पंतप्रधान नरेंद्र मोदी : कणखर राष्ट्रनेता!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाची संधी मिळणे, हे माझ्यासाठी नेहमीच सौभाग्यदायी असते. जेव्हा पक्षाचा विषय असतो, तेव्हा ते सरकार मध्ये आणत नाहीत आणि जेव्हा सरकारी विषय असतो, तेव्हा पक्ष मध्ये आणत नाहीत. त्यांच्यासारख्या कणखर राष्ट्रनेत्याच्या हातून अशीच देशसेवा घडत राहो, त्यासाठी दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो, यासाठी मी त्यांना अतिशय मन:पूर्वक शुभेच्छा देतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी : कणखर राष्ट्रनेता!
Photo : X
Published on

विशेष

देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाची संधी मिळणे, हे माझ्यासाठी नेहमीच सौभाग्यदायी असते. जेव्हा पक्षाचा विषय असतो, तेव्हा ते सरकार मध्ये आणत नाहीत आणि जेव्हा सरकारी विषय असतो, तेव्हा पक्ष मध्ये आणत नाहीत. त्यांच्यासारख्या कणखर राष्ट्रनेत्याच्या हातून अशीच देशसेवा घडत राहो, त्यासाठी दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो, यासाठी मी त्यांना अतिशय मन:पूर्वक शुभेच्छा देतो.

२०१४ मध्ये देशात असलेली प्रचंड अनागोंदी, भ्रष्टाचाराच्या साम्राज्याला कंटाळलेले जनमानस आणि त्यातून देशाला एक नवीन आकार देत, भारताचा चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचा झालेला प्रवास... जगातील तिसरी अर्थव्यवस्था होण्याच्या उंबरठ्यावर असलेला देश. हा संपूर्ण प्रवास असो की, आज अमेरिकेच्या टॅरिफविरोधात आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशीचा मंत्र घेऊन तितक्याच ठामपणे उभा असलेला भारत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वकौशल्याचा परिचय आजच्या नव्या भारताने दिला आहे. इतिहासातील घोडचुका दुरुस्त करण्यापासून ते आजच्या आव्हानांना सक्षमपणे तोंड देण्याचा निर्धार असा हा कालखंड पहायला, अनुभवायला मिळणे आणि त्या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होता येणे, यासारखे भाग्य नाही. हे सारे ज्या वैश्विक नेत्यामुळे घडले त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.

राममंदिर असो, ३७० कलम रद्द करणे असो, तीन तलाकवर बंदी असो, गरीब कल्याणाचा मोठा कार्यक्रम असो, सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक किंवा अगदी अलीकडचे ऑपरेशन सिंदूर असो, या अशा उपलब्धी सांगायच्या तर क्षेत्र आणि जागा अपुरी पडेल. महिला, शेतकरी, युवा, वंचित अशा प्रत्येक घटकांसाठी शेकडो निर्णय घेतले नाहीत, तर त्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडते आहे. २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर येणे, ही सोपी बाब नाही. या ११ वर्षांत तीन कोटी घरे असोत, १५ कोटी घरांना नळ असो, १२ कोटी शौचालयांची निर्मिती असो, ६८ लाख फुटपाथ विक्रेत्यांना पीएम स्वनिधी असो, अशा कितीतरी योजना सांगता येतील. फक्त एक आकडा पुरेसा आहे. ४३.८ लाख कोटी रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात आलेले आहेत. गरीब कल्याणासोबतच देश सुधारणांच्या एका नव्या वाटेवर स्वार झाला आहे. विकसित भारताच्या वाटेवरील सर्वात महत्त्वाचा भागीदार असलेली आमची नारीशक्ती २०२९ मध्ये ३३ टक्के आरक्षणासह संसद आणि राज्य विधानसभांमध्ये दिसणार आहे. स्टार्टअप, एम्स, आयआयएम, मेडिकल कॉलेज यांची संख्या सातत्याने वाढली आहे. जगाच्या ४९ टक्के डिजिटल व्यवहार करणारा आपला भारत देश आहे. विमानतळे, रेल्वे, महामार्ग, हरितऊर्जा अशा सर्वच क्षेत्रात यशाची नवनवी शिखरे आपण गाठतो आहोत आणि हे सर्व काही होऊ शकले ते केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे आणि त्यांच्यावरील देशवासीयांच्या विश्वासामुळे.

