लेखक/ ज्येष्ठ पत्रकार : अरविंद भानुशाली
महाराष्ट्रात मणिपूरनंतर आता बांगलादेशसारख्या उठावाची स्वप्नं काही राजकीय पक्ष पाहत आहेत. परंतु मुंबई पोलिसांची यंत्रणा एवढी जागरूक आहे की, असे प्रयत्न होऊ देणार नाही. मुंबई, ठाणे पोलिसांनी या टोळ्यांच्या, दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या दहशतवाद्यांच्या टोळ्या ठाणे महापालिका क्षेत्रातील मुस्लिमबहुल वस्तीत मुंब्रा व ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या बोरिवली-पडघा येथे आश्रयास असताना पकडल्या गेल्या.
प्रारंभी १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळी समुद्रकिनारी श्रीवर्धनमधून आरडीएक्सचा प्रथम वापर झाला. त्यावेळी आरडीएक्सचा साठा हा मुंब्रा येथील मोठ्या गोदामात ठेवण्यात आला होता. मुंबईचे पोलीस आयुक्त एम. एन. सिंह असताना या बॉम्बस्फोटातील दहशतवाद्यांकडून मुंब्रा येथे आरडीएक्सचा साठा ठेवल्याची माहिती मिळताच त्यांनी भरदिवसा धाडी टाकून या गोदामात ठेवलेला ४९८५ किलो आरडीएक्स व बॉम्बस्फोटासाठी लागणारे इतर साहित्य जप्त केले व त्या गोदामाच्या मालकालाही अटक केली होती. पुढे याच मुंब्रा येथून अनेक अतिरेकी ठाणे पोलीस आयुक्तपदी परमवीर सिंग असताना त्यांनी पकडले होते. या पकडलेल्या दहशतवाद्यांकडूनच मुंबईतील २६/११च्या म्होरक्याचा शोध लागला होता.
मुंब्रा हे 'अतिडेंजर' शहर झाले आहे. एकदा आरोपी मुंब्रा पोलिसांनी पकडला, तर त्याला सोडविण्यासाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा आणला जात होता. एवढे संवेदनाक्षम शहर झाले आहे. याच मुंब्रा शहरातील एका मुलीने पाकिस्तानात जाऊन विवाह करून आल्याची घटना घडली आहे. आजही मुंब्रा हे पोलिसांच्या हिटलिस्टवर आहे. आतापर्यंत अनेक दहशतवादी या शहरातून पकडले गेले आहेत.
मुंबई १९९३च्या बॉम्बस्फोटापूर्वी याच मुंब्र्यापासून दोन किलोमीटर अंतरावर दहिसर मोरी येथे महाकाय मशीद परदेशातील पैशाने उभारली गेली होती. या मशिदीत विद्यार्थ्यांसाठी २५० खोल्या बांधल्या होत्या. परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा बहाणा त्यासाठी देण्यात आला होता. या मशिदीत २०० ते २५० फुटांचे भुयार होते. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी दुसरे मोठे भुयार होते. या मशिदीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी परदेशातील बँकांकडून येत होता. पुढे ही बाब त्यावेळचे ठाणे जिल्हा शिवसेनाप्रमुख आनंद दिघे यांच्या लक्षात काही पत्रकारांनी आणून दिली आणि मग शिवसैनिकांच्या रट्ट्याने आज ती अर्धवट बांधलेली मशीद तशीच पडून आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर पडघा-बोरिवली हे मुस्लिमबहुल वस्तीचे गाव आहे. पूर्वी हा गावपट्टा शांत होता. विशेष म्हणजे, येथूनच जनता दलाचे हमीद नाचन ही अत्यंत लोकाभियुक्त व्यक्ती जिल्हा परिषद ठाणे येथे निवडून गेली होती. हमीद भाई हे त्याकाळी जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे यांच्या विचाराने या भागात सामाजिक कार्य करीत होती. हे सुरू असताना अचानकपणे त्यांच्या घरावर दिल्लीतील सशस्त्र पोलिसांची धाड पडते आणि हमीद नाचन यांचा चिरंजीव साकिब नाचन याला पकडले जाते. त्यांच्या घरात इतर दोन दहशतवादी व बॉम्ब बनविण्याचे साहित्य मिळते. मुंबई रेल्वेचा बॉम्बस्फोट झाला. त्यात दहशतवादी म्हणून साकिबचे नाव प्रथम आले. साकिबवर १२ देशविघातक गुन्हे दाखल झाले आहेत. साकिबवर भारतात इसिस नेटवर्क तयार करण्याचा आणि इतर कट्टरपंथींसोबत दहशतवादी हल्ल्यांचा कट रचल्याचा आरोप आहे. त्याने महाराष्ट्रातील पडघा या गावाला 'अल-शाम' म्हणजेच इस्लामिक स्टेट म्हणून घोषित केले होते.
