
-शिक्षणनामा
-रमेश बिजेकर
नालंदा विद्यापीठ हे प्राचीन भारतातील अब्राह्मणी ज्ञानपरंपरेचे एक तेजस्वी प्रतीक होते. जात, धर्म, आर्थिक स्तर यापलीकडे जाऊन सर्वांना शिक्षणाच्या समान संधी देणारे हे विद्यापीठ समतेच्या आणि लोकशाही मूल्यांच्या आधारावर उभे होते. विविध तत्त्वज्ञान, विज्ञान, कला यांचा समावेश करणारे अभ्यासक्रम, संवादाधिष्ठित अध्यापन पद्धती आणि भव्य वाचनालये यामुळे नालंदा विद्यापीठ जागतिक स्तरावर ज्ञानाचे केंद्र ठरले. या विद्यापीठाने ब्राह्मणी परंपरेची चिकित्सा करत अब्राह्मणी विचारांना मान्यता दिली, हीच त्याची खऱ्या अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ओळख होती.
इसवीपूर्व २०० ते इसवीसन ३५० या ५५० वर्षांच्या काळात मीमांसा, न्याय, वैशेषिक हे बाह्यार्थवादी अद्वैत तत्त्वज्ञान ब्राह्मणी छावणीने वेदप्रामाण्यासाठी आणि बौद्ध तर्कशास्त्र विरोधासाठी उभारले. हा काळ पुरुषसत्ताक वर्णजात समर्थक व विरोधक संघर्षाचा काळ होता. इसवीसन ५००पर्यंत ब्राह्मणी छावणी प्रभावी झाली होती. हे आव्हान बौद्ध दार्शनिकांपुढे होते. हे आव्हान पेलण्यासाठी अश्वघोषाने तंत्र प्रेरणेतून वर्णजाती विरोधी वज्रसूची लिहिली. नाटके व महाकाव्ये निर्माण केलीत. ही परंपरा वसुबंधूंनी अभिधर्मकोष व दिग्नागने सौत्रांतिक विज्ञानवादाची निर्मिती करून कायम ठेवली, असे शरद पाटील सांगतात. या ब्राह्मणी-अब्राह्मणी संघर्षाचे प्रतिबिंब नालंदा विद्यापीठावर पडले होते. नालंदा विद्यापीठाने अब्राह्मणी ज्ञान परंपराचा पुरस्कार केला, असे त्याच्या विवरणावरून दिसून येते. अब्राह्मणी शिक्षण आशय, लोकशाही रचना, विनामूल्य शिक्षण व शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणाचा पुरस्कार नालंदा विद्यापीठाने केला होता. पुरुषसत्ताक वर्णजाती ज्ञानपरंपरेची चिकित्सा व अब्राह्मणी ज्ञानपरंपरेचा पुरस्कार नालंदा विद्यापीठाचे वैशिष्ट्य होते.
बुद्धानंतर महायान पंथाने जाती व्यवस्थाविरोधी बिनतोड दार्शनिक प्रतिवाद व संघर्ष उभा केला. अब्राह्मणी परंपरेतील तंत्र, साख्य, जैन, बौद्ध तत्त्वज्ञानाचा कालातीत गाभा स्वीकारून सौतांत्रिक विज्ञानवादापर्यंतचा विकास महायान पंथाने घडवला. अश्वघोष, वसुबंधू, दिग्नाग, धर्मकीर्ती, असंग, नागार्जुन, धर्मपाल या विद्वानांची मोठी फळी महायान पंथाने निर्माण केली. महायान बौद्धवादाने विविध देशातील अभ्यासकांना आकर्षित केले होते. विशेषत: तिबेट, चीन, जपान, कोरिया या देशांतील अभ्यासक येत असत. महायान पंथाचा प्रभाव नालंदा विद्यापीठावर होता. धर्मपाल या विद्यापीठाचे प्रमुख होते. वसुबंधू, असंग, दिग्नाग, धर्मकीर्ती, शांतरक्षित, कमलशील हे विद्वान नालंदा विद्यापीठात अध्यापन करत होते. तंत्र, साख्य, जैन, बौद्ध व सौत्रांतिक तत्त्वज्ञान नालंदा विद्यापीठात शिकवले जात होते. परंतु एकसुरी ज्ञानपरंपरेचा पुरस्कार केल्या जात नव्हता. अब्राह्मणी तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करतानाच ब्राह्मणी तत्त्वज्ञानाची चिकित्साही शिकवली जात होती. विरोधी ज्ञानपरंपरा अस्पृश्य न मानता ज्ञानाचे खुलेपण हे नालंदा विद्यापीठाचे खास वैशिष्ट्य होते. नालंदा विद्यापीठाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे विकेंद्रीकरणाची रचना स्वीकारणे होय. एज्युकेशन इन एंशंट इंडिया या पुस्तकात हाटमट शार्फ यांनी एक महत्त्वाची नोंद घेतलेली आहे. जी नालंदा विद्यापीठाची लोकशाही रचनेची निदर्शक आहे. त्यांच्या मते, शिक्षण आणि प्रशासनाची रचना विकेंद्रीकरणाची होती. विकेंद्रीकरण लोकशाहीचा केंद्रबिंदू असतो. अब्राह्मणी परंपरेचे तपशील विचारात घेतल्यास, ही परंपरा स्वातंत्र्य, समता, लोकशाहीची पुरस्कर्ती होती.
