पाणी बचत उद्याची गरज

पाणी अडवा, पाणी जिरवा ही म्हण फक्त कागदावरच राहिली आहे. दिवसेंदिवस पाणी संकट गडद होत चाललंय, याचे संकेत मिळत असताना तुम्ही-आम्ही पाणी बचतीकडे दुर्लक्ष करत आहोत. विशेष करून मुंबईतील बहुतांश भागात पाणी उपलब्ध होत असल्याने पाणी बचतीला आपणच हरताळ फासला आहे.
पाणी बचत उद्याची गरज
Published on

- महाराष्ट्रनामा

- गिरीश चित्रे

पाणी अडवा, पाणी जिरवा ही म्हण फक्त कागदावरच राहिली आहे. दिवसेंदिवस पाणी संकट गडद होत चाललंय, याचे संकेत मिळत असताना तुम्ही-आम्ही पाणी बचतीकडे दुर्लक्ष करत आहोत. विशेष करून मुंबईतील बहुतांश भागात पाणी उपलब्ध होत असल्याने पाणी बचतीला आपणच हरताळ फासला आहे. ग्रामीण भागातील प्रत्येकाला पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जल जीवन मिशन योजनेची अंमलबजावणी करण्याची ओरड झाली; मात्र जल जीवन मिशन योजना संथगतीने का वाहत आहे, याचे उत्तर सरकारचे देऊ शकेल; मात्र पिण्याच्या पाण्याचे संकट लक्षात घेता 'आजची बचत उद्याची गरज' बनली आहे.

गेल्या काही वर्षांत वातावरणीय बदलामुळे पाऊस लहरी झाला आहे. त्यामुळे राज्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातही पावसाचे आगमन उशिरा होते आणि जनतेला पावसाच्या मोसमात पाणी कपातीला सामोरे जावे लागते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पाणीबाणी स्थिती निर्माण झाली तर त्याची ओरड होते. नळाला पाणी आले, काम झाले, तर नळ बंद करणे हे खास करून मुंबईकरांच्या स्वभावातच नसावे. त्यामुळे मुंबईत पाण्याला फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. मात्र पाणी हे अनमोल आहे, याची जाणीव ग्रामीण भागातील पाण्याची भयावह स्थिती बघितल्यानंतर येते. पाण्याचा अपव्यय टाळणे हे तुम्हा-आम्हा सर्वांच्या हातात. मात्र पाणी वाया घालवणे हा आपल्या सवयीचा जणू भागच झाला आहे. त्यामुळे पाणी वापराचे ऑडिट अनिवार्य ही काळाची गरज बनली आहे.

पाणी हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे; मात्र भविष्यात रोजच्या पाणीपुरवठ्याच्या मागणीत वाढ होण्याचे संकेत वाढत्या लोकसंख्येमुळे मिळू लागले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळत पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाबरोबर प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे आहे.‌ विशेष करून मुंबईसाठी समुद्राचे पाणी गोडे करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य उपलब्ध करणे यासाठी पालिका प्रशासनाने नियोजनबद्ध प्रयत्न केले तर भविष्यात पाणीबाणी परिस्थिती ओढावणार नाही, याचा विचार प्रशासनासह तुम्ही-आम्ही करणे उद्याची गरज आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी. यामुळे मुंबईला प्रत्येक गोष्टीत प्राधान्य दिले जाते. मुंबईत पाणीबाणी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकारकडून राखीव पाणीसाठा उपलब्ध करून दिला जातो. परंतु राज्यातील अनेक भागात पाण्याची ओरड होत असते. अनेक जिल्हे पाण्यासाठी व्याकूळ असून एक-दोन दिवस आड पाणी मिळते. त्यामुळे ग्रामीण भागात तर पाण्यासाठी कशा प्रकारे लढा द्यावा लागतो याचा विचारही डोळ्यांतून पाणी आणणारा आहे. ग्रामीण भागातील पाण्याची गरज, धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत होणारी घट लक्षात घेता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही पाण्याचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. वातावरणीय बदलामुळे पाऊसही लहरी झाला असून, भविष्यात पाणी संकट गडद होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पाण्याची आजची बचत उद्याची गरज असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पाणीबाणी स्थिती ओढवली तर तातडीने उपाययोजना करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. पाणी प्रत्येकाला मिळावे यात दुमत नाही; मात्र ग्रामीण भागात पुरेशा पाण्याची कमतरता ही एक कायमची समस्या निर्माण झाली आहे. उन्हाळा सुरू होताच दरवर्षी राज्याच्या विविध भागांतून पिण्याच्या पाण्याचे संकट तीव्र होत असल्याचे वृत्त येते. एप्रिल मे महिन्यात तर ग्रामीण भागातील लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. ग्रामीण भागातील प्रत्येकाला पाणी यासाठी जल जीवन मिशन योजना अंमलात आणली. ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात पिण्याच्या पाण्याचे थेट नळ कनेक्शन व्हावे म्हणून केंद्राने सुरू केलेल्या जल जीवन मिशन योजनेंतर्गत अनेक जिल्ह्यांत तालुक्यात कामे संथगतीने सुरू आहेत. जल जीवन मिशन या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र केंद्र सरकारने सुरू केलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेला महाराष्ट्रातील तालुक्यात घरघर लागली आहे. त्यामुळे पाणी हे जीवन असून पाण्यात चोरी म्हणजे जनतेच्या सहनशीलतेचा उद्रेक होणार आणि याला तुम्ही-आम्ही सगळेच जबाबदार असणार हे कोणी नाकारू शकत नाही.

गेल्या एक-दोन दशकांपूर्वी एखाद्याच्या लग्नकार्यात हवा तसा पैसा खर्च केला, तर त्यावेळी लोक म्हणत असे काय पाण्यासारखा पैसा खर्च केला. याचा अर्थ त्यावेळी पाण्याला फारसे महत्त्व दिले जात नसावे.

मात्र आजच्या घडीला पिण्याच्या पाण्याची भयंकर टंचाई जाणवू लागली आहे. राज्यात पिण्याच्या पाण्याची भयावह स्थिती निर्माण झाली की टँकरचालक घात लावून बसलेलेच असतात. ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी एखाद्या भागात टँकर पोहोचला की पाण्यासाठी लोकांची तोबा गर्दी होते. जेमतेम एक-दोन हांडे पाणी मिळाले तरी गावकरी विशेष करून महिला समाधान व्यक्त करतात. मात्र टँकरचालकांचे भले होत असल्याने हर घर जल पद्धत अंमलात आणत टँकर पद्धत मोडीत का काढली जात नाही. पाण्याचा असाच अपव्यय सुरू राहिला तर एका बादलीसाठी तुम्हा आम्हाला पैसे मोजावे लागणार हेही तितकेच खरे.

या गोष्टींची काळजी घ्या!

- पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितकाच वापर करणे.

- पाण्याचा स्रोत प्रदूषित न करणे.

- जगात गोड्या पाण्याचे प्रमाण मुळातच फार कमी आहे.

- पिण्याचे पाणी सर्वांनाच गरजेप्रमाणे मिळेल हे पाहणे.

- स्वतःला खरोखरी किती पाण्याची गरज आहे हे समजून घेऊन तितकेच पाणी प्रत्येकाने वापरणे व या गोष्टीचा प्रसार करणे गरजेचे.

gchitre4gmail.com

logo
marathi.freepressjournal.in