राजकारणात संयम हवाच!

६२ वर्षे होऊन गेली अजूनही अनेक लढे देऊनही बेळगाव सीमा भाग महाराष्ट्रात सामील होऊ शकत नाही
राजकारणात संयम हवाच!

सत्ता आज येते, उद्या जाते. सत्तेचा अमर पट‌्टा कुणीही घेतलेला नाही. १३५ वर्षांच्या काँग्रेसची अवस्था आज काय झाली आहे? राहुल गांधींना भारत जोडो यात्रा काढावी लागते. जोडो करण्यापेक्षा राजकारणात मन जोडा, संयम पाळणे हे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तरी दोनच नेते दिसतात, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार, बाकीच्यांबद्दल न बोललेलेच बरे.

संयुक्त महाराष्ट्र झाला, त्यास ६२ वर्षे होऊन गेली अजूनही अनेक लढे देऊनही बेळगाव सीमा भाग महाराष्ट्रात सामील होऊ शकत नाही. याला कारणेही तशीच आहेत. कर्नाटक-महाराष्ट्र हे आज एवढी दुष्मनी राज्यं झाली आहेत की, पाकिस्तान-भारत त्यापेक्षाही काहीच नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केव्हा झोपतात, ते केवळ त्यांनाच माहीत, असे सांगून रात्रंदिवस काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी गौरव केला आहे. खऱ्या अर्थाने हा गौरव शिंदेंचे पूर्वीचे नेते उद्धवजी यांनी करणे आवश्यक होते. तसे झाले नाही. खरं पाहू गेल्यास मुख्यमंत्र्यांनीही या दिवाळीत मातोश्रीवर जाणे अगत्याचे होते. एवढ्या वर्षांचे ऋणानुबंध, संबंध तुटत नसतात- मुख्यमंत्री गेले असते तर त्यांचाच मोठेपणा उभ्या महाराष्ट्राला दिसून आला असता. त्यामुळे शिंदे हे किती संयमी मुख्यमंत्री आहेत, हे दिसून आले असते, परंतु दोन्ही नेत्यांत एवढं ताणलं गेलं आहे की, संयमाच्या दोऱ्या काही क्षणात तुटल्या आहेत. अशा वेळी अजित पवारांचे ते संयमी शब्द आठवतात. भाजपने मोठ्या मनाने शरद पवार, राज ठाकरे यांच्या शब्दांचा मान ठेवून अंधेरी पूर्वेतील आपला उमेदवार मागे घेतला. त्यावर शिवसेना नेत्यांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्या संयमी नव्हत्या. उमेदवार पडणार म्हणून भाजपने माघार घेतली, असे वक्तव्य सेनेच्या नेत्यांनी केले. त्याला अजितदादांनी चाप लावला. जेव्हा एखादी निवडणूक बिनविरोध होते, तेव्हा निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या नेत्यांच्या संयमी प्रतिक्रिया येतात, परंतु येथे तसे झाले नाही.

पराभव होणार म्हणून माघार, हे वक्तव्य संयमी नव्हते. यापूर्वी २०१९ मध्ये अंधेरी पूर्वमधून भाजपच्या याच बंडखोर आमदाराने ४५ हजार मते घेतली होती. यावेळी तर भाजप व शिंदे गट एकत्र असताना पराभवाची भीती भाजपला नव्हती. जेव्हा पराभवाची भीती होती व आकड्यानुसार मतेही नव्हती, तेव्हा राज्यसभेची एक व विधान परिषदेला एक जादा जागा जिंकून भाजपने शिवसेना, काँग्रेस पक्षाला धोबीपछाड दिला होता. त्यांनी भाजपला पराभवाची भीती सांगावी, ही संयम सोडण्याची लक्षणे आहेत. या उलट ज्यांनी बाळासाहेबांसारख्या हिंदुहृदयसम्राटाचा ‘टी बाळू’ म्हणून उल्लेख करणाऱ्या, बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचे नाट्य करून उभा महाराष्ट्र आठवडाभर धगधगत ठेवला होता त्या भुजबळांबरोबर हे सर्व विसरून मांडीला मांडी लावून केवळ सत्तेची खुर्ची उबवण्यासाठी एकत्र बसले. हे संयमी नेतृत्व होते का? राजकारणात कालचे शत्रू आजचे मित्र व आजचे मित्र उद्याचे शत्रू होऊ शकतात, परंतु ते दिवस आठवून संयम राखणेही महत्त्वाचे असते.

