
ग्राहक मंच
मंगला गाडगीळ
सायबर क्राईमच्या वाढत्या घटनांनी आपली आर्थिक सुरक्षा धोक्यात आली आहे. आयुष्यभर कष्ट करुन कमवलेली पुंजी क्षणात बँक खात्यातून नाहिशी होते. नवीन टेक्नॉलॉजीचे ज्ञान गुन्हेगारांना असले तरी ग्राहकांना नाही. त्यामुळेच बँकेतील ठेवींवर पूर्ण सुरक्षा कवच असावे, ही मुंबई ग्राहक पंचायतची मागणी असून ती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे करण्यात आली आहे.
एका विधुर आजोबांना पुन्हा लग्न करण्याची इच्छा होती. त्यांनी एका संकेत स्थळावर आपले नाव नोंदवले. एके दिवशी समोरून ४३ वर्षीय महिलेचा होकार आला. लग्नाची तारीख नक्की करण्यात आली. हे दोघे जण वेगवेगळ्या शहरांमधील असल्याने थेट भेट झाली नाही, तरी ऑनलाईन बोलणे चालू होते. खरेदीसाठी वधूने पैशाची मागणी केली. वराने आनंदाने पैसे पाठवले. लग्नाचा दिवस जसजसा जवळ येत होता तसतसा वधूचा संपर्क कमी होत गेला. एक दिवस तो पूर्ण बंद झाला. लग्नाचे फेरे घेण्याऐवजी पोलीस स्टेशनचे फेरे करण्याची वेळ आजोबांवर आली.
नोकरी मिळवून देतो, अगोदर काही बाबी पूर्ण करण्यासाठी पैसे भरा, असे सांगितले जाते. नंतर नोकरी तर नाहीच, पण भरलेले पैसेही मिळत नाहीत. घरबसल्या टास्क पूर्ण करा, पैसे मिळवा, अशा जाहिराती केल्या जातात. काम केल्यावर तुमच्या नावावर पैसे जमा झालेले तर दिसतात, पण काढायला गेलो तर एक रुपयाही पदरात पडत नाही.
कांदिवलीतील एका खाजगी कंपनीच्या मालकाच्या बँक खात्यातून २३ डिसेंबर रोजी ७ कोटी ५० लाख रुपये इतर विविध बँक अकाउंटवर अनधिकृतरित्या वळवले होते. मालकाचे कार्ड स्वीप करून भामट्यांनी हे काम केले होते. मालकाने ताबडतोब १९३० या सायबर हेल्पलाईनवर कळवल्याने साडेसात पैकी चार कोटी वाचवण्यात पोलिसांना यश आले.
मुंबईतील गोरेगाव परिसरातील एक महिलेने नुकतीच स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. एक दिवस तिला फोन आला की तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल भरलेले नाही. फोन करणाऱ्याने आपण रिझर्व्ह बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. यामुळे तुमची सर्व खाती गोठवण्यात येणार असल्याचे सांगितले. पण मी क्रेडिट कार्ड वापरत नाही, असे महिलेने म्हटल्यावर हैदराबाद पोलिस अधिकाऱ्यांशी बोलण्यास सांगितले. तिथल्या अधिकाऱ्याने सांगितले की, येथील बँकेत ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. त्यातील २० कोटी रुपये तुमच्या खात्यात आले आहेत. त्या खात्याशी तुमचे आधार कार्ड जोडलेले आहे. नंतर तथाकथित सीबीआय अधिकाऱ्याकडे फोन देण्यात आला, त्याने तुम्हाला डिजिटल अरेस्ट करत आहोत, असे सांगितले. याची वाच्यता कुठेही करू नका अशीही धमकी दिली. त्यामुळे घाबरून जाऊन जवळ जवळ महिनाभर डिजिटल अरेस्टमध्ये असताना, त्या नवऱ्याच्याही नकळत, निरनिराळ्या बँक खात्यात सव्वा कोटी रुपये पाठवत राहिल्या.
