आता बिहारमध्येही राजकीय खेळ

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पाश्‍र्वभूमीवर तेजस्वी यादव यांच्या या राजकीय नाट्याने पाटण्यापासून दिल्लीपर्यंत खळबळ उडाली.
आता बिहारमध्येही राजकीय खेळ

महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यादरम्यान बिहारमध्ये एक मोठा खेळ झाला असून लवकरच तिथे सत्तापालट होण्याची शक्यता आहे. ‘मुस्लिमांचा सर्वात मोठा पुरस्कर्ता’ अशी ओळख असणाऱ्या असदुद्दीन ओवैसी यांच्या ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन’ (एआयएमआयएम) पक्षात फूट पडली आहे. त्यांच्या पाचपैकी चार आमदारांनी राष्ट्रीय जनता दलामध्ये प्रवेश करून ओवैसींना मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पाश्‍र्वभूमीवर तेजस्वी यादव यांच्या या राजकीय नाट्याने पाटण्यापासून दिल्लीपर्यंत खळबळ उडाली. आता ८० आमदारांसह राष्ट्रीय जनता दल हा विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष बनला आहे. बिहारच्या सिंहासनाचा ताबा मिळवण्यासाठी तेजस्वी यादव यांना आता फक्त सहा आमदारांची गरज आहे. पडद्यामागे सुरू असलेला खेळ पाहता राष्ट्रीय जनता दलाने ठरवलं आणि काही तोडफोड केली तर तिथे सत्तांतर होईल, असं राजकीय विश्‍लेषकांचं मत आहे.

‘एआयएमआयएम’च्या चार आमदारांच्या आगमनाने बिहारमधल्या महाआघाडीकडे आता ११६ आमदार आहेत. बिहार विधानसभेत बहुमतासाठी १२२ आमदारांची गरज आहे. लोकशाहीत आमदारांची पक्षांतरं ही नवी बाब नाही. पक्ष बदलणारे आमदार सहसा सत्ताधारी पक्षासोबत जातात, कारण त्या बदल्यात त्यांना सत्तेचा आनंद मिळतो; मात्र ओवैसींच्या या चार आमदारांनी राष्ट्रीय जनता दलासोबत जाऊन राजकारणात नवी परंपरा सुरू केली. राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचं सरकार स्थापन झालं तर त्यांना मंत्री करण्याचं आश्‍वासन दिलं गेलं असावं. कारण राजकारणात कोणीही स्वार्थाशिवाय एवढा मोठा निर्णय घेत नाही; मात्र या आमदारांच्या राजकीय निर्णयाचं कौतुक करायला हवं, कारण राष्ट्रीय जनता दल सध्या विरोधात असल्याने त्यांनी मोठी जोखीम पत्करली आहे. तेजस्वी यादव आणखी सहा आमदारांना सोबत घेण्याचा जुगार खेळून सरकार स्थापन करू शकतील की नाही, हे सध्या कोणालाच माहीत नाही; पण राजकीय विश्‍लेषकांच्या मते नितीशकुमार सरकारचे दिवस मोजण्याइतकेच आहेत आणि महाआघाडीचं सरकार स्थापन होणं निश्चित असल्याची खात्री पटल्यानेच ‘एआयएमआयएम’ च्या चार आमदारांनी मार्ग बदलला आहे. आता मोठा प्रश्‍न असा आहे की, तेजस्वी यादव बहुमताचा आकडा गाठण्यासाठी छोट्या पक्षांचे आणखी सहा आमदार फोडतील की, सत्ता मिळवण्यासाठी पडद्याआडून आणखी काही मोठे डावपेच खेळले जातील? हा प्रश्‍न उपस्थित करण्यामागचं मोठं कारण म्हणजे या संपूर्ण राजकीय घडामोडींनी नवं वळण घेतलं आहे. नितीशकुमार राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोडू इच्छितात का, हा प्रश्‍नही आहे.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांना राष्ट्रीय आघाडीतून बाहेर पडून आता महाआघाडीसोबत यायचं आहे का? जुन्या फॉर्म्युल्याच्या धर्तीवर तेजस्वी यांना उपमुख्यमंत्री आणि आघाडीतल्या अन्य नेत्यांना महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री करून त्यांच्या सरकारची उरलेला टर्म सुरक्षित करायची आहे का, हा खरा प्रश्‍न आहे. एक तर भाजपने नितीशकुमार आणि त्यांच्या पक्षाचं खच्चीकरण कसं केलं, हे सर्वज्ञात आहे. शिवाय नितीशकुमार यांनी जातनिहाय जनगणना, एनसीआर, सीसीएवरून भाजपच्या विरोधात भूमिका घेतली. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यावरूनही दोन्ही पक्षांमध्ये चांगलाच कलह झाला.

