अशी सोडवली माझी तक्रार...

अशी सोडवली माझी तक्रार...

मुंबई ग्राहक पंचायत या आशियातील सर्वात मोठ्या ग्राहक संस्थेचा मी सर्वसामान्य कार्यकर्ता. संस्थेच्या मुशीत तयार झालो असल्याने माझी तक्रार मी कशी सोडवली ही घटना इथे देत आहे.
Published on

-ग्राहक पंचायत

उदय पिंगळे

मुंबई ग्राहक पंचायत या आशियातील सर्वात मोठ्या ग्राहक संस्थेचा मी सर्वसामान्य कार्यकर्ता. संस्थेच्या मुशीत तयार झालो असल्याने माझी तक्रार मी कशी सोडवली ही घटना इथे देत आहे. यातून इतर ग्राहकांनाही काही बोध व्हावा, ग्राहक म्हणून आपला हक्क कसा बजवावा याचे मार्गदर्शन मिळावे, हा हेतू यामागे आहे.

काही वैयक्तिक कारणासाठी वापरात नसलेले दागिने आम्ही विकायचे ठरवले. हे दागिने प्रभादेवी येथील एका सुप्रसिद्ध पेढीवर घेतले होते. त्याच्या खरेदीच्या पावत्याही होत्या. अन्य सोनारांना ते दाखवले असता त्यांनी देऊ केलेली रक्कम आणि दागिने जिथून घेतले त्यांनी सांगितलेल्या रकमेत वीस हजारांहून अधिक फरक होता. अर्थातच मूळ सोनाराकडे दागिने विकण्याचा निर्णय मी घेतला. त्यांनी दागिन्यांची तीन लाख बेचाळीस हजार ही किंमत पुढील वीस-बावीस दिवसांमध्ये म्हणजे जास्तीत जास्त २ जानेवारी २०२४ पर्यंत एनईएफटीने देतो, असे सांगितले. यापूर्वीचा त्यांच्याकडील अनुभव चांगला असल्याने मी ते मान्य केले.

२ जानेवारीपर्यंत पैसे खात्यात जमा न झाल्याने फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधला असता १२ जानेवारीपर्यंत सर्व पैसे देतो, असे त्यांनी सांगितले. १० जानेवारीला त्यांना आठवण करून देण्यासाठी फोन केला असता तो न उचलल्याने मनात शंकेची पाल चुकचुकली. १२ तारखेला त्यांच्या दुकानात गेलो असता ते थातुरमातुर कारणे सांगू लागले. त्यांच्याकडून येणे असलेली रक्कम १६ आणि १८ जानेवारीचे प्रत्येकी एक लाख रुपयांचे चेक देऊन उरलेली रक्कम दोन हप्त्यांमध्ये एनईएफटीने २१ जानेवारीपर्यंत देतो, असे त्यांनी सांगितले. यात काही गडबड झाली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल, अशा पत्रावर त्यांची सही घेतली. मात्र दोन्ही चेक त्यांच्या खात्यात पैसे शिल्लक नसल्याने परत गेले. २१ जानेवारीपर्यंत एकही पैसा न मिळाल्याने आमच्याच तक्रार मार्गदर्शन केंद्रप्रमुख शर्मिला रानडे यांचा सल्ला घेतला असता त्यांनी पेढीवर फोन केला आणि पेढीच्या मालकांशी बोलणे केले. त्यांनी माझे पैसे देणे असल्याचे मान्य करून २८ जानेवारीपर्यंत देतो, असे सांगितले. पुन्हा २८ लाही पैसे न आल्याने शर्मिला रानडे यांनी ग्राहक पंचायतीच्या ‘समेट’ या मध्यस्थी मंचाकडे जाण्याचा सल्ला दिला. ३१ जानेवारीला वरचे ४२ हजार आले तरी तीन लाख रुपये बाकी असल्याने ४ फेब्रुवारीला ‘समेट’कडून पेढी मालकाला नोटीस दिली गेली आणि दहा दिवसांमध्ये त्यांचा प्रतिसाद मागवण्यात आला. १५ फेब्रुवारीला सोनाराकडून ५० हजार आले. परंतु नोटिशीला उत्तर न आल्याने लगेच नियम १३८ खाली पेढीला नोटीस देण्याचे ठरवले. ही नोटीस चेक परत गेल्यापासून ३० दिवसांत देणे बंधनकारक असल्याने भाचीच्या ओळखीने एका नामवंत फर्मकडून शेवटच्या दिवशीच पाठवली. यानंतर सोनाराच्या दुकानातून २२ फेब्रुवारीला फोन आला की, ‘तुम्ही आम्हाला दोन नोटिसा पाठवल्या आहेत. त्यातील कोणत्या नोटिशीला उत्तर द्यायचे? आम्ही १५ दिवसांत राहिलेले पैसे आणि चेक परत गेल्याचे चार्जेस देत आहोत.’ त्यावर मी त्यांना, ‘काय करायचे ते तुम्ही ठरवा. पैसे परत कसे मिळतील त्यासाठी सर्व प्रयत्न करणे हे माझे काम आहे.’ त्यांनी सांगितलेल्या मुदतीत आणखी पन्नास हजार २ मार्चला आले. तरीही अजून दोन लाख रुपये येणे बाकी होते. वारंवार पाठपुरावा करूनही नोटिशीला, ई-मेलला उत्तर देणे तर सोडाच, साधी पोचही त्यांनी दिली नाही. तीन महिने झाले. त्यावेळी साधारण ४०% रक्कम हातात आली होती. उरलेले दोन लाख रुपये मिळवण्यासाठी क्रिमिनलमध्ये जायचे की कन्झ्युमर फोरमकडे, याबाबत सल्ला घेतला असता क्रिमिनलमध्ये जाण्याचा सल्ला मिळाल्याने प्रभादेवी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्यायची ठरवले.

