घोषणेभोवतीचे नकारात्मक वलय

विविध हल्ल्यांच्या आधी ‘अल्लाह हू अकबर’चे संदर्भ असल्यामुळे किंवा या घोषणेसह होणाऱ्या हल्ल्यांमुळे ‘अल्लाह हू अकबर’ या शब्दांभोवती एक नकारात्मक वलय तयार झाले आहे. परंतु, ही 'अल्लाह हू अकबर' घोषणा म्हणजे नेमकं काय? तिचा अर्थ काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.
घोषणेभोवतीचे नकारात्मक वलय
Published on

चौफेर

प्राजक्ता पोळ

झिपलाइनसाठी तयार होऊन सेल्फी स्टिक उचलली, तेव्हा ऑपरेटरने ‘अल्लाह हू अकबर’ हे तीन वेळा म्हटले आणि त्यानंतर गोळीबार सुरू झाला. तो हे शब्द म्हणत असतानाच तो खाली पाहत होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही व्हिडीओ पाहिला, तेव्हा लक्षात आले की, तो हे म्हणताच गोळीबार सुरू झाला.”

अहमदाबादहून आलेल्या एका पर्यटकाने जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झिपलाइन राइड घेत असताना चुकून केलेल्या व्हिडीओ रेकॉर्डिंगमध्ये २२ एप्रिल रोजी बैसारन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे दृश्य टिपले गेले, ज्यात २६ लोकांचा बळी गेला. हा ५३ सेकंदांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ऋषी भट्ट नावाचा पर्यटक झिपलाइनचा आनंद घेत असताना जमिनीवर चालू असलेला हल्ला स्पष्टपणे दिसतो. त्याने सेल्फी स्टिकच्या सहाय्याने हा व्हिडीओ शूट केला होता. व्हिडीओमध्ये लोक जीव वाचवण्यासाठी पळताना दिसतात आणि एक व्यक्ती गोळीबारात जखमी होताना दिसतो. भट्ट सांगतात, “माझी पत्नी आणि मुलगा आधीच सुरक्षितरीत्या दुसऱ्या बाजूला पोहोचले होते. मी झिपलाइनसाठी तयार होऊन सेल्फी स्टिक उचलली, तेव्हा ऑपरेटरने ‘अल्लाह हू अकबर’ हे तीन वेळा म्हटले आणि त्यानंतर गोळीबार सुरू झाला. तो हे शब्द म्हणत असतानाच तो खाली पाहत होता. माझी राइड सुरू होताच खाली गोळीबार सुरू झाला. मी खाली उतरलो, तेव्हा मी पाहिले की, एका व्यक्तीला त्याच्या धर्माबद्दल विचारून मग गोळी झाडण्यात आली. मी झिपलाईनमधून स्वत:ला सोडवले, खाली उडी मारली आणि कुटुंबासह धावत गेलो. आम्ही एका अंधाऱ्या कोपऱ्यात लपलो, जिथे आधीच तीन-चार लोकांनी आसरा घेतलेला होता. आठ-दहा मिनिटांनंतर गोळीबार थांबला तेव्हा आम्ही तिथून पळ काढला. दोन दहशतवादी जमिनीवर होते, ते लोकांना धर्म विचारत होते आणि त्यानंतर गोळी झाडत होते. बाकीचे झुडपांमध्ये लपून गोळीबार करत होते. गोळीबाराच्या प्रमाणावरून अंदाज घेतल्यास चार-पाच दहशतवादी असावेत.”

ऋषी भट्ट यांची मुलाखत आणि त्यांनी काढलेला व्हिडीओ दोन्ही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. यावेळी हल्ल्याआधी ‘अल्लाह हू अकबर’ या शब्दाचा उच्चार का झाला? यावरच अधिक बोलले जात आहे. याआधीही झालेल्या दहशतवादी हल्ल्यांवेळी ‘अल्लाह हू अकबर’चा उच्चार झाल्याचे संदर्भ आहेत. २०१५ साली पॅरिसमधील बाताक्लाँ कॉन्सर्ट हॉलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात, तसेच बार्सिलोना येथे हल्ला करताना हल्लेखोरही हाच नारा देत होता. २०१७ साली पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर चाकू घेऊन जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने ‘अल्लाह हू अकबर’ अशी घोषणा केली, या घटनेला दहशतवादी हल्ला म्हणून वर्गीकृत करण्यात आले. विविध हल्ल्यांच्या आधी ‘अल्लाह हू अकबर’ म्हटल्याचे संदर्भ असल्यामुळे किंवा या घोषणेसह होणाऱ्या हल्ल्यांमुळे ‘अल्लाह हू अकबर’ या शब्दांभोवती एक नकारात्मक वलय तयार झाले आहे. परंतु ‘अल्लाह हू अकबर’ म्हणजे नेमके काय? त्याचा अर्थ काय आहे? हे समजून घेणे आवश्यक आहे.

