

मत आमचेही
केशव उपाध्ये
नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करणारी मंडळी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत झालेल्या देशाच्या आर्थिक विकासाकडे डोळेझाक करतात. किंबहुना ही प्रगती जाहीरपणे मान्य करण्याचे मोठेपण ते दाखवू शकत नाहीत. देशातील तरुणाई आजही त्यांच्यावर भरभरुन प्रेम करते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यकर्तापदाच्या कारकीर्दीला लवकरच २५ वर्षे पूर्ण होणार आहेत. १७ सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची १३ वर्षांची आणि पंतप्रधानपदाची १२ वर्षे असा त्यांच्या राज्यकर्तेपदाचा रौप्यमहोत्सवी प्रवास आहे. या निमित्ताने भारतीय जनता पार्टीतर्फे देशभर सेवा, संकल्प अभियान होणार आहे. नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाची १२ वर्षांची कारकीर्द देशाला नव्या उंचीवर नेणारी ठरली.
अलीकडेच म्हणजे ८ सप्टेंबर रोजी देशातील रेल्वेची २ हजार ८०० किलोमीटर लांबीची स्वतंत्र मालवाहतूक मार्गिका देशाला समर्पित करण्यात आली. मनमोहन सिंग सरकारच्या काळात १० वर्षांत या प्रकल्पाची फाईल दिल्लीत वेगवेगळ्या मंत्रालयातून मंजुरीसाठी फिरत होती. या मार्गिकेमुळे मालवाहतुकीच्या क्षेत्रात क्रांती होणार आहे. मालवाहतुकीचा पूर्व कॉरिडॉर १ हजार ३३७किलोमीटर लांबीचा आणि पश्चिम कॉरिडॉर १ हजार ५०६ किमी. असे एकूण २ हजार ८४३ किमीचे हे संपूर्ण जाळे ८ सप्टेंबर रोजी प्रत्यक्षात आले. आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीतील हा महत्वाचा टप्पा आहे.
विरोधकांकडून होणाऱ्या गलिच्छ, शिवराळ टीकेकडे दुर्लक्ष करीत नरेंद्र मोदी हे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी झटत आहेत. राज्यकर्ता म्हणून २५ वर्षांच्या प्रदीर्घ अशा कारकीर्दीत त्यांची परीक्षा घेणारे अनेक प्रसंग आले. परंतु ते त्या प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण झाले. अलीकडेच दिल्लीत जंतर-मंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी यांना टिकेचे लक्ष्य करण्याची स्पर्धाच विचारवंत, पत्रकारांमध्ये लागली होती. देशभरातील तरुण वर्ग, विद्यार्थी वर्ग मोदी सरकारवर प्रचंड नाराज आहे, असे विश्लेषण या विचारवंतांकडून केले जात होते.
मात्र देशातील तरुणाई, विद्यार्थी वर्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अजूनही पूर्वीप्रमाणेच भरभरून प्रेम करतो आहे, हे अलिकडील दोन कार्यक्रमांमध्ये ठळकपणे दिसून आले. यापैकी एक कार्यक्रम ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत झाला. तर दुसरा कार्यक्रम ८ सप्टेंबर रोजी वडोदरा येथे झाला. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणांमधून भारताच्या विकासाचे चित्र मांडले. पंतप्रधानांनी तरुणाईला देशाच्या विकास यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांच्या भाषणाला टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने प्रतिसाद देणारी तरुणाई पाहिल्यावर मोदी विरोधकांच्या छातीत धडकी भरली असेल.
