
आपले महानगर
तेजस वाघमारे
दरवर्षी जसे “नेमेचि येतो मग पावसाळा” तसाच मुंबईतील पावसाळा समस्यांचे चक्र घेऊन येतो. मुसळधार पावसामुळे लोकलसेवा ठप्प होते, नाले तुंबतात आणि सामान्य जनतेचे हाल होतात. प्रशासनाच्या उपाययोजना अपुऱ्या ठरतात. रेल्वे रुळांवरील पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. राजकारणी आणि अधिकारी याकडे गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे मुंबईकरांचे पावसाळ्यातील हाल वर्षानुवर्षे सुरूच आहेत. उन्नत मेट्रो काहीसा दिलासा देते, पण तो अपुरा आहे.
नेमेचि येतो मग पावसाळा...’ या काव्यपंक्तीप्रमाणे जून ते सप्टेंबर या काळात हमखास पाऊस पडतो. मोसमी पाऊस ही भारताला मिळालेली नैसर्गिक देणगी आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून निसर्गचक्र बदलत चालले आहे. वादळे, अवकाळी पाऊस जनजीवन विस्कळीत तर करतो आहेच, परंतु शेतकरी राजाचे नुकसानही करतो आहे. शहरांना अवकळा आल्याने शहरे पाण्याखाली जाऊ लागली आहेत. मुंबईची जीवनवाहिनी असलेली उपनगरीय लोकल सेवा पावसाळ्यात हमखास काही काळ ठप्प होते. यामुळे लाखो मुंबईकरांचे अतोनात हाल होतात. लोकल सेवा सुरळीत चालावी, यासाठी प्रशासनाकडून वरवरच्या उपाययोजना करण्यात येतात; मात्र, यातून मुंबईकरांचे होणारे हाल थांबण्याचे नाव घेत नाहीत.
राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई घड्याळ्याच्या काट्यावर धावते. “कधीही न झोपी जाणारे शहर” अशीही मुंबईची ओळख आहे. हाताला काम देणाऱ्या मायानगरीत लाखो लोक दाटीवाटीने राहतात. झोपडपट्टी, चाळी आणि टोलेजंग इमारतीमध्ये वास्तव्यास असलेल्या सर्व वर्गातील लोकांना प्रवासासाठी लोकल, बस, मेट्रो, रस्ते वाहतुकीवर अवलंबून रहावे लागते. पाणी साचून शहरातील जनजीवन विस्कळीत होऊ नये, यासाठी मुंबई महानगरपालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. परंतु नालेसफाईचे दावे दरवर्षी फोल ठरतात. यातून मुंबईकरांचे प्रचंड हाल होतात. याचेही राजकारण होते; नेतेमंडळी एकमेकांवर शाब्दिक आरोप करतात. परंतु रस्त्यांवरील चिखलात सामान्य मुंबईकरांचेच पाय माखतात. ही वर्षानुवर्षांची परंपरा बनली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
वैभवसंपन्न मुंबईतील नागरिकांच्या प्रवासासाठी १६ एप्रिल १८५३ मध्ये बोरीबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते ठाणेदरम्यान पहिली ट्रेन धावली. तेव्हा या रेल्वेचे इंजिन वाफेवर चालणारे होते. कालांतराने रेल्वे विकसित होत गेली आणि आज उपनगरीय सेवेचा विस्तार कर्जत-कसारा, पनवेल, पालघर असा मोठ्या प्रमाणात झाला आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील नागरिक कामानिमित्त दक्षिण मुंबईत येतात. या भागातील लोक लोकलवर अवलंबून आहेत. कामावर जाताना आणि कामावरून घरी परत जाताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. गर्दीने भरून धावणाऱ्या लोकलमधून पडून दरवर्षी शेकडो लोक मृत्युमुखी पडत आहेत. मृत्यू रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन उपाययोजना करत असले, तरी त्या कुचकामी ठरत आहेत.
