मुंबईचा श्वास गुदमरतोय

अनेक स्वप्नं उराशी बाळगत देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक मुंबईत येतात. मुंबईत येण्याचा ओघ वाढल्याने मुंबईची बजबजपुरी झाली आहे. याच वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईतील गृहनिर्माण, आरोग्य, स्वच्छता, वाहतूक, पर्यावरण, पाणी अशा विविध सुविधांवर ताण निर्माण झाला आहे.
मुंबईचा श्वास गुदमरतोय
मुंबईचा श्वास गुदमरतोयप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

आपले महानगर

तेजस वाघमारे

अनेक स्वप्नं उराशी बाळगत देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक मुंबईत येतात. मुंबईत येण्याचा ओघ वाढल्याने मुंबईची बजबजपुरी झाली आहे. याच वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईतील गृहनिर्माण, आरोग्य, स्वच्छता, वाहतूक, पर्यावरण, पाणी अशा विविध सुविधांवर ताण निर्माण झाला आहे.

सात बेटांची मिळून मुंबई बनली. खाडी, तलाव, विहिरी अशा नैसर्गिक स्रोतांचा जीव घेत मुंबईत टोलेजंग इमारती, झोपडपट्टी उभ्या राहिल्या. १९०६ साली मुंबईची लोकसंख्या सुमारे १० लाखांच्या आसपास होती. आज ही लोकसंख्या दीड कोटींहून अधिक आहे. यामध्ये दरदिवशी वाढ होत असून भविष्यात हा आकडा अजून वाढणार आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईतील पायाभूत सेवासुविधांवर प्रचंड ताण आला आहे. यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना आता अपुऱ्या पडू लागल्या आहेत.

मुंबईत एकेकाळी असलेल्या चाळी, टुमदार बंगल्यांच्या ठिकाणी टॉवर उभारले आहेत. झोपडपट्टीच्या ठिकाणी इमारती होऊ लागल्या आहेत. मुंबईकरांच्या जीवनमानात सुधारणा होत असतानाच मुंबईतील वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

मुंबईत महापालिका रुग्णालयांसोबतच खासगी रुग्णालये मोठ्या संख्येने आहेत. विविध आजारांवर उपचार होत असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येतात. पूर्वी महापालिका आणि राज्य सरकारच्या रुग्णालयात होणारे उपचारही आता महाग झाले आहेत. खासगी रुग्णालयात उपचार घेणे तर सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. महापालिका रुग्णालयांत तर पाय ठेवण्यास जागा नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे.

अनियंत्रित बांधकाम, रासायनिक उद्योग, वाढती वाहने अशा विविध कारणांनी मुंबईतील प्रदूषण वाढले आहे. प्रदूषणामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. वाढती वाहतूककोंडी तर मुंबईकरांची डोकेदुखी बनली आहे. या कोंडीवर उपाययोजना म्हणून उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. मात्र यानंतरही मुंबईत सकाळ असो वा संध्याकाळ अनेक मार्गांवर तासन‌्तास वाहनांच्या रांगा पाहावयास मिळतात. वाढत्या वाहतूककोंडीमुळे मुंबईकरांना मुंबई नकोशी वाटू लागली आहे.

झोपडपट्ट्या केवळ मुंबईत आहेत असे नाही, तर जगातील अनेक देशांसमोर झोपड्यांनी आव्हाने उभी केली आहेत. देशातील इतर राज्यांमध्येही झोपड्या आहेतच. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीची आहे. मुंबईत धारावीसारख्या अनेक भागांत झोपडपट्ट्या वाढल्या आहेत आणि वाढत आहेत. झोपडपट्टीदादांमुळे आणि राजकीय वरदहस्ताने या झोपड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे बहुतांश लोक मुंबईत झोपडीचा आसरा घेतात. मुंबईत होणाऱ्या स्थलांतरामुळे झोपड्या वाढण्यासह पिण्याचे पाणी, वाहतूककोंडी, अस्वच्छता असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

मुंबईतील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी झोपड्यांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. यामध्ये राजकीय नेते आणि विकासक संगनमताने झोपडीधारकांना त्रस्त करत आहेत. झोपडपट्टीच्या ठिकाणी इमारती उभ्या राहत आहेत. झोपडपट्टीचा विकास होताना त्या ठिकाणचे रस्ते आहेत तेवढेच राहतात. त्यामुळे येथे पार्किंगसह विविध समस्या निर्माण होतात. अशीच अवस्था जुन्या इमारतींचा पुनर्विकास करताना होत आहे. पुनर्विकासात वाढीव बांधकाम क्षेत्रफळ उपलब्ध होत असल्याने पुनर्विकासाला गती आली आहे. यातून दुप्पट ते तिप्पट घरे अधिकची उपलब्ध होत आहेत. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सुविधा वाढत नसल्याने आहे त्या सुविधांवर ताण येत आहे. वाहतूककोंडीवर उपाय म्हणून उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत, मात्र आहेत त्याच रस्त्यांवर उड्डाणपूल उभे राहत असल्याने वाहतूककोंडीच्या समस्येवर तोडगा निघालेला नाही.

वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मुंबईला पाणीपुरवठा होणाऱ्या धरणांच्या संख्येत वाढ झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना समान पाणीवाटप करणे पालिकेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाढती पाणी मागणी महापालिका प्रशासनाला पूर्ण करण्यासाठी हालचाल करावी लागणार आहे. अन्यथा मुंबईकरांना पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

वाढत्या स्थलांतरामुळे मुंबईत परवडणारी घरे खरेदी करणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. मुंबईतील जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे येथे सरकारी प्राधिकरणांनाही परवडणाऱ्या किमतीमध्ये घर उपलब्ध करून देणे अशक्य बनले आहे. शहर आणि उपनगरात घराच्या किमती कोट्यवधी रुपये झाल्या आहेत. जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास सुरू झाल्याने मुंबईत भाड्याच्या घराच्या किमतीही कमालीच्या वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण बनू लागले आहे.

मुंबई महानगर क्षेत्राचा विकास झपाट्याने झाल्याने या भागात नागरीकरण वाढले आहे. या भागातील नागरिक कामधंद्यानिमित्त मुंबईत येतात. प्रवासासाठी नागरिक लोकल सेवेवर अवलंबून असून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत आहेत. गर्दीच्या वेळी लोकलमध्ये पाय ठेवण्यास जागा मिळत नाही. लोकल सेवा वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करत असले तरी हाती घेतलेले प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाहीत. रेल्वे रुळालगत झालेल्या अनधिकृत बांधकामांमुळे प्रकल्प वेळेत मार्गी लागत नसल्याने रेल्वे सेवेवरील ताण कमी होण्याची शक्यता तूर्तास तरी दिसत नाही.

मुंबईत वाढत्या स्थलांतरामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि भविष्यात निर्माण होणार आहेत. याचा साकल्याने विचार करून त्यादृष्टीने प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

tejaswaghmare25@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in