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी भाजपने संयुक्त जनता दलाच्या नेत्यालाच फोडलं. दुसरीकडे, संयुक्त जनता दलातही सारं काही आलबेल नाही. नितीशकुमार यांच्याविरोधात नाराजी वाढत आहे. असं झालं तर सारं प्रकरण अंगलट येईल, कारण बिहार भाजपचे नेतेही नितीशकुमार यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी आतूर झाले आहेत. तथापि त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच ओवैसींच्या पक्षाचे आमदार मुख्य विरोधी पक्षात घुसले असले तरी सर्वात मोठा पक्ष राष्ट्रीय जनता दल हा सभागृहात स्थापन झाला आहे. एकंदर खेळ सुरू झाला आहे. भाजप आणि संयुक्त जनता दलाचं सरकार कोसळलं की, राज्यपालांना सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाला सत्तास्थापनेसाठी बोलवावं लागेल. थोडक्यात, इकडे महाराष्ट्रात जोरदार राजकीय उलथापालथ होत असताना बिहारमध्ये उलथापालथ झाली आहे. त्यामुळे तिथल्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय जनता दलाने भाजपला मागे टाकलं आहे. विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी)च्या आमदारांच्या विलीनीकरणानंतर भाजपच्या ७७ जागा आहेत. राष्ट्रीय जनता दलात सामील झालेल्या ‘एआयएमआयएम’च्या आमदारांमध्ये मोहम्मद इझहर अरफी, शाहनवाज आलम, रुकानुद्दीन अहमद आणि अन्जार नईमी यांचा समावेश आहे. आता ‘एआयएमआयएम’कडे फक्त एकच आमदार उरला आहे. या विलीनीकरणाला संयुक्त जनता दलाची मौन संमती मिळू शकते, असं बिहारच्या राजकीय जाणकारांचं मत आहे.

ताज्या विलीनीकरणात जनता दलाचे मनोज झा यांचा मोठा हात असल्याचं या पक्षाच्या सूत्रांचं म्हणणं आहे. व्हीआयपी पक्षाचं विभाजन आणि त्यांचे तीन आमदार भाजपमध्ये सामील झाल्याने भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष बनला होता. त्यांनी राष्ट्रीय जनता दलाला मागे टाकलं होतं; पण आता राष्ट्रीय जनता दल हा सर्वात मोठा पक्ष बनला आहे. भाजप दुसऱ्‍या क्रमांकावर घसरल्याने संयुक्त जनता दलाच्या छावणीत आनंदाचं वातावरण आहे. बिहार निवडणुकीच्या निकालापासून संयुक्त जनता दल विस्ताराच्या शर्यतीत कायम होता. या पक्षाने अपक्ष आमदार सुमित सिंग, लोकजनशक्ती पक्षाचे (एलजेपी) आमदार राजकुमार सिंग आणि बहुजन समाज पक्षाचे (बसपा) आमदार मोहम्मद जमान खान यांना आपल्या गोटात ओढलं. संयुक्त जनता दलाच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रीय जनता दल आता नंबर वन पक्ष आहे. सर्वात मोठा पक्ष बनल्यानंतर भाजपने अधिक मंत्रिपदांची मागणी केली होती; पण या नव्या घटनेच्या आडून संयुक्त जनता दलाला भाजपच्या जखमेवर मीठ चोळण्याची संधी मिळाली. राजकीय भाष्यकार डॉ. संजय सिंह यांच्या मते ‘एआयएमआयएम’चे आमदार संयुक्त जनता दलाच्या मंजुरीशिवाय राष्ट्रीय जनता दलात सामील होऊ शकत नव्हते, कारण ते सत्ताधारी पक्षाच्याही संपर्कात होते. या घटनेद्वारे संयुक्त जनता दलाने भाजपला स्पष्ट संदेश दिला आहे की, पक्ष सर्व राजकीय हालचाली गांभीर्याने घेणार आहे. आता राष्ट्रपतिपदाची निवडणूक संपल्यानंतर काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मुस्लीम, यादव आणि दलितांच्या मतांच्या बळावर राष्ट्रीय जनता दलाने बिहारमध्ये अनेक वर्षं राज्य केलं. त्यांचं राजकारण अशा वेगवेगळ्या समीकरणांवर अवलंबून होतं. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांच्या ‘एआयएमआयएम’ या पक्षाने मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाशी युती केली होती. या युतीचा फटका लालुप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या युतीला बसला. तरीही राष्ट्रीय जनता दलाने सर्वाधिक जागा जिंकून पहिल्या क्रमाकांचा पक्ष हे आपलं स्थान कायम ठेवलं होतं. काँग्रेसने जागावाटपात क्षमतेपेक्षा जास्त जागा पदरात पाडून घेतल्या; परंतु काँग्रेसला त्या निवडून आणता आल्या नाहीत.

काँग्रेसचा आततायीपणा आणि एमआयएम-बहुजन समाज पक्षाच्या युतीने लालुप्रसाद यादव यांच्या पक्षाशी जागावाटप न करता दाखवलेल्या आडमुठेपणामुळे बिहारमध्ये संयुक्त जनता दल-भाजप युतीची सत्ता आली. ‘एआयएमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाटणा इथे म्हटलं होतं की, बिहारमधल्या कोणत्याही पक्षाशी युती करून आपण आपली ओळख गमावू इच्छित नाही. सीमांचलमध्ये त्यांचा पक्ष मजबूत होत असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. थोडक्यात, असदुद्दीन ओवैसी विचार करत राहिले आणि तेजस्वी यादव यांनी त्यांना त्याच सीमांचलमधून बाहेर फेकून दिलं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in