तेथे गेल्यावर दुकान दादर पोलीस ठाणे कार्यहद्दीत येते हे समजले. म्हणून तिकडे गेलो. पोलीस स्टेशनमधून दुकान मालकांना फोन करण्यात आला. तो उचलला न गेल्याने एका मार्शलाला पाठवून कोणाला तरी घेऊन येण्यास सांगण्यात आले. दुकान मालक एका लग्नासाठी पुण्याला गेले होते. आलेल्या माणसाने मालकांना कॉल लावून दिला, तेव्हा त्यांनी ‘एक दिवसात पैसे देतो’, असे सांगितले असावे. चोवीस तासांत पैसे न दिल्यास यांची तक्रार दाखल करून घेतो, असे पोलिसांनी सांगितल्यावर साधारण ३० तासांमध्ये टप्प्याटप्प्याने उरलेले पैसे मिळाले. उशिरा का होईना पूर्ण पैसे मिळाले यात आनंद मानला.

त्या ज्वेलर्सने अनेकांना अशाच टोप्या लावल्या आहेत असे नंतर समजले. पेढी मालकांच्या वडिलांशी माझा वैयक्तिक परिचय होता. पूर्वी अनेकदा पुढील तारखेचा चेक देऊन मी त्यांच्याकडून वस्तू आणल्या होत्या, हे सांगितले तर खोटे वाटेल. नेहमी कायम भरलेल्या दुकानात आज गिऱ्हाईक नाही म्हणून सेल्समन वाट पाहतात, त्यांचे पगारही नियमित होत नाहीत, असे समजले. अनेक ज्वेलर्सची सोन्याची दुकाने दुथडी भरून वहात असताना यांच्याकडे कोणी फिरकत नाही, हा काळाचा महिमा, दुसरे काय? यात माझ्याकडून दुकानदारावर थोडा जास्तच विश्वास ठेवला गेला त्यामुळे जे कालहरण झाले, ते कदाचित टाळता आले असते. किंबहुना ‘अगदीच गळ्याशी आले तर बघू’ अशी दुकानदाराची मानसिकता दिसली. यातूनच चांगुलपणाचा असा गैरफायदा त्यांना घेता येतो. त्यामुळेच ‘विश्वास दाखवा, पण ठेवू नका’, हे नव्याने ठसवण्याची वेळ आता आली आहे. या सर्वच प्रकरणात अभय दातार, शर्मिला रानडे, पूजा जोशी- देशपांडे, विश्वकर्मा अँड असोसिएट, उद्योजक मित्र श्रीकांत आव्हाड आणि दादर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक साळुंके यांनी मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य केले.

‘ग्राहक सेवेतील त्रुटी’ या सदराखाली जिल्हा ग्राहक आयोगाकडे याची दाद मागता येईल. परंतु माझे मार्गदर्शक वकील श्रीकांत आव्हाड तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. शिरीष देशपांडे या सर्वांनी मूळ रक्कम मिळाली असल्याने हे प्रकरण आता वाढवू नये, असा सल्ला दिला. तीन महिने तीन दिवस अखंड पाठपुरावा केल्यावर, विरोधी पक्षाकडून एकरकमी तडजोड रक्कम देण्याची तयारी दर्शविण्यात आली. त्याप्रमाणे रक्कम मिळाल्याने सामंजस्याने हा प्रश्न सुटला.

म्हणूनच ग्राहक वाचकांच्या काही तक्रारी असतील, त्यांना काही मदत हवी असेल तर mpanchayat@gmail.com या ई-मेलवर आम्हाला जरूर कळवा. मला जशी मदत मिळाली तशी तुम्हालाही मिळेल. तुमची तक्रार तुम्हीच सोडवू शकाल.

मुंबई ग्राहक पंचायत

mgpshikshan@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in