गरज ही शोधाची जननी असते !

गुरुजींनी त्या म्हणीबद्दल काही सांगण्याआधीच आम्ही आमच्या मनात उद्भवलेली बालसुलभ शंका विचारण्यासाठी हात वर केला
गरज ही शोधाची जननी असते !

गरज ही शोधाची जननी असते ही म्हण कोणाला माहीत नाही? ती तर सर्वांनाच माहीत असते; पण ती आमच्या विशेष लक्षात आहे. विशेष लक्षात आहे म्हणजे इतकी लक्षात आहे की, पुढच्या जन्मी या जन्मीचं दुसरं काही आठवो की न आठवो; पण ही म्हण नक्कीच आठवेल! त्याचं असं झालं की, आम्ही अवघ्या १६ वर्षाचे निरागस बालक असताना इयत्ता पाचवीत शिकत होतो. त्याच वर्गात तीन वर्षे असल्यामुळे आमच्या सालकाडे गुरुजींचा आमच्यावर विशेष ‘डोळा’ होता. गुरुजींनी एके दिवशी फळ्यावर ‘गरज ही शोधाची जननी असते’ ही म्हण लिहिली. गुरुजींनी त्या म्हणीबद्दल काही सांगण्याआधीच आम्ही आमच्या मनात उद्भवलेली बालसुलभ शंका विचारण्यासाठी हात वर केला. गुरुजींनी आमच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. तोंडातली तंबाखूची गोळी डाव्या दाढेखाली सरकवत खिडकीतून बाहेर पिचकारी मारली. पिचकारी मारताना मिशीच्या केसांमध्ये अडकलेले जिव्हारसाचे मोती पालथ्या मुठीने पुसत ते करवदले, ‘हं, बोल रे’‘गुरुजी, मंग तिचा बा कोण?’ आम्ही तारुण्यसुलभ प्रश्न विचारला. वास्तविक गुरुजींनी इतका पुढचा विचार करून प्रश्न विचारणाऱ्या आमच्यासारख्या हुशार विद्यार्थ्याची पाठ थोपटून शाबासकी द्यायला हवी होती; पण गुरुजींचा संताप अनावर झाला. त्यांनी आपल्या नावाला जागायचं ठरवलं. ‘आदी तुज्या बाला आन बलावून शाळंत, मंग त्याच्या समुर सांगतो, तिचा बा कोन ते.’ असं ओरडून त्यांनी छडीची शोधाशोध सुरू केली. आपल्या नावाला जागण्यासाठी त्यांना छडीची गरज होती. खुर्चीखाली, टेबलखाली, दाराआड शोधाशोध करूनही जेव्हा त्यांना छडी सापडली नाही, तेव्हा त्यांनी चार मुलांची दप्तरं पालथी घालून चार लाकडी पट्ट्या मिळवल्या. त्या एकत्र करत चांगलीच मजबूत छडी तयार केली आणि आमची पाठ सोलून काढत आम्हाला वर्गाबाहेर पिटाळलं; पण नंतरच्या आयुष्यात मात्र शाळेत विचारून पाठीची साल सोलून घेतलेल्या त्या प्रश्नाचं उत्तर आपोआपच मिळालं. गरज ही शोधाची जननी असते तर गरजवंत हा शोधाचा बाप असतो, हे कळलं. हे सिद्ध करणारी अनेक उदाहरणं अवतीभवती सहजपणे दिसली.एखाद्या दिवशी दुपारी आपण मित्रांसोबत भटकत असतो. नेमक्या त्याच वेळी बायकोची माहेरची माणसं आपल्या घरी टपकतात. मग बायकोला ताज्या भाजीपाल्याची, गोडधोड पदार्थांची गरज भासते. मग एरवी आपली दखलही न घेणारी बायको, दहा जागी फोन करून आपल्याला शोधून काढते आणि अर्ध्या तासात आपण तिने दिलेल्या यादीप्रमाणे सर्व सामान घेऊन घरी हजर होतो. याला म्हणतात, ‘गरज ही शोधाची जननी असते.’एखादा मद्यप्रेमी पहिल्यांदाच एखाद्या नव्या गावी जातो. तिथे कोणीच ओळखीचं नसतं. अगदी नातेवाईकांचा पत्ता आणलेला असूनही त्यांचं घर लवकर सापडत नाही; पण ‘डोस’ मारण्याची वेळ झाली की, जीव कासावीस होतो. मग मात्र गुत्ता, बार शोधायला वेळ लागत नाही. महिना अखेरीस खिसा आणि बँक खाते दोन्ही रिकामे झालेले असताना, उधार पैसे देणारा मित्र आणि उधार वाणसामान देणारा वाणी, गरजवंत ताबडतोब शोधून काढतो. याला म्हणतात, ‘गरजवंत हा शोधाचा बाप असतो.’राजकारण्यांची तर तऱ्हाच वेगळी. गरजेपोटी ही मंडळी काय काय अफलातून शोध लावतील त्याची कल्पनाही सामान्य माणूस तर सोडाच; पण भले भले डॉक्टर्स, शास्त्रज्ञही करू शकणार नाहीत. मागे एका महाशयांनी ‘हर्बल तंबाखू’चा शोध लावला होता! म्हणजे याआधी तंबाखू दोन चार रासायनिक पदार्थांच्या मिश्रणातून बनत होती की काय? एका वाचाळ संपादकांनी तर म्हणे आपल्या सर्व पत्रकारांना विरोधकांच्या पाळतीवर ठेवून, ‘विरोधक कमी प्रतीचा गांजा ओढतात!’ असा शोध लावला होता! विरोधकांनी उच्च प्रतीचा गांजा ओढावा म्हणून सरकारने त्यांना सानुग्रह अनुदान द्यायला काय हरकत आहे? विरोधकही आपल्या तोलामोलाचे नकोत का?जाता जाता - डॉक्टर्स म्हणे आणीबाणीच्या वेळी आईचं पोट कापून पोटातून बाळ जन्माला घालतात. हल्ली तर त्यासाठी ब्राम्हणांकडून, ज्योतिषाकडून मुहूर्तसुद्धा काढून घेतात म्हणे! आताही कोणातरी राजकारण्याने म्हणे आपल्याच पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून त्या फाडलेल्या पाठीतून चक्क नवीन गटच जन्माला घातला, अगदी त्याच नावाचा, एका अमिबापासून दुसरा अमिबा तयार व्हावा तसा! त्यासाठीसुद्धा एखादा ज्योतिषी शोधून त्याच्याकडून मुहूर्त काढला गेला असेल का? सांगता येत नाही. गरज ही शोधाची जननी असते ना?

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in