भवताल
ॲड. वर्षा देशपांडे
नवरात्रात स्त्रीशक्तीची पूजा केली जाते, पण वास्तवात स्त्रियांना आजही अन्याय, हिंसा आणि दुजाभावाला सामोरे जावे लागते. देवीला अष्टभुजा देऊन शक्तिमान मानले जाते, तरी प्रत्यक्षात स्त्रियांना कमकुवत समजले जाते.
सध्या महाराष्ट्रात आणि देशभरात घटस्थापनेपासून दुर्गा उत्सव सुरू आहे. नवरात्र सुरू झाले आहे. खरंतर हा सृजनाचा उत्सव, स्त्रीत्वाचा उत्सव. शेतीचे नाते सांगण्याचा उत्सव. स्त्रिया आणि जमीन या सृजनशील आहेत. निर्मितीक्षम आहेत. प्रेम, कारुण्य, वात्सल्य आणि त्यासोबत लढवय्या, निर्भय, चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याची क्षमता ठेवतात. या संपूर्ण सजीव सृष्टीत स्त्रियांनी सर्वश्रेष्ठ असे जर कोण असेल, तर तो माणूस जन्माला घातला. आजही विज्ञान कितीही पुढे गेले असले, तरीही सरोगेट करून म्हणजेच गर्भाशय भाड्याने घेऊन का होईना पुरुषांना बाईच्या गर्भाशयातूनच बाईच्या पोटी जन्म घ्यावा लागतो. तरी तिचं सामाजिकीकरण होत असताना भारतासह देशभरामध्ये तिला दुजाभावाने वागविले जाते. तिला सतत हिंसेला तोंड द्यावे लागते.
भारत हा फार गमतीशीर देश आहे. एका बाजूला शक्तीची देवता म्हणून महिषासुरमर्दिनीची पूजा केली जाते, नवरात्र साजरी केली जाते. तिला देवी म्हणून शक्तिमान मानले जाते. तिच्या आठ भुजांमध्ये शस्त्र देऊन पायाखाली राक्षस देऊन ती कसा दुष्टांचा संहार करू शकते हे दाखविले जाते. पण प्रत्यक्ष बाईला नाजूक समजले जाते. कमकुवत समजले जाते. बायकाही त्या नाजूकपणाचा अभिमान बाळगताना दिसतात. नटणे, मुरडणे, चवळीच्या शेंगेसारखी असणे स्त्रियांना भूषणावह वाटते. नवरात्रीतील देवी म्हणून अष्टभुजा देवतेने शक्तिमान असले पाहिजे, पण आपण बाई म्हणून नाजूक, मुळूमुळू रडणारी असली पाहिजे, असाच स्त्रियांचा आणि पुरुषांचा देखील कुटुंबात समज असतो.
शाळांमध्ये बुद्धीची देवता म्हणून सरस्वतीची पूजा केली जाते. आमच्या लहानपणी तर शाळेत आम्ही दहा पैशाची वर्गणी काढून सरस्वतीचे पूजन करून फुटाणे वाटायचो. गूळ-चणे किंवा साखर-चणे हा शुक्रवारचा शाळेतला प्रसाद असायचा. सरस्वती ही देखील बाईच. बुद्धी हा शब्द देखील स्त्रीलिंगी. पण प्रत्यक्षात व्यवहारात मात्र बाई म्हणजे पायातली चप्पल. औरत माने पैर की जुती. बायकांना काही अक्कल असते का? बायकांची अक्कल घुटन्यात. बायका म्हणजे फिदी-फिदी हसणं, मुळूमुळू रडणं. पुरुषांच्या बोलण्यात येते की बाई आहे. तिच्या नादाला नका लागू. बायकांचा आणि अकलेचा काही संबंध आहे का? राखीव आलंय म्हणून त्यांना सहन करायचं. बाई आहे तिच्यासोबत डोकं नका लावू. बुद्धिवान असणं हे पुरुषांसाठी अनिवार्य आहे. स्त्रिया सुंदर असल्या की झाले. किंबहुना बुद्धिमान वगैरे स्त्रिया नसलेल्याच बरे. किंबहुना बुद्धिमान स्त्रियांचे पुरुषांना वावडेच आहे. बुद्धिमान स्त्रियांची पुरुषसत्ताक व्यवस्थेला भीती वाटते. त्यामुळे अगदी लग्न करताना देखील मुलगी बघायला जातात आणि मुलाचं मात्र करिअर, बुद्धी, पगार बघितला जातो. मुलाला कोणी स्वयंपाक येतो का? हा प्रश्न विचारत नाहीत आणि स्त्रिया कितीही शिकलेल्या असल्या, उच्च शिक्षण घेतलेल्या असल्या, कोणत्याही पदावर असल्या, प्रशासक, वकील, न्यायाधीश असल्या तरी तिचं दिसणं आणि तिचं स्वयंपाकपाणी करता येणे, तिने लग्न करणे, तिला मूल होणे अनिवार्य आहे.
