नितीनभाऊ,तुम्ही राजकारणात असायलाच हवे !

यशवंतरावांना प्रखर विरोध केलेले एस. एम. जोशी यांचा पंचाहत्तरीचा सत्कार यशवंतराव चव्हाण करतात
नितीनभाऊ,तुम्ही राजकारणात असायलाच हवे !

तीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली गिरीशबाबूंच्या सत्काराला काँग्रेसचे नेते, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे स्वत: आले. त्यांच्याच हस्ते सत्कार झाला. पक्षाच्या सगळ्या भिंती ओलांडून चांगल्या कामाला, चांगल्या व्यक्तींचा सत्कार करताना या परंपरेने संकोच केला नाही. ही यशवंतरावांची परंपरा आहे. जात-धर्म-भेद गळून पडले पाहिजेत आणि सामाजिक जीवनात समानतेचा पुरस्कार करणाऱ्यांना शक्ती दिली पाहिजे. ही त्या मागची भावना आहे. त्यामुळे यशवंतरावांना प्रखर विरोध केलेले एस. एम. जोशी यांचा पंचाहत्तरीचा सत्कार यशवंतराव चव्हाण करतात.

आयुष्यभर राजकीय विरोधात राहिलेल्या थोर नेते उद्धवराव पाटील यांचा सत्कार यशवंतराव करतात. त्या उद्धवराव पाटील यांचा पुतळा विलासराव देशमुख औरंगाबादमध्ये उभा करतात. अशा या निकोप परंपरेतील तो महाराष्ट्र, आजच्या घाणेरड्या राजकारणात परवा नागपूरच्या सत्कारात पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला. सगळ्यांच्या भाषणाने कार्यक्रम एका उंचीवर गेला. गिरीशबाबूंच्या सत्कारात सुरुवातीचेच भाषण करताना मी या विषयाला थोडासा स्पर्श केला की, ‘आम्हाला यशवंतरावांचा महाराष्ट्र हवा आहे....’ जात-धर्म-पक्ष या नावावर राजकारण न करता, समाजकारण निकोप राहिले पाहिजे, हाच विचार देशाला तारणार आहे. या सत्कार कार्यक्रमात सर्वात उत्तम भाषण झाले ते नितीन गडकरी यांचे.

गडकरी यांनी हताश भावनेने ‘या सत्ताकारणात राहावे का?’ असा प्रश्न विचारला; पण त्यांना हे सांगणे आहे की, “नितीनभाऊ, तुम्ही असा विचार मनात आणूच नका.... तुमच्यासारखे लोक जर बाजूला झाले, तर आजच्या राजकारणातील धटिंगणांना रान मोकळे मिळेल. तुमच्यासारखे सुसंस्कृत, सभ्य राजकारणी भाजपमध्ये असलेच पाहिजेत, तरच काही आशा आहे. तुम्ही वाजपेयी परंपरेतील आहात.”

‘राजधर्म का पालन करो’, असे मोदींना वाजपेयींनी त्यावेळी खडसावून सांगितले होते. त्या वाजपेयींची परंपरा ही लोकशाही परंपरा आहे. तुम्ही त्याचे वाहक आहात. महाराष्ट्रात तरी पूर्वीचा जनसंघ आणि नंतरच्या भाजपमधील त्यावेळचे नेते रामभाऊ म्हाळगी, तुम्ही, रामभाऊ कापसे, रामभाऊ नाईक, श्यामराव कापगते, बुलडाण्याचे वानखेडे, ना. स. फरांदे, उत्तमराव पाटील, वामनराव परब, हशू अडवाणी यांनी किती खस्ता खावून पक्ष वाढवला. याची मला पूर्ण कल्पना आहे. तो जनसंघ किंवा नंतरचा भाजप आज राहिलेला नाही. अशा वेळी तर तुमची जास्त गरज आहे. त्यामुळे तुम्ही सत्कारसभेत जो विचार मांडलात तो विचार मनातून काढून टाका. तुमच्यासारख्या नेत्याची देशाला गरज आहे. विकासकामात तुम्ही राजकारण कधी आणले नाहीत. कोणाला संपवण्याची भाषा केली नाहीत. सभ्य सुसंस्कृत राजकारण कसे करावे, याचे जे या महाराष्ट्रात आदर्श आहेत, त्यात तुम्ही आहात. राजकीय मतभेद असतील आणि आहेतही; पण त्याच्या मर्यादा जाणणारे तुम्ही आहात, म्हणूनच मोकळेपणाने गिरीशबाबूंच्या सत्कारात तुम्ही बोलू शकता. सत्ता येईल आणि जाईल. पदे येतील आणि जातील; पण माणुसकीचे नातं सर्वश्रेष्ठ आहे. ते ज्या दिवशी संपेल, त्या दिवशी या देशाच्या अध:पतनाला सुरुवात होईल.

