
भ्रम-विभ्रम
सावनी गोडबोले
पु. ल. देशपांडे म्हणजे गमतीदार लेख, त्यांच्या शाब्दिक कोट्या, त्यांच्या व्याख्यानातले अचूक टायमिंग आणि प्रेक्षकांमध्ये उसळलेले उत्स्फूर्त हशे. पण पुलं म्हणजे तेवढेच का? विनोदी साहित्यासोबतच पुलंनी गंभीर वैचारिक लिखाणही केले आहे. अर्थात त्यांच्या मिश्किल शैलीमुळे लेखन वैचारिक असूनही ते जड वाटत नाही. सहज पचते.
विवेकी, विचारी माणसाच्या वागण्या-बोलण्यात सुसंगती असते. या उलट माणूस जर फार विचार करत नसेल, तर आपण काय वाचलेले आहे ते आचरणात आणण्याची तसदी तो घेत नाही. ‘नामस्मरणाचा रोग’ या लेखात वरवर अगदी निरुपद्रवी वाटणाऱ्या नामस्मरणासारख्या प्रकारात काय वाईट आहे हे पुलंनी लिहिले आहे. एखाद्याचे नाव तेवढे घ्यायचे आणि त्या माणसाची शिकवणूक मात्र आचरणात आणायची नाही या विसंगतीवर, अविवेकी वागण्यावर पुलंनी या लेखातून बोट ठेवले आहे. ते म्हणतात, ‘बोलणे आणि वागणे याचा मेळ नसलेल्या आपल्या देशात सर्वात लोकप्रिय जर काही असेल, तर ते नामस्मरण. मग ते कधी देवाचे, कधी शिवाजी महाराजांचे, कधी लोकमान्य टिळकांचे, सावरकरांचे, महात्मा गांधींचे, महात्मा फुल्यांचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे... या यादीला अंत नाही. जयजयकार करणे आणि खिरापत वाटणे ही कुठल्याही धार्मिक नामस्मरण सप्ताहांची वैशिष्ट्ये असतात. ती याही थोर पुरुषांच्या उत्सवात दिसली की, त्या-त्या पुरुषांचे देणे आपण देऊन टाकले आणि पवित्र झालो हीच भावना सर्वत्र दिसते.’
पुलंचा आक्षेप श्रद्धेला किंवा भावनेला नव्हता. आक्षेप होता तो त्या प्रवाहात वाहवत जाण्याला. १९८४ साल हे महात्मा फुलेंचे जन्मशताब्दीचे साल. त्यानिमित्त शासनाने प्रसिद्ध केलेल्या गौरव ग्रंथातला हा लेख. लेखाचा शेवट करताना ते म्हणतात, ‘एकदा नामस्मरण सुरू झाले की, माणसाचा देव होतो आणि बुद्धिनिष्ठ चिकित्सेची हकालपट्टी होते. राम, कृष्ण यांसारख्या आपल्या महाकाव्यातल्या नायकांचे आम्ही देव केले. महात्मा गांधींचीही देवपूजाच सुरू झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या प्रखर बुद्धिनिष्ठ व्यक्तीलाही देव करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. फुल्यांचेही नुसतेच नामस्मरण करून त्यांनाही एकदा अवतारी पुरुषाच्या देव्हाऱ्यात बसवले की, आम्ही फुले आचरणात आणण्याच्या जबाबदारीतून सुटू!’
पुलं हे विज्ञाननिष्ठ होते. ‘धर्म अंधश्रद्धा आणि तुम्ही-आम्ही’ या लेखात पुलं म्हणतात, ‘एक तर धर्म, ईश्वर, पूजाअर्चा यांत मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पाहायला आवडतात. समजू लागल्यापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडांवर माझा विश्वास नाही. देव धर्म या कल्पना धूर्त सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत, याविषयी मला यत्किंचितही शंका नाही.’
पुलं मूर्तिपूजक नव्हते, याचे अनेक दाखले त्यांच्या लिखाणात सापडतात. अचेतन मूर्तीतल्या देवापेक्षा त्याच्या भक्तांच्या मनातला देव आणि त्यांचा भक्तिभाव त्यांना अधिक जवळचा असे. रा. ज. देशमुखांवरील लेखात पुलं लिहितात, देशमुखांनी मला ओढून विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपुराला आणि भवानीमातेच्या दर्शनाला सोलापुराला नेले. ‘ज्याचा दंडवत भवानीमातेला आणि विठोबाला घडला नाही तो कसला मराठी लेखक?’ असं म्हणून. पण मला विठोबाचे अप्रूप ज्ञानोबा-तुकोबांमुळे आणि भवानीमातेचे कौतुक शिवबांमुळे.’
