तिची वटपौर्णिमा !

नानाविध पैलू, अस्तर आणि शिकवण तसंच संस्काराच्या हेतूने कथा-अपकथांची झालर असणारी आपली संस्कृती जगातल्या प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे
तिची वटपौर्णिमा !

सावित्रीने आपल्या पतीचे म्हणजेच सत्यवानाचे प्राण घेऊन जाणाऱ्या यमाशी तीव्र संघर्ष केला आणि त्याच्याकडून पतीचे प्राण परत आणून त्याचं मृत शरीर चेतनामय केलं, अशी कथा आहे. मुळातच कल्पनारम्यता, अतिशयोक्ती, उदात्तीकरण आदींचं सिंचन असणारी ही कथा आजच्या बुद्धिजीवी आणि ‘पुराव्यानिशी सिद्ध करा’ म्हणणाऱ्या पिढीला पटणारी नाही. वटपौर्णिमेनिमित्त त्यांना त्यातला गर्भितार्थ समजून सांगायला हवा.

नानाविध पैलू, अस्तर आणि शिकवण तसंच संस्काराच्या हेतूने कथा-अपकथांची झालर असणारी आपली संस्कृती जगातल्या प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. मानवी सभ्यतेच्या अनेक जिवंत खुणा मिरवणाऱ्या या संस्कृतीचा आविष्कार अनेक सण-समारंभ आणि रूढी-परंपरांमधून घडताना दिसतो. भारतीय समाज त्याचा आजही श्रद्धापूर्वक अवलंब करतो. सध्याच्या यांत्रिक, वैज्ञानिक, आधुनिक युगातही या पाऊलखुणा जपण्याचा आपला प्रयत्न असतो. म्हणूनच कालबाह्य वाटाव्यात अशा अनेक प्रथा, कर्म, उपचार आजही श्रद्धापूर्वक पार पडताना दिसतात. वटपौर्णिमा हा असाच एक सण आहे.

वैद्यकीय क्षेत्राने कमालीची प्रगती केली असली तरी मृत व्यक्तीमध्ये प्राण फुंकणारं कोणतंही तंत्र आज तरी मानवी दृष्टिक्षेपात नाही. कदाचित, भविष्याच्या गर्भात मानवाची ही प्रगती लपलेली असावी; मात्र आज तरी याबाबत अंधार असल्याने एखाद्या उच्चशिक्षित मुलीने वा महिलेने ही प्रथा नाकारली तर आश्‍चर्य वाटायला नको. दर काही वर्षांनी काळ बदलतो तसा समाजही बदलतो, समाजरूढी बदलते आणि समाजव्यवहारही बदलतो. सहाजिकच त्यानुरूप सणांचं साजरीकरण, अथवा त्याचा अन्वयार्थ बदलतो. म्हणूनच या बदललेल्या अर्थानिशी या सणाकडे बघण्याची गरज आहे.

सत्यवान-सावित्रीची कथा मुळात पती-पत्नीमधलं अथांग प्रेम, अलोट विश्‍वास आणि एकमेकांसाठी कितीही कष्ट घेण्याची तयारी या उदात्त भावनेवर आधारित आहे. सहाजिकच या सणाच्या निमित्ताने सात जन्म नाही तर किमान हा जन्म तरी पती-पत्नीने एकमेकांबरोबर सुखाने संसार करावा, ही अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. खेरीज पूर्वी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी संघर्ष केला असला तरी आजच्या समानतेच्या युगात पतीनेही पत्नीसाठी सर्व प्रकारचा त्याग करण्याची, तिच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या संघर्षाला तयार राहण्याची गरज आहे. उत्सवीकरण आणि अंध साजरीकरणापेक्षा, वडाच्या फांद्या ओरबाडून पूजा करण्यापेक्षा एकमेकांना सतत साथ देण्याचं वचन देणं हेच आजचं यथोचित वटपौर्णिमा पूजन आहे.

