नव्याचे नऊ दिवस

एमएमआरडीएमार्फत उभारण्यात आलेल्या मेट्रो प्रकल्पांमुळे मुंबईकरांचा प्रवास काही प्रमाणात सुखकर होत आहे. पण याचदरम्यान नवीन असलेल्या मेट्रो ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड होऊ लागल्याने मुंबईकरांची गैरसोय होऊ लागली आहे.
नव्याचे नऊ दिवस
Published on

आपले महानगर

तेजस वाघमारे

एमएमआरडीएमार्फत उभारण्यात आलेल्या मेट्रो प्रकल्पांमुळे मुंबईकरांचा प्रवास काही प्रमाणात सुखकर होत आहे. पण याचदरम्यान नवीन असलेल्या मेट्रो ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड होऊ लागल्याने मुंबईकरांची गैरसोय होऊ लागली आहे.

मुंबई महानगर क्षेत्रातील परिवहन व्यवस्था बळकट करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) विविध मेट्रो, उड्डाणपूल प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशचा चेहरामोहरा बदलला आहे. एमएमआरडीएमार्फत उभारण्यात आलेल्या मेट्रो प्रकल्पांमुळे तर मुंबईकरांचा प्रवास काही प्रमाणात सुखकर होत आहे. पण याचदरम्यान नवीन असलेल्या मेट्रो ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड होऊ लागल्याने मुंबईकरांची गैरसोय होऊ लागली आहे.

महानगर क्षेत्रातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी एमएमआरडीएने ३३७ किलोमीटरचा (१४ मार्गिका) बृहत आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार टप्प्याटप्प्याने मेट्रो मार्ग उभारण्यास सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत मेट्रो बृहत आराखड्यामधील वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गिका १, अंधेरी पूर्व ते दहिसर या मेट्रो ७ आणि डी. एन. नगर ते दहिसर पश्चिम या मेट्रो २अ मार्गिका प्रवाशांच्या सेवेत आल्या आहेत. एमएमआरडीएमार्फत उभारण्यात आलेल्या मार्गिका महामुंबई मेट्रोमार्फत चालविण्यात येत आहेत, तर कुलाबा-वांद्रे-आरे मार्गिका ३ ही मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत चालविण्यात येत आहे, तर तसेच मेट्रो मार्ग २ब ४, ४अ, ५, ६, ७अ आणि ९ चे काम वेगाने सुरू आहे, तर इतरही मार्गिकांची कामे प्रगतिपथावर आहेत.

प्रवासी सेवेत दाखल झालेल्या मेट्रो मार्गिकांना प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. रस्ते आणि लोकल सेवेवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना मेट्रोचे पर्याय उपलब्ध झाल्याने मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु या मार्गिकांवरील ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड होऊ लागल्याने प्रशासनांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

पूर्व उपनगर आणि दक्षिण मुंबईला मोनो रेलद्वारे जोडण्यासाठी एमएमआरडीएने मोनो रेल प्रकल्प राबवला. मात्र सुरुवातीपासूनच हा प्रकल्प एमएमआरडीएसाठी पांढरा हत्ती ठरला. अनेकदा मोनो बंद झाल्याने प्रवासी ट्रेनमध्ये अडकून पडले. त्यांच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाला कसरत करावी लागली. वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे एमएमआरडीएने मोनो रेलची सेवा २० सप्टेंबरपासून तात्पुरती बंद केली आहे. मोनोची सिस्टम बळकट झाल्यानंतर या मार्गावरील सेवा सुरळीत सुरू करण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुन्हा रस्ते आणि लोकल मार्गाने प्रवास करावा लागत आहे. तसेच मोनो रेलमध्ये काम करत असलेल्या कामगारांच्या रोजगाराचा प्रश्नही निर्माण झाला.

आजवर मुंबईकरांना प्रवासासाठी केवळ उपनगरीय लोकल सेवेवर अवलंबून राहावे लागत होते. उपनगरीय लोकल सेवा पावसाळ्यात विस्कळीत होते, याचा अनुभव दरवर्षी पावसाळ्यात रेल्वे प्रवाशांना येतो. या तुलनेत मेट्रो मार्ग उन्नत असल्याने मेट्रो मार्गावर पाणी तुंबण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे पावसाळ्यात मेट्रो सेवा सुरळीत सुरू असते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये मेट्रो बिघाडाच्या घटना वाढीस लागल्या आहेत.

मेट्रो नुकत्याच प्रवासी सेवेत दाखल झाल्या आहेत. असे असताना आता मेट्रो बिघाडाचे सत्र काही दिवसांपासून विविध मेट्रो मार्गांवर सुरू आहे. यामुळे प्रवासी तिकीट घेतल्यानंतरही प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ट्रेनमध्ये तांत्रिक समस्या येणे सहाजिकच आहे. मात्र त्या होऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. तांत्रिक समस्या उद्भवू नयेत यासाठी देखभाल दुरुस्ती नित्यनियमाने होणे गरजेचे आहे. ट्रेनमधील समस्या दुर्लक्षित केल्यास भविष्यात मुंबईकरांचा प्रवास आणखी खडतर बनेल.

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो १ मार्गाला प्रवाशांची मोठी पसंती लाभली आहे. ८ जून २०१४ रोजी सुरू झालेल्या मुंबई मेट्रो वनने अवघ्या ११ वर्षांत १११ कोटींपेक्षा जास्त प्रवाशांना प्रवास घडवून आणला आहे. या मार्गावरील ट्रेनमध्येही आता तांत्रिक समस्या निर्माण होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. यासोबतच मेट्रो ३ मधील गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. मेट्रो ३चा अंतिम टप्पा प्रवाशांच्या सेवेत आल्यास या मार्गाला मोठा प्रतिसाद लाभणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एमएमआरसीला सतर्क राहावे लागणार आहे.

tejaswaghmare25@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in