नरेंद्र मोदी : उच्चभ्रू राजकीय वर्गाला आव्हान देणारे लोकनायक

नरेंद्र मोदी यांचा प्रवास हा एका सामान्य कुटुंबातून उभ्या राहिलेल्या लोकनेत्याचा आहे. त्यांचा संघर्ष तळागाळातील कार्यकर्तृत्व, जनसेवेच्या ध्यासातून आकारला. त्यांच्या नेतृत्वाने भारतीय राजकारणातील उच्चभ्रू परंपरेला आव्हान देत नवा जनआधारित मार्ग दाखवला.
नरेंद्र मोदी : उच्चभ्रू राजकीय वर्गाला आव्हान देणारे लोकनायक
Photo : X
Published on

विशेष

शिवराज सिंह चौहान 

नरेंद्र मोदी यांचा प्रवास हा एका सामान्य कुटुंबातून उभ्या राहिलेल्या लोकनेत्याचा आहे. त्यांचा संघर्ष तळागाळातील कार्यकर्तृत्व, जनसेवेच्या ध्यासातून आकारला. त्यांच्या नेतृत्वाने भारतीय राजकारणातील उच्चभ्रू परंपरेला आव्हान देत नवा जनआधारित मार्ग दाखवला.

भारतीय राजकारणात नरेंद्र मोदी यांचा उदय पारंपरिक राजकीय परिप्रेक्ष्यातून समजून घेतला जाऊ शकत नाही. राजकीय घराण्यांमध्ये वाढलेल्या अनेक नेत्यांपेक्षा वेगळे असलेले नरेंद्र मोदी आणि त्यांचे नेतृत्व त्यांच्या जीवनातील संघर्षाने, तळागाळातील कार्यकर्तृत्वाने आणि विविध शासकीय स्तरांवरील अनुभवाने साकारले गेले. त्यांची ही कारकीर्द केवळ एका माणसाच्या उन्नतीचे प्रतिनिधित्व करत नाही, तर भारतातील उच्चभ्रू वर्गीय राजकारणाला दिलेले आव्हान आहे.

वडनगर येथील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या मोदी यांचे बालपण जबाबदारीचे आणि साधेपणाचे होते. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धर्मादाय संस्था उभारण्यापासून ते शाळकरी वयातच समाजातला जातीभेद टिपत त्यावर नाटक लिहिण्यापर्यंत त्यांच्यात लहान वयातच संघटनात्मक कौशल्य आणि सामाजिक चिंतेचे भान असे अनोखे मिश्रण पाहायला मिळाले. वंचित वर्गमित्रांसाठी वापरलेली पुस्तके आणि गणवेश गोळा करण्यासाठी त्यांनी मोहिमादेखील चालवल्या. जनसेवेच्या दृष्टीने नेतृत्वाचा पाया घालण्याचा त्यांचा विचार यातून विशेषत्वाने दिसून येतो. या छोट्या छोट्या प्रयत्नांनी ते सार्वजनिक जीवनात कोणता दृष्टिकोन घेऊन पुढे जातील याची पूर्वकल्पना आली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (आरएसएस) असताना तळागाळातील लोकांसाठी काम करण्याची त्यांची इच्छा अधिक तीव्र झाली. येथे सामान्य कार्यकर्त्यांना गावकऱ्यांशी संवाद साधण्याच्या, त्यांच्याप्रमाणे जगण्याच्या आणि आपल्या वर्तनातून त्यांचा विश्वास संपादित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. एक तरुण प्रचारक म्हणून मोदींनी अगदी तेच केले. मोदी अनेकदा गुजरातमध्ये बसने किंवा स्कूटरने प्रवास करत. अन्न आणि निवाऱ्यासाठी गावकऱ्यांवर विसंबून, त्यांनी सामायिक तत्त्वावर कष्ट आणि संघर्षातून लोकांमध्ये विश्वास निर्माण केला. ज्या लोकांसाठी त्यांनी सेवाव्रत घेतले होते, त्यांच्या दैनंदिन विवंचना जाणून घेऊन त्यासाठी काम करण्यात ही शिस्त त्यांच्या कामी आली. संकटांना संघटित आणि व्यापक प्रमाणावर सामोरे जाण्याची वेळ आली असता प्रभावीपणे नेतृत्व करण्यास मोदी यांचा भक्कम पाया असा रचला गेला.

१९७९ मध्ये मच्छू धरण कोसळले, तेव्हा मोठे संकट आले होते, ज्यामध्ये हजारो लोक मृत्युमुखी पडले. अशा प्रसंगी २९ वर्षीय मोदी यांनी तातडीने स्वयंसेवकांना वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये घटनास्थळी पाठवले, मदत साहित्याचे आयोजन केले, मृतदेह बाहेर काढले आणि कुटुंबांचे सांत्वन केले. काही वर्षांनंतर, गुजरातमधील दुष्काळादरम्यान, त्यांनी सुखडी अभियानाचे नेतृत्व केले, जे संपूर्ण राज्यभर चालवण्यात आले. सुमारे २५ कोटी रुपयांचे अन्नवाटप यावेळी करण्यात आले. या दोन्ही आपत्तींमध्ये, त्यांनी सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरू केले. सुस्पष्ट उद्देश, लष्करी शैलीचे संघटन आणि नेतृत्व म्हणजे केवळ प्रतीकात्मकता नाही, तर सेवा आहे हा त्यांचा उदात्त दृष्टिकोन त्यांच्या कार्यातून ठळकपणे दिसून आला.