जंतर-मंतर आंदोलनानंतर भाजप विरोधकांना आणि मोदीद्वेष्ट्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. मात्र या दोन्ही कार्यक्रमातून तरुणाई आणि विद्यार्थी वर्गाची नाळ अजूनही नरेंद्र मोदी यांच्याशी जोडलेली असल्याचे सिद्ध झाले. नवी दिल्लीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स या प्रख्यात महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी पाऊण तास भाषण केले. या पाऊण तासाच्या भाषणात उपस्थित विद्यार्थ्यांनी ४१ वेळा टाळ्यांच्या कडकडाटाने पंतप्रधान मोदींना दाद दिली. पंतप्रधानांच्या भाषणाने त्या कार्यक्रमात उपस्थित प्रत्येकजण भारावलेला होता. तरुण वर्ग आणि विद्यार्थी हे पंतप्रधान मोदींपासून दूर गेले आहेत, हा 'दिमागी नक्षलीं'चा खोटा प्रचार श्री राम कॉलेजच्या कार्यक्रमात उघडा पडला. पंतप्रधान मोदींचे हे भाषण अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण होते. गेल्या १२ वर्षातील देशाच्या विकासाचे प्रगती पुस्तक पंतप्रधानांनी तरुणाई समोर सादर केले. गेल्या १२ वर्षात देशाची वाढलेली कृषी निर्यात, मॅन्यूफॅक्चरिंग हब म्हणून देशाचा झालेला उदय याचा तपशिल सादर करताना पंतप्रधानांनी भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक (स्पेस स्टेशन) उभारण्याचा संकल्पही बोलून दाखवला. तरुणाईने मोठी स्वप्ने पाहावीत आणि ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावावे, हा पंतप्रधानांचा संदेश उपस्थित तरुणांना वेगळीच ऊर्जा प्रदान करणारा ठरला.
श्री राम कॉलेज हे महाविद्यालय देशातील प्रतिष्ठित महाविद्यालयांपैकी आहे. या महाविद्यालयात शिक्षण घेण्याचे स्वप्न बाळगून लाखो विद्यार्थी दिल्लीत येत असतात. अशा अत्यंत प्रतिभावान, गुणवान विद्यार्थी पिढीशी पंतप्रधान मोदींनी साधलेला संवाद मोदी विरोधकांना अनेक संदेश देणारा ठरला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची देहबोली विलक्षण आत्मविश्वासाची होती. त्यांनी आपल्या भाषणातून भारत आता थांबणार नाही, कोणत्याच शक्तींच्या प्रचारापुढे झुकणार नाही, असा स्पष्ट संदेश दिला.
जेन-झीवर अजूनही मोदींचेच राज्य आहे, हे दर्शविणारा आणखी एक कार्यक्रम वडोदरा येथे झाला याच दिवशी मुंबई बीकेसी येथे ग्लोबल फिनटेक फेस्ट या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी अर्थ, बैंकिंग, माहिती-तंत्रज्ञान या क्षेत्रातील नामवंतांशी संवाद साधला. फिनटेक क्षेत्राने 'यूपीआय'चा जगभर विस्तार करण्यासाठी आपली शक्ती पणाला लावावी, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमात केले. या तिन्ही कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशाच्या विकासाचे संकल्प चित्र मांडताना यात तरुणाईच्या सहभागाचे महत्वही अधोरेखित केले.
अर्थव्यवस्था वेगाने वाढते आहे
नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करणारी मंडळी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत झालेल्या देशाच्या आर्थिक विकासाकडे डोळेझाक करतात. किंबहुना ही प्रगती जाहीरपणे मान्य करण्याचे मोठेपण ते दाखवू शकत नाहीत. एप्रिल ते जून या कालावधीत देशातील वीज उत्पादनात नऊ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर एकूण वाहन विक्रीत २० टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, दुचाकी वाहनांच्या विक्रीत २० टक्के, तर तीनचाकी वाहनांच्या विक्रीत जवळपास ३० टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. पोलाद आणि सिमेंटच्या वापरात झालेली आठ टक्क्यांची वाढ ही देशातील बांधकाम, गृहनिर्माण आणि व्यावसायिक क्षेत्रातील गतिविधी वेगाने विस्तारत असल्याचे स्पष्ट प्रमाण आहे. अशा या नेत्याला दीर्घायुरोग्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
प्रदेश उपाध्यक्ष