एक एक पाऊल पुढे

मन प्रसन्न ठेवणं तर गरजेचं आहेच, पण आधी आपलं ध्येय निश्चित करून त्यानुसार एक एक पाऊल पुढे टाकणंही तितकंच गरजेचं आहे
एक एक पाऊल पुढे

मन प्रसन्न ठेवण्याची गरज, त्यासाठीचे विचार, त्यापासून होणारे फायदे आपण मागील लेखात पाहिले. कोणतंही काम करण्यासाठी, कोणतंही ध्येय गाठण्यासाठी मन प्रसन्न ठेवणं तर गरजेचं आहेच, पण आधी आपलं ध्येय निश्चित करून त्यानुसार एक एक पाऊल पुढे टाकणंही तितकंच गरजेचं आहे. हो, रस्ता कितीही लांबचा असला, ध्येय कितीही उच्च असले तरी त्या दिशेने एक एक पाऊल टाकायला सुरुवात कराल तेव्हाच तर तिथे पोहचाल ना ?आपलं ध्येय कोणतंही असो, उच्च शिक्षणाचं, व्यापार वृद्धीचं, गडगंज पैसा कमविण्याचं किंवा इतर कुठलंही, आधी ध्येय निश्चित करणं हे आवश्यक असतं. आपल्याला कुठल्या गावी जायचं आहे तेच जर माहीत नसेल तर प्रवास तरी कुठल्या दिशेने करणार, आणि पोहचणार तरी कुठे ? आयुष्यात ध्येय निश्चित न केलेला माणूस कुठेच पोहचत नसतो. तुम्ही कधी गल्लीत हिंडणारी भटकी कुत्री पाहिली आहेत का ? ती दिवसभर गल्लीतल्या गल्लीत कधी इकडे तर कधी तिकडे फिरत असतात. दिवसभरात ती कमीतकमी दहा पंधरा किलोमीटर तरी इकडून तिकडे पळतात , पण तरी दिवस मावळतो तेव्हा ती त्या गल्लीतच असतात आणि कोणीतरी टाकलेला पोळीचा तुकडा खाऊन तिथेच झोपून जातात. ध्येय निश्चित न केलेला माणूस हा असाच असतो. तो धावपळ तर फार करतो, पण ती दिशाहीन असते. आयुष्यच्या शेवटी तो कुठेच पोहचलेला नसतो. याउलट, तुम्ही कधी साखरेचा दाणा तोंडात धरून आपल्या घराकडे निघालेली मुंगी पाहिली आहे का ? ती कितीही वेळा भिंतीवरून खाली पडली, तरी तो साखरेचा दाणा ती सोडत नाही. भिंतीवर चढणंही ती सोडत नाही. तिच्या रस्त्यात तुम्ही एखादी वस्तू ठेवून बघा. ती त्या वस्तूला वळसा घालून पुढे जाते. काहीही झाले, रस्त्यात कितीही अडथळे आले तरी सरतेशेवटी ती तोंडातला साखरेचा दाणा घेऊन आपल्या घरी पोहचतेच. कुत्र्याची ताकद आणि मुंगीची ताकद यांची तुलना होऊ शकते का ? कुत्र्याची बुद्धी ( ट्रेनिंग दिलेली कुत्री वासावरून गुन्हेगार आणि बॉम्ब शोधून काढतात.) आणि मुंगीची बुद्धी यांची तुलना होऊ शकते का ? तुमच्यात किती ताकद आहे, तुमच्याजवळ किती बुद्धी आहे याचा आणि तुमच्या यशाचा, तुमच्या ध्येय गाठण्याचा अजिबातच संबंध नसतो. ते अवलंबून असते ते तुम्ही तुमची ताकद, तुमची बुद्धी कशी आणि कशासाठी वापरता यावर. त्यामुळे तुमच्याजवळ ताकद कमी आहे, बुद्धी कमी आहे याचा न्यूनगंड अजिबात बाळगू नका. उठा. आपलं ध्येय निश्चित करा आणि कामाला लागा.आपलं ध्येय गाठण्यासाठी आधी आळस झटका. बरीचशी माणसं ही बा. सि. मर्ढेकरांच्या कवितेतल्या ' गणपत वाणी' सारखी असतात. आठवते का शाळेत असतांनाची बा. सि. मर्ढेकरांची ती कविता,' गणपत वाणी बिडी पितांनाचावायचा नुसतीच काडी ;म्हणायचा अन मनाशीच कीया जागेवर बांधिन माडी.आणि असा हा गणपत वाणी , त्याच किराणा दुकानात गोणपाटावर झोपत, स्वप्न रंगवत, निष्क्रिय आयुष्य घालवतो आणि तिथेच मरून जातो. आपला गणपत वाणी होऊ देऊ नका. फक्त स्वप्नं रंगवत बसू नका. उठा आणि आपल्या ध्येयप्राप्तीसाठी एक एक पाऊल ध्येयाच्या दिशेने पुढे टाकायला सुरुवात करा. हो, एक एक पाऊलच. एकावेळी दोन पाऊलं कोणीच चालू शकत नाही. अगदी हिमालयाची शिखरं सर करणारी माणसं सुद्धा एकावेळी एकच पाऊल उचलतात.आपलं ध्येय गाठण्यासाठी उतावळे होऊ नका. थोडं निसर्गाकडे पाहा. निसर्गात घडणारी प्रत्येक घटना ही ठरल्यावेळीच होत असते. सूर्योदय झाल्याबरोबर सूर्य माथ्यावर आला आहे असं कधी होत नाही. त्यासाठी निश्चित कालावधी जावाच लागतो. माथ्यावरचा सूर्य लगोलग मावळतीला गेला आहे, असंही कधीच होत नाही. त्यासाठीही वाट पाहावीच लागते. अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी पौर्णिमा येत नाही आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीच अमावस्या आली आहे असंही कधी होत नाही. या दोन्ही घटना घडण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी जावाच लागतोच. आज जमिनीत बी पेरले आणि दुसऱ्या दिवशी झाड उगवून त्याला तिसऱ्या दिवशी फळ लागले असं कधीच होत नाही. त्यासाठी आवश्यक तो वेळ लागतोच. निसर्गात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला ठराविक कालावधी लागतच असतो. तिथे उतावळेपणा चालत नाही. अकस्मात आणि घाईघाईने होणारी कोणतीही नैसर्गिक घटना ही आपत्ती ठरत असते. महाप्रलय , ढगफुटी, भूकंप ही त्याचीच काही उदाहरणं. आपणही निसर्गाचाच एक भाग आहोत. त्यामुळे निसर्गाचे सर्व नियम आपल्यालाही लागू होत असतात. त्यामुळे आपल्या आयुष्यात काही घटना घडण्यासाठी वाट पाहावी लागली तर ती शांतपणे पाहा. नऊ महिने पूर्ण होण्याआधी मातेच्या उदरातून मूल बाहेर आले तर तो गर्भपात असतो. त्यामुळे वेळेआधी यशाची अपेक्षा बाळगू नका, तसा प्रयत्नही करू नका. तो कदाचित तुमच्या यशस्वी कारकिर्दीचा गर्भपात असू शकतो.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in