शिक्षणनामा
रमेश बिजेकर
जन्मसिध्द व्यवसाय ही रचना कायम ठेवण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणाने शाळा संकुल, क्लस्टर व कौशल्य शिक्षणाचा पुरस्कार केला आहे. शाळा संकुल, क्लस्टर यातून शिक्षण विस्ताराचे संकुचितीकरण करून शिक्षणबंदी घडवणे हे या धोरणाचे उदिष्ट आहे.
जाती व्यवस्थेची प्रमुख सहा लक्षणे पुढीलप्रमाणे होती - १) जात जन्मसिध्द असते. २) व्यवसाय (उत्पादन व वितरण) जन्मसिध्द असतो. ३) रोटीव्यवहार जातीतच. ४) बेटीव्यवहार जातीतच. ५) अलग व बहिष्कृत वस्त्या ६) जातीचे नियमन-दंडन जातपंचायती मार्फत. जाती व्यवस्थेच्या विकसित टप्प्यात ही सहा लक्षणे अस्तित्वात आली होती.
जाती व्यवस्था विरोधी संघर्ष आणि उत्पादन साधनातील बदल यातुन या लक्षणांमध्ये काही बदल घडून आलेत तर काही तसेच कायम आहेत. १) जात जन्मसिध्द असण्याचे लक्षण कायम आहे. २) व्यवसाय (उत्पादन व वितरण) जातवर्गीय अस्तित्वात आले. २०११ च्या जनगणनेप्रमाणे ६८.८४ टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहत होती व ६८.८९ टक्के पारंपारिक उत्पादन २०११ ला होत होते. यात शेती, वनीकरण, मासेमारी, विणकाम, कुंभार, लोहार, हातमाग, कुंभारकाम इत्यादीचा सहभाग होता. शहरी व ग्रामीण भागात सामंती, निम्न औद्योगिक व औद्योगिक उत्पादन आजही सुरू आहे. जात भांडवली मिश्र उत्पादन पध्दती कार्यरत आहे. व्यवसाय जन्मसिध्द असण्याची अट शिथिल झाली असली तरी जाती उत्पादनात मोठ्या प्रमाणात उत्पादक जाती अडकून आहेत. ३) जातीतच रोटीव्यवहार संपुष्टात आले आहे. दलित विद्यार्थ्यानी शाळेतील माठाचे पाणी प्याला म्हणून मारहाणीत त्याचा मृत्यू होतो. ब्राह्मण बाईच्या घरी मराठा बाईने जात लपवून स्वंयपाक केला आणि ब्राह्मणबाईचा देव बाटला अशा अपवादात्मक घटना जातीतच रोटीबंदीच्या अवशेषाची आठवण करून देतात. ४) जातीतच बेटीव्यवहाराची पकड कायम आहे. जातीतच बेटीव्यवहारातून स्त्रियांच्या लैंगितेवर नियंत्रण आणुन पितृसत्ता टिकवता येते. भांडवली व्यवस्था व स्त्रीमुक्तीच्या प्रबोधनातून आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह घडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ही निवड करताना खालच्या जातीची मुलगी वरच्या जातीत न स्विकारण्याची व तिचा वर्गीय स्तर पाहण्याची मानसिकता कायम आहे. जाती अंतर्गत विवाहातून जाती व्यवस्थेचे पुनर्उत्पादन सुरू आहे. ५) अलग बहिष्कृत वस्त्याची चौकट शिथिल झाली असली तरी जातीबहुल वस्त्या शिल्लक आहेत. मोठ्या शहरातील अपार्टमेंटमध्ये विविध जातींचे निवास अस्तित्वात आले आहेत. परंतु खालच्या जातींच्या प्रतिनिधीचा वर्गीय स्तर लक्षात घेतला जातो. जात शोधली जाते. ६) जात पंचायतीची नियमन-दंडनाची जागा न्यायव्यवस्थेने घेतली आहे. परंतु न्यायव्यस्थेवरील ब्राह्मणी प्रभुत्व संपुष्टात आलेले नाही. ती ब्राह्मोभांडवली प्रभुत्वात काम करते आहे. जात पंचायती खिळखिळ्या झाल्या असल्या तरी तिचे अवशेष शिल्लक असल्याच्या घटना घडत असतात.