महाराष्ट्राच्या राजकारणात सुरुवातीचा काळ पाहिला तर तो संयमी नेत्यांचा होता. स्व. यशवंतराव चव्हाण हे द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी आपला संयम कधीही ढळू दिला नाही. आचार्य अत्रेंचा तोफखाना दैनिक ‘मराठा’मधून सुरू असताना स्व. यशवंतरावांनी कधी प्रत्त्युत्तर दिले नाही.

प्रतापगडावरील प्रसंग तर अक्षरश: रणसंग्रामाचा होता. संपूर्ण प्रतापगडास संयुक्त महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांनी वेढा घातला होता. यशवंतरावांनी खुष्कीच्या मार्गाने पंडित जवाहरलाल नेहरूंना प्रतापगडावर नेले. त्यावेळी यशवंतरावांनी जो संयमीपणा दाखवला, तो औरच होता, ते मात्र मोरारजी देसाईंना उमजले नाही. त्यांनी सत्याग्रहींवर गोळ्या झाडल्या. १०५ जणांचे प्राण घेतले. असे होते महाराष्ट्राचे राजकारण!

आजचे राजकारण हे केवळ सत्तासंपादनासाठी सुरू आहे. मग संयमीपणा राहणार कुठे? तत्त्वे, जाहीरनामे सर्व बाजूला ठेवून सत्तासंपादन हा एकच मार्ग, मग अशावेळी तो संयम राहिला कुठे? आजच्या सत्ताकारणात कुणीही धुतल्या तांदळासारखे नाही. नाहीतर ज्या बाळासाहेबांनी मुंबईतून लाल बावट्याला हद्दपार केले त्यांच्या चिरंजीवाने केवळ अंधेरी पूर्वची निवडणूक जिंकण्यासाठी लाल बावट्याला जवळ केले. उद्या तेथे भाजपने उमेदवार मागे घेतला नसता, तर कोण जाणे शिवसेनेने एमआयएमशी युती केली असती. नाहीतरी एमआयएमच्या खासदारांनी शिवसेनेबरोबर हात मिळवण्याचा प्रयत्न केलाच होता.

‘शिवसेना’ हा पहिल्यापासूनच आक्रमक असा राजकीय पक्ष! हिंदुत्ववादी विचार स्वीकारल्यानंतरच शिवसेना प्रथम औरंगाबादमध्ये पोहचली. त्यावेळी सेना आक्रमक होती. शिवसेनेत मनोहर जोशी, सुधीरभाऊ, लीलाधर डाके, दत्ताजी नलावडे यांच्यासारखे संयमी नेते होते. आता तसे नेते राहिले नाहीत. संजय राऊत, काल-परवा सेनेत आलेल्या अंधारे मॅडम, भास्कर जाधव हे नेते झाले आहेत. बाळासाहेबांचे अष्टप्रधान होते. बाळासाहेब आक्रमक, परंतु हे जवळचे नेते संयमी असल्याने शिवसेना कधी अडचणीत आली नाही. तो प्रसंग आजही आठवतो. काँग्रेसच्या बॅ. रजनी पटेल यांनी शिवसेना संपविण्याचा विडा उचलला होता, परंतु संयमी नेत्यांचा सल्ला घेऊन बाळासाहेबांनी स्व. इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीस पाठिंबा दिला. त्यावेळी शिवसेनेवर टीकेची झोड उठली, परंतु शिवसेना बचावली! वेळप्रसंगी बाळासाहेबांनी मुरली देवरा या काँग्रेस नेत्यास मुंबईचे महापौर देखील केले होते.

एवढेच कशाला, राज ठाकरे बाहेर पडले तो काळ! बाळासाहेब व्यथित झाले, परंतु त्यांनी नारायण राणे बाहेर पडल्यानंतर जो आक्रमकपणा दाखविला तो राजच्या वेळी दाखवला नाही. बाळासाहेबांनी त्यावेळी खूप संयम दाखवला. बाबासाहेबांना हे माहीत होते की, राणे व राज हे उद्धव यांनाा सेना कार्याध्यक्ष केल्यामुळेच बाहेर पडले. राणेंवर ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी संयम सोडून आक्रमकपणा दाखविला तो ‘राज’च्या बाबतीत नव्हता. त्याला कारण रक्ताचे नाते हेच होते. ‘राज’ यांचा पुण्यातील आरतीचा फोटो पाहिल्यास ‘राज’ हे बाळासाहेबांचे कॉपीच वाटतात.

