पृथ्वी वाचवू या...

पृथ्वी हे आपले एकमेव घर आहे आणि तिचे आरोग्य आणि स्थिरता मानवी जीवनासाठी आवश्यक आहे. पृथ्वीवरील हवामान सामान्य असेल, तरच जीवसृष्टी टिकून राहू शकते...
पृथ्वी वाचवू या...

- मिलिंद बेंडाळे

वसुंधरा दिन विशेष

पृथ्वी हे आपले एकमेव घर आहे आणि तिचे आरोग्य आणि स्थिरता मानवी जीवनासाठी आवश्यक आहे. पृथ्वीवरील हवामान सामान्य असेल, तरच जीवसृष्टी टिकून राहू शकते. निसर्गाने त्यात बदल केला तर संपूर्ण मानवी संस्कृती पापण्या लवतात न लवतात तोच नाहीशी होऊ शकते; पण शोकांतिका अशी आहे की, या विषयावर जगातील आघाडीच्या राजकारण्यांनी वारंवार वेगवेगळ्या घोषणा करूनही पृथ्वीवरील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. निसर्ग आपल्याला वारंवार इशारा देत आहे. अवकाळी पाऊस, बर्फवृष्टी, पूर, दुष्काळ अशी परिस्थिती अधिकाधिक बिघडत असतानाही आपण निसर्गाच्या या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहोत. पृथ्वीवर जीवसृष्टीच नसेल तर प्रगती, पैसा आणि जगभरच्या शर्यतीत अधिक पुढे जाण्यात काय अर्थ आहे?

दरवर्षी २२ एप्रिल रोजी जगभरातील लोक ‘जागतिक पृथ्वी दिन’ साजरा करतात. आपण आपल्या ग्रहाचे संरक्षण केले पाहिजे, याची स्वत:लाच आठवण करून देणारा हा दिन आहे. पृथ्वी ही एकमेकांशी जोडलेल्या आणि परस्परावलंबी असलेल्या भौगोलिक भागांची एक जटिल प्रणाली आहे, जी जीवन टिकवून ठेवते. आपण श्वास घेतो. पृथ्वी देत असलेल्या अन्नपदार्थावर जगतो. पृथ्वी आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पुरवते. तथापि, मानवी क्रियाकलापांनी ग्रहावर प्रचंड दबाव आणला आहे. त्यामुळे परिसंस्था आणि जैवविविधतेचे अपरिवर्तनीय असे नुकसान झाले आहे. हवामानबदल हा पृथ्वीला भेडसावणारा सर्वात महत्त्वाचा धोका आहे.

पृथ्वीचे सतत वाढत जाणारे तापमान, वितळणारे बर्फाचे आवरण आणि अत्यंत प्रतिकूल हवामानातील घटनांचा आपल्या ग्रहावर आधीच गंभीर परिणाम होत आहे. समुद्राची पातळी वाढत असून संपूर्ण परिसंस्था नष्ट होत आहे. त्यामुळे वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. हवामानबदलामुळे उष्माघात, श्वसनाचे आजार आणि संसर्गजन्य रोगांच्या वाढत्या घटनांसह मानवी आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या आहे. पृथ्वीवरील सर्व प्रकारचे वेगाने वाढणारे प्रदूषण पृथ्वीला घेरत आहे. पृथ्वी आणि तेथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आणत आहे. हवेतील आणि पाण्यातील विषारी रसायनांपासून ते महासागरातील प्लास्टिकच्या कचऱ्यापर्यंत प्रत्येक घटक पर्यावरण आणि वन्यजीवांचे नुकसान करत आहे. प्रदूषणामुळे होणारे जैवविविधतेचे नुकसान ग्रहाची हवामानबदलासाठीची लवचिकता कमी करते.

जागतिक वसुंधरा दिन १९७० मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून हा दिवस प्रत्येक प्रकारे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी, जनतेला जागरूक करण्यासाठी आणि हवामानबदलाबद्दल जगाला सतर्क करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जागतिक वसुंधरा दिनाचे उद्दिष्ट लोकांना पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांना कृतिशील करणे हे आहे. शैक्षणिक कार्यक्रम, ‘सोशल मीडिया’वरील मोहिमा आणि इतर कार्यक्रमांद्वारे पृथ्वीवरील मानवी विकासाच्या चुकीच्या कल्पनांबद्दल जागरूकता निर्माण केली जाते. जागतिक वसुंधरा दिन ही पर्यावरण संरक्षणाला समर्थन देणारी धोरणे आखण्याची, त्यासाठीचा प्रचार-प्रसार करण्याची संधी आहे. हरित वायूचे प्रमाण कमी करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे या उद्देशाने नवीन उपक्रम आणि धोरणे जाहीर करण्यासाठी राज्यसंस्था जागतिक पृथ्वी दिनाचा व्यासपीठ म्हणून वापर करू शकतात.

