मुंबईत रस्ते प्रवासाचे अग्निदिव्य

मुंबईत वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शहरातील शंभरहून अधिक वर्षे जुने धोकादायक उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे मुंबईत वाहतूककोंडीतून मार्ग काढताना वाहनचालकांना अग्निदिव्य करावे लागणार आहे.
मुंबईत रस्ते प्रवासाचे अग्निदिव्य
Published on

- आपले महानगर

- तेजस वाघमारे

मुंबईत वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शहरातील शंभरहून अधिक वर्षे जुने धोकादायक उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे मुंबईत वाहतूककोंडीतून मार्ग काढताना वाहनचालकांना अग्निदिव्य करावे लागणार आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यातून दररोज किमान ६०० लोक नोकरीसाठी मुंबईत येतात, असा अंदाज आहे. मुंबईत माणसांचे लोंढे अविरतपणे सुरू आहेत. याचा पायाभूत सेवासुविधांवर ताण येत आहे. यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे शहर उपनगरांचा श्वास कोंडला जाऊ लागला आहे. लोकल, रस्ते मार्गाने प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शहरातील शंभरहून अधिक वर्षे जुने धोकादायक उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे मुंबईत वाहतूककोंडीतून मार्ग काढताना वाहनचालकांना अग्निदिव्य करावे लागणार आहे.

रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी दक्षिण मुंबईत ब्रिटिश काळात उड्डाणपूल उभारण्यात आले. यापैकी बहुतांश उड्डाणपूल मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आहेत. या पुलांचे आयुर्मान झाल्याने ते जीर्ण झाले आहेत. दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर असे उड्डाणपूल तोडून नव्याने पूल उभारण्यात येत आहेत. उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करताच त्या परिसरात प्रवाशांना प्रचंड वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा गोखले उड्डाणपूल वाहतुकीस बंद केल्यानंतर पश्चिम उपनगरातील वाहनचालकांना वाहतूककोंडीच्या अग्निदिव्याला सामोरे जावे लागले. पूर्व-पश्चिम प्रवास करताना प्रवाशांची दमछाक झाली. हा पूल पूर्ण क्षमतेने वाहतूक सेवेत अद्याप आला नसतानाच सायन रेल्वेवरील उड्डाणपूल धोकादायक झाल्याने आणि रेल्वे मार्गिका विस्तारीकरणासाठी बंद करण्यात आला.

कुर्ला, सायनकडे जाणाऱ्या वाहनांचा मुख्य मार्गच बंद झाल्याने या मार्गावरील वाहतूक सायन रुग्णालयाजवळील पुलावरून वळविण्यात आली आहे. सायन हॉस्पिटल ते माहीम फाटक हा दोन-तीन मिनिटांच्या प्रवासासाठी अर्ध्या तासाहून अधिक वेळ जातो आहे. वाहतूक वळविल्यानंतर या मार्गावर कुठेही वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलीस क्वचित नजरेस पडतात. यामुळे वाहतूककोंडीतून मार्ग काढणे वाहनचालकांसाठी जिकीरीचे झाले आहे. यातच भरीस भर म्हणून मिठी नदीवरील पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे सायन ते कलानगर प्रवास प्रवाशांसाठी त्रासदायक बनला आहे. पाच मिनिटांच्या अंतरासाठी एक तास वाहनांमध्ये अडकून पडावे लागत आहे.

सायन उड्डाणपुलाची पुराण कथा बंद होत नाही, तोच एलफिन्स्टन पूल पुनर्निर्माणासाठी बंद करण्याची अधिसूचना वाहतूक विभागाने जारी केली आहे. महत्त्वाची रुग्णालये असलेल्या या भागात वाहतूककोंडी नित्याचीच. परंतु हा पूल बंद झाल्यास मुंबईकरांचे होणारे हाल प्रत्यक्ष अनुभवल्यानंतरच समजणार आहेत. या भागातील कोंडी फोडून सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी कोणी वाहतूक पोलीस रस्त्यावर असतीलच, ही भाबडी आशा न बाळगलेली बरी.

एलफिन्स्टन पाठोपाठ मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दादरमधील टिळक उड्डाणपुलाचे पुनर्निर्माण करण्याचे सुरू होईल. ही कामे पूर्ण होण्यास अडीच-तीन वर्षांहून अधिक कालावधी लागतो. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूककोंडी, ध्वनी, वायू प्रदूषण या परिणामांही मुंबईकरांना सामोरे जावे लागणार आहे.