वटसावित्रीच्या कथेतल्या सावित्रीने समस्त स्त्रियांना लढण्याचं, चिकाटी दाखवण्याचं आणि अंतिम उद्दिष्टं गाठेपर्यंत पाय रोवून उभं राहण्याचं बाळकडू दिलं आहे. स्त्री मुळातच चिवट आणि करारी असते. स्वत:पेक्षा दुसऱ्यासाठी जगणारी असते. दुसऱ्यावर मायेचा, प्रेमाचा वर्षाव करणारी असते. मुलगी, पत्नी, सून, भावजय, नणंद, वहिनी, काकू, मामी, मैत्रीण अशा एक ना अनेक भूमिका बजावताना त्या प्रत्येक नात्यात तिचा जीव अडकलेला असतो. पतीला परमेश्‍वर मानणारी स्त्री आजही त्याच्या प्रेमळ दृष्टिक्षेपाने मोहरते. त्याच्या एखाद्या गोड शब्दाने सुखावते. अशी ही स्त्री अनेकांशी विविध नात्यांमध्ये बांधली गेलेली असली तरी प्रत्येक नातं दृढ करणारं तिच्यातलं मातृत्व अधिक प्रभावी असतं. म्हणूनच केवळ सत्यवानाची सावित्रीच नव्हे, तर अमक्या-तमक्याची वहिनी, कोणाची आई, कोणाची मामी अथवा काकू मानवी क्षमतेच्या मर्यादा लंघून त्या त्या नात्यातला प्राण जपताना बघायला मिळते. त्यामुळे वटपौर्णिमा हा सण सावित्रीच्या अनेक रूपांचा गौरव करणारा आहे, असंही म्हणता येईल.

खरंचच सध्याची सावित्री बदलली आहे. ती नवऱ्यासाठी प्राण पणाला लावते. नवऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी अविश्रांत प्रयत्न करणाऱ्या अनेक महिला सावित्रीचं प्रतिरूप म्हणून समोर येत राहतात. एक उदाहरण समोर आहे. एक दिवस एका मुलीचा नवरा घरी आला तो नोकरी गेल्याची दुखद बातमी घेऊन... खरं तर तो क्षण पायाखालची जमीन हलवणारा होता. तोल ढासळणं स्वाभाविक होतं; पण ती त्याला म्हणाली, ‘आज आपण बाहेर जेवायला जाऊ या. तेव्हा चांगले कपडे घाल, चेहरा हसरा ठेव. हीच तर आयुष्याची खरी सुरुवात आहे. तू एम.बी.ए. आहेस. आपण व्यवसाय सुरू करू. या व्यवसायात तू कोणाचा नोकर नाहीस तर मालक असशील. भागीदार म्हणून मला स्वीकारशील का?’ तिचे हे आश्‍वासक आणि आधार देणारे शब्द त्याच्यासाठी नवसंजीवनी ठरले नसते तरच नवल... आज त्यांचा संसार बहुअंगानं फुलला आहे. अशा वेळी ती वडाची पूजा करते की नाही, हा प्रश्‍न निरर्थक ठरतो. ती उपवास करते की नाही, या प्रश्‍नालाही अर्थ राहत नाही. इथे उरते ती फक्त सद्भावना. शेवटी हे सगळे सण प्रतीक स्वरूपात असतात. ही प्रतीकं शोधण्यात वेळ दवडायचा की, त्यातल्या गोड भावनेचा अंगीकार करून आयुष्य सुखी करायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे.

पत्नीची पीडा, वेदना ओळखायला हवी. घरादाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या या अन्नपूर्णेलाही विश्रांतीची गरज आहे हे जाणून घ्यायला हवं. रविवारी सकाळी ‘आज संडे स्पेशल काय?’ असा प्रश्‍न विचारण्यापेक्षा ‘आज संडे स्पेशल तुझ्यासाठी आहे’ असं म्हणायला हवं. एखाद वेळी या अन्नपूर्णेच्या हातातही भरलेलं ताट यायला हवं. व्रताची फलश्रुती एकांगी नको. केलेल्या व्रताचं फळ तिलाही मिळालं तर अधिक चांगलं नाही का?