पृथ्वी दिन हा आता जागतिक कार्यक्रम बनला आहे. तो १९३ पेक्षा जास्त देशांमध्ये साजरा केला जातो. दरवर्षी एक अब्जहून अधिक लोक त्यात सहभागी होतात. वसुंधरा दिनाचा उद्देश व्यक्ती, समुदाय आणि सरकारांना पर्यावरणाच्या रक्षणासाठी शिक्षित करणे, प्रेरणा देणे, संघटित करणे हा आहे. ‘पृथ्वी दिन २०२४’ची नवी थीम हा संदेश पुढे नेईल, जबाबदार वर्तनाचा पुरस्कार करेल. त्यामुळे आपल्या ग्रहाचे संरक्षण होईल आणि सर्वांनाच शाश्वत भविष्य लाभेल. प्रदूषणाचा प्रभाव कमी करण्यासाठी आपण दैनंदिन जीवनात कोणते बदल करू शकतो, स्थानिक समुदायांना त्यांच्या शाश्वत विकासाच्या प्रयत्नांमध्ये अधिक चांगले समर्थन कसे देऊ शकतो, जागतिक स्तरावर पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व कसे वाढवू शकतो, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.

जसजसे आपण पुढे जात आहोत तसतसे पर्यावरणीय समस्यांबद्दल जागरूकता आणण्यात आणि बदलाचे समर्थन करण्यात पृथ्वी दिन महत्त्वाची भूमिका बजावत राहील. याद्वारे आपल्याला सभोवतालच्या जगात मूर्त बदल करण्याची संधी दिली जाते. आपण उचललेले प्रत्येक पाऊल कितीही लहान असले तरीही ते आपल्या ग्रहाचे संरक्षण आणि जतन करण्याच्या जागतिक प्रयत्नांमध्ये योगदान देत असते. या मोहिमेचे उद्दिष्ट सरकार, व्यवसाय आणि व्यक्तींना निरोगी, समृद्ध आणि न्याय्य भविष्याचा एकमेव मार्ग म्हणून हरित अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करणे असे आहे. पृथ्वीच्या तापमानवाढीला मानवी हस्तक्षेप कारणीभूत आहे. जीवाश्म इंधन अर्थव्यवस्था आणि जुन्या वारसा तंत्रज्ञानापासून दूर जाणे आणि आपल्या ग्रहाचे आरोग्य पुनर्संचयित करणारी, आपल्या प्रजातींचे संरक्षण करणारी आणि सर्वांना संधी देणारी एकविसाव्या शतकातील अर्थव्यवस्था तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

व्यवसाय, गुंतवणूकदार आणि वित्तीय बाजार यांनी त्यांच्या संस्था आणि समाजासाठी नानाविध उपक्रम राबवले पाहिजेत. सरकारांनी नागरिक, व्यवसाय आणि संस्थांना सार्वजनिक हितासाठी प्रोत्साहित केले पाहिजे आणि समान आणि शाश्वत जागतिक आर्थिक व्यवस्थेसाठी फ्रेमवर्क तयार केले पाहिजे. मतदार आणि ग्राहक या नात्याने नागरिकांनी सर्व स्तरांवर अशा शाश्वत उपायांसाठी प्रयत्न केले पाहिजेत. २२ एप्रिल रोजी ‘जागतिक पृथ्वी दिन’ साजरा केला जातो. वास्तविक, हा दिवस अमेरिकन सिनेटर गेलॉर्ड नेल्सन यांच्या विचारांची देणगी आहे. अनेक वर्षांपासून ते सर्वांसाठी पर्यावरणरक्षणाचा मार्ग शोधण्यात गुंतले होते. खरे तर आपण प्रत्येक दिवस वसुंधरा दिन मानून पृथ्वीच्या संरक्षणासाठी काहीतरी करत राहायला हवे; पण आपल्या कामात व्यस्त असलेल्या लोकांनी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त थोडाफार हातभार लावला तर पृथ्वीवरील ऋण कमी होऊ शकते. पृथ्वी ही एक अतिशय व्यापक संज्ञा आहे; ज्यामध्ये पाणी, हिरवळ, वन्यजीव, प्रदूषण आणि त्याच्याशी संबंधित नानाविध घटकांचा समावेश होतो. पृथ्वी वाचवणे म्हणजे सर्वांचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेणे; म्हणूनच प्रत्येक दिवस वसुंधरा दिन मानून तिच्या संरक्षणासाठी काही उपाय करत राहिले पाहिजेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in