मुंबईमध्ये अनेक जुने उड्डाणपूल असून, ते जीर्ण झाले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव या पुलावरून वाहतुकीस निर्बंध घालण्यात येतात. असे १०हून अधिक उड्डाणपूल क्रमाक्रमाने काही वर्षांत वाहतुकीसाठी बंद करावे लागणार आहेत. त्यामुळे मुंबईतील रस्ते प्रवास अतिकठीण ठरणार आहे. महापालिका, वाहतूक विभाग आपापली जबाबदारी पार पाडत असले, तरी मुंबईच्या वाहतूककोंडीवर कोणीही गंभीर असल्याचे दिसत नाही.

मंत्र्यांचे ताफे रस्त्यावरून जाण्यासाठी वाहतूक पोलीस इमानेइतबारे कामात झोकून देतात. परंतु मुंबईत अनेक ठिकाणी होणाऱ्या वाहतूककोंडीत नागरिक तासन‌्तास अडकून पडत असताना त्यावर कोणत्याही यंत्रणेचे लक्ष नाही, हे दुर्दैवी म्हणावे लागेल.

मुंबईत दररोज नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत. त्या तुलनेत रस्ते लहान होत चालले आहेत. मुख्य रस्त्यांवर मेट्रो, उड्डाणपूल प्रकल्प उभारण्यात आले आहेत. हे प्रकल्प उभारताना वाहतूककोंडीचा विचार होताना दिसत नाही. वेगवान प्रवास करून वाहने काही मिनिटांत पुन्हा वाहतूककोंडीत अडकत आहेत. नवीन प्रकल्प राबविण्यात येत असले, तरी त्यांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास भविष्यात सुखकर होईल, अशी आशा बाळगल्यास ती फोल ठरणारी असेल.

सुमारे ५० लाख वाहने मुंबईत आहेत. गर्दीच्या वेळी मुंबईतील अनेक रस्ते वाहनांच्या कर्णकर्कश आवाजात हरवून जातात. जड वाहनांसाठी रस्त्यावर वेळा निश्चित करून देण्यात आल्या आहेत. मात्र याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. रस्त्यावर होणारी दुतर्फा पार्किंग वाहतूककोंडीस कारणीभूत ठरत आहे.

मेट्रोमुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होईल, असे सांगण्यात येत होते. परंतु रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी झालेली नाही. मुंबईत दररोज नवीन वाहने रस्त्यावर येऊन वाहतूककोंडीत भर घालत आहेत. वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी वाहन खरेदीला लगाम घालण्यासाठी परिवहन विभाग विचार करू लागला आहे. मुंबई महानगरसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त होऊ लागले आहेत.

वाहतूककोंडी दूर करून प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी मुंबईत विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या कामांसाठी रस्त्यावर लावण्यात येणारे बॅरिकेट आणि वाहतुकीसाठी बंद करण्यात येणारे रस्ते यामुळे वाहतूककोंडीत भर पडते. मुंबईतील धोकादायक झालेले उड्डाणपूल जसे की, घाटकोपर रेल ओव्हर ब्रीज, करी रोड रेल ओव्हर ब्रीज, ऑर्थर रोड/चिंचपोकळी ओव्हर ब्रीज, भायखळा रेल ओव्हर ब्रीज, मरीन लाईन्स रेल्वे ओव्हर ब्रीज, सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रीज, फ्रेंच रेल ओव्हर ब्रीज (ग्रँट रोड-चर्नी रोड दरम्यानचा), केनडी रेल्वे ओव्हर ब्रीज (ग्रँट रोड-चर्नी रोड दरम्यानचा), फॉकलँड रेल्वे ओव्हर ब्रीज (ग्रँट रोड-मुंबई सेंट्रल दरम्यानचा), मुंबई सेंट्रल स्टेशनजवळील बेलासीस ब्रीज, महालक्ष्मी स्टील रेल्वे ओव्हर ब्रीज, प्रभादेवी रेल्वे ओव्हर ब्रीज आणि दादर टिळक रोड रेल्वे ओव्हर ब्रीज यांचा समावेश आहे. हे पूल नव्याने उभारण्यासाठी बंद केल्यास मुंबई शहरातील वाहतूककोंडी वाढणार आहे. त्यामुळे मुंबईतील वाहतुकीचे नियोजन प्रशासनाला वेळेत करावे लागणार आहे.

tejaswaghmare25@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in