नालंदा विद्यापीठातील विषयाची यादी नजरेपुढे घेतल्यास तीन गोष्टी स्पष्ट होतात. १) गुरुकुल, जैन शिक्षण पद्धती व तक्षशिला विद्यापीठाच्या तुलनेत नव्या विषयांची भर. २) परस्परविरोधी विचारांचा सहभाग. ३) नव्या ज्ञान शाखांची भर. मानव्य शास्त्राच्या अभ्यासात तत्त्वज्ञान, इतिहास, भाषा, साहित्य, कला, संगीत या विषयांचा अंतर्भाव व स्वतंत्र शाखा म्हणून अभ्यासल्या जात होत्या. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात तंत्र, सांख्य, जैन, बौद्ध, सौत्रांतिकवाद, योग, न्याय वैशेषिक, तर्कशास्त्र, वेद, पुराण, या तत्त्वज्ञानांचा सहभाग होता. इतिहास, काव्य, (साहित्य) जातक कथा हे विषय अभ्यासक्रमात अंतर्भूत होते. गणित, औषधशास्त्र, संख्याशास्त्र, शल्यचिकित्सा, आयुर्वेद, ग्रहांचा अभ्यास, कृषी उत्पादन वाढीचा अभ्यास या मूलभूत ज्ञानशाखांचा सहभाग अभ्यासक्रमात केलेला दिसून येतो. राजकारण, दंडनीती व युद्धशास्त्र शिकवले जात असल्याच्या नोंदी सापडतात. यातून नालंदा विद्यापीठाने उत्पादक ज्ञान, मूलभूत ज्ञान व ज्ञानाचे खुलेपण स्वीकारल्याचे स्पष्ट होते. शिक्षण आशयाची ही भूमिका अब्राह्मणी नीतिमूल्यांवर आधारित होती. नवज्ञाननिर्मिती, ज्ञानाची व्यापकता, खुलेपण व समावेशकता असल्याशिवाय शिक्षणाची गुणवत्ता साध्य करता येत नाही. या निकषावर नालंदा विद्यापीठाने स्वत:ची गुणवत्ता सिद्ध केली. जी जगभराच्या अभ्यासकांना आकर्षित करत होती.