पावसाची चाहूल लागताच महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन नालेसफाईची कामे हाती घेतात. तसेच पाणी साचणाऱ्या सखल भागांमध्ये पंप लावले जातात; मात्र, अधिक पाऊस झाल्यास सखल भागात पाणी साचते. परिणामी, रेल्वे रूळ पाण्याखाली जातात. त्यामुळे लोकल सेवा ठप्प होते. यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्यांचे प्रचंड हाल होतात. रेल्वे स्थानकांवर उभे राहण्यास जागा नसते. त्यामुळे आधीच भरून आलेल्या लोकलमध्ये प्रवेश मिळणे अशक्यच. ही परिस्थिती दर पावसाळ्यात मुंबईकरांच्या पाचवीला पुजली आहे.
रेल्वे स्थानके चकाचक करण्यासाठी रेल्वे प्रशासन लाखो रुपये खर्च करत आहे. मात्र, पावसाळ्यात रेल्वे वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी रुळांची उंची वाढविण्याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. साध्या लोकलपासून वातानुकूलित लोकलपर्यंत रेल्वेचा प्रवास होत असताना, या लोकल आहेत त्याच रुळावरून धावत आहेत. २६ मे रोजी झालेल्या जोरदार पावसाने मशीद, भायखळा, दादर, माटुंगा, बदलापूर येथील रेल्वे रुळांवर पाणी साचले. त्याचप्रमाणे हार्बर मार्गावरील स्थानकांमध्येही रुळांवर पाणी साचल्याने लोकल विस्कळीत झाल्या. हे दर पावसाळ्यात मुंबईकरांना सहन करावे लागते. येणाऱ्या कठीण प्रसंगावर मुंबईकर त्याच हिमतीने दरवेळी मात करतात. मात्र, मुंबईच्या लोकल प्रवाशांचे दुःख समजून घेण्यास लोकप्रतिनिधींना वेळ नाही. विविध कारणांमुळे विस्कळीत होणारी रेल्वे आणि लोकांचे हाल हे समीकरण झाले असताना रेल्वे प्रशासन केवळ दिलगिरी व्यक्त करून वेळ मारून नेत आहे. लोकांच्या होणाऱ्या अडचणींची कोणालाही पर्वा नसल्याचा संताप प्रवासी व्यक्त करत असतात.
पावसाळ्यात रेल्वे रुळांवर जमा होणारे पाणी हा प्रश्न अनेक वर्षांपासून सुटलेला नाही. यामुळे दरवर्षी लाखो रेल्वे प्रवाशांचे हाल होतच आहेत; मात्र, या समस्येवर उपाय योजण्याकडे का दुर्लक्ष केले जाते, हाही एक गंभीर प्रश्न आहे. रेल्वे केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्याने मुंबईतील लोकप्रतिनिधी त्याकडे लक्ष देत नाहीत. रेल्वे अधिकारीही मुंबईबाहेरून येत असल्याने त्यांनाही मूळ प्रश्न सोडविण्यात अधिक रुची नसते. निवृत्तीला आलेले रेल्वे अधिकारी मुंबईकरांच्या समस्या सोडविण्यास अधिक प्राधान्य देत नाहीत. यामुळे मुंबईकरांचे वर्षानुवर्षांचे हाल सुरूच आहेत. याचे ना राजकारण्यांना सोयरसुतक, ना रेल्वे अधिकाऱ्यांना. त्यामुळे लोकल प्रवाशांचे विविध कारणांनी होणारे हाल संपण्याची शक्यता दिसत नाही.
लोकल पावसाळ्यात दरवर्षी ठप्प होते. परंतु नव्याने सेवेत आलेल्या भुयारी मेट्रोत पाणी घुसल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्नत मार्गावरील मेट्रो मात्र पावसाळ्यात विना व्यत्यय धावत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळत आहे. मात्र, दररोज ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करत असलेल्या उपनगरीय लोकलमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास खडतरच दिसत आहे.
tejaswaghmare25@gmail.com