वरील उदाहरणांमध्ये वेगवेगळ्या युक्त्या सायबर गुन्हेगारांनी वापरलेल्या दिसत आहेत. सोशल मीडियावर अशी वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक होत असते, हे आपण वर्तमानपत्रात वाचत असतोच. फसवली गेलेली ही सगळी साधी, सभ्य, सरळमार्गी माणसे असतात. कष्टाने मिळवलेला आणि साठवलेला पैसा बघता बघता, अचानक नाहीसा होतो. सरकारने कालानुरूप ऑनलाईन बँकिंगमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आणली खरी, पण ती कशी वापरायची, त्यात काय खाचाखोचा आहेत हे ग्राहकांना शिकवलेच नाही. त्याबाबतीत ग्राहकांचे प्रशिक्षण होणे गरजेचे होते.
सायबर पोलिसांच्या माहितीनुसार एप्रिल ते सप्टेंबर २०२३ या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यात दोन हजार ६२३ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. मागच्या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यात, एप्रिल ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत हाच आकडा २१ हजार ३६७ कोटी वर पोहोचला. यामध्ये हॅकिंग, सोशल मीडियावर खोटी माहिती-फोटो देणे, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड, नोकरी लावून देतो, हुबेहूब दिसणारी वेबसाईट बनवून त्यायोगे फसवणूक, ऑनलाईन खरेदी मधील फसवणूक, कर्ज देऊन दामदुपटीने वसुली, गिफ्ट कार्डद्वारे फसवणूक, चोरलेल्या माहितीचा उपयोग करून फसवणूक, सेक्सटॉर्शन इत्यादी प्रकारे फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.
बँकेच्या व्यवहारातील फसवणुकीच्या आकड्यात होत असलेली वाढ चिंताजनक आहे. यामुळे अर्थव्यवस्थाच कोलमडून पडण्याचा धोका आहे. ग्राहकांच्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना सुरक्षा कवच मिळालेले आहे. ते सुद्धा बँक बुडाली तरच (DICG scheme). वाढत्या डिजिटल फ्रॉडमुळे आर्थिक असुरक्षितता वाढलेली आहे. हे लक्षात घेऊन अशा फ्रॉडपासून आपल्या ठेवी वाचवण्यासाठी यावर १०० टक्के विमा कवच असावे अशी मागणी ‘मुंबई ग्राहक पंचायत’ करत आहे. तशा आशयाचे पत्र या ग्राहक संघटनेने अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांना पाठवले आहे. अशी मागणी संघटनेने अगोदरही केलेली होती. त्यामुळे यावर्षीचा आपला पहिला संकल्प हाच की,
श्रीमती निर्मला सीतारामन,
माननीय अर्थमंत्री, भारत सरकार,
खोली क्रमांक १३४, नॉर्थ ब्लॉक,
नवी दिल्ली - ११० ००१
या पोस्टाच्या पत्त्यावर किंवा Email id: appointment.fm@gov.in किंवा fmo@nic.in या ईमेलवर हीच मागणी करायची.
यथावकाश सरकार पावले उचलेल, सुरक्षिततेसाठी काही नियम करेल. त्या अगोदर आपण आपल्या भोवती सुरक्षा कवच निर्माण करणे गरजेचे आहे. काही स्वस्त किंवा फुकट मिळते आहे किंवा डिजिटल अरेस्ट सारखी भीती घातली जात आहे किंवा आपले कुतूहल जागे होऊन आपण नको तिथे नाक खुपसतो आहोत, या सगळ्याला दूर ठेवणे हेच आपले सुरक्षा कवच. म्हणूनच या वर्षी आपण हा संकल्प करू या की, मोह आणि भीती याला मी बळी पडणार नाही. आणि काही अघटित घडलेच तर न लाजता, न घाबरता पोलिसांना १९३० या नंबरवर ताबडतोब कळवेन.
मुंबई ग्राहक पंचायत
mgpshikshan@gmail.com