नालंदा विद्यापीठ आताच्या बिहार राज्यात होते. ज्याचे अवशेष आज शिल्लक आहे. नालंदा विद्यापीठात शिक्षण विनामूल्य होते. विद्यापीठाला दानशूर व राजांकडून आर्थिक मदत होत होती. विद्यापीठाचे स्वत:चे उत्पन्नाचे स्त्रोत होते. विद्यार्थ्यांना शिक्षण, आहार, निवास व आरोग्य या सुविधा विनामूल्य उपलब्ध केल्या जात होत्या. जात, धर्म वा इतर कुठल्याही निकषांवर प्रवेश नाकारल्या जात नव्हता. सर्वांना प्रवेश व समान शिक्षण सुविधा विद्यापीठात दिल्या जात होती. विद्यार्थ्याच्या सामाजिक, आर्थिक स्तराचे परिणाम त्याच्या शिक्षणावर होणार नाही, अशी रचना अस्तित्वात आणली गेली होती. त्यामुळे गरीब, श्रीमंत, राजघराणे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र व इतर देशातील विद्यार्थी एकत्र शिकत होते. यातून स्वाभाविकपणे उच्च दर्जाचे सामाजिक अभिसरण घडत होते. जे कुठल्याही काळाच्या शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू असणे अपेक्षित असते. या विद्यापीठाची भव्यता प्रा. भामरे नानाजी यांनी त्यांच्या संशोधनात पुढीलप्रमाणे मांडली आहे. नालंदा विद्यापीठाची इमारत चार मजली होती. विद्यापीठाच्या परिसरात अशा अनेक इमारती होत्या. क्रीडांगण, विद्यार्थी व शिक्षकांचे निवासालय, (वेगवेगळ्या चिनी प्रवासी व इतर अभ्यासकांनी चार हजार ते १० हजार विद्यार्थी व ६०० ते १००० शिक्षकांच्या निवासाची सोय असल्याचे म्हटले आहे.) स्नानगृह, उद्याने, चबुतरे होती. इमारती व चबुतरे कलाकुसरी युक्त होती.
नालंदा विद्यापीठाची ज्ञानाची आर्तता व भव्यता त्यांच्या ज्ञान संग्रहातून दिसून येते. तीन मोठी वाचनालये विद्यापीठात होती. रत्नसागर, रत्नाधी व रत्नरंजक ही तीन वाचनालये होती. यापैकी रत्नाधी हे वाचनालय नऊ मजली इमारतीचे होते. या इमारतीसाठी वल्लभी या राजाने मोठी आर्थिक देणगी दिलेली होती. साख्य, जैन, तंत्र, बौद्ध, सौत्रांतिक, वेदांतिक ब्राह्मणी साहित्यांची पुस्तके वाचनालयात संग्रहित केलेली होती. इतकेच नव्हे तर कला, साहित्य, शिल्पकला, विज्ञान, गणित, भाषा इत्यादी विषयांच्या पुस्तकाचे संकलन या वाचनालयात केल्याची नोंद, हाटमट शार्फ, चिनी प्रवासी व भामरे नानाजी यांनी घेतलेली आहे. पुस्तकाच्या या प्रचंड संग्रहातून ज्ञानाची बांधिलकी व समावेशकता विद्यापीठाची सिद्ध होते.
अध्यापन पद्धती शिक्षण व्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक राहिलेला आहे. ब्राह्मणी अध्यापन पद्धती प्राचीन काळापासून आजतागायत शिक्षण व्यवस्थेत प्रभावी राहिलेली आहे. गुरू सांगेल ते ज्ञान संपूर्ण व अंतिम मानण्याची शिकवण ब्राह्मणी परंपरा देते. ज्ञाता ज्ञानी व श्रोता अज्ञानी हे श्रेष्ठ-कनिष्ठत्वाचे नाते उभे करते. श्रवण व मुखोद्गत करण्यावर ही परंपरा भर देते. नालंदा विद्यापीठाने ही परंपरा नाकारून अब्राह्मणी अध्यापन पद्धतीचा पुरस्कार केला. संवाद व प्रतिप्रश्न हे अध्यापनाचे प्रमुख सूत्र होते. नवज्ञान निर्मितीचे तत्त्व त्यात दडलेले होते. विद्यार्थ्यांना स्वावलंबन व शिस्त यासाठी विद्यापीठ आग्रही होते. १० हजार विद्यार्थांना १५०० शिक्षक असल्याची नोंद ह्युयान त्सांग या चिनी प्रवासीनी घेतली आहे. साधारणत: सात विद्यार्थ्यांस एक शिक्षक हे गुणोत्तर नालंदा विद्यापीठाचे होते. २० विद्यार्थ्यांस एक शिक्षक देणे परवडत नाही, म्हणून शाळा बंद करण्याचा निर्णय घेणारी आजची शिक्षण व्यवस्था व प्राचीन काळातील नालंदा विद्यापीठाचा अमूल्य ठेवा ही विसंगती आपण कशी सोडवणार आहोत?
ramesh.bijekar@gmail.com