आता दिवाळी येईल. धनाची देवता म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाईल. धनलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी याच्या पूजनाच्या दिवशी हजारो रुपयांच्या फटाक्यांच्या माळा उडवल्या जातील. पाच-दहा रुपयांसाठी गिऱ्हाईकांबरोबर घासाघिस करणारे व्यापारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांवर हजारो रुपये खर्च करतील. लक्ष्मी ही देवता आहे. बाईमाणूस आहे. पण धनवान कोण आहे? जमीन, घर, मुलं, सर्व प्रकारची स्थावर, जंगम मालमत्ता ही पुरुषांच्या मालकीची आहे. एकूण कामाच्या दोनतृतीयांश कामं शेतीतील असो, घरातील असो किंवा समाजातील असो स्त्रिया करतात आणि जगभरामध्ये शंभर रुपयातील फक्त एक रुपया स्त्रियांकडे अर्थकारणात आलेला दिसतो. स्त्रिया करत असलेल्या दोनतृतीयांश कामाची पैशांमध्ये मोजदाद केली जात नाही. त्यामुळे देशाचा जीडीपी देखील चुकीचाच निकषांवर मोजला जातो. त्यामुळे घराचं अंदाजपत्रक असो की देशाचं, त्यामध्ये कुठेही स्त्रियांच्या कामाची नोंद नाही. स्त्रियांसाठी अंदाजपत्रकात त्यांची संख्या निम्मी असून देखील तरतूद नाही, स्त्रिया बिनपगारी, फुल अधिकारी. सर्वात आधी उठणार, सगळ्यात शेवटी झोपणार, राबराब राबतात. लक्ष्मीपूजन करणारी इथली परंपरा या गृहलक्ष्मीची, मात्र आपल्या घरात रोज अवहेलना करणार.
म्हणूनच नवरात्रीच्या निमित्ताने प्रश्न विचारावासा वाटतो की, हा जगण्यातला भारतीय समाजातील विरोधाभास कधी संपणार? एका बाजूला तिची देवी म्हणून पूजा करायची आणि दुसऱ्या बाजूला मात्र तिला दासी म्हणून हिणवायचे. सगळ्या शिव्या आई- बहिणीवरून दिल्या जातात. पुरुषांच्या दाढीच्या ब्लेडपासून सगळ्या वस्तूंच्या विक्रीच्या जाहिरातींसाठी स्त्रिया शरीरप्रदर्शन करण्यासाठी यांना लागतात. पुरुषांना शहाणं करण्यासाठी आणि स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी स्त्रीमुक्ती चळवळीला संघर्ष करून ४२ हून अधिक कायदे बनवायला भाग पाडावे लागले. स्त्रियांच्या हिंसेचा प्रश्न हा जागतिक पातळीवर राजकीय बनतो आहे. गर्भाशयापासून थडग्यापर्यंत सर्वच वयातील स्त्रिया असुरक्षित आहेत. भय व हिंसा सोसत आहेत. भारतात तर आता नवीन विधेयकाप्रमाणे संसदेत आणि विधानसभेत ५० टक्के स्त्रिया खासदार आणि आमदार म्हणून निवडून येणार आहेत. पुरुषांच्या आदेशानुसार फेटा बांधून मोटारसायकलवर बसून आरक्षणाचा मोर्चा असेल, तलाक कायद्यातील बदलाविरोधातील मोर्चा असेल किंवा सीएए, एनआरसी विरोधातील शाहीन बाग असेल याठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या या स्त्रिया स्वतःच्या बाबतीत झालेल्या किंवा अवतीभवती घडलेल्या स्त्रीविषयक हिंसक घटनेच्या विरोधात साधा ब्र देखील काढत नाहीत किंवा निषेधपत्र देखील काढत नाहीत. सर्व दुर्गा मंडळे, नवरात्री मंडळे यातील पदाधिकारी पुरुष आहेत. लाखो रुपयांची या मंडळांची उलाढाल आहे. पहाटे किंवा संध्याकाळी चौकाचौकातील नवरात्रोत्सवाच्या मंडळासमोर हजारोंच्या संख्येने स्त्रिया पायात चपला न घालता मळवट भरलेल्या, ठरलेल्या विशिष्ट रंगाच्या साड्या नेसून भक्तीने आरतीला टाळ्या वाजवताना दिसतात. निर्मितीचे प्रतीक असणाऱ्या आठही हातात शस्त्रं घेऊन समोर असणारी ती देवी प्रत्यक्ष जगण्याचे आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपण केलेल्या नवरात्रातील उपवासामुळे प्रसन्न होऊन सोडवायला खरोखरीच येईल असे यांना खरंच वाटते का?
लोटलेला भक्तिसागर फॅशनेबल आहे. शिकल्या सवरलेल्या, पदवीधर असलेल्या स्त्रियांच्या चळवळीमुळे राखीव जागा मिळवून, नोकरी-कामधंदा करून पैसे मिळत असलेल्या, बचत गटातील सक्रिय असणाऱ्या, आशा, अंगणवाडी ताई, शिक्षिका, नोकरदार महिला जेव्हा आम्ही स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायविरुद्ध उभे राहण्यासाठी बोलवितो, मोर्चाला निमंत्रण देतो तेव्हा त्या पाठ फिरवतात. परंतु या मांडवासमोरच्या गर्दीत त्या टाळ्या वाजवत उभ्या दिसतात तेव्हा मन विषण्ण होते. या तथाकथित धार्मिक आणि श्रद्धेच्या बाजारातून बाहेर पडून जगण्याच्या प्रश्नाला या कधी भिडणार, असा प्रश्न पडतो?
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व लेक लाडकी अभियानच्या संस्थापक