लोकांना संघटित करण्याच्या त्यांच्या क्षमतेची परीक्षा या घटनांनी घेतली, तर आणीबाणीने दडपशाहीतील त्यांच्या धैर्याची परीक्षा घेतली. अवघ्या वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी शीख वेश धारण करत पोलिसांना चकवा देत कार्यकर्ते आणि नेते यांच्याशी संवाद राखला. त्यांच्या या तळागाळातील नेटवर्कने कठोर राजवटीविरुद्धचा प्रतिकार जिवंत ठेवला, ज्यामुळे मोदींना एक प्रमुख संघटक अशी प्रतिष्ठा मिळाली.

हेच कौशल्य लवकरच निवडणुकीदरम्यान राजकारणात वापरात आले. भाजप गुजरातचे संघटन मंत्री (संघटन सचिव) म्हणून त्यांनी पक्षाचा विस्तार नवीन समुदायांमध्ये केला, ज्यामध्ये राजकीय चर्चेत दुर्लक्षित असलेल्या समुदायांचाही समावेश होता. त्यांनी विविध पार्श्वभूमीतून आलेल्या नेत्यांना घडवले, लोकांचा पाठिंबा मिळवला आणि गुजरातमध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या सोमनाथ-अयोध्या रथयात्रेसारख्या प्रमुख कार्यक्रमांचे नियोजन करण्यात मदत केली. नंतर, वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रभारी म्हणून त्यांनी बूथ पातळीवर मजबूत पक्ष यंत्रणा उभारली.

मोदी २००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी हे धडे प्रशासनात लागू केले. उदाहरणार्थ, पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच त्यांनी नर्मदा नदीचे पाणी साबरमतीला आणण्यासाठी बैठक बोलावली, ज्यामध्ये त्यांच्या प्रशासनाची व्याख्या निर्णायक कृतीतून निदर्शनास आली. त्यांचा दृष्टिकोन प्रशासनाला जनचळवळ बनवण्याचा होता, जिथे प्रवेशोत्सवाने शालेय प्रवेशाला प्रोत्साहन दिले, कन्या केळवाणींनी मुलींच्या शिक्षणाला पाठिंबा दिला, गरीबांसाठीच्या कल्याण मेळ्यांनी नागरिकांचे कल्याण झाले आणि कृषी रथाने शेतकऱ्यांना कृषी-आधार दिला. नोकरशहांना कार्यालयातून काढून शहरे आणि खेड्यांमध्ये पाठवण्यात आले. प्रशासनाचे काम बैठकींपुरते मर्यादित न राहता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी मोदी आजही आग्रही आहेत.

पंतप्रधान झाल्यानंतर गुजरातमधील हे प्रयोग राष्ट्रीय टेम्पलेट बनले. स्वच्छता मोहिमेतील त्यांचा अनुभव स्वच्छ भारत मोहिमेत परावर्तित झाला, जिथे त्यांनी प्रतीकात्मकतेला जनकृतीत रूपांतरित करण्यासाठी स्वतः हातात झाडू घेतला. डिजिटल इंडिया, जनधन योजना आणि इतर उपक्रम हे उथळ कार्यक्रम नव्हते, तर तळागाळासाठी झटून कमावलेल्या त्यांच्या अनेक वर्षांच्या शिक्षणावर आधारित लोकचळवळी होत्या. त्यांनी त्यांच्या जन-भागीदारीच्या तत्त्वज्ञानाला मूर्त रूप दिले. प्रशासन तेव्हाच कार्य करते, जेव्हा नागरिकही सहभागी होतात. मोदींसारखे नेते आणि लोकांमधील हा विश्वास, जो दशकांपासून जोपासला गेला आहे, तोच आज भारतात धोरणाचे भागीदारीत रूपांतरित होताना दिसून येत आहे.

लोकांना काय हवे आहे आणि ते कसे पूर्ण करायचे हे जाणून घेण्याची दुर्मिळ वृत्ती मोदींनी दाखवली आहे आणि हीच वृत्ती कठोर प्रशासकीय अनुभवासह त्यांच्या राजकारणाची व्याख्या बनली आहे.

भारतीय राजकारण केवळ उच्चभ्रू लोकांचे आहे ही कल्पना, मोदी यांचे जीवन आणि नेतृत्व पाहता नव्याने लिहिली जात असल्याचे अनुभवायला मिळत आहे. मोदी गुणवत्तेचे आणि कठोर परिश्रमाचे प्रतीक बनले आहेत आणि त्यांनी प्रशासन सामान्य लोकांच्या हाताशी आणले आहे. त्यांची राजकीय ताकद लोकांना जोडण्यात दिसून येत आहे. याद्वारे त्यांनी सामान्य नागरिकांच्या संघर्षातून भारतीय राजकारणाला पुन्हा आकार दिला आहे.

केंद्रीय कृषी मंत्री

logo
marathi.freepressjournal.in