पुन्हा ऐक्याचा जागर! भाजप सरकारविरुद्ध प्रमुख राजकीय पक्ष एकत्र

केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येऊन संघर्ष करण्याचा निर्णय घेतला होता.
पुन्हा ऐक्याचा जागर! भाजप सरकारविरुद्ध प्रमुख राजकीय पक्ष एकत्र

निवडणुका जवळ आल्या की विरोधी पक्षांमध्ये ऐक्य साधण्यासाठी बोलणी सुरु होतात. विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व कोणी करायचे, या आघाडीत कोणाला घ्यायचे आणि कोणाला घ्यायचे नाही यावरून मतभेद निर्माण होतात. त्यातून आघाडीची बिघाडी होण्याची शक्यताही असते. असे असले तरी विरोधी पक्षांचे ऐक्य साधण्याचे प्रयत्न थांबत नाहीत. अलीकडेच केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येऊन संघर्ष करण्याचा निर्णय घेतला होता. पण या आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने अदानी प्रकरणी जी भूमिका घेतली त्यामुळे विरोधकांच्या ऎक्याबाबत काहीसे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जी आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या शिष्टाईमुळे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील तणाव निवळला होता. असे तणावाचे प्रसंग निर्माण होत असले तरी विरोधी ऐक्य साधण्याचे थांबल्याचे दिसत नाही. आता बिगरभाजप पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न वेगाने सुरु झाल्याचे दिसून येत आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आता यासाठी पुढाकार घेतला आहे. नितीशकुमार यांचा पक्ष एकेकाळी भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक होता. पण त्या आघाडीशी त्यांचे बिनसल्याने त्यांनी वेगळी चूल मांडली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असताना ज्या लालू प्रसाद यादव यांच्या भ्रष्टाचारावर ते टीका करीत होते त्याच लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासमवेत बिहारमध्ये सरकार स्थापन करून ते मुख्यमंत्रीपदावर स्थानापन्न झाले! आता नितीशकुमार यांनी विरोधी ऐक्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत विरोधी पक्षांच्या एकजुटीवर मतैक्य झाले. आगामी निवडणुका एकत्रित लढविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली. काँग्रेसने या आघाडीत सहभागी होण्याची तयारी दर्शविली असली तरी काँग्रेसप्रणित महाआघाडीच्या सहभागी होण्यास आम आदमी पक्ष, ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष, समाजवादी पक्ष कितपत तयार होतील याबद्दल साशंकताच आहे.

तसेच राष्ट्रीय नेतृत्व करण्याचे स्वप्न उरी बाळगून असलेले भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांची काँग्रेसला वगळून वेगळी आघाडी निर्माण करण्याचे प्रयत्न चालविले होते. हे सर्व लक्षात घेऊन अधिकाधिक विरोधी पक्षांशी संवाद साधून त्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले जातील, असे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे. केवळ भाजपला सत्तेवरून दूर करण्यासाठी निर्माण होणारे ऐक्य कितपत प्रदीर्घ काळ टिकेल याबद्दल शंकाच आहे. कारण यातील काही नेत्यांनी आपल्या स्वार्थासाठी या आघाडीतून त्या आघाडीत अशा कोलांटउड्या मारल्या आहेत. त्यामुळे आपल्या मनासारखे न घडल्यास त्यांच्या निष्ठा किती टिकून राहतील याबद्दल शंकाच आहे. लोकशाहीमध्ये प्रबळ विरोधी पक्ष असणे अत्यंत अत्यावश्यक आहे. सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम असा पक्ष करीत असतो. पण विरोधकांना आता भाजपला सत्तेवरून दूर सारून केंद्रातील सत्ता हस्तगत करायची आहे. इच्छा खूप चांगली आहे पण त्या इच्छेची पूर्तता करण्यासारखी आपली स्थिती आहे का याचेही आत्मपरीक्षण करायला हवे! महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला असला तरी या आघाडीत अधून मधून कुरबुरी सुरु असतातच. ती कुरबुर थांबल्यास महाविकास आघाडी आपला प्रभाव दाखवू शकेल. विरोधी ऐक्याच्या प्रयत्नातील एक मोठा अडसर म्हणजे ही आघाडी कोणाचे नेतृत्व मान्य करणार? अनेकदा चर्चा केल्याप्रमाणे या आघाडीतील अनेक नेते पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी अनेक नेत्यांना आपापल्या महत्वाकांक्षा बाजूला ठेवाव्या लागतील. तसे करण्याची या नेत्यांची तयारी आहे का?

भाजपला दूर करण्यासाठी अशा संभाव्य आघाडीकडे प्रभावी आर्थिक कार्यक्रमही असायला हवा. केवळ भाजप नको, या खांबावर विरोधी ऐक्याचा विशाल तंबू उभारता येणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे! २०१४पासून आतापर्यंत देशावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे शासन आहे. भाजपच्या सिंहासनास हादरा द्यायचा असेल तर जनतेला विश्वासार्ह असा पर्याय विरोधी आघाडीला द्यावा लागेल. विश्वासार्हता गमावून बसलेल्या अनेक नेत्यांना ती पुन्हा प्राप्त करावी लागेल. मतदारांना तशी खात्री पटवून द्यावी लागेल. मार्गामध्ये असे अनेक अडसर आहेत. लक्ष्य साध्य करण्यासाठी कालावधीही खूप कमी उरला आहे. ते लक्षात घेऊन विरोधकांना आपल्या ऐक्यास लवकरात लवकर मूर्त स्वरूप द्यावे लागणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in