राजकारणात सलग २५ वर्ष संवैधानिक पदांवर कार्यरत असणे ही सोपी गोष्ट नसते. सलग २५ वर्ष पदांवर राहून सुद्धा लोकप्रियतेचा आलेख सतत उंचावत राहणे, नव्हे तो वैश्विक होणे, हेच या प्रवासाचे फलित आहे. ही केवळ त्यांच्या लोकप्रतिनिधित्वाची २५ वर्ष नाहीत, तर संवैधानिक पदांवरील कर्तव्यपूर्तीची आहेत. हा लोकसेवेचा कालखंड आहे. लोककल्याणाचा, सुशासनाचा, नेतृत्वकौशल्याचा, भारतीय मानबिंदू उंचावण्याचा आहे.

नरेंद्र मोदी यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पण, त्यातील सर्वात महत्त्वाचा भाव कुठला असेल तर ते सर्वात आधी एक स्वयंसेवक आहेत. ते पूर्णवेळ प्रचारक होते. त्यानंतर संघटन मंत्री म्हणून मोठा कालखंड त्यांनी भाजपमध्ये काम केले. गेली ११ वर्षं ते पंतप्रधानपदी असताना त्यांनी जो राष्ट्रधर्म जपला आहे, जी कर्तव्यपरायणता जपली आहे, त्याचे रहस्य या त्यांच्या स्वयंसेवकत्वात दडले आहे. स्वयंसेवक हा कर्मयोगी असतो आणि त्याची निर्णयप्रक्रिया अतिशय साधी, सोपी आणि सरळ असते. अगदी आपल्या दोन मित्रांचेच भांडण सुरू असेल तर कोणता तोडगा काढला तर त्यात त्या दोघांचे हित सामावले असेल, घरातील एखादा वाद असेल तर कोणता तोडगा संपूर्ण कुटुंबासाठी हितकारक आहे, हे ओळखून त्याप्रमाणे निर्णय घेतला जातो. मोदींवर तर राष्ट्राची जबाबदारी आहे, त्यामुळे राष्ट्रहिताशी ते कधीही तडजोड करीत नाहीत. ज्यातून राष्ट्रहित साधले जाणार आहे, तोच निर्णय घेण्याकडे त्यांचा कल असतो.

राष्ट्र भक्कम करायचे असेल तर समाज भक्कम करावा लागतो. समाजाला भ्रष्टाचाराची कीड लागली असेल तर त्यातून समाजाला बाहेर काढणे, हे जिकरीचे काम असते. मोदी यांनी देशाची सूत्रे घेतल्यापासून सर्वाधिक प्रहार हा भ्रष्टाचार आणि सरकारमधील दलालीवर केला. देशातील विविध क्षेत्रात दलालांची साखळी संपविण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. डीबीटी, जनधन आणि आधार यातून त्यांनी केंद्रातून पाठविलेल्या १०० पैकी १०० रुपये लाभार्थ्याच्या खात्यात पाठवण्याचा पायंडा सुरू केला. त्यांच्यासाठी पद नव्हे, तर व्यवस्था महत्त्वाची आहे. एकदा राहुल गांधींनी २००८ मध्ये सांगितले होते, माझ्या वडिलांच्या काळात १०० पैकी १५ पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचायचे, पण आता तेही पोहोचत नाहीत. पण आज स्थिती पूर्णत: बदलली आहे.

राष्ट्र म्हणून एक भक्कम व्यवस्था उभी करणे आवश्यक असते. शत्रूला नामोहरम करते, तेच राष्ट्र सामर्थ्यशाली असते. विकसित भारताचा प्रवास होत असताना जगाला आपले सामर्थ्य दाखवणारा भारत आज भक्कमपणे वाटचाल करतो आहे. २०१६ मध्ये उरीचा हल्ला झाला तेव्हा अवघ्या ११ दिवसांत भारताने सर्जिकल स्ट्राईकने उत्तर दिले. पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवादी तळ नष्ट केले. पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना बोलावून कडक शब्दांत समज दिली. २०१९ च्या प्रारंभी पाकिस्तानने पुलवामामध्ये पुन्हा आगळीक केली. त्याला बालाकोटच्या हवाई हल्ल्यांनी उत्तर दिले गेले. यात पाकिस्तानच्या हद्दीत घुसून हवाई हल्ले करीत दहशतवाद्यांचे तळ नष्ट करण्यात आले. या दोन घटनांनी भारताच्या संरक्षणविषयक धोरणाच्या दिशा स्पष्ट केल्या. नवा भारत कसा असेल, हे मोदी यांनी संपूर्ण जगाला ठणकावून सांगितले. हे भारताचे ‘न्यू नॉर्मल’ होते. आता अलीकडे पहलगाम झाले, त्याला ऑपरेशन सिंदूर हे उत्तर होते. देशाचे दुर्दैव आहे की, विरोधक केवळ पुरावे मागतात. त्यांना भारतीय लष्करावरही विश्वास नाही.