‘अल्लाह हू अकबर’ म्हणजे ‘देव सर्वात महान आहे’. ही घोषणा इस्लामी प्रार्थनेचा, नमाजचा, अजानचा अविभाज्य भाग आहे.

या घोषणेला अरबी भाषेत ‘तकबीर’ म्हणतात. ती मुस्लिम समाजात श्रद्धा, आनंद, संकट किंवा संकल्प अशा विविध प्रसंगांमध्ये वापरली जाते.

‘कबीर’ हा अरबी भाषेतील शब्द असून, त्याचा अर्थ ‘महान’ असा आहे. ‘अकबर’ हा त्याच शब्दाचे तुलनात्मक रूप आहे. म्हणजे ‘सर्वात मोठा’. ‘अल्लाह हू अकबर’ म्हणजे ‘अल्लाह सर्वात मोठा आहे’. हा घोष इस्लाममधील नम्रता, आत्मसमर्पण आणि ईश्वराच्या महानतेवर श्रद्धा व्यक्त करणारा भाग आहे.

‘अल्लाह हू अकबर’ ही घोषणा दहशतवादी घटनांमध्ये वापरली गेल्यामुळे अनेक वेळा ती संपूर्ण धर्माला चुकीच्या नजरेने पाहण्याचं कारण बनते. जर पहलगाम हल्ल्याच्या त्या व्हिडीओबद्दल बोलायचे झाले, तर झिपलाइन ऑपरेटरला या हल्ल्याची पूर्वकल्पना होती म्हणून तो ‘अल्लाह हू अकबर’ म्हणाला का? असा प्रश्न उपस्थित केला गेला. सोशल मीडिआवरच्या या चर्चेमुळे झिपलाइन ऑपरेटर मुजम्मिलला घटनेनंतर नॅशनल इन्क्वायरी एजन्सी (एनआयए) आणि जम्मू-कश्मीर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली आहे.

झिपलाइन ऑपरेटर मुजम्मिलच्या वडिलांनी यावर बोलताना “आम्ही मुसलमान आहोत, वादळ आले तरी आम्ही ‘अल्लाह हू अकबर’ म्हणतो”, असे म्हणत मुजम्मिलने आपल्या मुलावर केल्या जाणाऱ्या हल्ल्याची पूर्वकल्पना असल्याच्या आरोपांना फेटाळून लावले. दरम्यान, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी झिपलाइन ऑपरेटरने उच्चारलेल्या ‘अल्लाह हू अकबर’ या घोषणेचे समर्थन केले आणि अशा प्रकारच्या घोषणांबाबत समान दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले, “सोशल मीडियावर काही लोक अतिशय सांप्रदायिक भाषा वापरत आहेत. जसे आपण ‘जय श्रीराम’ म्हणतो, तसे मुसलमान ‘अल्लाह हू अकबर’ म्हणतात. जेव्हा आम्ही अडचणीत असतो, तेव्हा आम्ही ‘अल्लाह हू अकबर’ म्हणतो…” त्यांनी पुढे भारत सरकारकडे मागणी केली की, सोशल मीडियावर द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. झिपलाइन ऑपरेटरला हल्ल्याची पूर्वकल्पना होती की नाही हे चौकशीतून समोर येईल. पण त्यासाठी एका धर्मातल्या श्रद्धेला बदनाम केले जात आहे. एकीकडे मुजम्मिलने या हल्ल्याआधी ‘अल्लाह हू अकबर’ म्हटले, त्यानंतर गोळीबार सुरू झाला हे बोलताना अनेक पर्यटकांना वाचवताना जीव गमावलेल्या आदिलनेही ही घोषणा दिली असेल, हे कसे नाकारता येईल?

दहशतवादी हल्ल्याआधी जरी ही घोषणा दिली जात असली, या घोषणेचा खरा अर्थ आणि उद्देश काय आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. एखाद्या धर्माची प्रार्थना किंवा श्रद्धा जर हिंसेच्या माध्यमासाठी वापरली जात असेल, तर दोष त्या धर्माचा नसून त्याचा गैरवापर करणाऱ्यांचा आहे. त्यामुळे संपूर्ण धर्म किंवा त्याच्या श्रद्धेला दोष देणे अन्यायकारक ठरते. एखाद्या पवित्र घोषणेचा गैरवापर झाल्यामुळे ती घोषणा किंवा तो धर्मच हिंसक असल्याचा दावा करणे हे केवळ अज्ञानाचे लक्षण आहे.

prajakta.p.pol@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in