शाळाबाह्य बालके आणि आत्मनिर्भर भारत

मुलांच्या उज्ज्वल भविष्यावरच देशाचे भविष्य अवलंबून असते. म्हणून मुले कमकुवत, अविकसित आणि शाळाबाह्य राहिली तर देशाचा विकास होऊ शकत नाही.
शाळाबाह्य बालके आणि आत्मनिर्भर भारत
Published on

- डॉ. निलेशकुमार रामभाऊजी इंगोले

दखल

मुलांच्या उज्ज्वल भविष्यावरच देशाचे भविष्य अवलंबून असते. म्हणून मुले कमकुवत, अविकसित आणि शाळाबाह्य राहिली तर देशाचा विकास होऊ शकत नाही. परिणामी ‘आत्मनिर्भर भारत’ हे देशाचे स्वप्न अपूर्णच राहील. कारण ही बालके जेव्हा उद्याचे नागरिक होतील, तेव्हा त्यांना इतरांवरच निर्भर राहावे लागेल. त्यामुळे देशातील बालकांच्या शैक्षणिक, सामाजिक स्थितीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. सोबतच प्रत्येक शाळाबाह्य बालकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणून भविष्यात एकही शाळाबाह्य बालक निर्माण होणार नाही, याची मोठी दक्षता घ्यावी लागेल.

आज बालकांचे संरक्षण करण्यासाठी कठोर कायदे तयार करण्यात आले. या कायद्यांनुसार प्रत्येक बालकाला जन्मजात जीवन जगण्याचा, जीवनमानाचा आणि विकासाचा, कोणत्याही प्रकारच्या आजारावर सर्वोत्तम दर्जाचा उपचार मिळण्याचा, संपूर्ण क्षमतेने व्यक्तिमत्त्व विकास करण्याचा, बुद्धिमत्ता आणि शारीरिक क्षमता वाढवणाऱ्या शिक्षणाचा तसेच सामाजिक सुरक्षेचा अधिकार आहे. परंतु असे असूनही आज बालकांच्या अनेक समस्या समाजात दिसून येतात. यातील महत्त्वाची समस्या म्हणजे शिक्षणापासून वंचित असलेल्या शाळाबाह्य बालकांची आहे.

भारतीय संविधानाने मूलभूत अधिकार म्हणून वय वर्षे ६ ते १४ वयोगटातील बालकांना सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार बहाल केला आहे. तसेच शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यात येत आहे. परंतु असे असूनही आज मोठ्या प्रमाणात समाजात शाळाबाह्य बालकांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शाळाबाह्य बालके म्हणजे ६ ते १४ वयोगटातील शिक्षणापासून वंचित असलेली किंवा अनियमित शाळेत जाणारी बालके. ज्या वयात शिक्षणाचा पाया मजबूत होतो, त्याच वयात शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असल्यामुळे ही बालके शाळाबाह्य होतात. या शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने दिनांक ५ जुलै ते २० जुलै २०२४ पर्यंत शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण आयोजित केले आहे. ही बाब दरवर्षी राबवली जात असली, तरीही शाळाबाह्य बालकांचे प्रमाण मात्र वाढतच आहे. कारण एकदा बालक शाळाबाह्य झाले की, त्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. एकदा शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडलेली बालके शैक्षणिक, सामाजिक, कौटुंबिक व इतर कारणांच्या ताणामुळे शैक्षणिक प्रवाहाबाहेरच राहतात. कधी कधी तर बालकांची इच्छा असूनही पालकांच्या रोजगाराच्या समस्येमुळे बालकाला शाळाबाह्य व्हावे लागते. शैक्षणिक सुविधांची सुवर्णसंधी असतानाही बालकांना शिक्षण घेण्याच्या काळात शिक्षणापासून वंचित व्हावे लागते, ही फार गंभीर बाब आहे. शिक्षणापासून दूर असल्याने ही मुले अनेकदा वाईट मार्गाने जाऊ लागतात. समाजासाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण अशी बालके गुन्हेगारी, व्यसनाधीनता अशा अनेक वाईट मार्गांच्या आहारी जातात. अशा परिस्थितीमुळे बालकांना देशाचा जबाबदार नागरिक बनविण्यात समाज म्हणून आपण कमी पडत असल्याची जाणीव होते. कायदे, सुरक्षा यंत्रणा असूनही हे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. कारण सामाजिक नियंत्रणाची साखळी कमकुवत झाल्याचे दिसून येते. अपवाद वगळता एखादी घटना घडत असताना त्या गोष्टीचा आपल्याशी काय संबंध आहे? आपल्याला काय करायचे आहे? अशा वैचारिक वृत्तीमुळे व सामाजिक भान हरवल्याने टाळता येणाऱ्या घटनांना सुद्धा आळा घातला जात नाही. परिणामी अनेक बालकांच्या जीवनाची हानी होते. त्यामुळे हा चिंतेचा विषय आहे.