जाती व्यवस्थेच्या लक्षणात काही बदल झाले असले तरी तिचे ब्राह्मणी प्रभूत्व कायम आहे. हे ब्राह्मणीकत्व विविध क्षेत्रात कार्यरत आहे. तिचे उपलक्षण समाजजीवनात आपण अनुभवत असतो. उतरंडीची समाजरचना, श्रेणीबध्द स्तरीकरण, निर्णयाचे केंद्रीकरण, स्त्रियांवरील लैंगिक निर्बध, साचेबध्द व एकांगी ज्ञान परंपरा व संस्कृतीचे गौरवीकरण आपल्या रोजच्या अनुभवाचे आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये ब्राह्मणीकत्वाचा पुरस्कार केला आहे. जातवर्ग पितृसत्तेचे बळकटीकरण, बाजारीकरण, निर्णयाचे केंद्रिकरण, स्तरिकरण व भारतीय ज्ञान प्रणाली म्हणून एकसुरी वेदांतिक शिक्षण आशयाचा पुरस्कार राष्ट्रीय शिक्षण धोरणाने केला आहे. जन्मसिध्द व्यवसाय ही रचना कायम ठेवण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणाने शाळा संकुल, क्लस्टर व कौशल्य शिक्षणाचा पुरस्कार केला आहे. शाळा संकुल, क्लस्टर यातून शिक्षण विस्ताराचे संकुचितीकरण करुन शिक्षणबंदी घडवणे व कौशल्य शिक्षणातून जाती उत्पादन संबंधांना बळकटी आणणे हे या धोरणाचे उदिष्ट आहे. गाव तिथे शाळा हे सूत्र बाद करुन १० किमी अंतरावर एक शाळा संकुल बांधले जाणार आहे. महाविद्यालयात ३,००० विद्यार्थी असण्याची जाचक व अनैसर्गिक अट लावून महाविद्यालयाची संख्या कमी केली जाणार आहे. परिणामी प्राथमिक व उच्च शिक्षण विद्यार्थांना सहज उपलब्ध होणार नाही. विद्यार्थ्यांच्या निवासापासुन शिक्षणाचे अंतर वाढवणे हे शिक्षणबंदीचे प्रतिरुप असते.
जातवर्गीय उत्पादन संबंधांना बळकट करणे व मजूर निर्मितीचे उदिष्ट कौशल्य शिक्षणाचे आहे. जातीगत व निमभांडवली उत्पादन कौशल्याची रचना धोरणात उभी केली आहे. प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर याचा आराखडा निश्चित केला आहे. प्राथमिक स्तरावर जातीगत उत्पादन (बागकाम, कुंभारकाम, लोहारकाम इत्यादी) आणि उच्च प्राथमिक स्तरावर अर्धभांडवली उत्पादन (प्लबिंग, मोटार रिवाईडिंग, वेल्डिंग इत्यादी) शिकवले जाणार आहे. माध्यमिक स्तरावर व्होकेशनल व आयटीआय जोडले जाणार आहे. व्होकेशनल व आयटीआय शिक्षणातून मजूर निर्मितीची प्रक्रिया घडणार आहे. राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ मध्ये ६४ कलांची व ललित कलांची यादी दिली आहे. व्यवसाय शिक्षणात या पारंपारिक कलांचे अभ्यासक्रम निश्चित करण्याचे मार्गदर्शक तत्व दिली आहेत. ती स्पष्टपणे कौशल्यातून जातवर्गीय उत्पादन संबंधांचे दृढीकरण करण्याचे सुचवते. शिक्षण बंदी व जातवर्गीय उत्पादन संबंधाचा पुरस्कार म्हणजे ‘जन्मसिध्द उत्पादन’ संबंधाचे प्रतिबिंब आहे.
