
आपले महानगर
तेजस वाघमारे
बेस्ट उपक्रम अनेक संकटांमध्ये अडकला आहे. मुंबई महापालिकेकडून बेस्ट उपक्रमाला आवश्यक मदत होत नसल्याने बेस्ट उपक्रम अधिकच गाळात रूतू लागला आहे. त्यात भरीस भर म्हणून निकृष्ट सेवा आणि वाढत्या अपघातांमुळे बेस्टची प्रतिमा डागाळू लागली आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे.
मुंबईची रक्तवाहिनी असलेली बेस्ट बस मुंबईकरांना गेली ७५ वर्षांहून अधिक काळ सेवा देत आहे. ही सार्वजनिक वाहतूक सेवा आता अखेरच्या घटका मोजू लागली आहे. मुंबई शहर आणि उपनगराच्या प्रत्येक भागाला जोडलेली ही सेवा मुंबईतील गरीबांपासून श्रीमंतांना अविरत सेवा देत आहे. परंतु प्रशासकीय आणि राजकीय उदासीनतेमुळे ही सेवा हळूहळू अस्ताकडे चालली आहे. वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध होत असताना गोरगरीबांची बेस्ट सेवा आजही दररोज लाखो प्रवाशांचा प्रवास सुखकर करत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित बेस्ट उपक्रम येतो; मात्र महानगरपालिका प्रशासनाने या उपक्रमाला नेहमीच सापत्न वागणूक दिली आहे. सर्वाधिक बजेट असलेली महानगरपालिका मुंबईच्या सौंदर्यीकरण, प्रकल्पांवर करोडो रुपयांचा चुराडा करत आहे. परंतु मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याकडे महापालिका पुरेसे लक्ष देताना दिसत नाही. मुंबईकर जनतेला नियमितपणे चांगली सेवा देण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडे स्वमालकीच्या किमान ३३३७ बसगाड्या कायम राखणे आवश्यक आहे. त्यानुसार आयुष्यमान संपलेल्या बसगाड्यांच्या बदल्यात नवीन बसगाड्या विकत घेण्यासाठी आवश्यक आर्थिक निधी मुंबई महानगरपालिकेकडून बेस्ट उपक्रमाला देणे आवश्यक आहे. मात्र २०१९ नंतर महापालिकेने बेस्ट उपक्रमाला आयुष्यमान संपलेल्या बसगाड्यांच्या बदल्यात नवीन बसगाड्या विकत घेण्यासाठी कुठलाही निधी दिलेला नाही.
परिणामी बेस्ट उपक्रमाचा स्वमालकीच्या बसगाड्यांचा बस ताफा आजघडीला केवळ १०८५ इतकाच राहिला आहे. ३१ मार्च २०२५ रोजी बेस्ट उपक्रमाकडे स्वमालकीच्या फक्त ७६१ बसगाड्या शिल्लक राहणार आहेत, तर ३० नोव्हेंबर २०२५ रोजी बेस्ट उपक्रमाकडे स्वमालकीच्या केवळ २५१ बसगाड्या शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे बेस्टची सेवा बंद पडण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवा अबाधित राहावी यासाठी बेस्ट बचाव संघटनेने लढा उभारला आहे. परंतु आजवर महापालिका प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. बेस्ट उपक्रम अनेक संकटांमध्ये अडकला आहे. लाखो मुंबईकर नागरिकांच्या सेवेत अविरत असलेला बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात आहे. बुडत्याला काडीचा आधार या उक्तीप्रमाणे बेस्टच्या वीज उपक्रमामुळे बेस्ट सेवा तरली आहे. महापालिकेकडून बेस्ट उपक्रमाला आवश्यक मदत होत नसल्याने बेस्ट उपक्रम अधिकच गाळात रूतू लागला आहे. बेस्ट सेवेला कंत्राटीकरणाची वाळवी लागली असून, ती बेस्ट सेवा पोखरू लागली आहे.
बेस्ट सेवेत कंत्राटीकरण आल्यापासून बेस्ट सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. निकृष्ट सेवा आणि वाढत्या अपघातांमुळे बेस्टची प्रतिमा डागाळू लागली आहे. प्रशिक्षणाचा अभाव असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये बेस्ट उपक्रमाबद्दल आपलेपणा नाही. त्यामुळे प्रवाशांसोबतची त्यांची वागणूक मदतीची, सहानुभूतीची नाही. प्रवासी बसमध्ये चढण्यापूर्वीच बस सुरू करणे, थांबा आल्याची माहिती प्रवाशांना न देणे, ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य न करणे असे अनेक प्रकार कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून होऊ लागले आहेत. संस्थेशी बांधिलकी नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून चांगल्या सेवेची अपेक्षा करणे आता प्रवाशांनीही सोडून दिले आहे.
