‘मुंबई आय’ खरेच होणार आहे काय?

‘मुंबई आय’ हा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा जायंट फेरीस व्हील प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे मुंबईचे पर्यटन क्षेत्र आकर्षक बनण्यास मदत होईल. या प्रकल्पासाठी योग्य जागा शोधण्यात येत आहे. यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बहुप्रतीक्षित ‘मुंबई आय’ प्रकल्पाला मंजुरी दिल्याने मुंबई लवकरच ‘आयकॉनिक लंडन आय’ची स्वतःची आवृत्ती तयार करणार आहे.
‘मुंबई आय’ खरेच होणार आहे काय?
X - @IndianTechGuide
Published on

मत आमचेही

ॲड. हर्षल प्रधान

‘मुंबई आय’ हा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा जायंट फेरीस व्हील प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे मुंबईचे पर्यटन क्षेत्र आकर्षक बनण्यास मदत होईल. या प्रकल्पासाठी योग्य जागा शोधण्यात येत आहे. यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बहुप्रतीक्षित ‘मुंबई आय’ प्रकल्पाला मंजुरी दिल्याने मुंबई लवकरच ‘आयकॉनिक लंडन आय’ची स्वतःची आवृत्ती तयार करणार आहे. पण हा प्रकल्प खरंच मुंबईला हवा आहे काय? हा प्रश्नही महत्त्वाचा आहे.

लंडन आयपासून प्रेरित होऊन ‘मुंबई आय’ या प्रकल्पाची संकल्पना मांडली गेली. मुंबईतील पर्यटकांसाठी आणखी एक प्रमुख पर्यटन आकर्षण म्हणून त्याची आखणी केली जात आहे. या प्रकल्पामुळे पर्यटकांना मुंबईचे एक चित्तथरारक हवाई दृश्य पाहता येईल. महानगरपालिकेच्या मंजुरीमुळे दीर्घकाळापासून रखडलेला हा प्रकल्प अखेर प्रत्यक्षात येऊ शकेल. २०२२ मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने वांद्रे रेक्लेमेशन येथे ‘मुंबई आय’ बांधण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र स्थानिक रहिवाशांच्या विरोधामुळे ही योजना रद्द करण्यात आली होती.

लंडन आय म्हणजे काय?

लंडनच्या मध्यभागी चक्रावर आधारित प्रकल्प उभारण्याची कल्पना डेव्हिड मार्क्स आणि ज्युलिया बारफिल्ड या दोन वास्तुविशारदांनी मांडली होती. यासाठी मोठा निधी लागणार होता. हा बहुतेक निधी ब्रिटिश एअरवेजकडून येत होता. यासाठी अचूक स्थान शोधणे तसेच चक्राचे आणि लोक ज्या कॅप्सूलमध्ये बसून प्रवास करणार होते त्यांचे डिझाइन सुधारणे हे आव्हानही त्यांनी पेलले. अनेकवेळा वेगवेगळे डिझाइन तयार केले गेले. अंतिम डिझाइन तयार करण्यासाठी युरोपमधील अनेक देशांतील लोकांना एकत्र आणले गेले. या चाकाचे बांधकाम अंशतः नेदरलँड्समध्ये करण्यात आले. तसेच ब्रिटनमधील स्टील, इटलीतील व्हेनिस येथे उत्पादित कॅप्सूलमधील काच, जर्मनीतील बेअरिंग्ज, चेक प्रजासत्ताकमधील स्पिंडल्स, हब कास्ट आणि केबल-कार उत्पादक तज्ज्ञांनी फ्रान्समध्ये तयार केलेल्या कॅप्सूलचा वापर करून या आयची उभारणी झाली.

आय बांधण्याचे काम १९९८ मध्ये सुरू झाले आणि ३१ डिसेंबर १९९९ रोजी मिलेनियम सेलिब्रेशनच्या अगदी आधी तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी अधिकृतपणे त्याचे उद्घाटन केले. ‘लंडन आय’ हे आता यूकेमधील सर्वाधिक भेट दिले जाणारे सशुल्क पर्यटन आकर्षण आहे. दरवर्षी येथे ३.५ दशलक्षाहून अधिक पर्यटक येतात. ‘लंडन आय’मध्ये ५००० हून अधिक लोकांचे लग्न जमले आहे आणि ५०० हून अधिक लग्ने झाली आहेत. पहिले लग्न २००१ मध्ये झाले होते. या चाकाचा घेर ४२४ मीटर आहे. राणीच्या राज्याभिषेकाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त एका कॅप्सूलला ‘कोरोनेशन कॅप्सूल’ असे नाव देण्यात आले आणि ते वेगळे दिसावे म्हणून लाल रंगाने सजवण्यात आले. चाकाच्या संपूर्ण बांधकामाचे वजन १००० टनांपेक्षा जास्त आहे. एका वर्षात ‘लंडन आय’ सुमारे ३७०० किमी फिरते. हे अंतर लंडन आणि कैरोमधील अंतराइतके आहे. आयच्या पहिल्या १५ वर्षांत सर्व परिभ्रमणांची एकूण संख्या सुमारे ३२,९०० मैल इतकी आहे जी पृथ्वीच्या परिघाच्या जवळजवळ १.३ पट आहे.