बाळासाहेब हयात असताना त्यांनी राजच्या विरोधात मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रचारही केला, परंतु रक्ताची माणसं जेव्हा बाजूला होतात, तेव्हा खऱ्या अर्थाने संयम ढळतो. परंतु बाळासाहेबांनी त्या काळात राजच्या बाबतीत संयम ढळू दिला नाही. बाळासाहेबांचा मृत्यू होईपर्यंत त्यांना वाटत होते या दोन चुलतभावांनी एकत्र यावे; परंतु ते झाले नाही. येथे तर उद्धव यांचे एकच चुकले की, जेव्हा ४० सत्तेतील आमदार, मंत्री सुरत, गुवाहाटीला जातात ते राजपेक्षा मोठे बंड होते. गेली अनेक वर्षे ज्यांनी शिवसेनेचे बॅनर शिवसैनिक म्हणून लावण्यापासून ते तडिपारीपर्यंत शिक्षा भोगल्या, त्यांचे शिवसेनेत योगदान नक्कीच होते व आहे. त्यांना परत आणण्यापेक्षा प्रथम शिंदेंचे गटनेतेपद काढून घेतले. पुढे मध्यस्थ म्हणून जी माणसं पाठवली ती शिंदे ग्रुपमध्ये सामील झाली. सत्तास्थाने, मंत्रिपदे सोडून ४० सेना आमदार तर गेलेच; परंतु त्यांच्या समवेत १० अपक्ष, मंत्रीही शिंदे यांच्याकडे पोहचले. तेव्हा दोन पावले मागे येत संयम दाखवून उद्धव यांनी त्यांचे म्हणणे मान्य करणे आवश्यक होते ते झाले नाही.

आता कुणाचे बरोबर, कुणाचे चूक! हे दाखविण्यापेक्षा सर्वच राजकीय पक्षांनी संयम दाखवून राजकारण केले, तर ते पक्ष कधीही संपणार नाहीत, हे कटू सत्य आहे. व्यक्तिद्वेषाचे राजकारण कधी टिकत नाही. पक्षांतर होते. आजचे मित्र राजकारणात विरोधक होतात, तर आयुष्यभर विरोधी बोलणारे नेते मित्र होतात. मात्र पक्षांतर करून विरोधी नेते जेव्हा अन्य पक्षात जातात तेव्हा संयम राहत नाही. हेच पाहा ना, गोरे यांनी शरद पवार हे दाऊदचे हस्तक आहेत असे आरोप विधानसभेत भाजपचे आमदार असताना केले तेच गोरे हे शरद पवारांचे समर्थक होऊन राष्ट्रवादीत गेले आहेत. एकनाथ खडसे यांनी तर एकही मोका शरद पवार, राष्ट्रवादीविरोधात सोडला नाही. आरोप करणारे खडसे राष्ट्रवादीचे आमदार झाले आहेत. भान ठेवून, संयम ठेवून बोलतात ते कधी फसत नाहीत. मात्र संयम सुटला की, ‘मी कुठे’ याचे भान ठेवत नाहीत ते नेते राजकीय पटलावरून बाद होतात. संयम सुटल्याने राजकारणातून बाद झाले ना? तेव्हा ज्या राजकीय पक्षात आहात तेथे संयम पाळणे हे महत्त्वाचे आहे.

डॉ. पतंगराव कदमांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी विश्वजित कदम यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यावेळी बाळासाहेब थोरात, नाना पटोलेंनी विनंती केली की भाजपने उमेदवार न देता ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी देवेंद्रजींची भेट घेतली. भाजपचे आभार मानले. जर अंधेरी पूर्वला उमेदवार माघारी घेतल्याबद्दल शिवसेनेने आभार मानायचे सोडून द्या उलट पराभव होणार म्हणून भाजपने माघार घेतली, असे डिवचले. त्यावर महाविकास आघाडीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देऊन ‘समयसूचकता’ पाळा असा स्पष्ट सल्ला शिवसेनेला दिला. तो संयम होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in