आता ‘फाइव्ह जी’चे पर्व!

देशासाठी परिवर्तनाचा क्षण असल्याचे दूरसंचार उद्योगात कार्यरत असलेल्या उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही म्हटले आहे
आता ‘फाइव्ह जी’चे पर्व!

माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची वेगाने प्रगती सुरू आहे. आता ‘फाइव्ह जी’ची प्रतीक्षा संपली असून आता लवकरच भारतात ‘फाइव्ह जी’ सेवा उपलब्ध होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला संबोधित करताना घोषित केले होते. आता पंतप्रधानांच्या हस्ते शनिवारी नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या सेवेचा प्रारंभ झाल्याने भारताने एका नव्या युगात पाऊल टाकले आहे. देशातील १३० कोटी जनतेला देशाकडून आणि देशातील दूरसंचार उद्योगांकडून एक अद्भुत भेट मिळाली असल्याचे सांगून या सेवेमुळे संधींची अमर्याद क्षितिजे खुली झाली आहेत, असे पंतप्रधान या प्रसंगी म्हणाले. या नव्या सेवेमुळे शिक्षणापासून ते शेतीपर्यंत; तसेच आरोग्य सेवेच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल होणार आहेत. ‘फाइव्ह जी’ सेवेचा आरंभ हा देशासाठी परिवर्तनाचा क्षण असल्याचे दूरसंचार उद्योगात कार्यरत असलेल्या उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही म्हटले आहे. ‘फाइव्ह जी’ सेवेचा प्रारंभ झाला असला तरी सध्या ही सेवा भारतातील १३ शहरांना उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, पुणे आदी शहरांचा समावेश आहे; पण पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत ही सेवा देशात सर्वत्र उपलब्ध करून देण्याची योजना आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या ‘फोर जी’ सेवेपेक्षा या सेवेची गती दहा पटींनी अधिक असणार आहे. या सेवेमुळे रोबोटिक शस्त्रक्रिया अचूकपणे करता येतील. तसेच घरबसल्या शिक्षण घेणे सुलभ होईल. ऑनलाइन खरेदी अधिक गतीने करता येईल. शेअर बाजारातील घडामोडी अधिक वेगाने समजणे शक्य होणार आहे. मोबाइलमध्ये इंटरनेटचा वेग वाढल्याने मोबाइलवर केली जाणारी कामे वेगाने आणि सहजतेने करणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे चित्रपट, विविध गेम्स, व्हिडीओ, विविध अॅप्स यासह अन्य अनेक गोष्टी कमी वेळेमध्ये आणि सहजपणे डाउनलोड करणे शक्य होणार आहे. तसेच जे व्हिडीओ कॉल्स केले जातात त्यांचा दर्जाही या सेवेमुळे सुधारणार आहे. भारतात सध्या इंटरनेटचा वेग १४ मेगॅबीट्स पर सेकंड (एमबीपीएस) असा आहे. ‘फाइव्ह जी’ सेवेमुळे या वेगात किमान दहापट वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शनिवारी या सेवेचा शुभारंभ होताच एअरटेल या कंपनीने यामध्ये आघाडी घेऊन मुंबईसह देशातील आठ शहरांमध्ये ही सेवा सुरू केली. आता एअरटेलच्या पाठोपाठ रिलायन्स जिओ ही कंपनीही ही सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. या दोन कंपन्यांच्या तुलनेत व्होडाफोन आयडिया ही कंपनी बरीच मागे असून त्या कंपनीकडून ‘फाइव्ह जी’ सेवेसाठी काही ठोस कालावधी घोषित करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पनवेल येथे एका व्हर्च्युअल कार्यक्रमात उपस्थित राहून शुभारंभ कार्यक्रमात भाग घेतला. ‘फाइव्ह जी’ सेवेचा शुभारंभ हा क्रांतिकारी क्षण असल्याचे सांगून या नव्या तंत्रज्ञानामुळे शिक्षणासह सर्वच क्षेत्रात राज्याची प्रगती होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. इंटरनेटला मिळणाऱ्या वेगाचा फायदा अभ्यासासाठी करून घ्या. गेम आणि सिनेमे पाहण्यासाठी करू नका, असा सल्ला या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी उगवत्या पिढीला दिला. एकप्रकारे ‘फाइव्ह जी’ सेवा ही सदुपयोगासाठी वापरली जावी, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना दिला. नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलताना उद्योगपती मुकेश अंबानी यांनी, भारतात जरी ही सेवा विलंबाने सुरू झाली असली तरी उच्च दर्जाची आणि परवडणारी सेवा देऊन आम्ही प्रथम क्रमांकावर येऊ, असे सांगितले. भारताने या सेवेचा शुभारंभ करून डिजिटल इंडियाच्या दिशेने मोठी झेप घेतली असल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. एकूणच ‘फाइव्ह जी’ सेवेचा प्रारंभ झाल्याने एका नव्या पर्वाचा प्रारंभ झाला आहे. देशातील जनतेला या सेवेचा नक्कीच लाभ होणार आहे; पण सर्वसामान्य जनतेला ही सेवा सहजपणे परवडेल, याकडे संबंधितांनी लक्ष दिले पाहिजे. या सेवेचा लाभ घेऊन शिक्षणापासून शेती, वैद्यकीय क्षेत्र आदींमध्ये अधिकाधिक उच्च पातळी कशी गाठता येईल, याकडे लक्ष द्यायला हवे. या सेवेचा उपयोग सत्कारणांसाठी कसा करता येईल, याकडे तरुण पिढीने जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे. जगातील प्रगत देशांशी भारत स्पर्धा करीत असून त्या देशांपेक्षा, अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारताने अधिक उंची गाठावी, अशी सर्वच देशवासीयांची अपेक्षा आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in