अशा वेळी ‘अरुणी’ होऊन राजकारणाचे गढूळ पाणी अडवण्यासाठी कदाचित देहाचा आडवा बांध घालावा लागेल. तरच ‘धोम्यऋषींना’ आपल्या शिष्याने देशाला उपयोगी काम केले, हे समाधान वाटेल. तुम्ही समाजकारणात राहा, राजकारणात राहा, सत्ताकारणातही राहा आणि गिरीशबाबूंना बरोबर ठेवा, अशा सगळ्या चांगल्या संस्काराचे नेतेच देशातील आजचे घाणेरडे वातावरण बदलू शकतील. गिरीशबाबूंच्या सत्कारातून हाच संदेश महाराष्ट्रात गेलेला आहे.

‘रामशास्त्री’ रामण्णा

“पूजा-अर्चा, कर्म-कांड यामध्ये वेळ घालवायचा असेल तर पेशवाईचे पंतप्रधानपद सोडून गंगाघाटावर जाऊन तपश्चर्या करा...” अशा स्पष्ट शब्दांत माधवराव पेशवे यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणारे त्यावेळचे न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांची आठवण व्हावी, एवढ्या परखड शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ए. व्ही. रामण्णा यांनी रांची येथील भाषणात देशातील विविध वाहिन्यांना खडसावलेले आहे.

मुख्य न्यायमूर्ती रामण्णा यांनी प्रसार माध्यमांमध्ये ‘कुडमुडी’ न्यायालये हिरिरीने जी मते मांडतात त्यावर आक्षेप घेतलेला आहे. एवढेच नव्हे, तर वृत्त वाहिन्या आणि समाज मांध्यमांना देशाची प्रगती, समृद्धी आणि शांततापूर्ण विकास घडवण्याचा भाग म्हणून तुम्ही किती काम करता? असा प्रश्नही विचारला आहे. त्याहीपेक्षा आजच्या लोकशाहीच्या या काळात मुख्य न्यायमूर्तींनी जी भीती व्यक्त केली आहे, ती या सरकारला आणि त्यांच्या कारभाराला शोभा देणारी नाही. न्यायमूर्तींवर हल्ले वाढत आहेत आणि ज्या गुन्हेगारांना न्यायमूर्ती गजाआड पाठवतात किंवा अन्य शिक्षा फर्मावतात ते न्यायमूर्ती निवृत्त झाल्यानंतर, त्यांना सुरक्षा मागण्याची वेळ आली आहे! सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची ही टिपण्णी आजच्या सामाजिक वातावरणातील असुरक्षितता ठळकपणे नोंदवणारी आहे. यापूर्वी या देशातील अनेक न्यायमूर्तींनी गुन्हेगारांना शिक्षा सुनावलेली आहे. अनेक गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे; पण त्यावेळी राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालेले नसल्यामुळे निवृत्त झाल्यावर अशा न्यायमूर्तींना सुरक्षेची गरज कधीच वाटली नव्हती. आताच्या मुख्य न्यायमूर्तींना याची गरज वाटावी, याचाच अर्थ आजचे सामाजिक वातावरण, कायद्याला न जुमानणारे, पदांना न जुमानणारे सार्वजनिक धटिंगणपणाचे झालेले आहे आणि ही गोष्ट सरकारला भूषणावह नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी कडक ताशेरे ओढल्यानंतर काही फरक पडेल, असे कोणी मानत नाही. कारण आजची सडलेली व्यवस्था दुरुस्त होणे शक्य नाही; पण सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य पदावर राहून आपले मत ठामपणे मांडणारा न्यायमूर्ती या देशात आहे, हासुद्धा या देशातील लोकशाहीला संरक्षण देणाऱ्या रक्षकाची भूमिका घेत असलेला एक न्यायाधीश आहे, याचे समाधान आहे. म्हणून ‘रामशास्त्री’ रामण्णा यांचे मन:पूर्वक अभिनंदन....

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in