‘मुंबई आय’ला होणारा विरोध

‘लंडन आय’ला मदत करण्यासाठी जसे सगळे देश आणि तंत्रकुशल तज्ज्ञ एकत्र आले होते तशी मदत मुंबई आयला केली जाईल का, हा खरा प्रश्न आहे. ‘मुंबई आय’च्या संकल्पनेची सुरुवात झाली तेव्हा नमनालाच घडाभर तेल पडल्यासारखे झाले. नॅशनल बिल्डिंग कोडप्रमाणे ‘मुंबई आय’साठी १४ एकर जागा अपेक्षित असताना ते एक एकर जागेमध्ये बसवण्याचा हट्ट सरकार का करते आहे? त्यासाठी आवश्यक असणारी जागा ‘वांद्रे रेक्लेमेशन’ येथे उपलब्ध नसताना ‘मुंबई आय’ वांद्रे रेक्लेमेशनलाच करण्याचा हट्ट का? असे आरोप करत तत्कालीन सरकारच्या संकल्पनेवर आक्षेप घेतला गेला होता.

‘लंडन आय’ आणि जगभरातील अशा अन्य प्रकल्पांचा विचार केला तर अशा प्रकल्पांना एका वर्षात सात मिलियन लोक भेट देतात. त्यासाठी नॅशनल बिल्डिंग कोडप्रमाणे ७६७ शौचालये, १२०० मुताऱ्या, २००० गाड्यांचे पार्किंग आणि अन्य सुविधांसाठी सुमारे १४.२२ एकर जागा अपेक्षित होती. वांद्रे रिक्लेमेशन येथे केवळ एक एकर जागा उपलब्ध आहे. या जागेत हे सर्व कसे बसविणार? वांद्रे-वरळी सेतू परिसर हा नेहमी गजबजलेला असून आता या परिसरातील हॉटेल व हॉस्पिटलमुळे प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. भविष्यात आणखी एक फाइव्ह स्टार हॉटेल येऊ घातले आहे. त्यामुळे वांद्रे रेक्लेमेशनला ‘मुंबई आय’ उभारून प्रचंड वाहतूककोंडी होईल म्हणून या ‘मुंबई आय’ला वांद्रेकरांचा विरोध आहे. असे असताना सरकार याच जागी प्रकल्प उभारण्ण्याचा हट्ट करते आहे. याचा अर्थ हा प्रकल्प करायचाच नाही का? असाही प्रश्न विचारला गेला. त्यामुळे तेव्हा हा प्रकल्प गुंडाळण्यात आला होता. आताही या प्रश्नांची उत्तरे सरकारला द्यावी लागणार आहेत.

मुंबईत पर्यटन स्थळे आहेत का?

अविरत चालणाऱ्या मुंबईमध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. मात्र तेथील गजबजाट आणि सतत वाहणारी गर्दी पाहिली की ही पर्यटन स्थळे आहेत की बजबजपुरी असा प्रश्न पडतो. मरीन ड्राइव्ह, गेटवे ऑफ इंडिया, चौपाटी बीच, सिद्धिविनायक मंदिर, जुहू बीच, धारावी झोपडपट्टी, वरळी सीफेस, हाजी अली, छत्रपती शिवाजी टर्मिनस, अक्सा बीच, वर्सोवा बीच, कुलाबा कॉजवे मार्केट, चोरबाजार, पवई लेक, कान्हेरी लेणी, शिवाजी पार्क, आरे कॉलनी, छोटा काश्मीर, रेसकोर्स, पॅगोडा अशी काही मोजकी पर्यटन स्थळे मुंबईत आहेत. त्या ठिकाणी पर्यटक येतात देखील. मात्र त्यांना त्या पर्यटन स्थळांचा किती आनंद घेता येत असेल हा प्रश्नच आहे. मुंबईचे विहंगम दर्शन घडवून आणण्यासाठी जायंट व्हीलसारख्या कल्पनांना खरेच पुढे आणायला हवे. पण हे करणार कोण? आपल्याकडे राजकारण्यांना एकमेकांची उणी-दुणी काढण्यापासून फुरसत नाही. एखादा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी हे सगळे एकत्र येणे शक्य आहे का? ‘मुंबई आय’साठी लागणारा निधी हा महानगरपालिकेसाठी फार मोठा प्रश्न नाही. आवश्यकता आहे ती राजकारण्यांच्या एकत्रित सहकार्याची.

‘मुंबई आय’ प्रकल्प नेमका कसा आहे?

समुद्रकिनारी सुमारे १२० ते १५० मीटर व्यासाचा पाळणा ‘मुंबई आय’ प्रकल्पाद्वारे उभा करण्यात येणार आहे. काचेचे आच्छादन असलेल्या पाळण्यातून पर्यटकांना मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांसह मुंबईचे दर्शन होईल, अशी संकल्पना आहे. त्यासाठी दोन हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पाळणा उभा करण्यासोबत तेथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आवश्यक सेवासुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा खर्च अपेक्षित आहे. आवश्यक पायाभूत सेवासुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही मोठा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे.

या प्रकल्पासाठी जागतिक निविदा मागवल्या जातील आणि त्यानंतर हा प्रकल्प सुरू होईल. वांद्रे रेक्लेमेशन येथील जागा प्रकल्पाला मिळावी अशी अपेक्षा होती. मात्र त्याला स्थानिकांनी विरोध केला. आता यासाठी समुद्रकिनाऱ्याजवळील जागेचा शोध घेण्याचा प्रयत्न होत आहे. ही जागा कधी आणि कुठे उपलब्ध होणार, हा प्रश्नच आहे. मुंबई आय प्रकल्पामुळे मुंबईच्या आकर्षणात वाढ होऊन स्थानिक व्यवसायांना अधिक चालना मिळेल. आजूबाजूच्या स्थळांच्या विकासाच्या माध्यमातून आर्थिक व्यवस्थेला चालना मिळेल. मात्र स्थानिक नागरिकांचा विरोध, प्रदूषण आणि वाहतूककोंडी यामुळे या प्रकल्पाला गंभीर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून योजना आखल्यास हा प्रकल्प मुंबईच्या पर्यटन क्षेत्रात एक महत्त्वाचा बदल घडवून आणेल.

प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

logo
marathi.freepressjournal.in