‘अर्थात संतांची देवाची कल्पना आणि राजेलोक किंवा धानिकांची देवाची कल्पना यांत काडीचेही साम्य नाही’, हेही ते स्पष्टपणे लिहून जातात आणि संतांच्या कार्याच्या मर्यादाही ते स्पष्ट करायला कचरत नाहीत. ‘आपल्या देशात इतके संत जन्माला येण्याऐवजी निसर्गाचे रहस्य ओळखून ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते, तर हा देश अधिक सुखी झाला असता. मला कुठल्याही संतांपेक्षा ॲनास्थेशियाचा शोध लावणारा संशोधक जास्त मोठा वाटतो. कारण त्याने वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनारहित करून मानवजातीवर मोठे उपकार केले आहेत.’
जे डोके चालवायला उद्युक्त करते ते विज्ञान आणि डोके टेकायला सांगतो तो धर्म. विज्ञान जन्मजात श्रेष्ठत्व कानिष्ठत्व मानत नाही. त्यामुळे एखादा नवा संशोधक हातात ठोस पुरावे असतील, तर पूर्वसूरींच्या संशोधनाला आव्हान देऊ शकतो. पण वैज्ञानिकांना, संशोधकांना धर्मगुरूंनी आणि राजांनी परदेशात मारल्याची, त्यांना डांबून ठेवल्याची अनेक उदाहरणे आहेत. म्हणूनच पुलं एका ठिकाणी म्हणतात, ‘धर्म धर्म करणाऱ्या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे दुसरे शत्रू नसतील. मग ते बायकांना नवऱ्याच्या चितेवर जिवंत जाळतील, नरबळी देऊन आपले राजमहाल आणि देवळे टिकाऊ करतील, कुणाला अस्पृश्य म्हणतील, कुणाला वाळीत टाकतील. धर्माच्या आणि पंथाच्या दुराभिमानातून माणसाचे रक्त सर्वात अधिक सांडलेले आहे आणि या साऱ्या खटाटोपातून शेवटी नवे हुकूमशाहाच उदयाला आलेले दिसतात.’
असामी-असामीमध्ये पुलं बेगडी अध्यात्म, साक्षात्कारी बाबा, बुवा यांची खिल्ली उडवतात. श्रीमंतांच्या घरी या संप्रभवानंद स्वामींचा दरबार भरत असला, तरी मुळात ही शुद्ध फसवणूकच आहे. वरची बांधणी वेगळी असली, तरी आतला फसवणुकीचा आत्मा तोच!
इतर पुस्तकांची परीक्षणे करताना पुलंनी त्या पुस्तकाचे केवळ साहित्यिक मूल्य नव्हे, तर सामाजिक संदेश, त्याची आत्ताच्या काळातील गरज हे सारे देखील तपासले आहे. बाबा आढाव यांच्या ‘एक गाव-एक पाणवठा’ या पुस्तकासाठी बाबा दुष्काळी भागात हिंडले आणि तेथे अजूनही पाळल्या जाणाऱ्या अस्पृश्यतेने माणुसकीचे झरे कसे आटले याची काळीज हेलावणारी वर्णने त्यांनी पुस्तकात केली. त्याच्या परीक्षणात पुलं जात नावाच्या अंधश्रद्धेची चीरफाड करतात. ते लिहितात ‘जन्मल्या क्षणीच देहाला चिकटलेली जात, त्या देहाचे मढे झाले तरी सुटत नाही. कधी धार्मिक सत्तेच्या आधाराने कधी राजकीय सत्तेसाठी संगनमत करून कधी स्वार्थासाठी जातीच्या टोळ्या बनवून या देशात जात नावाचा शाप आपण कसा चिरंजीव करून ठेवला आहे.’
आपल्या परंपरांचा पोकळ अभिमान बाळगणाऱ्यातले पुलं नव्हेत. याच लेखात ते पुढे लिहितात ‘ज्या देशात पिण्याच्या पाण्यालाही जात आहे, तिथल्या विद्वानांनी जगाला आध्यात्मिक उन्नतीचे धडे देण्याचा आव आणण्याइतकी आत्मवंचना नाही. जोवर संतासाहित्याच्या श्रेष्ठत्वाचा पडताळा लोकाव्यवहारातून सिद्ध होत नाही, तोवर ते सारे ग्रंथ भोजनोत्तर वाचायच्या रहस्यकथेसारखेच वाचले जातात, असेच म्हणायला हवे. गरिबी आणि दैव यांचे एक नाते जुळवून दिले गेले, गतजन्मातील पाप नावाची एक थाप चिरंजीव केली गेली, कुणीही खोलात जाऊन तपासून न पाहिलेला परंपरा नावाचा शब्द रूढ केला गेला.’ आपल्या गरिबीचे, दैववादाचे इतके अचूक आणि परखड विश्लेषण करणाऱ्या माणसाला केवळ ‘विनोदी लेखक’ म्हणणे हाच मोठा विनोद नव्हे का?
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या
savpras@yahoo.com