नव्या भारताचे शिल्पकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या भारताला एक गती दिली आहे. शक्ती दिली आहे. ही केवळ वर्तमानापुरती बाब नाही; ती येणाऱ्या पिढ्यांसाठीही प्रेरणादायी आहे. मी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा देतो.
नव्या भारताचे शिल्पकार
Published on

प्रासंगिक

एकनाथ शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या भारताला एक गती दिली आहे. शक्ती दिली आहे. ही केवळ वर्तमानापुरती बाब नाही; ती येणाऱ्या पिढ्यांसाठीही प्रेरणादायी आहे. मी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा देतो.

आज १७ सप्टेंबर... संपूर्ण जगात भारताचे नाव मोठे करणारा आणि ज्याला देशाच्या नव्या शतकाचा भाग्यविधाता म्हणू शकू, अशा जननायक पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस. मी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि अनेक वर्षे त्यांच्याकडून आम्हाला देशसेवेची प्रेरणा मिळो, अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांनी गेल्या अकरा वर्षांपासून पंतप्रधान म्हणून केलेले कार्य हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे.

महाराष्ट्रासारख्या देशातल्या आघाडीच्या आणि प्रगत अशा राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. मी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हा सोहळा छोटासाच होता, पण नंतर मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी लगेचच बोललो आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांचे शब्द अजून माझ्या कानात आहेत... आप एक ग्रासरूट नेता हो, मुझे विश्वास हैं, आप महाराष्ट्र जैसे राज्य को अपने अनुभवोसे बहुत उंचाई तक लेके जाओगे. मिलकर काम करो, अच्छा काम करो, कोई भी मदद चाहिए तो बोलिए. महाराष्ट्र की डेव्हलपमेंट के लिए सब करेंगे......

खरोखरच एखादा नेता करोडो लोकांच्या हृदयावर राज्य का करू शकतो याचे एकमेव उदाहरण म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे बोट दाखवावे लागेल. मी एनडीए आघाडी पक्षातल्या शिवसेनेचा नेता. भारतीय जनता पार्टी एक बलाढ्य अशी राष्ट्रीय पार्टी आणि या पक्षाचे सर्वेसर्वा आणि ज्यांनी देशात भारताचा गौरव वाढवला असे मोदी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला इतकी मोठी संधी देताहेत ही फार मोठी गोष्ट होती.

भारताला नवी उंची

गेल्या दहा वर्षांतच भारताने जगातली तिसरी अर्थव्यवस्था होण्यापर्यंत मजल मारली आहे ही अजिबात साधीसुधी गोष्ट नाही. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत यांनी देशाला नवी ओळख दिली, पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजनेसारख्या अभिनव योजनेचे हे यश सुद्धा आहे. ‘मेक इन इंडिया’ने तर क्रांतीच केली. आता आपल्याला काही महत्त्वाच्या शस्त्रनिर्मितीमध्ये इतर देशांवर अवलंबून राहण्याची गरज उरली नाही. स्वदेशी शस्त्रास्त्र निर्मितीला चालना दिली. पहलगामसारख्या मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेनंतर अतिशय धोरणीपणे, कूटनीती वापरून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणला तो मोदी यांनी. ऑपरेशन सिंदूर हे तर आता आपल्या देशाचे धोरणच ठरले. कुठलीही दहशतवादी कारवाई ही आता देशाविरुद्धचे युद्धच समजले जाईल, असा कडक इशारा दिल्याने दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्या सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. त्यापूर्वीही सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट कारवाईमुळे प्रत्येक नागरिकात आत्मविश्वास जागा झाला आहे. जगातल्या अनेक लहान-मोठ्या देशांना भेटी देऊन मोदी यांनी भारताचे त्यांच्याशी असलेले नाते घट्ट केले आहे. मोदी कधी कोणत्या देशांत जातात तेव्हा त्यांना भेटायला आणि नुसती त्यांची झलक बघायला मिळावी म्हणून लोक प्रचंड गर्दी करतात. ही आपल्या देशाचा गौरव वाढवणारी बाब आहे.