मोदी यांची प्रामाणिकता आणि पारदर्शी प्रशासन यावर कोणतेही उत्तर विरोधकांकडे नाही. म्हणून संविधान बदलाचे खोटे नरेटिव्ह पसरविले गेले. त्यालाही उत्तर देण्यात मोदी यशस्वी ठरले. महाराष्ट्राच्या जनतेने तर या नरेटिव्हला असे काही उत्तर दिले की त्या वेदनेतून अजूनही विरोधक बाहेर पडलेले नाहीत. आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर वाटचाल करणारे आपले पंतप्रधान आहेत. म्हणून महाराष्ट्राचे विषय आले तर मोदी यांच्या प्राधान्यक्रमावर ते असतात. इंदू मिलच्या स्मारकासाठी ३५०० कोटींची जागा एका झटक्यात देणे असो की, पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी ते भक्कमपणे पाठीशी उभे असतात. मोदी यांनी महाराष्ट्राचा एकही विषय प्रलंबित ठेवला नाही. यावर्षी तर प्रधानमंत्री आवास योजनेतील ३० लाख घरे त्यांनी महाराष्ट्राला दिली. आज महाराष्ट्रात दहा लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत, यामागे निश्चितपणे मोदी यांचे भक्कम पाठबळ आहे. महाराष्ट्र हे सातत्याने एफडीआयमध्ये क्रमांक एकचे राज्य राहिले आहे. यामागे सुद्धा मोदी यांचा भक्कम पाठिंबा आहे. वाढवण पोर्ट असेल, नवी मुंबईचे विमानतळ असेल, पुण्याचे नवीन विमानतळ, नागपूर विमानतळाचे आधुनिकीकरण, अमरावती विमानतळ, अमरावतीचा टेक्सटाईल पार्क, गडचिरोली पोलाद सिटी, पालखी मार्ग, मेट्रोचे मुंबई, नागपूर, पुण्यातील प्रकल्प, छत्रपती संभाजीनगरमधील डीएमआयसी, ऑरिक सिटी, जलसंधारणाचे प्रकल्प, त्यातही महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांसाठी विशेषत्वाने मिळालेले पॅकेज, जे अन्य कुठल्याही राज्यांना मिळालेले नाहीत, प्रत्येक प्रकल्पात मोदी हे भक्कमपणे उभे राहिले आणि राहत आहेत. आता नदीजोडचा एक मोठा कार्यक्रम आपण हाती घेतो आहोत. त्यातही केंद्र सरकारचा भक्कम पाठिंबा आहेच.

नरेंद्र मोदी यांच्याशी अनेकदा वैयक्तिक भेटी झाल्या, अनेकदा त्यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले. खरे तर ही संधी मला मिळणे, हे माझ्यासाठी नेहमीच सौभाग्यदायी असते. ते आमच्या विशाल परिवाराचे कुटुंबप्रमुख सुद्धा आहेत. त्यामुळे समस्या सांगितली की त्यावरील समाधान त्यांच्याकडे हमखास मिळते. दोन गोष्टींत ते कधीही गल्लत करीत नाहीत. जेव्हा पक्षाचा विषय असतो, तेव्हा ते सरकार मध्ये आणत नाहीत आणि जेव्हा सरकारी विषय असतो, तेव्हा पक्ष मध्ये आणत नाहीत. अगदी भेटीच्या वेळेतही पक्ष आणि विकासाचे विषय अशी स्वतंत्र रचना चर्चेची असते. या राष्ट्रनेत्याच्या हातून अशीच देशसेवा घडत राहो, त्यासाठी त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो, यासाठी मी त्यांना अतिशय मन:पूर्वक शुभेच्छा देतो.

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

logo
marathi.freepressjournal.in