुख्य रेल्वे मार्गावर वातानुकूलित लोकल चालविण्यात येत आहेत. २०१७ पासून वातानुकूलित लोकल उपनगरीय सेवेत दाखल झाली. मध्यम आणि श्रीमंत वर्गालाही तिकीट दर परवडत नसल्याने या लोकल रिकाम्या चालत होत्या. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वातानुकूलित लोकलचे तिकीट दर कमी करण्यात आले. त्यामुळे वातानुकूलित लोकलला प्रवाशांकडून प्रतिसाद वाढला आहे. परंतु वातानुकूलित लोकलचे तिकीट किंवा पास मध्यमवर्गीय आणि गोरगरीबांच्या आवाक्याबाहेर असल्याने त्यांना सामान्य लोकलमधून प्रवास करावा लागत आहे.
मध्य रेल्वेवरून सध्या ८० वातानुकूलित लोकल सेवा चालविण्यात येत आहेत, तर सामान्य उपनगरी लोकलच्या १ हजार ८१० सेवा चालविण्यात येतात. यामधून मध्य रेल्वेवरून दरदिवशी ३९ लाख प्रवासी प्रवास करतात, तर वातानुकूलित लोकलमधून सुमारे ८४ हजार प्रवासी प्रवास करतात. पश्चिम रेल्वे मार्गावर १ हजार ४०६ लोकल फेऱ्या चालविण्यात येतात. यामधून तब्बल ३० लाख प्रवासी प्रवास करतात, तर १०९ वातानुकूलित लोकलमधून दरदिवशी १ लाख २६ हजार प्रवासी प्रवास करतात.
गर्दीच्या वेळी वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. मात्र ऐन गर्दीच्या वेळी सामान्य लोकल चालण्याऐवजी वातानुकूलित लोकल चालविण्यात येत असल्याने गर्दीमध्ये अधिकच वाढ होऊन प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागतो. मात्र वातानुकूलित लोकलचे दरवाजे बंद होत असल्याने वातानुकूलित लोकल उपयुक्त ठरत आहे. मात्र गर्दीच्या वेळी चालविण्यात येणाऱ्या वातानुकूलित लोकल सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागत असून गाडीत प्रवेश मिळत नसल्याने प्रवाशांना दरवाजाला लटकून प्रवास करावा लागत आहे. वातानुकूलित लोकलची संख्या अशीच वाढत गेल्यास गर्दीमुळे लोकलमधून पडून होणाऱ्या मृत्यूंचा प्रश्न पुन्हा निर्माण होऊ शकतो.
वर्षभरात वातानुकूलित लोकलच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय रेल्वे मंत्र्यांनी जाहीर केला आहे. यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. त्यानुसार उपनगरीय मार्गावर वातानुकूलित लोकलची संख्या वाढणार आहे. यामुळे वातानुकूलित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल. परंतु अनेक सध्या लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आणखी कोंडी होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या वांद्रे स्थानकात चर्चगेटला जाणाऱ्या तीन वातानुकूलित जलद लोकल एकापाठोपाठ आल्या. यामुळे सर्वसाधारण लोकलने प्रवेश करणाऱ्या प्रवाशाने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. 'ही सर्वसामान्यांसाठी धोक्याची घंटा' असल्याचे मत प्रवीण मसुरकर या प्रवाशाने सोशल मीडियावर व्यक्त केले आहे.
वाढत्या वातानुकूलित लोकल फेऱ्यांना प्रवासी संघटनांकडूनही विरोध होत आहे. वातानुकूलित लोकलची संख्या वाढल्यास सामान्य लोकलमध्ये गर्दी वाढून चालत्या लोकलमधून पडून अपघात होऊ शकतो. यामुळे सामान्य लोकल आणि वातानुकूलित लोकल असा नवा वाद प्रवाशांमध्ये निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हातावर पोट असलेले लाखो गोरगरीब लोकांना वातानुकूलित लोकलचा प्रवास खिशाला परवडणारा नसल्याने त्यांना लोकलची प्रतीक्षा करत गर्दीतून प्रवास करण्याची वेळ येणार आहे.
सामान्य लोकल प्रथम दर्जा, सामान्य डब्बे आणि महिला डब्बे अशी एकत्रित सर्वांना सामावून घेणारी आहे. परंतु वातानुकूलित लोकल ही केवळ एकाच दर्जाचे तिकीट घेणाऱ्या प्रवाशांसाठी धावते. वातानुकूलित लोकलमधून केवळ श्रीमंत लोकच प्रवास करू शकत असल्याने रेल्वे गरीब आणि श्रीमंत प्रवासी अशी दरी निर्माण करत आहे. यावरून दोन्ही दर्जाच्या प्रवाशांमध्ये वाद निर्माण होऊ शकतात. रेल्वे श्रीमंतांची सोय करू पाहत असतानाच गरीबांसाठी लोकल फेऱ्या वाढविण्याबाबत गंभीर दिसत नाही. पोटापाण्यासाठी विरार, कर्जत-कसारा, पनवेल आदी भागातून मुंबईत येणारा कामगार वर्ग अग्निदिव्य करत रेल्वे प्रवास करत आहे. यामध्येच उशिराने धावणाऱ्या लोकलमुळे प्रवासी त्रस्त झाले असतानाच त्यांना कोणीही वाली उरला नसल्याचे दिसते. प्रवाशांची गैरसोय दूर करण्याकडे रेल्वे प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही. याबाबत उच्च न्यायालयाने रेल्वेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. यानंतरही लोकलच्या गोंधळात सुधारणा झालेली नाही. प्रवाशांची गरज ओळखून लोकल फेऱ्या वाढविण्यासाठी योग्य नियोजन करण्यात रेल्वेला यश आलेले नाही. यामुळे लोकल गर्दीने तुडुंब भरून वाहत आहेत.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील बहुतांश लोक झोपडपट्टीमध्ये राहतात. वाढत्या महागाईमुळे अनेकांना संसाराचा गाडा चालविणे कठीण बनले आहे. त्यामुळे लोकल प्रवास करणारे लाखो लोक दरदिवशी पाच ते दहा रुपयांचे तिकीट न काढता विनातिकीट प्रवास करत आहेत. विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी रेल्वे विविध मोहिमा राबवत असून, त्या अपयशी ठरत आहेत. वातानुकूलित लोकलमधूनही विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. विनातिकीट प्रवाशांना रोखण्यात रेल्वेला यश आलेले नाही.
सामान्य लोकल रद्द करून त्याठिकाणी वातानुकूलित लोकल चालविण्यात येत आहेत. यामुळे सामान्य लोकलमधून अधिक चेंगराचेंगरीच्या अवस्थेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिकच जिकरीचा झाला आहे. आज वातानुकूलित लोकलने प्रवास करणारे प्रवासी सुपात आहेत. त्यांनाही कधीतरी जात्यात जावे लागणार आहे, तर आधीच जात्यात असलेले सामान्य लोकलचे प्रवासी वातानुकूलित लोकलच्या वाढत्या संख्येमुळे अधिकच भरडले जाणार आहेत.
tejaswaghmare25@gmail.com