पालघरला साधूंची हत्या का घडली?

दोन साधूंसह तिघांच्या हत्येच्या दुर्दैवी प्रकरणावरून महाराष्ट्राच्या मातीत विद्वेषाची बिजे पेरण्याचे काम तीन वर्षांनंतरही अखंडितपणे सुरू
पालघरला साधूंची हत्या का घडली?

पालघर जिल्ह्यात झालेल्या साधूंच्या हत्येच्या घटनेला तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही भाजपच्या राम कदम यांनी प्रवर्गीय प्रवक्त्यांची विद्वेषाची पेरणी थांबवलेली नाही. दोन साधूंसह तिघांच्या हत्येच्या दुर्दैवी प्रकरणावरून महाराष्ट्राच्या मातीत विद्वेषाची बिजे पेरण्याचे काम तीन वर्षांनंतरही अखंडितपणे सुरू आहे. भाजपचे वर्चस्व असलेले सरकार महाराष्ट्रात सत्तेवर येऊन दहा महिने उलटून गेले आहेत आणि प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला आहे. तरीही राजकारण थांबत नाही.

भाजपची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत हत्या होऊनही जणू काही तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने हत्या घडवून आणल्याचा संबंधितांचा अविर्भाव असतो. पालघरचे हत्याकांड काळीज पिळवटून टाकणारे होते. महाराष्ट्राला काळीमा फासणारे होते. हत्या झालेल्या साधूंना न्याय मिळायला पाहिजे, दोषींना कठोर शासन झाले पाहिजे, परंतु त्यासाठी महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी, महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्यासाठी मोहीम चालवण्याची आवश्यकता नाही.

पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ जमावाकडून झालेल्या हल्ल्यात त्र्यंबकेश्वरच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे महंत कल्पवृक्षगिरी उर्फ चिकणे महाराज (वय ७०), त्यांचे सहकारी महंत सुशीलगिरी (वय ३०) आणि वाहनचालक नीलेश तेलगडे (३०) अशा तिघांचा मृत्यू झाला. १६ एप्रिल २०२० रोजीच्या रात्री घडलेल्या या घटनेसंदर्भातील काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशीच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या वृद्ध साधूंवर जमाव क्रूरपणे हल्ला करीत होता आणि जमावाच्या हिंस्त्रतेपुढे पोलिसांचेही काही चालत नव्हते. किंबहुना पोलिसांनी स्वतःच्या जीवाच्या भीतीने साधूंना वाचवण्याचे निकराचे प्रयत्न केले नाहीत, हेही त्या व्हिडीओमधून दिसत होते. घटनास्थळावरील पोलिसांनी साधूंच्या संरक्षणाऐवजी स्वतःचा जीव वाचवण्याला प्राधान्य दिले. घटनेला तीन वर्षे उलटून गेल्यामुळे अनेकांना त्यातील तपशील आठवत नसतील. त्यामुळे जो अपप्रचार केला जातो, तेच वास्तव असल्याचा गैरसमज पसरू शकतो. त्यासाठी घटनाक्रम लक्षात घेणे आवश्यक ठरते.

आपल्या गुरूचे निधन झाल्याची बातमी कळल्यानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी तिघेजण मुंबईतील कांदिवलीहून गुजरातमधील सूरतकडे निघाले होते. सुरुवातीच्या काळात टाळेबंदी कडक होती. त्या काळात सरकारी यंत्रणेचा अधिकृत पास असल्याशिवाय प्रवास करता येत नसे. अंत्यदर्शनासाठी जायचे असल्यामुळे हे साधू मागचापुढचा विचार न करता तसेच सुरतकडे निघाले. पास नसल्यामुळे त्यांना चारोटी टोलनाका येथून पोलिसांनी परत पाठवले. कोणत्याही परिस्थितीत सूरत गाठायचे असल्यामुळे ते परत फिरून विक्रमगडहून जव्हार-दाभाडीमार्गे डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे रात्री साडेनऊच्या सुमारास पोहोचले. तेथून जवळच दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची सीमा सुरू होते. गडचिंचले आणि परिसरात आधीच्या काही दिवसांत चोर, दरोडेखोर लोकांच्या किडन्या काढून नेत असल्याची अफवा होती. काही मुस्लीम लोक पोलिसांच्या, डॉक्टरांच्या तसेच साधूंच्या वेशात येऊन मुलांच्या किडन्या काढून नेतात, अशीही एक अफवा होती. या अफवेच्या पार्श्वभूमीवर लोक लाठ्या-काठ्या घेऊन गस्त घालत होते. नेमक्या अशा लोकांच्या ताब्यात साधूंची गाडी सापडल्यानंतर जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. जवळच्या नाक्यावरील सुरक्षारक्षकाने पोलिसांना कळवले. घटनास्थळ पालघरपासून ११० किलोमीटर अंतरावर आहे, मात्र गस्तीवरील पोलिसांची गाडी जवळच असल्यामुळे पोलिसांनी तातडीने याठिकाणी धाव घेतली आणि साधूंना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु जमाव मोठा असल्यामुळे पोलिसांनाही त्यांचे संरक्षण करता आले नाही. वेळेवर घटनास्थळी पोहोचूनही पोलिसांना संबंधितांचे प्राण वाचवता आले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. घटनेचा जो व्हिडीओ व्हायरल झाला होता त्यात ते स्पष्ट दिसत होते.

