युद्ध नको, काश्मीरसोबत प्रेम हवे!

पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला निर्घृण अतिरेकी हल्ला सर्व पातळ्यांवर निंदनीय आहे; मात्र कुणी मुसलमानांविरुद्ध गरळ ओकतोय, तर कुणी काश्मिरींबद्दल. कुणी धडा शिकवण्याची, तर कुणी पाकिस्तानशी युद्ध छेडण्याची भाषा करतोय. अतिरेक्यांनी पद्धतशीरपणे डावपेच आखून ते थंड डोक्याने तडीसही नेले. आपणही मनात कितीही राग असला तरी डोके थंड ठेवून, विचारपूर्वक धोरण ठरवणे आवश्यक आहे.
युद्ध नको, काश्मीरसोबत प्रेम हवे!
Published on

- लक्षवेधी

- डॉ. संजय मंगला गोपाळ

पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला निर्घृण अतिरेकी हल्ला सर्व पातळ्यांवर निंदनीय आहे; मात्र कुणी मुसलमानांविरुद्ध गरळ ओकतोय, तर कुणी काश्मिरींबद्दल. कुणी धडा शिकवण्याची, तर कुणी पाकिस्तानशी युद्ध छेडण्याची भाषा करतोय. अतिरेक्यांनी पद्धतशीरपणे डावपेच आखून ते थंड डोक्याने तडीसही नेले. आपणही मनात कितीही राग असला तरी डोके थंड ठेवून, विचारपूर्वक धोरण ठरवणे आवश्यक आहे.

पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला निर्घृण अतिरेकी हल्ला सर्व पातळ्यांवर निंदनीय आहे. या खुनी हल्ल्यात देशभरातले पर्यटक व काश्मीर घाटीतील शांतताप्रिय, सज्जन आणि धाडसी नागरिक अतिरेक्यांशी सामना करताना मारले गेले. जम्मू-काश्मीरमधील जनतेसह अख्खा देश या घटनेने हळहळला आणि दहशतवादाविरुद्ध लढा तीव्र करण्याच्या भूमिकेतून पेटूनही उठला; मात्र धर्मांध अतिरेकी विचारांच्या संघटना आणि व्यक्ती त्यांच्या राजकीय हेतूंनुसार प्रतिक्रिया देत आहेत. आपले पाकिस्तानसोबतचे शत्रुत्व आणि ‘हिंदू खतरे में है’, हे कथन लादणारी मंडळी; आधीच कोणत्याही मुद्द्याला हिंदू-मुस्लिम रंग देत, सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यात माहिर. त्यात त्यांना हे कोलीतच मिळाल्यासारखे झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही अधिक आक्रमक भूमिका घेत नाहीये ना, सरकार, ‘स्वतःच्या चुका ठेवायच्या झाकून, नी पाकिस्तानचे निमित्त शोधायचे वाकून’, असे करत नाहीये ना, याकडे सुजाण नागरिकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. या बाबतीत देशातील समस्त विरोधी पक्षांनी सरकारला पाठिंबा देऊन, स्वागतार्ह पाऊल उचलले आहे.

२०१९मधील लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर घडलेल्या पुलावामा हल्ल्याबाबत जम्मू-काश्मीरच्या त्या वेळच्या राज्यपालांनी केंद्र सरकारला आधीच घेरलेले आहे. त्या हल्ल्यातले अनेक प्रश्न, आजही अनुत्तरित आहेत. अशावेळी बिहार विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर घडलेल्या ताज्या हल्ल्याची गत तशीच नसेल, तर सरकारने अधिक पारदर्शक, प्रामाणिक आणि कोणतेही राजकारण मध्ये न आणता परिस्थिती हाताळणे आवश्यक आहे. सरकारची पावले कधी सरळ, कधी वाकडी पडताहेत का? घटना घडताच पुलवामाच्या वेळेप्रमाणे आपले शूटिंग व जाहीर सभा यात दंग राहणाऱ्या मा. पंतप्रधानांनी यावेळी आपला परदेश दौरा अर्धवट सोडून देशाकडे धाव घेतली. देशाचे गृहमंत्री लागलीच जम्मू-काश्मीरला धावले; मात्र तिथे त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच महत्त्वाच्या बैठकीत सामील करून घेतले नाही. पंतप्रधान सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहता बिहारच्या निवडणूक दौऱ्यावर निघून गेले. घटना घडून आठवडा होत आला. अजून जम्मू-काश्मीरला जाणे, जखमींना भेटणे किंवा हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या घरी भेट देणे हे सरकारच्या प्रमुखांना अग्रक्रमाचे वाटलेले नाही. सरकारतर्फे संपूर्ण घटनेवर देशाची भूमिका स्पष्ट करणारी पत्रकार परिषद अद्याप घेतलेली नाही.