महिलांना दुसऱ्याची काळजी घेणं, शुश्रुषा करणं शिकवावं लागत नाही. हे त्यांचे अंगभूत गुण आहेत; पण त्याची कदर करायला हवी. महिला पतीच्या स्वास्थ्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावण्यासही मागे-पुढे पाहत नाही. एका मैत्रिणीचे पती डॉक्टर होते. दुर्दैवाने त्यांना किडनीचा विकार जडला आणि प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नाही, हे सत्य समोर आलं. हे कळल्याबरोबर तिने क्षणाचाही विचार न करता स्वत:ची किडनी देऊ केली. दुसरं एक असंच उदाहरण आहे, एका तरुण जोडप्याचं. या जोडप्यातल्या तरुणाच्या किडन्या खराब झाल्या होत्या. दोघांनी घरच्यांविरुद्ध जाऊन लग्न केलेलं... हा मुलगा मराठी आणि बायको सिंधी... आपल्या पतीच्या किडन्या फेल आहेत आणि त्याच्यावरील उपचारांसाठी दीड-दोन लाख रुपये खर्च येणार आहे हे कळल्यावर त्या २५ वर्षीय तरुणीचं धाबं दणाणलं; पण या आघातातून सावरत तिने कंबर कसली. पतीच्या उपचारांचा खर्च भागवता यावा यासाठी ती वणवण भटकली. मित्रमैत्रिणींना गोळा करून सोशल कार्यक्रम सादर करत पैसे गोळा केले. असं करत तिने उपचारासाठी आवश्यक रक्कम जमवली. तिच्या कष्टामुळे तो युवक पुढची पाच वर्षं जगू शकला. खरं तर ही मुलगी सिंधी होती. तिने कधीही वडाची पूजा केली नसणार हे उघड आहे; पण म्हणून काय अडलं? तिने अंगीकारलेलं व्रत कमी दर्जाचं होतं का? अशी अनेक उदाहरणे देता येतील. म्हणूनच कर्मकांड नव्हे, तर प्रेमाची निखळ भावना महत्त्वाची...

आज घरोघरी अनेक सावित्री आजन्म हे व्रत अंगीकारताना दिसत आहेत. नवऱ्याशी पटत नसलं तरी संसाराचा डोलारा सांभाळत खंबीरपणे उभ्या आहेत. कारण त्यांना संसाररूपी रोपटं वृक्षामध्ये परावर्तित करायचं आहे. संसाराचा वटवृक्ष झाला तरच चिमण्या पाखरांना हक्काचा आधार मिळू शकतो. घरोघरच्या सावित्री याच जाणिवेने संसाराला टेकू देऊन खंबीरपणे उभ्या आहेत. देशातच नव्हे तर विदेशातही त्यांच्या या कर्तृत्वाचा सन्मान होताना दिसतो. मध्यंतरीच पार पडलेल्या एका चाचणीमध्ये भारतीय गृहिणींना गृहकर्तव्यदक्षतेमध्ये ५८ टक्के गुण मिळाले. जगभर पार पडलेल्या या चाचणीमध्ये भारतीय गृहिणींनी मिळवलेले हे सर्वोत्कृष्ट गुण आहेत. जागतिक पातळीवर भारतीय गृहिणींचा उल्लेख ‘अष्टभूजा’ म्हणून केला जातोय. खरोखरच या आठ हातांचं बळ घेऊन त्या कामं ओढताना दिसत आहेत. अशा या सावित्रींचा सन्मान व्हायला हवा. त्यांची किंमत ठेवायला हवी. असं झालं तर घेतल्या व्रताचं इच्छित फळ मिळालं असं म्हणता येईल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in