-श्याम बसप्पा ठाणेदार
मराठी भाषा दिन विशेष
मराठी ही आपली मातृभाषा आहे. तसेच ती महाराष्ट्राची राज्यभाषाही आहे. आपल्या शैलीदार लेखणीतून ज्यांनी मराठी भाषेला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले ते ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानपीठ विजेते वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.
सुमाग्रजांना १९८७ साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. हा मराठी भाषेला मिळालेला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार होता. त्यामुळे त्यांचा जन्मदिवसच मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यास महाराष्ट्र शासनाने सुरवात केली. भारतातील २२ प्रमुख भाषांपैकी मराठी ही एक प्रमुख भाषा आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्याची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही पंधरावी तर देशातील तिसरी भाषा आहे. २००१ च्या लोकसंख्येनुसार मराठी बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या दहा कोटींच्या पुढे आहे. मराठी भाषा ९ व्या शतकापासून प्रचलित आहे. मराठी भाषेची निर्मिती संस्कृतपासून झालेल्या महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. मराठी भाषेला गौरवपूर्ण इतिहास आहे. देशातीलच नव्हे तर जगातील प्रमुख भाषा म्हणून मराठीकडे पाहिले जाते. ज्ञानेश्वरांपासून कुसुमाग्रजांपर्यंत अनेकांनी मराठी भाषेला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला.
माझी मराठीची बोलू कौतुके
परी अमृतातही पैजा जिंके
ऐसी अक्षरे रसिके....मेळवीन
अशा शब्दात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी मराठीचा गौरव केला आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...अशा शब्दात कविश्रेष्ठ सुरेश भटांनी मराठीचा गौरव केला आहे. एक हजार वर्ष जुनी, पाच हजार बोली भाषेपासून तयार झालेली, अमृतातही पैज जिंकणारी या माय मराठी भाषेच्या जपणुकीसाठी आपण काय करतो याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. आज हिंदी आणि इंग्रजी भाषांनी मराठी भाषेवर आक्रमण केले आहे. इंग्रजी व हिंदी भाषेच्या आक्रमणाने महाराष्ट्रातूनच मराठी भाषा हद्दपार होती की काय अशी शंका येऊ लागली आहे. अर्थात याला सर्वस्वी मराठी माणसेच जबाबदार आहे. मराठी माणसांच्या मनातच मराठीला गौण स्थान आहे आणि इंग्रजी भाषेला प्रथम स्थान आहे. इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. इंग्रजीला ज्ञानभाषा म्हटले जाते म्हणून मराठीची उपेक्षा केली जात आहे. विशेषतः उच्चभ्रू मराठी कुटुंबात मराठीत बोलणे अप्रतिष्ठित समजले जाते तर इंग्रजी भाषेत बोलणे प्रतिष्ठेचे समजले जाते. मराठी ही मातृभाषा असूनही इंग्रजीतून बोलण्याचा अट्टहास धरला जातो. मराठी माणसे एकमेकांशी बोलताना मराठीत बोलायला कचरतात.
मराठीपेक्षा इंग्रजी आणि हिंदीतून बोलणे प्रतिष्ठेचे समजतात. मराठी माणसेच आपल्या पाल्यांना मराठी माध्यमाच्या शाळेत दाखल करण्याऐवजी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत भरमसाठ फी भरुन दाखल करीत आहे. इंग्रजी भाषेचे अवास्तव स्तोम माजवल्याने मराठीमाध्यमांच्या शाळा बंद पडू लागल्या आहेत. मराठी साहित्य संमेलनाकडे मराठी माणसेच पाठ फिरवू लागल्याने मराठी पुस्तकांच्या विक्रीत घट होऊ लागली आहे. ग्रंथालयातील मराठी पुस्तके वर्षानुवर्षे जागेवरूनही हलतही नाही. महाराष्ट्रातच मराठी भाषेची उपेक्षा होऊ लागली आहे. मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे काम मराठी, साहित्यिक व सरकारचे आहे असेच मराठी माणसाला वाटते. मराठी साहित्यिकांना, लेखकांना मराठी भाषेविषयी जन्मजात प्रेम आहेच. अभिमान आहे. मराठी भाषा गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि आकर्षक होईल यासाठी ते आपल्या परीने प्रयत्न करीतही आहे. महाराष्ट्र सरकारही मराठी भाषा जिवंत राहावी यासाठी प्रयत्न करीत आहे. पण महाराष्ट्र सरकारचे हे प्रयत्न तोकडे आहेत असेच म्हणावे लागेल. मराठी भाषेवर इंग्रजी भाषेचे अतिक्रमण वाढत असताना ते रोखण्यासाठी सरकार ठोस प्रयत्न करीत असल्याचे दिसत नाही. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मागणी तसा पुरवठा या तत्वाने सरकार भराभर परवानगी देत आहे.
इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सढळ हाताने परवानगी देणारे सरकार नवीन मराठी शाळांना परवानगी देत नाही तसेच आहे. त्या शाळांना अनुदान देताना हात आखडता घेते. सरकारी कार्यालयात मराठीचा वापर अनिवार्य असताना तिथेही मराठीची गळचेपी होते. अनेक सरकारी कार्यालयात आज देखील मराठीचा वापर नावापुरताच केला जातो. केंद्र सरकारच्या कार्यलयात तर मराठीचा वापर होतच नाही. सरकारी कार्यालयात मराठीचा वापर व्हावा असा आदेश असताना त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. मराठी भाषा जगवण्यासाठी, वाचवण्यासाठी राज्य सरकारने खंबीर धोरण आखायला हवे. केवळ परिपत्रक काढून उपयोग नाही तर त्याची प्रभावी अंमलबजावणी होते का याचाही शोध सरकारने घ्यावा. राज्य सरकारच्या व्यवहारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्यासंबंधीच्या धोरणाची अंमलबजावणी करणे, सरकारच्या दैनंदिन कामकाजात मराठीचा जास्तीतजास्त वापर करणे, मराठी शाळांना जी उतरती कळा लागली आहे त्यासंदर्भात ठोस निर्णय घेऊन मराठी भाषेला उर्जितावस्था मिळवून देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने करावा. मराठी ही अभिजात भाषा आहे. अभिजात भाषेसाठी लागणारे सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करते असे असूनही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारने दबाव आणावा. सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरुन मराठीसाठी एकत्र येऊन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधान, राष्ट्रपतींची भेट घ्यावी. साहित्यिक, लेखक यांनीही यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत. मराठी भाषा जगवण्यासाठी, वाचवण्यासाठी सरकारी तसेच सामाजिक पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत. मराठी भाषेला सुगीचे दिवस आणण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. सर्वसामान्य मराठी माणसांपासून सरकारपर्यंत सर्वांनीच मराठीच्या उत्कर्षासाठी आत्मचिंतन करायला हवे.