चोर-दरोडेखोरांच्या अफवेमुळे गस्त घालणाऱ्या जमावाने चोर समजून तिघांची हत्या केल्याची ही घटना होती. देशभरात झुंडबळींच्या अनेक घटना घडल्या आहेत आणि त्या बहुतांश अल्पसंख्य आणि दलित समाजातील लोकांच्या हत्या घडल्या आहेत. पालघरच्या घटनेमध्ये हत्या झालेले भगव्या वेशातील दोन साधू दिसत असल्यामुळे काही प्रवृत्तींनी या घटनेला धार्मिक रंग देऊन तत्कालीन महाराष्ट्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. विशेषतः रिपब्लिक चॅनलच्या अर्णब गोस्वामी यांनी आपल्या चॅनलच्या टीआरपी वाढीसाठी या घटनेचा वापर करून घेतला. सत्ता गमावल्यामुळे बेचैन झालेल्या भाजपच्या नेत्यांना हिंदुत्व मिरवण्याची आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वापासून पाठ फिरवल्याचे चित्र निर्माण करण्याची आयती संधी यानिमित्ताने मिळाली. भाजपच्या देशभरातल्या नेत्यांनी वस्तुस्थिती जाणून न घेता पिसाळल्यासारख्या प्रतिक्रिया या घटनेवर दिल्या. ट्विटरवर, वृत्तवाहिन्यांवर तेव्हा निषेधाचा पूर आला होता. घटना हृदयद्रावक होती. संतापजनक होती, त्यामुळे तिचा निषेध होणे स्वाभाविक होते; परंतु इथे मुद्दाम होऊन प्रकरणाला धार्मिक रंग देऊन विद्वेष निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात होते.

हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा एक संशय व्यक्त केला जात होता. परंतु तसे असते तर तो त्यांच्या नियोजित मार्गावर व्हावयास हवा होता. तसे घडलेले नाही. हल्ला जिथे झाला त्या गडचिंचले येथे हे साधू येण्याची कोणतीही शक्यता नव्हती. चारोटी नाक्यावर गाडी अडवल्यामुळे वेगळ्या मार्गाने जायचे म्हणून त्यांनी गाडी या मार्गाने काढली आणि दुर्दैवाने झुंडीच्या ताब्यात सापडले. अपघाताने जुळून आलेला हा योगायोग होता आणि त्यात दुर्दैवाने साधूंसह तिघांना प्राण गमवावे लागले. कांदिवली ते चारोटी अंतर शंभर किलोमीटर आहे. कांदिवली ते गडचिंचले अंतर १२७ किलोमीटर आहे. गडचिंचले मार्गाने ते थेट गेले असते, तर त्या मार्गाने साधू जाणार असल्याची बातमी आधीच कुणीतरी पोहोचवली असण्याची शक्यता असू शकली असती. पण ते या मार्गाने आलेच नाहीत. थेट चारोटीला गेले. तिथे नाक्यावर अडवले म्हणून तिथून मागे फिरून चाळीस किलोमीटरवर असलेल्या गडचिंचले येथे आले. चारोटी नाक्यावर अडवले नसते तर ते गडचिंचले येथे आलेच नसते आणि ही घटनाही घडली नसती. पण अपघाताने आलेल्या या ठिकाणी त्यांच्यासंदर्भात जीवघेणी दुर्घटना घडली.

साधूंवर हल्ला करणाऱ्यांमध्ये बहुतांश भाजपशी संबंधित लोक असले तरीसुद्धा इथे पक्षीय विचार करणे योग्य ठरत नाही. कारण जमावाचे झुंडीत रूपांतर होते तेव्हा त्याला कोणताही पक्ष असत नाही. त्यामुळे अशा घटनांचा राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार व्हायला हवा. घटनेचे राजकारण करून धार्मिक विद्वेष पसरवण्याचे जे काम भाजपकडून करण्यात आले, त्यातून त्यांची मानसिकता दिसून येते. सत्ता नसल्याच्या काळातले त्यांचे वैफल्य समजून घेता येत होते. आता सत्ता आली आहे. प्रकरणाचा तपास त्यांच्याच सीबीआयकडे गेला आहे. राजकारण थांबवून सीबीआयच्या तपासाची वाट पाहिली, तर त्यातून शहाणपणा दिसून येईल. परंतु सत्तेमुळे शहाणपण येतेच असे नाही!

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in