महाराष्ट्र हे उद्योग, संस्कृती आणि कर्तृत्व यांचे सुंदर मिश्रण आहे. मी आधी लिहिल्याप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रासाठी नेहमीच आमच्या महायुती सरकारच्या पाठीशी उभे राहिले आहेत. मी मुख्यमंत्री असतानाच्या काळात तर महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले, मदत केली. मग ती रेल्वेसाठी सर्वाधिक तरतूद असो किंवा पायाभूत सुविधांसाठी भरघोस निधी असो.

आज मुंबईचे जे रूप झपाट्याने बदलते आहे ते पंतप्रधानांच्या मार्गदर्शनामुळेच. गेल्या वर्षी वाढवण इथे जगातल्या एका मोठ्या बंदराचे भूमिपूजन त्यांनी केले, ट्रान्स हार्बर लिंक, मेट्रो प्रकल्प, बुलेट ट्रेन हे प्रकल्प मोदी यांच्या पाठिंब्यामुळे शक्य झाले. आज अटल सेतू हा देशातला समुद्रावरचा सर्वाधिक लांबीचा पूल सुरू झाला आहे. मुंबई आणि रायगड हे दोन जिल्हे जोडले गेले आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनने जोडले जाणार आहे. एकूणच देशात ज्या गतीने राष्ट्रीय महामार्ग झाले त्याची तर तुलनाच होऊ शकत नाही.

समृद्धी महामार्ग हा गेमचेंजर प्रकल्प आहे असे आम्ही समजतो. त्याचे उद्घाटन मोदी यांच्या हस्तेच झाले होते. त्यावेळी तर आमच्या महायुती सरकारला सत्तेवर येऊन सहा महिनेच झाले होते. हा महामार्ग शेतकऱ्यांना आणि उद्योगांना नवीन संधी देणारा आणि परिवर्तन घडविणारा ठरतोय. स्मार्ट सिटी योजनेत पुणे, नागपूर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांना नवे रूप मिळाले. औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर या शहरांची नावे आम्ही बदलू शकलो. मराठी भाषेला अभिजात दर्जा त्यांच्यामुळेच मिळू शकला.

मला मुख्यमंत्री म्हणून दावोसला जाण्याची दोनदा संधी मिळाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची जादू तिथे अधिक समजली. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक मिळून त्याचा फायदाही झाला.

खरं तर आदरणीय मोदी यांच्याविषयी लिहायचे ठरवले तर शब्द अपुरे पडतील. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. विकासाच्या अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचल्या, महिला केंद्रित विकास होतोय, शासन आणि प्रशासनात तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे गती आली, पारदर्शकता वाढली. प्रशासनाचे उत्तरदायित्व वाढले आहे. गरिबीचे प्रमाण कमी झाले आहे. बेरोजगारीही कमी झाली आहे. पूर्वीच्या राजवटींमध्ये भ्रष्टाचार, इन्स्पेक्टर राज होते. २०१४ च्या नंतर अशी हिंमत कोणी केली नाही. मोदी यांच्यावर न की एक डाग आहे, न की गेल्या अकरा वर्षांत एकही घोटाळ्याची माहिती समोर आली. आपल्या देशातले काही बालिश बुद्धीचे नेते मोदी विद्वेषाने इतके पछाडले आहेत की, ते बाहेर जाऊन देशाची बदनामी करतात. पण त्यांनी मोदी यांच्यावर बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकल्यासारखे आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होऊ नये म्हणून सर्व पक्ष एकत्र आले. मात्र शेवटी मोदी हाच एकमेव पर्याय आहे हे देशातल्या जनतेने ओळखले आहे.

आता मोदी यांनी दिलेला ‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा म्हणजे मूलमंत्र झाला आहे. मोदी यांनी सगळ्या भारताला एक गती दिली आहे. शक्ती दिली आहे. ही केवळ वर्तमानापुरती बाब नाही; ती येणाऱ्या पिढ्यांसाठीही प्रेरणादायी आहे. मी पुनश्च एकदा पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा देतो.

उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

logo
marathi.freepressjournal.in