नितीशकुमार यांनी उधळला भाजपचा डाव

२०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि जेडीयू आघाडीने सत्ता मिळवली होती.
नितीशकुमार यांनी उधळला भाजपचा डाव

बिहारच्या २४३ जणांच्या विधानसभेत बहुमतासाठी १२२ संख्याबळाची आवश्यकता आहे. राष्ट्रीय जनता दलाचे ७९ आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) ४५ या दोन पक्षांच्या एकत्र येण्यातूनच बहुमताचा आकडा गाठला जातो. तरीसुद्धा काँग्रेसच्या १९, कम्युनिस्ट पक्षाचा (मार्क्सवादी-लेनिनवादी) १२, जीतनराम मांझी यांच्या हम पक्षाच्या चार, सीपीआय, सीपीएमच्या प्रत्येकी दोन आणि अपक्ष एक अशा सगळ्यांचे मिळून १६४ सदस्यांचे महागठबंधन आकाराला आले. ७७ सदस्यांचा भारतीय जनता पक्ष सत्तेतून बाहेर जाऊन प्रमुख विरोधी पक्ष बनला. एका दिवसात बिहारमधले राजकीय चित्रच बदलून गेले.

२०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि जेडीयू आघाडीने सत्ता मिळवली होती. केंद्र-राज्य अशा दोन्हीकडील सत्तेत भाजप असल्यामुळे डबल इंजिन सरकार असले, तरी त्याचा उपयोग बिहारचे मागासलेपण दूर होण्यासाठी झाल्याचे कोणत्याही पातळीवर दिसून येत नाही. दीर्घकाळ सत्तेत असलेल्या नीतिशकुमार यांना त्यासाठी जबाबदार धरता येते; परंतु केंद्रानेही त्यांना आवश्यक ते सहकार्य केल्याचे दिसत नाही. अर्थात भाजप आणि जेडीयू यांच्यात काडीमोड होण्यामागे हा विकासाचा मुद्दा नाही. मुद्दा आहे, तो पूर्ण राजकीय स्वरूपाचा आहे. भारतीय जनता पक्ष ज्या ज्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांना सोबत घेतो, तिथे तिथे संबंधित पक्षांना गिळंकृत करून त्यांची जागा व्यापण्याचा प्रयत्न करतो. पंजाबमध्ये अकाली दलाला तो अनुभव आला. महाराष्ट्रात शिवसेनेने तो अनुभव घेतला. बिहारमध्ये जेडीयूला तसाच अनुभव आला. जेडीयूची अवस्था शिवसेनेसारखीच होण्याची पाळी आली होती; परंतु नीतिशकुमार वेळीच सावध झाले आणि त्यांनी भाजपचा डाव उधळून लावला.

भाजपसोबतची आघाडी तोडण्यामागे जी कारणे समोर आली आहेत, ती पाहिल्यानंतर भाजपची वृत्ती आणि रणनीती या दोन्हींवर प्रकाश पडतो. केंद्रीय मंत्रिमंडळात आपल्या पक्षाचा कुणीही सदस्य सहभागी होणार नाही,असे नीतिशकुमार यांनी जाहीर केले असताना जेडीयूचे राज्यसभा सदस्य आरसीपी सिंह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. या आरसीपी सिंह यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष जेडीयूमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा नीतिशकुमार यांच्यासह जेडीयूच्या नेत्यांचा आरोप आहे. आरसीपी सिंह यांच्या रूपात बिहारमध्ये एकनाथ शिंदे उभा करण्याचा प्रयत्न भाजपने केला. त्यांच्या माध्यमातून जेडीयूमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यातून पक्षांमधील मतभेद वाढत चालले होते. दरम्यान, आरसीपी सिंह यांची राज्यसभेची मुदत संपल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचाही राजीनामा द्यावा लागला. आरसीपी सिंह यांच्या राजीनाम्यानंतर विषय संपायला हवा होता; परंतु तो तसा न संपता तिथून त्याने गती घेतल्याचे पाहायला मिळते. मधल्या काळात राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ आयोजित भोजन समारंभ, नीती आयोगाची बैठक यासह अन्य काही महत्त्वाच्या बैठकांना गैरहजर राहून नीतिशकुमार यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू एकत्र सत्तेत असताना स्थानिक भाजपच्या नेत्यांशी नीतिशकुमार यांचा संवाद उरला नव्हता. पूर्वी सुशील मोदी उपमुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांच्याशी नीतिशकुमार यांचा सुसंवाद होता. भाजपने सुशील मोदी यांना राज्यसभेत नेऊन सोडले. बिहार विधानसभेचे अध्यक्ष असलेले भाजपचे विजयकुमार सिन्हा यांच्याशी नीतिशकुमार यांचे मतभेद टोकाला गेले. त्यातून दोन्ही पक्षांमधील अंतर वाढत गेले. भाजपने जेडीयूच्या आमदारांना कोट्यवधी रुपये देण्याचे तसेच मंत्रिपदाचे अमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप नीतिशकुमार यांच्यावतीने करण्यात आला. त्यासंदर्भातील सहा रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचा नीतिशकुमार यांचा दावा आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीने आपला पक्ष संपवण्याचा प्रयत्न भाजपने चालवला, अशा परिस्थितीत भाजपसोबत अधिक काळ सत्तेत न राहण्याचा निर्णय घेऊन नीतिशकुमार यांनी भाजपसोबतची युती तोडली.