सर्वपक्षीय बैठकीत सरकारने सर्व बाजूने दबाव आल्यावर, आमची ‘चूक’ झाल्याचे कसेबसे का होईना, मान्य केले आणि लागलीच ते व्हिडीओतून गायबही करून टाकले. अतिरेक्यांनी माणुसकीचा खून केला. इथे सरकार सत्याचाच खून करू पाहते आहे. पंतप्रधानांनी घोषित केलेल्या पाकविरोधी कडक कारवाईबाबतही, असाच खोटेपणा आता उघड होतो आहे. मीडिया भारतने दिलेल्या वृत्तानुसार, “पहलगाम हल्ल्यानंतरची संतप्त प्रतिक्रिया म्हणून भारताने पाकिस्तानचे पाणी रोखल्याची कारवाई केल्याचे सरकार आणि संघ-भाजप सांगत असले, तरी १९९५ साली काँग्रेस सरकारच्या काळात पायाभरणी केलेल्या शाहापूरकांडी प्रकल्पाच्या जीवावर २०१६पासूनच अशा धमक्या दिल्या गेल्या. आता तो प्रकल्प कार्यान्वित होण्याची व पहलगाम हल्ल्याची वेळ एकच झाल्याने; सरकारची आजवरची धमकी प्रथमच खरी ठरणार आहे. पाणी रोखणे आणि अलीकडचा हल्ला याचा काहीही संबंध नाही. रोखले जाणारे पाणी भारताच्याच वाट्याचे अतिरिक्त पाणी असून, भारताने यात आंतरराष्ट्रीय कराराचेही उल्लंघन केलेले नाही! सत्यासत्याची अशी सरमिसळ, सरकारच्या इराद्यांबाबतची शंका वाढवते. अशावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे सर्वपक्षीय बैठकीतील सौहार्दाचे वागणे बोलणे असो वा लागलीच जम्मू-काश्मीरला भेट देणे असो, उठून दिसले. मुंबईतील २६/११च्या हल्ल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा मुंबई दौरा आणि पत्रकार परिषद घेऊन देशाशी साधलेला संवाद आठवला.

“काश्मीर खोऱ्यातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आपल्या देशातील लष्कर खूप मोठ्या प्रमाणावर काश्मीर खोऱ्यात तैनात असताना अशा प्रकारचा हल्ला होणे हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश मानायला हवे. तसेच कलम ३७० हटविल्यानंतर पुन्हा एकदा काश्मीरचे नंदनवन झाले आहे, या सरकारच्या प्रचारावर विश्वास ठेवून पर्यटनासाठी काश्मीर खोऱ्यात परतलेल्या पर्यटकांना सुरक्षा यंत्रणा पुरविण्यात सरकार अपयशी ठरले आहे आणि म्हणून सर्वात प्रथम देशाच्या गृहमंत्र्यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेऊन तत्काळ राजीनामा द्यावा,” अशी मागणी जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाने केली आहे. अतिरेकी सुमारे २००-३०० किमी वरील सरहद्द पार करून आले. चार-पाच दिवस टेहळणी करून हल्ल्याचा प्लॅन त्यांनी बनवला. असे अतिरेकी हल्ले कोठे होणार याचा अंदाज घेऊन, गुप्तहेर संघटनांनी सतत नजर ठेवून राहिले पाहिजे होते. फोन ट्रॅक करणे, सीसीटीव्ही कॅमेरे चेक करत राहणे, ड्रोनचा उपयोग, गुप्तहेरांना नव्याने महिती देणे, आधुनिक तंत्रज्ञान मिळवून वापरणे, या गोष्टी करणे अतिरेक्यांची माहिती देणारे छुपे नागरिक खबरे तयार करणे हे अत्यंत आवश्यक होते. बॉर्डरवरच्या व मार्गावरील सुरक्षा व्यवस्था व लष्कर कोठे होते? अतिरेक्यांकडून गोळीबारानंतर अर्धा तास उलटला तरी घटनास्थळी सुरक्षारक्षक का पोहोचले नाहीत? नावे विचारून गोळ्या झाडल्या हे वृत्त सर्वत्र पसरवले; मात्र वरील प्रश्नांबाबत सरकारची अद्याप मिठाची गुळणी का? राजीनामा वगैरे देण्याची नैतिकता विद्यमान सरकाराला संघाने शिकवलेली नाही. पण श्रेय घ्यायच्या वेळी पुढे असणारे नेते यावेळी स्वतःचे अपयश तरी कबूल करतील का? प्रश्न विचारणे एक भारतीय मतदार म्हणून कर्तव्य आहे. स्वपक्षीय नेत्यांच्या चुकांवर सतत पांघरूण घालणारे अंधभक्त देशद्रोही म्हणायचे का?

पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्याचा उपयोग राजकारण्यांकडून धार्मिक ध्रुवीकरणासाठी होत असतानाच काश्मीरमधील सामान्य जनतेने निरपेक्षपणे केलेली मदत ही कश्मीरियत जपणारी आहे. हल्ल्याच्या ठिकाणी स्वतःच्या जीवावर उदार होऊन पर्यटकांचे जीव वाचवणारे व त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणारे घोडेवाले व आपल्या घरी जेवायला घालणाऱ्या इतर स्थानिकांनी केलेल्या धर्मातीत मदतीला खरे तर सलाम करणे आवश्यक आहे. काश्मिरी जनतेसोबत प्रेम वाढवणे आवश्यक आहे.

“युद्धात पाक वा भारताकडून अण्वस्त्राचा वापर झाला, तर अवघ्या काही तासांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय (आणि पाकिस्तानीही!) नागरिक मरतील. आपल्या जमिनी आणि नद्या आजीव विषारी होतील. साडेतीन कोटी लोक आयुष्यभर ‘मरण आलं असतं तर बरं’ अशा वेदना घेऊन जगतील आणि त्या वेदनांवर कुठलीही औषधे कधीही पुरी पडणार नाहीत. या सगळ्याला जबाबदार असलेल्यांना सुळावर चढवून आपल्याला न्याय मिळायलाच हवा. पण सुडाच्या वारुवर उधळताना आपल्यातले शहाणपण हरवता कामा नये. त्यातून आपला प्रवास विनाशाकडे होता नये”, असे आवाहन २००१मध्ये देशाच्या सीमेवर शहीद झालेल्या, फ्लाइट लेफ्टनंट अभिजित गाडगीळ यांच्या आई कविता गाडगीळ यांनी केले आहे. युद्ध न छेडता, पाकिस्तानला धडा शिकवणे योग्य ठरेल.

‘भारत जोडो अभियान’चे राज्य समन्वयक व राष्ट्रीय सचिव

sansahil@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in