पुढे तर मुंबई पोलीस आयुक्तपदी रणजित शर्मा असताना त्यांनी पडघ्याच्या जंगलात बॉम्ब बनविण्याचा कारखानाच पकडला होता. १९९१मध्ये साकिबला १० वर्षांची सजा झाली असतानाही पडघा-बोरिवलीत अतिरेक्यांच्या गाड्या येत होत्या. अनेकवेळा पोलिसांनी छापे मारले. एवढेच कशाला पडघा-बोरिवलीत एक सशस्त्र पोलीस चौकीही बसवली. १९९३च्या बॉम्बस्फोटानंतर साकिबला दहा वर्षांची सजा झाली. तुरुंगातून सुटून आल्यानंतर परत २००२मध्ये बॉम्बस्फोट झाले. त्यातही साकिबचे नाव पुढे आले. पुन्हा १० वर्षांची शिक्षा देखील त्याला झाली. हे होत असताना आज २०२४ मध्येही अतिरेक्यांचे, त्यांच्या टोळ्यांचे पडघा-बोरिवली हे केंद्र बनले आहे.
साकिब नाचन याच्या टोळीत १० असे दहशतवादी होते की, त्यांची १० मुस्लिम राष्ट्रांशी साखळी होती. मुंबईत पुन्हा मोठा बॉम्बस्फोट होणार आहे, याची माहिती एनआयएला मिळताच त्यांनी २०२३ मध्ये पडघा-बोरिवलीत मध्यरात्री छापे टाकले. त्यावेळी अल कायद्याच्या दोघा जणांसह साकिब नाचन याला ताब्यात घेताच त्याचे आंतरराष्ट्रीय संबंध असल्याचे आढळून आले. ८ ते १० दिवसांत या गावात एनआयए, मुंबई-ठाणे पोलीस, सीबीआयच्या धाडी पडत आहेत. मधल्या काळात दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे आढळून आले. पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधित मोठी अपडेट मिळून आली होती. विशेष म्हणजे, या गावात करण्यात आलेल्या छापेमारीत लाखो रुपये हस्तगत करण्यात आले होते. मुंबईत २०२३च्या बॉम्ब हल्ल्याची तयारी केली जात आहे, याचा सुगावा एनआयएला लागला. भल्या पहाटे २० ते २२ गाड्यांचा ताफा पडघा-बोरिवलीत शिरला आणि पुढे जे घडले ते सर्वश्रुत आहे.
मणिपूर संपले आता बांगलादेश!
आंबेडकर, छत्रपती शाहूंच्या या राज्यात मणिपूर होईल, अशी भाकिते केली जात होती. आता 'बांगलादेश होईल' असे म्हणत आहेत. काहींना राज्यात मणिपूरची, तर आता 'बांगलादेश होणार' अशी स्वप्नं पडत आहेत. बांगलादेश दुसरी क्रांती नव्हे, तर लुटमार होती. ज्याच्या हाताला मिळेल ती वस्तू घेऊन पसार होत होते. विद्यार्थी, तरुण जमाव जरूर होता; परंतु त्यामागे मुस्लिम राजकारण होते. हिंदूंची देवळे, घरे, मालमत्ता पेटवून दिल्या जात होत्या. तर काही ठिकाणी लुटमारी करीत होते.
मुस्लिम राष्ट्रांमध्ये लोकशाहीला फारसे महत्त्व नाही. शेख हसीना यांनी अवामी पार्टीच्या चिन्हावर लढून ३४० जागा संपादन केल्या होत्या. विरोधकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकला होता. तसे आपल्याकडे आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला ४०५ जागा अपेक्षित होत्या. परंतु भाजपला देशातील जनतेने पूर्ण बहुमत दिले नसले, तरी एनडीए म्हणून पूर्ण बहुमत मिळाले आहे. २८८पैकी २१० सदस्यांचे बहुमत आहे. लोकसभा निवडणुकीत निगेटिव्ह प्रचार झाल्याने महायुतीला राज्यात ४८ पैकी १७ जागा मिळाल्या. विरोधकांना ३१ जागा मिळाल्या. याचा अर्थ राज्यात बांगलादेश सारखा उठाव हे म्हणणे संयुक्तिक नाही.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)