उतरंडीच्या समाजरचनेने आर्थिक, सामाजिक, सासंकृतिक श्रेणीबध्दता निर्माण केली. त्याचे परिणाम शिक्षण व्यवस्थेवर झाले आहेत. शिक्षण व्यवस्था ती काटेकोरपणे पाळत आलेली आहे. गुरुकुल शिक्षण पध्दती पासुन ब्राह्मणी श्रेणीबध्दता शिक्षणात कार्यरत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाने कालसुसंगत श्रेणाबध्दतेचा पुरस्कार केला आहे. शिक्षणातील श्रेणीबध्दतेतून समान तत्व दूर सारले जाते व विषम सुविधा व संधीचे तत्व स्विकारले जाते. पंचतारांकित शाळांपासून ते गोठ्यात भरणा-या शाळा व आयआयटी पासून ते चार खोल्यात भरणा-या महाविद्यालयाचे अस्तित्व श्रेणीबध्दतेचा परिपाक आहे. ही श्रेणीबध्दता केवळ भौतिक सुविधांपुरती मर्यादित नाही तर समाजव्यवस्थेत त्या-त्या समाज गटाचे स्थान निश्चित करण्याची रचना आहे. या रचनेत राष्ट्रीय शिक्षण धोरणाने वाढ केली आहे. सीएम, पीएम स्कुल, ओपन स्कुल, डिस्टन्स लर्निंग, प्रौढ शिक्षण, ब्रिज कोर्स, आभासी शिक्षण इत्यादी स्तरिकरणाची वाढ प्राथमिक शिक्षणात केली आहे व समान शाळा पध्दती नाकारली आहे. उच्च शिक्षणात विद्यापीठ व महाविद्यालयांना तीन स्तरात विभागले गेले आहे. संशोधन, संशोधन आणि शिक्षण व शिक्षण असे स्तरीकरण आकाराला येणार आहे. यातून अनुक्रमे धोरणकर्ते, प्रशासनिक व मजूर अशी श्रेणीबध्दता विद्यार्थ्यांची अस्तित्वात येईल.
‘भारतीय ज्ञान प्रणाली’चा पुरस्कार राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ने केला आहे. भारतीय ज्ञान प्रणालीची व्याख्या केलेली नाही. भारतीय ज्ञान प्रणाली म्हणजे ब्राह्मणी ज्ञान प्रणाली असे प्रतिबिंबित केले आहे. भारताचा बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवाद लक्षात घेता ब्राह्मणी-अब्राह्मणी ज्ञानशाखा एकमेकांशी संघर्ष करत वाहत आलेल्या आहेत. या दोन्ही ज्ञान प्रवाहांचा उल्लेख धोरणात केला आहे. परंतु पुरस्कार ब्राह्मणी ज्ञान शाखांचा केला आहे. वेदामध्ये उत्तर मिमांसा, पूर्व मिमांसा, न्याय वैशेषिक या ब्राह्मणी तत्वज्ञानाचा पुरस्कार करून तंत्र, सांख्य, जैन, लोकायत या तत्वज्ञानांना धोरणात जागा दिलेली नाही. पितृसत्ताक वर्णजाती समर्थक व विरोधक ज्ञान प्रणालीचा सम्यक सहभाग न करता पितृसत्ताक जाती समर्थक ज्ञान प्रणालीचा पुरस्कार केला आहे. यातून पितृसत्ताक जाती व्यवस्था समर्थक पिढ्या घडवण्याची व्युहरचना धोरणाने केली आहे. हे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० चे ब्राह्मणीकत्व होय.
rameshbijekar2@gmail.com