नीतिशकुमार यांनी केलेल्या खेळीमुळे केवळ बिहारच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणातील रंगत वाढणार आहे. गेले काही महिने राष्ट्रीय राजकारणात चाचपडणाऱ्या विरोधकांच्या आघाडीला नीतिशकुमार यांच्या साथीमुळे बळ मिळणार आहे. भारतीय जनता पक्षाने एकीकडे शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले, त्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत असताना त्याच दिवशी बिहारमध्ये नीतिशकुमार यांनी भाजपशी असलेली युती तोडली. एकीकडे भाजपच्या सत्तेचा विस्तार होत असताना दुसरीकडे सत्तेतून पायउतार व्हावे लागत होते. महाराष्ट्र आणि बिहारमधील या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध नाही, असे कितीही म्हटले तरी या दोन्ही घटनांचा संबंध जाणवल्यावाचून राहत नाही. योगायोगाने महाराष्ट्रातील घटना आधी घडली. त्यामुळे नीतिशकुमार सावध झाले आणि त्यांनी आपल्या सरकारवरील संकट परतवून लावले. महाराष्ट्रातील सत्तांतर घडलेच नसते, तर मात्र कदाचित नीतिशकुमार गाफील राहिले असते आणि यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले असते. महाराष्ट्राला लागलेली ठेच पाहून बिहार शहाणा झाला असेच म्हणावे लागेल. भारतीय जनता पक्षाचे जे जुने मित्रपक्ष होते, शिवसेना आणि अकाली दल त्यांच्याखालोखाल नीतिशकुमार यांची भाजपशी दीर्घकाळ सोयरीक होती. १९९६ साली नीतिशकुमार जनता दलातून बाहेर पडून त्यांनी समता पक्षाची स्थापना केली. त्यावेळी लालुप्रसाद यादव यांच्या आक्रमक राजकारणाला वैतागून आपले अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाला सोबत घेतले. १९९६ ते २०१३ अशी १७ वर्षे दोन्ही पक्ष एकत्र राहिले. त्यावेळचा भाजप हा अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचा भाजप होता, त्यामुळे नीतिशकुमार यांना काही अडचण आली नाही; परंतु भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केल्यानंतर नीतिशकुमार यांनी २०१३मध्ये भाजपशी असलेले संबंध तोडले. २०१४मध्ये त्यांनी पुन्हा लालुप्रसाद यादव यांच्याशी आघाडी केली. २०१४ला देशात सत्तांतर झाले आणि त्या काळात नरेंद्र मोदी यांचा मोठा करिश्मा असतानाही नीतिशकुमार-लालुप्रसाद यादव यांच्या आघाडीने २०१५च्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवले; परंतु दोन वर्षांत पुन्हा नीतिशकुमार यांनी पलटी मारली आणि राष्ट्रीय जनता दलासोबतची युती तोडून पुन्हा भाजपला सोबत घेऊन सत्ता टिकवली. २०१९च्या विधानसभा निवडणुकाही भाजप-जेडीयू आघाडीने लढवल्या आणि बहुमत मिळवले. यावेळी भारतीय जनता पक्ष ७५ जागा मिळवून मोठा पक्ष बनला तरीही त्यांनी ४५ जागा मिळवलेल्या नीतिशकुमार यांना मुख्यमंत्रिपद दिले. बिहारमधील सरकार सुरळीत चालले असताना राष्ट्रीय पातळीवर ज्या घडामोडी घडत होत्या, त्या घडामोडींमुळे नीतिशकुमार अस्वस्थ होते. त्यांनी केंद्र सरकारसोबत असहकाराची भूमिका घेतल्याचे अनेक प्रसंगांतून दिसून आले. त्यातून दोन्ही पक्षांमधील दरी वाढत गेली आणि त्याची परिणती भाजप आणि जेडीयू यांची आघाडी तुटण्यामध्ये झाली. नीतिशकुमार हे राजकारणातील मुरब्बी खेळाडू असल्यामुळे त्यांनी आधीच राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसशी संधान साधले होते. त्यांच्याशी बोलणी पूर्ण झाल्यानंतरच त्यांनी निर्णायक पावले टाकण्यास सुरुवात केली. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या एक पाऊल पुढे राहण्याचा प्रयत्न केला. ही सावधगिरी नीतिशकुमार यांनी दाखवली नसती, तर त्यांचे उद्धव ठाकरे झाल्यावाचून राहिले नसते!

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in