असाच विषय शाळाबाह्य बालकांचा आहे. बालके शाळाबाह्य होण्याच्या प्रमुख कारणांमधील महत्त्वाचे कारण म्हणजे पालकांच्या रोजगाराची समस्या दिसून येते. रोजगारासाठी पालकांबरोबर बालकेही स्थलांतरित होतात. यामध्ये वीटभट्टी कामगार, ऊसतोड कामगार, इत्यादी अनेक प्रकारच्या रोजगारासाठी बालके स्थलांतरित होतात. मग शिक्षण प्रवाहापासून दूर झालेल्या बालकांना आई-वडिलांबरोबर बालकामगार म्हणून बालवयापासूनच विविध अनावश्यक बाबी अनुभवायला मिळतात. ज्यामुळे त्यांचे आयुष्य वेगळे वळण घेते. त्यातून स्वतःच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या व पर्यायाने देशाच्या होणाऱ्या विकासात अडथळा निर्माण होतो. या सर्वांचा विचार करता प्रत्येक शाळाबाह्य बालकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणून भविष्यात एकही शाळाबाह्य बालक निर्माण होणार नाही यासाठी ध्येय-धोरण ठरविणे आवश्यक आहे. तरच आजची बालके शिक्षणातून आत्मनिर्भरतेचे धडे घेऊन स्वतः सक्षम नागरिक बनून देशालाही सक्षम व आत्मनिर्भर बनविण्यात हातभार लावतील. यासाठी प्रत्येक बालकाला शालेय शिक्षण मिळणे गरजेचे आहे. आजच्या २१ व्या शतकात शाळाबाह्य बालकांची संख्या कमालीची अस्वस्थ करणारी आहे. या सर्वांचा परिणाम बालकांच्या संपूर्ण पिढीवर होतो. त्यामुळे देशाचे भविष्य असणाऱ्या बालकांना घडविण्यासाठी या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन व बालकांच्या जीवनातील समस्यांचा काळोख नष्ट करून त्यांचे जीवन प्रकाशमान करण्यासाठी आपण सर्वांनी झटले पाहिजे. त्यातूनच बालकांचे उज्ज्वल भविष्य घडेल व आपला देश खरोखर आत्मनिर्भर होईल.

देशाचे उद्याचे सूत्रधार, देशसेवक, समाजसेवक, विचारवंत, संशोधक, वैज्ञानिक हे सर्व आजच्या बालकांमधूनच घडणार आहे. शिवाय देशाचे उद्याचे सामर्थ्य हे आजचा बालक किती शिक्षित, प्रतिभासंपन्न, आरोग्यपूर्ण, निर्भिड, प्रज्ञावान व सुरक्षित आहे यावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे देशाला मजबूत स्थितीत ठेवण्यासाठी व देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांच्याविषयीच्या कर्तव्याची मूल्ये समाजात रुजली पाहिजेत. तरच शिक्षित बालक आत्मनिर्भर देशाचा मजबूत पाया ठरेल.

(लेखक शिक्षणक्षेत्रातील अभ्यासक आहेत.)

dr.nileshingole222@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in