मुंबईच्या विस्तारासोबत बेस्ट शहर उपनगराच्या कानाकोपऱ्यात पोहचली. उपनगरीय रेल्वेतून उतरल्यावर प्रवाशांना दुसरा स्वस्त आणि विश्वासू पर्याय हा एकमेव बेस्ट सेवा आहे. इंधनाच्या वाढत्या किमती, कर्मचाऱ्यांचे पगार अशा विविध कारणांनी प्रशासनावर आर्थिक बोजा पडत आहे. यानंतरही पाच ते २० रुपयांत सेवा देणारी सर्वात स्वस्त बस सेवा म्हणून बेस्टची ओळख आहे. मुंबई शहरात मेट्रोचे विविध मार्ग सुरू झाले आहेत. यानंतरही बेस्ट बस गर्दीने ओसंडून धावतात. गोरगरीब, मध्यमवर्गीय व्यक्ती आजही प्रवासासाठी बेस्ट बसला प्राधान्य देत आहे. पीक अवर्समध्ये तर बसमध्ये आता प्रवेश करण्यास जागा नसते. दिवस-रात्र मुंबईकरांच्या सेवेत असलेल्या बेस्ट सेवेवर मुंबईतील मजूर, कामगार सर्वसामान्य नागरिक अवलंबून आहे. त्यामुळेच की काय महापालिका, राज्य सरकारकडून ती उपेक्षित राहिली आहे.
बस संख्येमुळे उपक्रमाला सेवा चालविणे कठीण बनले आहे. यामुळे बेस्ट बसचा वक्तशीरपणा बिघडला आहे. बस वेळेचा भरोसा उरला नसल्याने प्रवासी शेअर रिक्षा, टॅक्सी पर्याय निवडू लागले आहेत. नियोजनाचा अभाव असल्याने रेल्वे स्थानकापासून पर्यायी ठिकाणी सेवा सुरू करण्यात बेस्टला अपयश आले आहे. बेस्ट टेक्नोसॅव्ही बनण्याचा प्रयत्न करते, परंतु नवीन प्रयोग मध्येच फसत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. बेस्टने चलो मोबाइल ॲपचा गवगवा केला. या ॲपच्या माध्यमातून तिकीट घेणे ते बसचे लोकेशन प्रवाशांना कळते. परंतु गेले काही महिन्यांपासून बहुतांश इलेक्ट्रॉनिक बसचे लोकेशन बंद झाले आहे. इलेक्ट्रॉनिक बस बंद पडण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. यामुळे बेस्ट सेवेचे तीनतेरा वाजल्यानंतरही त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही.
मुंबईत वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतूककोंडीबरोबरच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. रस्त्यांवरील वाहन पार्किंग, पादचारी यामुळे बस चालविणे चालकांना कठीण बनले आहे. खासगी वाहनचालकांकडून बेस्ट बसचालकांना शिवीगाळ, मारहाण होण्याचे प्रकार वाढले आहेत. कंत्राटी बसचालकांना संरक्षण नसल्याने अनेकांना चुकी नसतानाही चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सेवेतील चालकांना संरक्षण देण्यासाठी उपक्रमाने वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे.
बेस्ट उपक्रमाचे मुंबईतील प्रमुख ठिकाणी डेपो आहेत. या डेपोंकडे बिल्डर आणि दुष्ट राजकारण्यांची नजर आहे. यापूर्वीही काही अधिकाऱ्यांना सोबत घेऊन बिल्डरांनी डोपोंच्या जागा लाटल्या आहेत. बेस्टच्या मालकीच्या या जागांचा पार्किंग, कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारून विकास केल्यास बेस्ट उपक्रमाला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त होईल. त्यासोबतच डेपोंचे श्रीखंड खाऊ इच्छिणारे नेते, अधिकारी यांचे षडयंत्र वेळीच उधळून लावण्यासाठी बेस्टप्रेमी मुंबईकरांनी डोळ्यात तेल घालून जागे राहिले पाहजे. अन्यथा बेस्ट कोण्या कंपनीच्या दावणीला बांधली जाऊन मुंबईकरांची ‘बेस्ट’ सेवा महागडी आणि मनमानी झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी प्रवासी आणि मुंबईकरांनी जागता पहारा दिला पाहिजे.
tejaswaghmare25@gmail.com